व्यसन आणि डिप्रेशन, संबंध, कारण व उपाय – डॉ. मैथिली उमाटे

Submitted by अतुल ठाकुर on 14 February, 2018 - 08:57

मुक्तांगणला संशोधनासाठी मुलाखती घेत असताना डिप्रेशन आणि व्यसनाचा संबंध लक्षात आला. मात्र त्यावर त्यावेळी फारसे काम करता आले नाही. यावेळी आनंदयात्रीसाठी डॉक्टरांच्या मुलाखती घेण्याचे ठरल्यावर एक विषय “डिप्रेशन” हा घ्यावा असे ठरवले. मानसोपचारतज्ञ डॉ. मैथिली उमाटेंशी यासाठी संपर्क केल्यावर त्यांनी तत्काळ होकार दिला. भेटण्याची वेळ आणि ठिकाणही सांगितले. मॅडम मुंबईच्या प्रख्यात जे.जे हॉस्पिटल आणि वैद्यकिय महाविद्यालयात काम करतात हे मला माहित होते. प्रायव्हेट क्लिनिकमध्ये मुलाखत घेण्याऐवजी सर्वसामान्यांमध्ये मॅडम काम करतानाच त्यांच्याशी बोलावे असे वाटले. त्यालाही मॅडमची हरकत नव्हतीच. त्याप्रमाणे दुपारी त्यांना भेटण्यासाठी जे.जे. ला गेलो. ब्रिटीश काळातील जुनी दगडी अतिप्रचंड इमारत आणि त्यातील ओपीडीत दुसर्‍या मजल्यावर एका केबिनमध्ये त्या काम करताना मला दिसल्या. माणसे जात येत होती. ऑफीसमधील माणसे निरनिराळे कागदपत्र घेऊन येत होती. पेशंटस येत होते. एकंदरीतच मॅडम व्यस्त होत्या. मध्येच एक क्षण असा आला की तेव्हा त्यांच्या केबिनमध्ये कुणीच नव्हते. तेव्हा मी डोकावलो. त्यांनी हसून मला आत बोलावले. मैथिली मॅडमसमोर बसल्यावर आपण एका “स्कॉलर” समोर बसल्याची भावना येतेच. अवघड विषय सोपा करुन सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. बरोबरीने आधुनिक वैद्यकात मानसोपचारासंबधी जे काही रिसर्च, अभ्यास सुरु आहे त्याचेही त्या दाखले देत होत्या. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातील गंभीर, सहृदयी आणि अभ्यासू प्राध्यापिकाही लक्षात आल्यावाचून रहात नाही. फारसा वेळ न घालवता मी त्यांना “डिप्रेशन” या आजाराविषयी विचारले. त्याविषयी त्या म्हणाल्या.” हा मूडसचा आजार आहे. नैराश्य कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आयुष्यात प्रत्येकाला येते. मात्र आम्ही डॉक्टर त्याला डिप्रेशन आलंय असं म्हणत नाही. एखाद्या मुलाला शाळेत जायला आवडत नाही. तेथे गेल्यावर त्याला निराश वाटते मात्र घरी बसला की तो ठणठणीत असतो. हे डिप्रेशन नाही. एखाद्या सुनेचे सासूशी भांडण होते. तिला अतिशय निराश वाटते पण मैत्रिणींबरोबर ती बाहेर गेली की ताजीतवानी होते. हे ही डिप्रेशन नाही. जर दिवसातील बहुतेक वेळ नैराश्याची भावना आहे आणि असे पंधरा दिवसांहून जास्त काळ चालले तर डिप्रेशनचा आजार आहे असे आम्ही म्हणतो. सर्वसाधारणपणे माईल्ड, मॉडरेट आणि सिव्हीअर असे याचे तीन प्रकार असतात.” डिप्रेशनच्या व्याख्येपासून सुरुवात झाल्यावर मी व्यसनासंबंधी मॅडमना प्रश्न विचारत गेलो आणि एखादे अनोळखी दालन मैथिलीमॅडमनी माझ्यासमोर खुले केल्यासारखे वाटले.

