*माझी सैन्य गाथा (भाग४)*

Submitted by nimita on 12 March, 2018 - 15:57

संध्याकाळी साडे पाच च्या सुमाराला गेस्ट रूम च्या बाहेर फेरफटका मारायला बाहेर पडले. सगळीकडे सोनेरी संधीप्रकाश पसरला होता. आकाशात केशरी, पिवळ्या रंगांची उधळण झाली होती. मी फिरता फिरता सहज मेस च्या मागच्या बाजूला गेले. तिथून खालच्या valley चा पूर्ण view दिसत होता. मला हरिश्चंद्रगडा वरच्या कोकणकड्याची आठवण झाली. खाली पाहिलं आणि नजर तिथेच खिळून राहिली. हिरव्या रंगाच्या इतक्या छटा मी पहिल्यांदाच पहात होते… जणू काही Asian paints चं green shade card च! शाळेत असताना कॅम्लिन ची वॉटर कलर्स ची पेटी असायची ना- ज्यामधे रंगांच्या चौकोनी वड्या असायच्या- तसे हिरव्या रंगाचे छोटे छोटे चौकोन दिसत होते दूरपर्यंत! जणूकाही वेगवेगळ्या छटा असलेल्या हिरव्या कापडी तुकड्यांची चादर आच्छादली होती जमिनीवर ! आणि त्यामधून नागमोडी वळणं घेत जाणारी लोहित नदीची धारा… त्या हिरव्या चादरीवर चंदेरी कलाकुसर केल्यासारखं वाटत होतं.
पायथ्याशी असलेल्या छोट्या छोट्या गावांमधे राहणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह चालायचा या चौकोनी जमिनीच्या तुकड्यांवर... उपजाऊ जमीन आणि शुद्ध हवा- पाणी… जमिनीतून हिरवं सोनं पिकत होतं.
बघता बघता अंधारून आलं. घड्याळात पाहिलं तर जेमतेम सव्वा सहा वाजले होते.
खरं म्हणजे खोलीत जावंसच नव्हतं वाटत, पण रात्रीच्या पार्टी ची तयारी करायची होती. ‘आणि तसंही आता तर काय, इथेच राहायचं आहे- त्यामुळे रोजच दिसणार आहे हा नजारा…’ असा विचार करून मी आत गेले.
I was really looking forward to the welcome dinner. त्या निमित्ताने मी आमच्या युनिट मधल्या सगळ्या ऑफिसर्स आणि ladies ना भेटणार होते. हा माझा इथला परिवार होता आणि मला लवकरात लवकर त्या परिवारात समाविष्ट व्हायचं होतं. पण एकीकडे थोडासा nervousness पण होता. कारण मी आज पर्यंत कधीही अशी आर्मी पार्टी अटेंड केली नव्हती..
तसं पाहता नितीन नी मला सगळं नीट समजावून सांगितलं होतं. Armed forces मधे hierarchy ला खूप महत्त्व असतं. काही protocols पाळावे लागतात. आणि punctuality तर खूप महत्त्वाची ! एक मिनिटाचा उशीर ही नाही चालत.
Ladies are treated with utmost respect and courtesy….... You are not a ‘woman’ here, you are a 'lady’.
येणाऱ्या प्रत्येक नव्या सदस्याचं अगदी मनापासून स्वागत केलं जातं आणि बघता बघता ती व्यक्ती या परिवारातलीच होऊन जाते.
आम्ही तयार होऊन बरोब्बर दिलेल्या वेळेला ऑफिसर्स मेस मधे पोचलो. युनिट मधले बाकी ऑफिसर्स आणि त्यांचे परिवार आधीच पोचले होते. ती पार्टी माझ्या स्वागतासाठी होती म्हणून बाकी सगळे आमच्या आधीच येऊन आम्हाला वेलकम करायला तयार होते.
मी सगळ्यांना अभिवादन करून आत गेले. मला ante room मधल्या मुख्य सेंट्रल सोफ्यावर बसवण्यात आलं. मी हळूच त्या खोलीत चौफेर नजर फिरवली. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल सारखी सजावट होती तिथली.
