सहिष्णू सुखासिनता, गांधीवाद, सावरकरवाद आणि गांधीद्वेष

Submitted by अननस on 8 March, 2018 - 12:35

गांधीवाद आणि सावरकरवाद ही भारतातल्या समाजात अनेक दशके चालत आलेली विभागणी आहे. याच्यावर अनेक इतिहासकार, विचारवंत, राजकिय आणि सामाजिक विश्लेषक यांनी अनेक प्रकारे अभ्यास करून आपली मते मांडली आहेत. अस असले तरीही, या दोन मधला फरक आणि समाजामध्ये गांधीवादी विचारांचा प्रभाव असलेला गट आणि सावरकरवादी विचारांचा प्रभाव असलेला गट असे विभाग आणि त्यामध्ये असलेला वैचारिक किंवा तात्विक विरोध हा कायम राहिला आहे आणि माझ्यामते तो तसा यापुढे ही राहणार आहे.

या लेखाचा मुख्य मुद्दा हा कि ज्यावेळी आम्ही समाजकारण करू तेव्हा प्रामुख्याने समाज जो अनेक वेळा दैनंदीन व्यवहारीक जीवनाच्या पलिकडे जाउन, वैचारिकता जोपासणारा असतो, त्या समाजाची विभागणी करताना फक्त गांधीवाद किंवा सावरकरवाद किवा इतर विचारवंतांचे अनुयायी अशी न करता काही सुक्ष्म फरक समजून करणे आवश्यक आहे. मला जाणवलेला सूक्ष्म फरक आणि त्यातून आलेली विभागणी ही काही प्रमाणात अशा प्रकारची आहे - सहिष्णू सुखासीनता, गांधीवाद, सावरकरवाद आणि गांधीद्वेष. अजूनही समाजात विचारधारा असतील ज्या या लेखामध्ये आल्या नाहीत आणि वाचकांनी त्या विचार धारा जरूर मांडाव्यात.

गांधीवादा विषयी स्वतः गांधीजी असं सांगायचे, "I have nothing new to tell, truth and non-violence are as old as mountains". ही गांधीजींची नम्रता पण आहे आणि वस्तूस्थिती सुध्दा आहे अस मला वाटते. गांधीजींनी त्यान्च्या कार्यामध्ये काही मूल्य जपली ती म्हणजे, सत्य, अहिंसा, स्वावलंबन, प्रेम, काटकसर. वैयक्तिक मुल्य जोपासना आणि समाजातील किंवा मानवी मनातील सत्य प्रेमाला अवाहन या मध्यमातून गांधीजींनी एक मोठी सामाजिक आणि राजकिय चळवळ उभी केली ज्यामध्ये अबाल व्रुध्दांचा समावेश होता. एखादी अशिक्षीत, गरीब विधवा असो, किंवा लहान मूल असो, त्याला सत्य काय हे कळते आणि त्याची काच धरून ती व्यक्ती सत्याग्रहामध्ये सहभागी होउ शकते. अस सांगून त्यांनी सामान्य माणसाला सामर्थ्यशाली बनवले. यामध्ये गांधीजींचे महात्म्य आहे. वर लिहिल्या प्रमाणे अनेक इतिहासकारं, राजकिय आणि सामाजिक विश्लेषक यांनी गांधी कार्याचा आढावा घेतला आहे. त्याबरोबरच, "truth and non-violence are as old as mountains" या गांधींच्या विधानात सत्य देखील आहे कारण, सत्य, अहिंसा, अस्थेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य ही गांधीजींनी जोपासलेली आणि समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केलेली मुल्य पातंजल योग सुत्रामध्ये गांधीजींच्या १५-१६ शतके आधी आली आहेत.