पुढे मेंदूतील रसायनांच्याबाबत मॅडम म्हणाल्या की मेंदूतील डोपामाईन हे रसायन माणसाच्या आनंदाशी निगडीत असते. व्यसनाचा आनंद एकदा मिळाला की ते पुन्हा पुन्हा करावेसे वाटते याचे कारण हे डोपामाईन आहे. पुन्हा डिप्रेशनचा म्हणजे नैराश्य असल्याने त्याचाही संबंध डॉपामाईनशी आहेच. या रसायनाच्या असंतूलनाने डिप्रेशन जडते. व्यसन आणि डिप्रेशन यांच्यात संबंध असला तरी प्रत्येक व्यसनी माणुस हा डिप्रेस्ड होतोच असे नाही आणि प्रत्येक डिप्रेस्ड माणुस हा व्यसनी होईलच असेही नसते. मात्र डिप्रेस्ड माणुस हा व्यसनी होण्याची शक्यता जास्त असते हे त्यांनी अधोरेखित केले. व्यसनी माणसांमधील वीस टक्के माणसे डिप्रेशनच्या आजाराचे बळी असु शकतात तर डिप्रेशनने ग्रासलेल्यांपैकी वीस ते तीस टक्के माणसे व्यसनी होण्याची शक्यता असते असे त्या म्हणाल्या. अनेकदा असे दिसते की माणुस निराशेने पछाडलेला आहे, उदास वाटते आहे, मनात निरनिराळे नको नको ते विचार येत आहेत. अशावेळी माणसे व्यसन करतात कारण त्यामुळे तात्पुरते मन बधीर होते आणि त्या विचारांपासून सुटका झाल्यासारखी वाटते. व्यसन आणि नैराश्यातला हा महत्त्वाचा संबंध मॅडमनी विशद केला. डिप्रेशन आणि व्यसन यातल्या काही लक्षणांमधला फरकदेखील त्यांनी मार्मिकपणे विशद केला. बहुतेकवेळा डिप्रेस्ड माणसे ही स्वतःलाच दोष देणारी (सेल्फ ब्लेमिंग) आढळतात. स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आढळतं. या उलट व्यसनी माणसांमध्ये इतरांना दोष देण्याचा स्वभाव दिसतो. मी व्यसनी नव्हेच असे “डिनायल”, थोडी घेतली की हात थरथरायचे थांबतात. गांजा ओढला की क्रियेटिव्हीटी वाढते हे ‘रॅशनालायझेशन” अशा तर्‍हेचे डिफेन्स मेकॅनिझम्स (स्वतःची संरक्षक यंत्रणा) व्यसनी माणसांमध्ये कार्यरत झालेले आढळतात. या उलट नैराश्याने पछाडलेला माणुस स्वतःलाच दोष देताना आढळतो. माझ्यातच काहीतरी कमतरता आहे अशी भावना तेथे दिसते. वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनने पहिल्या पाच आजारात नैराश्याच्या आजाराला स्थान दिले आहे. पाचात नैराश्याचा क्रमांक तिसरा आहे. अशा अतिशय महत्त्वाच्या आजाराचा नक्की कुठल्या व्यसनाशी जास्त संबंध आहे असे विचारले असता त्यांनी मद्यपानाकडे लक्ष वेधले. काही अभ्यासानूसार मद्यपि माणसांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरिक्षण आहे. अतिशय दु:खी वाटणे, सतत निराश वाटणे, चिंताग्रस्तता, अपराधी भावना, चीडचीड, कसलिही उमेद नसणे, अशा तर्‍हेची अनेक लक्षणे असलेल्या या आजाराचा स्त्रीशी असलेला संबंधही मॅडमनी मुद्दाम सांगितला.