‘Mess’ चा डिकशनरी मधला अर्थ आणि या ‘mess’ चा अगदी दूर दूर पर्यंत काहीही संबंध नव्हता. इथे सगळं कसं अगदी proper होतं.. elegance आणि style ठिकठिकाणी दिसत होती. थोड्याच वेळात आमच्या युनिट चे commanding officer (CO) आणि त्यांची पत्नी आले. ते युनिट मधले सगळ्यात सिनियर ऑफिसर असल्यामुळे त्यांना सगळ्यात शेवटची वेळ दिली गेली होती .. मी आधी सांगितल्या प्रमाणे आर्मी मधे hierarchy ला खूप महत्त्व दिलं जातं. कुठल्याही कार्यक्रमात seniority च्या हिशोबानी येण्याची वेळ दिली जाते. थोडक्यात सांगायचं तर- सगळ्यात junior असतील ते सगळ्यात आधी येतात आणि सगळ्यात सिनियर असतात ते सगळ्यात शेवटी!
It is a way of showing respect to the seniors. आणि म्हणूनच प्रत्येक जण त्याला दिलेल्या वेळेनुसार हजर असतो.
जेव्हा CO नी हॉल मधे प्रवेश केला तेव्हा सगळे ऑफिसर्स उठून उभे राहिले…. हो, armed forces मधे सिनियर ऑफिसर्स आणि ladies ना respect दाखवण्यासाठी म्हणून ते येताच सगळे उभे राहतात.. इतकंच नाही तर समजा एखादी lady किंवा सिनियर काही कारणासाठी आपल्या जागेवरून उठले तर लगेच बाकी सगळे ऑफिसर्स पण उभे राहतात.
पण हा नियम फक्त ऑफिसर्स आणि jawans करता आहे… ladies करता नाही. I mean a lady is not supposed to get up for any officer-irrespective of his seniority. आणि मला सगळ्यात जास्त tension याच गोष्टीचं आलं होतं. कारण कॉलेज मधे असताना मी तीन वर्षं NCC मधे होते. And we as cadets were supposed to salute all our instructors and officers. आणि ते आपल्याशी बोलत असताना सुद्धा आपण पूर्णवेळ ‘सावधान’ मधे !
त्या पार्श्वभूमीवर मला सारखी हीच भीती वाटत होती की ‘समोर इतक्या सिनियर ऑफिसर ला बघून मी सवयीप्रमाणे चुकून सावधान मध्ये उभी राहून सॅल्युट तर नाही ठोकणार ???’
त्या मुळे मी बसल्या जागीच एक हातानी सोफाचा arm- rest घट्ट पकडून ठेवला होता आणि मधून मधून स्वतःला च सांगत होते,” उठू नको, उठू नको!” (अर्थात मनातल्या मनात).
CO च्या पत्नीनी खूप आपुलकीनी माझी चौकशी केली- माझं शिक्षण, छंद वगैरे माहित करून घेतले. इतर ladies बरोबर गप्पा चालूच होत्या..बघता बघता मी त्यांच्यातलीच एक होऊन गेले.
थोड्या वेळानी एक ऑफिसर माझ्या जवळ आले आणि एक गुगली प्रश्न टाकला… मला म्हणाले,” मॅम, हमने सुना है की आप बहुत अच्छा गाती हैं।” मी त्यांच्या गुगली वर सिक्सर मारत म्हणाले,”हां, मैने भी अभी अभी सुना है… आप ही से !”
खरं सांगायचं तर मला त्यावेळी तिथे गाण्यासारखं एकही गाणं आठवत नव्हतं… ऐनवेळी सगळी चित्रविचित्र गाणी डोक्यात गर्दी करत होती. आम्ही NCC च्या कॅम्प मधे किंवा ट्रेकिंग च्या वेळी जी टाइमपास गाणी म्हणायचो ना ती - पण त्या वेळेकरता आणि त्या जागे करता तर ती अजिबात च योग्य नव्हती. मी थोडं इकडचं तिकडच बोलून टाळायचा प्रयत्न केला, पण त्यांनी सगळ्यांनी जाहीर केलं की ‘जोपर्यंत गाणं नाही ऐकवणार तोपर्यंत कोणीच घरी नाही जाणार.’
मग मी पण जास्त भाव न खाता एक गाणं म्हणून टाकलं….. पण आधीच सांगितलं होतं सगळ्यांना ,’ याचे जे काही परिणाम होतील त्यासाठी मी जबाबदार नाही!!!’