सावरकरांनी जोपासलेल्या जीवनमूल्यान विषयी गांधीजीं येवढे कदाचित लिहीले गेले नसेल. पण प्रखर आणि उत्कट राष्ट्रप्रेम आणि मनामधल्या नैसर्गिक राष्ट्रप्रेमाला धरून समाजामध्ये एकात्मतेचे आवाहन, त्या बरोबर बुध्दीवाद , वैज्ञानिक द्रुष्टीकोन आणि अन्यायाचा विरोध करण्यासाठी प्रसंगी हिंसेचा वापर याला धरून सावरकरांनी समाज घडवायचा प्रयत्न केला. सावरकर आणि गांधीजी यांच्या समाज धारणे मधला फरक, यामध्ये योग्य काय, अयोग्य काय हा गेले ८-१० दशके न सम्पलेला वाद आहे, आणि ही विचार भिन्नता, समाजामध्ये होती आणि यापुढे सुध्दा राहील अस आपण ग्रुहीत धरायला हरकत नाही. प्रश्न गांधीवादी समाज असावा का सावरकर वादी असावा का अजून कोणत्या तरी राष्ट्रपूरुषा चा वैचारिक प्रभाव असलेला असावा ( जसे, आंबेडकर ज्यानी आत्मविकास, संघटन आणि त्यातून समाजविकास, आव्श्यक पडल्यास अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हिंसेचा वापर हा मन्त्र सांगितला) हा फारसा नाही. समस्या खरीतर ही आहे कि राष्ट्र पुरूषांच्या विचार धारणा समाज घडवत असल्या तरीही एक मोठा त्यान्चा प्रभावित वर्ग त्यांच्या काहीच धारणा धरत असतो. उदाहरण द्यायचे झाले तर, गांधीजींचे महत्व समाज मना मध्ये असतानाच एक मोठा वर्ग असा होता, किंवा आहे ज्याला सहिष्णू सुखसीन असे आपण म्हणू शकतो ज्याला गांधीजींची अहिंसेची तत्वे किंवा सर्व धर्मसमभावाची तत्वे वैयक्तिक सुखभोगापुरती किंवा व्यवहाराची गरज म्हणूनच जपत असतो. त्याच्या पलिकडे जाउन, सत्य, स्वावलंबन, प्रार्थना, ब्रम्हचर्य, अपरिग्रह या गोष्टींचा गांधीजींनी आग्रह धरला त्या मध्ये सहिष्णू सुखासिन समाजाला विशेष रस नसतो. त्यामुळे वर वर बघायला गेले तर गांधी प्रभावित मोठा समाज असल्या सारखे वाटू शकते परंतू बहुसंख्य समाज हा गांधीवादी नसून सहिष्णू सुखासीन असतो.

सावरकर वादाविषयी पण असच सांगता येइल. आज अनेक माध्यमातून सावरकरांचे विचार समाजा पर्यंत पोहोचवंण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग अंदमान च्या सहली असोत, ' मी सावरकर बोलतोय' या सारखी नाटके असोत. यामध्ये रस घेणारा वर्गही वाढत आहे. पण यामध्ये सावरकर वादी आणि गांधी द्वेष्टा असा फरक करायला हवा. सावरकर वादी म्हणजे सावरकरांची मूल्य जोपासणारा हे स्पष्ट होउ शकते. पण हा वर्ग पण दुर्लक्षीत करून चालणार नाही, ज्यांच्या मध्ये सावरकरांचे अनूसरण यापेक्षा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, ब्रम्ह्चर्य, अपरिग्रह या मुल्यांना विरोध हा जास्त महत्वाचा भाग असतो. हा वर्ग अनेकदा सावरकरांच्या राष्ट्रप्रेमापेक्षा वैयक्तिक कुटूंब प्रेम आधिक धरणारा असतो. सावरकरांच्या वैज्ञानिक धारणां विषयी आदर व्यक्त करीत असणारा हा वर्ग कौटूम्बिक रूढींना सोडणारा किंवा सैल होउ देणारा नसतो. समाजातील लोक, नथुराम गोडसे चे कौतूक करणारे असले (नथूराम गोडसें ची क्रूती ज्यांना योग्य वाटते, ते सगळे याच गटात मोडतात असे नाही.) तरीही हा वर्ग सहसा प्रखर हिंदूवादाच्या फरसा जवळ जात नाही. या समाजातील लोक सहसा, सकाळी ४-२ म्हातार्या व्यक्तिंनी चालविलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत फारशा दिसत नाहीत. हिंदू असल्याचा अभिमान बाळगणारा हा समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी कल्याण आश्रमात, किंवा स्वामी विवेकानन्दांच्या कार्यात फारसा सहभाग घेत नाही.