स्त्री ही मुळात भावनिक व्यक्ती असते. घराची, विशेषतः आपल्या मुलांची जबाबदारी आपल्यावर आहे ही भावना स्त्रीमध्ये प्रबळ असते. आयुष्यात काही वाईट घडल्यास स्वतःलाच दोष देण्याची प्रवृत्ती स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते त्यामुळे डिप्रेशनची शक्यता आणि प्रमाणही स्त्रिमध्ये जास्त दिसून येते. त्यातच जर स्त्री व्यसनी असेल तर आगीत तेल पडल्याप्रमाणे घडते. आधीच समाजात तूलनेने पुरुषाचे व्यसन कह्यात असेल तर नजरेआड केले जाते मात्र स्त्रीच्या व्यसनाला क्षमा केली जात नाही. त्यामुळे व्यसनी स्त्री ही आपोआपच समाजापासून दूर फेकली जाते. बहुतेकवेळी व्यसनातून बाहेर येण्यासाठी ज्यातर्‍हेची मदत घरून अथवा समाजातून मिळणे आवश्यक असते ती पुरुषाच्या मानाने स्त्रिला कमी मिळते. या कारणांमुळे व्यसनी स्त्री ही डिप्रेशनम्ध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. व्यसनी स्त्रिया आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचेही प्रकार घडतात यामागे डिप्रेशन हेच कारण असेल असे सांगता येत नाही मात्र ते कारण असण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे मैथिली मॅडम म्हणाल्या. बरेचदा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा तो एक प्रयत्न असतो. जीव जाणार नाही अशा बेताने हाताला कापून घेणे हा त्यातलाच एक प्रकार. मात्र याकडे दुर्लक्ष करणे चुकिचे असते. ह्या स्त्रिया एक प्रकारे त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे हा सिग्नल देत असतात. बाहेरच्यांना या गोष्टी म्हणजे एक नाटक वाटू शकते. पण ते तसे नसून त्यांच्याकडे लक्ष दिले जाणे ही त्यांची भावनिक गरज असते. ज्याला सुईसाईडल टेंडेंसी म्हणतात त्याचे कारण हे नैराश्य असेल किंवा नसेलही मात्र स्वभावदोष हे त्याचे अतिशय महत्त्वाचे आणि प्रमुख कारण असु शकते. जर एखाद्या व्यक्तीत काही विशिष्ट स्वभावदोष असतील, त्यात ती व्यक्ती व्यसनी असेल आणि त्यात तिला नैराश्याने पछाडलेले असेल तर हे सर्व घटक एकत्र येऊन माणसे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना आढळतात असे मॅडम म्हणाल्या. व्यसनी व्यक्तीमध्ये हिंसक प्रवृत्ती अनेकदा दिसून येते. त्यामागे डिप्रेशन असू शकते का याला पुन्हा मॅडमनी हो आणि नाही असेच उत्तर दिले. स्वतःला इजा करून घेण्याची प्रवृत्ती असलेल्या माणसांमध्ये सहनशक्ती कमी झालेली असते. ज्याला “लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स” म्हणतात. स्वतःला इजा केली की शांत वाटतं असे ही मंडळी सांगतात. इथे नैराश्य आणि व्यसनाचा संबंध असू शकतो.

मात्र दारुच्या नशेत होणारे भास ज्याला मानसशास्त्राच्या भाषेत सायकॉसिस म्हणतात त्या भासांमुळे व्यक्ती हिंसक होऊ शकते. अनेकदा व्यसनी व्यक्तींमध्ये “डेलिरियम” ही अवस्था येते. त्या अवस्थेत माणसाला काही सुधरत नाही. माणसे “कनफ्युज्ड” असतात. अशा अवस्थेतही हिंसा घडण्याची शक्यता असते. या हिंसेचे स्पष्टीकरण करताना मैथिली मॅडमनी पुढे अतिशय चपखल उदाहरण दिले. व्यसनामुळे मनाचे ब्रेक्स ढिले पडतात असे त्या म्हणाल्या. एरवी जी गोष्ट करताना माणुस समाजाचा आणि आपल्यावर झालेल्या संस्कारांचा विचार करेल तीच गोष्ट दारु प्यायल्यावर करणे त्याला अगदी सोपे जाते. व्यसनाने मर्यादा सैल झालेल्या असतात. भीड चेपली जाते. त्यामुळे एरवी शांत असणारा माणुस व्यसन केले की राक्षस होतो. बायकामुलांवर हात उचलतो. सामान्य भाषेत सांगायचे तर त्याच्यात “डेयरींग” येते. या डेयरींग येण्याचा पुन्हा त्यांनी डिप्रेशनशी संबंध जोडला. निराश माणसांनी आत्मविश्वास