सगळ्यांनी शांतपणे बसून गाणं तर ऐकलंच पण नंतर चक्क टाळ्या ही वाजवल्या… एखादया माणसाला प्रोत्साहन कसं द्यायचं हे ‘आर्मी’ मधल्यांना बरोब्बर जमतं !
काही वेळानी मेस सेक्रेटरी (म्हणजे ऑफिसर्स मेस चे ‘इन चार्ज ऑफिसर’) माझ्यापाशी आले आणि त्यांनी मला जेवायला येण्यासाठी request केली.
आर्मी मधे जेवणाच्या वेळी पण काही प्रोटोकॉल्स पाळतात…. जर त्या पार्टी मधे मुलांना पण बोलावलं असेल तर सगळयात आधी मुलांना जेवायला दिलं जातं, त्या नंतर ladies आणि सगळ्यात शेवटी ऑफिसर्स. आणि इथेही रँक ची hierarchy पाळली जाते…. सगळ्यात सिनियर ऑफिसर सगळ्यात आधी आणि ज्युनिअर सगळ्यात शेवटी. Ladies च्या बाबतीत ही तसंच!
पण त्या दिवशी मी गेस्ट असल्यामुळे buffet table वरची सगळ्यात पहिली प्लेट मला दिली गेली. जेवण झाल्यावर थोड्या वेळानी CO आणि त्यांची पत्नी घरी गेले, आणि त्यानंतर एक एक करून सगळे जण आपापल्या घरी गेले.
अशा रीतीने भल्या पहाटे रुपाई च्या गेस्ट रूम मधे सुरू झालेल्या त्या जादुई दिवसाची सांगता लोहितपुर च्या गेस्ट रूम मधे झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन ऑफिसमधे गेल्यानंतर थोड्या वेळानी दोन तीन सिनियर ladies मला भेटायला आल्या. थोडा वेळ गप्पा मारल्या नंतर त्यातली एक जण म्हणाली,” चलिये, आपको युनिट में घुमा लाते हैं।” आम्ही सगळ्या जणी बाहेर आलो तर ऑलरेडी एक जीप थांबली होती गेट पाशी.
आम्ही सगळ्या जीपमधे बसलो आणि ड्रायव्हर नी जीप समोर दिसणाऱ्या एक छोट्याशा टेकडीच्या दिशेनी वळवली. तो सगळा डोंगराळ प्रदेश असल्यामुळे एकसंध सपाट जमीन अशी कमीच होती.. एखाद्या हिल स्टेशन प्रमाणे! त्या मुळे एका टेकडी वर ऑफिस कॉम्प्लेक्स तर जवळच्याच दुसऱ्या टेकडीवर ऑफिसर्स ची घरं, थोडं उतरून खाली गेलं की jawans ची घरं, एक छोटीशी MI Room( Medical Inspection Room), दुसऱ्या बाजूच्या रस्त्यानी वर चढून गेलं की ऑफिसर्स मेस आणि त्याच्या समोर CO चं घर !!! बस्स, अर्ध्या तासात सगळं फिरून झालं. एक छोटीशी कॉलनी असल्यासारखं वाटत होतं मला. पण या सगळ्यात मला कुठेच एकही दुकान, शाळा वगैरे काहीच दिसलं नाही. मी एकीला विचारलं,” यहाँ कोई मार्केट वगैराह नहीं दिखाई दिया। और स्कूल भी नहीं है। फिर आप सब के बच्चे किस स्कूल में जाते हैं? और आप सब्जी, ग्रोसरी वगैराह कहाँसे लाती हैं?”
त्यावर सगळ्या हसल्या आणि म्हणाल्या, “ यहाँ से १३ किलोमीटर पे एक गाँव है- तेज़ु’ - हमारे लिये सबसे पास वाला मार्केट उधर ही है। और हमारे बच्चे भी वहीं के स्कूल में पढते हैं। “ तसं पाहिलं तर १३ किलोमीटर म्हणजे काही जास्त अंतर नाहीये, पण त्या डोंगर दऱ्यांमधून चढउतार करत जायचं म्हणजे वेळ ही जास्त लागायचा. रोज सकाळी आर्मी चीच एक बस सगळ्या मुलांना घेऊन जायची शाळेत, आणि तिथेच थांबायची. दुपारी शाळा सुटली की सगळ्या मुलांना घेऊन परत वर यायची. जर कोणाला मार्केट मधून काही हवं असेल तर सामानाची लिस्ट आणि पैसे स्कूल बसच्या ड्रायव्हर ला द्यायचे, मग परत येताना तो सगळं सामान घेऊन यायचा. हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन होतं.