अत्यन्त विवेकी असलेला हा वर्ग, वैयक्तिक विकासासाठी प्रयत्न करणारा असला तरीही आंबेडकरांप्रमाणे संघटीत होउन समाज घडवणारा असत नाही. त्यामुळे वर वर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव असणारा मोठा समाज वाटत असला तरीही तो सावरकरांचा अनुयायी कमी आणि गांधीजींचा द्वेष्टा अधिक असतो.

आमचा समाज समजून घेताना, समाजावर ज्यान्चा प्रभाव आहे ते राष्ट्रपूरुष समजून घ्यायला हवेतच पण त्याहून मह्त्वाचे म्हणजे त्यांना मानणारा पण वैयक्तिक जीवना मध्ये त्यान्च्या मूल्यांचा फक्त थोडासाच भाग जोपासणारा समाज समजून घेतला पाहिजे आणि सकारात्मक द्रुष्टीकोनातून स्विकारायला पण पाहिजे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गांधीवाद आणि सावरकरवाद ही भारतातल्या समाजात अनेक दशके चालत आलेली विभागणी आहे, हे पहिलेच वाक्य वाचून तुफान हसलो.
हे म्हणजे 'एव्हरेस्ट आणि गुलटेकडी ही भारतातली प्रमुख दोन शिखरे आहेत' असं म्हणण्यासारखं आहे.
आता उरलेला लेख वाचतो.

प्रॅक्टीकली कोणीही कुठलाही वाद पुर्णपणे आचरणात आणू शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती भिन्न असते. मला टोटल गांधीवाद आचरणात आणायचा असेल तर मी स्वत: गांधीच असायला हवे. मी फार तर त्या विचारसरणीच्या जवळ जाणारा आहे म्हणून स्वत:ला गांधीवादाचा समर्थक म्हणवत असेल ईतकेच.

तसेच मी त्याचवेळी माझ्या स्वभावधर्माला अनुसरून काही अंशी सावरकरवादी वा काही अंशी आंबेडकरवादीही असू शकतोच. कारण मुळात हे किंवा आणखीही जे वाद असतील त्यापैकी कोणतेही दोन वाद कधीच एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द नसतात. आपण आपल्या सोयीने आणि स्वत:ला जोखून आपल्याला हवे ते प्रत्येक महापुरुषाकडून उचलायचे.

गांधीद्वेषी वा सावरकरद्वेषी हे काही पटले नाही. तुम्ही जगातल्या कोणत्याही व्यक्तीचा सरसकट द्वेष करू शकत नाही. मग महापुरुषांचा आणि त्यांनी आखून दिलेल्या आचरणांचा तर नाहीच नाही. तुम्हाला फक्त त्यांच्या काही गोष्टी पटत नाहीत, आणि काही ज्या पटतात त्या कबूल करायची शरम वाटते ईतकेच.

π, एव्हरेस्ट भारतात आहे? Uhoh

बाकी वैय्यक्तिक पातळीवर बहुसंख्य माणसं मध्यममार्गी असतात हे ऋन्मेष चं म्हणणं मान्य आहे.

ही टेक्निकॅलिटी कोणीतरी काढेल असं वाटलंच होतं Happy पण दॅट इज बिसाईड द पॉईंट. सावरकरांबद्दल पूर्ण आदर बाळगून सुद्धा, त्यांचं भारतीय राजकारणातलं स्थान अतोनात वाढवून त्यांना गांधींच्या तोलामोलाचे रंगवणार्‍यांकडे पाहून हसू येतं. एका 'विशिष्ट सोशिओ-जॉग्रफिकल बॅकग्राउंडच्या' लोकांनाच ते एवढे महत्वाचे वाटतात, यामागचा कार्यकारणभाव सांगायला हवा का?