आमचं युनिट दर्शन होऊन मी परत गेस्ट रूम मधे आले. थोड्याच वेळात नितीन ही आला ऑफिस मधून. आणि आला तो एक खूषखबर घेऊनच. आम्हांला एक टेम्पररी घर allot झालं होतं. त्याच दिवशी दुपारी आम्ही आमच्या सगळ्या सामानासाहित आमच्या पहिल्या वहिल्या वास्तूत प्रवेश केला.
जरी तात्पुरतं असलं तरी ते माझं -rather आमचं दोघांचं पहिलं घरकुल होतं. मला अजूनही लक्षात आहे ते घर… खरं तर मी इतक्या वर्षांत वेगवेगळ्या गावांमधे army quarters मधे राहिले आहे, आणि त्यातलं प्रत्येक घर अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. एखाद्या घराच्या पुढे मोठी लॉन होती तर एखाद्या घरात मागे किचन गार्डन करता मोकळी जागा! कुठे घरा समोर एक lake तर कुठे वाऱ्याच्या झुळुकीबरोबर खिडकीतून घरात येणारे हलके फुलके ढग !!!! अशी ती सगळी घरं माझ्या मनात कायमची घर करून राहिली आहेत.
आमचं ते पहिलं वहिलं घरकुल सुद्धा असंच खास होतं. आमच्या घराला लागूनच अजून एका ऑफिसरचं घर होतं.
आमचं सामान तसं कमीच होतं आणि हे घर टेम्पररी असल्यामुळे आम्ही फक्त गरजेपुरतंच सामान unpack केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन ऑफिस ला गेल्यावर मी स्वैपाक करत असताना अचानक घराच्या बाहेर कुठलातरी आवाज यायला लागला. आधी तो आवाज लांबून कुठूनतरी येत होता..., नक्की कसला आवाज आहे ते लक्षात येत नव्हतं, पण गवताच्या सळसळण्याचा असावा असं वाटत होतं . मग हळूहळू आवाजाची तीव्रता वाढायला लागली. माझं कुतूहल काही मला स्वस्थ बसू देईना. मी बाहेर अंगणात जाऊन पाहिलं तर समोरच्या रस्त्यावरून एक महाकाय हत्ती येत होता, बरोबर त्याचा माहूत देखील होता. या आधी मी फक्त सर्कस मधेच असा चालत फिरता हत्ती पाहिला होता, आणि तोही लांबून! पण इथे तर अगदी जवळून बघायची संधी मिळाली होती.. तेवढ्यात माझी शेजारीण तिच्या छोट्या मुलीला -प्रियम’ ला घेऊन बाहेर आली- हत्ती दाखवायला म्हणून! जेव्हा तो हत्ती आमच्या समोरून जात होता तेव्हा प्रियम त्याला म्हणाली,”’बाय बाय elephant…” जणू काही तो तिचा मित्र च होता. मी जेव्हा तिच्या आईला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या,” हो, हा हत्ती इथलाच आहे. In fact, आपल्या युनिट चा एक मेंबर आहे. त्याचं नाव आहे ‘गजराज’!”..
त्याचं गजराज हे नाव तर मला लगेच भावलं, कारण तो होताच तसा.. अगदी राजेशाही थाटाचा. पण ‘आपल्या युनिट चा मेम्बर ‘ ??? आणि तोही एक हत्ती??? हे म्हणजे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं.
माझ्या चेहेऱ्यावरचं भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह बघून माझी शेजारीण म्हणाली,” फक्त आपल्या या युनिट मधेच असा हत्ती आहे, कारण आपल्या युनिट च्या अखत्यारीत काही जागा अश्या आहेत की तिथे पावसाळ्यात नदी आणि तत्सम जलाशय पार करून जायला फक्त हत्तीच समर्थ आहे! आणि गम्मत अशी की जेव्हा जेव्हा सैनिक संमेलन होतं, तेव्हा प्रत्येक वेळी हा गजराज तिथे बाहेर उभा असतो, like all other soldiers!!” हे सगळं ऐकल्यावर मी तर थक्कच झाले आणि तितकीच गंमत ही वाटली.
पण हे ‘सैनिक संमेलन’ म्हणजे नक्की काय असावं? नावावरून तशी कल्पना आली होती..माझ्या अंदाजा प्रमाणे ही CO आणि इतर ऑफिसर्स आणि जवान यांची मीटिंग असावी असं वाटलं. पण नंतर नितीन ला विचारून खात्री करून घ्यायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून घरी आल्यावर नितीन म्हणाला,” एक घर रिकामं झालं आहे कालच- म्हणजे permanent accommodation आहे एक. पण त्या घराच्या मागच्या बाजूला सगळं जंगल आहे म्हणून इतर कोणाला ते घर नको आहे. काय करायचं? आपण एकदा बघून येऊ ते घर आणि मग ठरवू.”
ठरल्या प्रमाणे आम्ही दोघं संध्याकाळी घर बघायला गेलो. ऑफिसर्स नेस च्या समोरच्या रस्त्यावर अगदी शेवटच्या टोकाला होतं ते घर. आणि खरंच घराच्या मागच्या बाजूनी जंगल सुरू होत होतं. तसं पाहिलं तर इतर घरांपासून थोडं दूर आणि एकाकी होतं. सुरक्षेच्या दृष्टींनी पाहता थोडं risky होतं. कारण मागे घनदाट जंगल आणि इतर घरं पण हाकेच्या टप्प्याबाहेर! पण का कुणास ठाऊक, मला ते घर बघता क्षणीच आवडलं होतं. जेव्हा मेन गेट मधून आत गेलो तेव्हा माझ्यासाठी अजून एक surprise होतं. ते घर जमिनीपासून काही फूट उंचावर होतं… म्हणजे शहरी भाषेत सांगायचं तर… अपार्टमेंट्स मधे कसं असतं- ग्राउंड फ्लोअर वर पार्किंग स्पेस आणि फर्स्ट फ्लोअर वर घर- काहीसं तसंच! फक्त या घरात खालची जागा (ग्राउंड फ्लोअर) पूर्णपणे रिकामी होती. आणि सिमेंट काँक्रिट च्या खांबांऐवजी बांबूचे खांब होते. घराची जमीन देखील लाकडाची होती.
मी तर सॉल्लिड खुश झाले हे सगळं बघून !!
पण एक प्रॉब्लेम होता- ते घर दोन भागांत विभागलेलं होतं . म्हणजे किचन, डायनिंग रूम आणि लिविंग रूम असा एक हिस्सा; आणि बेडरूम्स, वॉशरूम्स असा दुसरा हिस्सा! आणि या दोन्हीला जोडणारा एक ओपन पॅसेज . असं वाटत होतं की जणू काही एका पूर्ण घराला कोणीतरी मधून कापलंय आणि त्या दोन्ही भागांना लांब लांब ठेवलंय.
पण आधी सांगितल्याप्रमाणे मला ते घर पाहता क्षणीच भावलं होतं- अगदी love at first sight म्हणा ना! त्या मुळे मी लगेच माझा होकार दिला.
पण त्या घराची थोडी साफसफाई करायची गरज होती. त्या मुळे आम्ही दुसऱ्या दिवशी शिफ्ट व्हायचं ठरवलं.
त्या रात्री बराच वेळ मी ‘ नवीन घर कसं सजवायचं’ हाच विचार करत होते. त्या विचारांतच मला झोप लागली; पण मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक जाग आली. बाहेर कुठला तरी आवाज येत होता- अर्धवट झोपेत असल्यामुळे नीट कळत नव्हतं, पण लक्ष देऊन ऐकल्यावर असं वाटलं की जणू काही कुठेतरी पाणी पडतंय आणि तेही खूप जोरात! खिडकीचा पडदा बाजूला सारून पाहिलं ; पण बाहेर काहीच दिसत नव्हतं! काहीच म्हणजे अक्षरशः काहीच नव्हतं दिसत… बाहेरच्या बागेतली झाडं वगैरे सुद्धा … कारण बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता. लहानपणापासून जोरात पडणाऱ्या पावसा करता ‘मुसळधार’ हे विशेषण मी ऐकलं होतं. पण त्या दिवशी पहिल्यांदा शब्दशः ‘मुसळ’धार पाऊस बघितला. एक एक धारा अक्षरशः मुसळा एवढी जाड होती. आणि त्यामुळे जणू काही पाण्याचा पडदा च तयार झाला होता ! मी अवाक होऊन बघत होते; आणि माझ्याही नकळत मी नितीनला उठवलं, त्याला म्हणाले,” बाहेर बघ!” मी जितक्या excitement मध्ये त्याला खिडकीबाहेरचं दृश्य दाखवलं तितक्याच शांतपणे तो म्हणाला,” अगं, पाऊस पडतोय. त्यात काय बघायचं?” मी त्याला म्हणाले,” अरे हो, पण केवढ्या जाड धारा आहेत बघ ना….खरंच मुसळधार!” त्यावर तो म्हणाला, “ इथे असाच पाऊस असतो. “ एवढं बोलून तो परत झोपला. तेव्हा मला लक्षात आलं की हे सगळं माझ्यासाठी नवीन असलं तरी नितीन नी वारंवार अनुभवलं होतं. मला शाळेत शिकलेला संस्कृत श्लोक आठवला-’ अतिपरीचयाद अवज्ञा… .’