ऋर्‍न्मेष, तुमचे म्हणणे पटतय, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, आम्ही काही बाबतीत गांधी चे विचार आचरणारे काही प्रमाणात आंबेडकरांचे विचार आचरणारे किंवा काही प्रमाणात अजून इतर विचार आचरणारे असू शकतो.

गांधीद्वेष किंवा सावरकर द्वेष ही कदाचित काही विशिष्ट परिस्थिती मध्ये निर्माण झालेली अभिव्यक्ती असू शकते. सर सकट समाजाला गांधीद्वेषी ठरवणे कदाचित अन्याय कारक होइल. पण हे लक्षात घेतले पहिजे कि जो खरतर मूख्य मुद्दा अधोरेखीत करावासा वाटतो, कि राष्ट्रपुरूषाचा किंवा धर्माचा समाजावर खूप प्रभाव आहे असे दिसत असले तरीही अनेकदा समाज राष्ट्र्पुरूषांची किंवा धर्माची मुल्य कमी प्रमाणात जपणारा असून, प्रामुख्याने कुटुंब वत्सल सुखासीनता आणि विवेक जपणारा आहे. ज्याला फेरफटकाने 'मध्यम मार्गी' असा चांगला शब्द वापरला आहे.

आमच्या आजूबाजूच्या समाजाने वस्तूनिष्ट मूल्यमापन व्हायला हवं.

गांधीवाद आणि सावरकरवाद ही भारतातल्या समाजात अनेक दशके चालत आलेली विभागणी आहे, हे पहिलेच वाक्य वाचून तुफान हसलो.
हे म्हणजे 'एव्हरेस्ट आणि गुलटेकडी ही भारतातली प्रमुख दोन शिखरे आहेत' असं म्हणण्यासारखं आहे.
>>

डेव्हीड जॉन्सन किंवा डोडा गणेशची तुलना डेनिस लिली किंवा हॅरॉल्ड लारवूडशी करणं शक्यं नाही किंवा फॉर दॅट मॅटर उपुल चंदनाची तुलना शेन वॉर्नशी करणं जेवढं अशक्यं आहे तेवढंच गांधींची तुलना सावरकरांशी करणं अशक्यं आहे.

<<<बहुसंख्य समाज हा गांधीवादी नसून सहिष्णू सुखासीन असतो.>>>
बहुसंख्य समाज हा सहिष्णू सुखासीन असतो अगदी बरोब्बर.
त्यात गांधीवादी असण्याचा नि नसण्याचा काय संबंध?
हा वाद, हा प्रश्न गांधीवाद, सावरकरवाद यावर चर्चा करण्यासाठी असेल तर माझ्या मते सहिष्णू, सुखासिनतेचा इथे काही संबंध नाही.

सहिष्णू सुखासिन लोक गांधीवाद का सावरकर वाद यात लक्ष घालत नाहीत. सहिष्णू राहिल्यास सुखी रहाता येते हे कळल्या मुळे ते सहिष्णू रहातात. गांधी, सावरकर, आंबेडकर काहीहि म्हणू देत, हे लोक ठीक आहे, वा, वा म्हणतात, जमेल त्या मार्गाने पोटापाण्यापुरते किंवा हवे तेव्हढे पैसे मिळवण्याचे प्रयत्न करत रहातात नि घरी जातात, चंगळ करतात, पोटभर जेवतात नि ताणून देतात. म्हणजे सुखी रहातात. फुक्कट डोक्याला ताप नाही!
जे स्वतः सुखी असले नि नसले तरी समाजाला सुखाने जगू न देण्यासाठी उगाचच लोकांच्या भावना भडकवण्या साठी काही काही उकरून काढतात ते सहिष्णू हि नसतात नि सुखासिन असते तर असल्या भानगडीत पडले नसते..