दुसऱ्या दिवशी दुपारी लंच नंतर आम्ही सामान हलवायचं ठरवलं होतं, पण दुपारी घरी आल्यावर नितीन म्हणाला,” मला दहा बारा दिवसंकरता तेज़ु ला जावं लागेल, TD साठी. TD म्हणजे टेम्पररी ड्युटी .” मी विचारायच्या आधीच त्यानी स्पष्ट केलं, आणि पुढे म्हणाला,” मी परत आल्यावर आपण घर शिफ्ट करूया का? म्हणजे दोघांना मिळून सगळं सामान नीट लावता येईल. नाहीतर तुला एकटीलाच करावं लागेल सगळं.” थोडा विचार करून मी म्हणाले,” नको, आत्ताच करूया शिफ्ट, तू येईपर्यंत मी हळूहळू सगळं घर नीट set करीन. नाहीतरी तू नसताना मी एकटी bore च होईन ना! नुसतं बसून राहण्यापेक्षा काहीतरी कामात busy राहीन! “ त्यानी विचारलं,” एकटी manage करू शकशील ना ?” त्यावर मी त्याला म्हणाले,”Just wait and watch !”
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे हाही भाग मस्तच आहे .घरात बसून वाचतानासुद्धा सगळ इमॅजीन होत तुमच लेखन वाचून.खूप कमी लोकांना इतक सुंदर लिहीता येत.त्यातल्या एक तुम्ही आहात.

<<< तसं पाहता नितीन नी मला सगळं नीट समजावून सांगितलं होतं. Armed forces मधे hierarchy ला खूप महत्त्व असतं. काही protocols पाळावे लागतात. आणि punctuality तर खूप महत्त्वाची ! एक मिनिटाचा उशीर ही नाही चालत. >>>

खरं आहे, पण मग एकदम सॅम माणेकशॉ यांची आठवण येते. सॅम माणेकशॉ म्हणजे बांगलादेशाच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार, भारताचे पहिले फिल्ड मार्शल. पण त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने दुखवटा जाहीर केला नाही, इतकेच कशाला प्रेसिडेंट, पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर, सैन्यदल-वायुदल-नौसेना यांचे प्रमुख यापैकी कुणीही त्यांच्या अंत्यविधीला हजर राहिले नाही. फाइव्ह स्टार डेकोरेटेड ऑफिसरची ही कथा, तर बाकीच्यांचे काय? फक्त बोलायच्या गोष्टी.

हो मलाही उत्सुकता आहे कारण गेल्या भागात त्या नोटवर लेख संपला होता, सो मला वाटले की त्याचीही काही भारी गंमत असेल
नॉर्थ ईस्ट मधला मुसळधार पाऊस एकदाच अनुभवला आहे त्यामुळे मुसळासारख्या धारा वाचून एकदम अगदी अगदी झाले
गजराज, नवीन घर अगदी समोर उभे राहून पाहतोय असे वाटतेय
लवकर पुढचा भाग येऊ द्या

<<तुमची लेखमाला अत्यंत आतुरतेने वाचत आहे. फारच सुरेख लिहीत आहात तुम्ही. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.>>
+११

सर्वांना मनापासून धन्यवाद! अश्या प्रोत्साहनामुळेच अजून लिहावंसं वाटतं.
आणि त्या दिवशी मी 'उठे सबके कदम' हे गाणं म्हणले होते. Happy