गमावलेला असतो. त्यांची स्वप्रतिमा डागाळलेली असते. अशावेळी ही मंडळी आधार म्हणून व्यसनाला जवळ करतात. व्यसन केल्याने खोटा आत्मविश्वास वाढल्यासारखे त्यांना वाटत असावे. या सार्‍या गोष्टींचे स्पष्टीकरण करीत असताना मैथिली मॅडम वेळोवेळी आधुनिक जगात या विषयावर चाललेल्या अभ्यासांची उदाहरणे देत होत्या. निव्वळ सर्वेच नाही तर वैद्यकिय क्षेत्रात मेंदूवर जे संशोधन सुरु आहे त्याचेही दाखले त्यांनी दिले. एका अभ्यासानूसार व्यसनमुक्तांना व्यसन सुटल्यावर अनेक वर्षांनी व्यसनाचा विचार करण्यास जेव्हा संशोधकांनी सांगितले तेव्हा त्यांच्या मेंदूत तेच बदल घडण्यास सुरुवात झाली जे बदल ही मंडळी व्यसन करताना घडत होते. निव्वळ विचार केल्यानेच मेंदूत हे बदल घडत होते. आणि हे बदल “फंक्शनल न्युरो इमेजिंग” या नविन तंत्राने पाहता येत होते. एकंदरीतच मैथिली मॅडमच्या मुलाखतीत डिप्रेशन आणि व्यसन यांमध्ये संबंध निश्चित आहे हे लक्षात आले. मात्र त्याला अनेक पदर आहेत. ते संबंध गुंतागुंतीचे आहेत. त्याबद्दल एकच एक असे ठाम विधान करता येत नाही. यावर संशोधन सुरु आहे हे देखिल लक्षात आले. मुलाखतीच्या शेवटी जेथे जेथे व्यसन आणि डिप्रेशन यांचा संबंध येतो तेथे डिप्रेशन येऊ नये म्हणून काय उपाय करावेत यावर मॅडम सविस्तर बोलल्या.

व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालणार्‍या माणसांच्या स्लिप्स रिलॅप्स होतात अशावेळी त्यांना नैराश्याने ग्रासण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्या हातून ही चूक घडली हे मान्य करणे ही पहिली पायरी. त्यानंतर ही चूक पुन्हा घडणार नाही हे स्वतःला समजवणे ही दुसरी पायरी. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा चूक घडली म्हणजे आपल्या हातून चुकांची मालिका सुरु होणार असे नसते हे स्वतःला ठामपणे पटवणे ही तिसरी पायरी. आपल्या आयुष्यात आता वाईटच घडणार अशी भावना मनात येऊ देऊ नये. हे होण्यासाठी एखादा स्वमदत गट जॉईन करता आला तर पाहावे. त्याचा फायदा होतो. घरच्यांनी स्लिप आणि रिलॅप्सवर टिका न करता समजून आपल्या माणसाला समजून घेणे आवश्यक आहे. माणसाला भक्कम भावनिक आधार असेल तर तो यातून लवकर बाहेर पडू शकतो. व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालताना डिप्रेशन हा व्यसनाकडे पुन्हा वळण्याचा अतिशय धोकादायक घटक असू शकतो. त्यामुळे व्यसनमुक्ती टिकवायची असेल तर डिप्रेशनपासून दूर राहणे आवश्यक आहे हे मॅडमनी आवर्जून सांगितले. त्यासाठी काही उपायांची शिफारसही केली. माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे व्यसनमुक्तीची कास धरलेल्याने एकाकी, एकटे राहू नये. समाजात मिसळावे. नातेसंबंध, निर्व्यसनी मित्र, शेजार पाजार अशांशी संबंध राखून सामाजिक नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न करावा. अनेक ठिकाणी सत्संगाचे कार्यक्रम असतात. आपली श्रद्धा असल्यास अशाही कार्यक्रमांना जाण्यास हरकत नाही. व्यसनमुक्तीच्या पथावर चालण्याची सुरुवात करणार्‍या माणसाने स्वतःला कुठेतरी गुंतून ठेवावे. व्यसनात असताना काहीजण दिवसभर दारु पित राहतात. काहींची संध्याकाळ दारुत बुडालेली असते. व्यसनापासून दूर झाल्यावर त्यावेळात काय करावे हे या मंडळींना कळत नाही इतकी अचानक पोकळी त्यांच्या आयुष्यात निर्माण होते. अशावेळी नेहेमी पिण्याच्या ज्या वेळा असतील त्यावेळी स्वतःला सकारात्मक कार्यात गुंतवावे. व्यायाम, योगाभ्यास किंवा एखादा छंददेखिल अशावेळी उपयोगास येऊ शकेल. समाजात, नातेसंबंधात साजरे होणारे सणवार, सोशल गॅदरिंग्ज यांना आवर्जून हजर रहावे. संशोधनात असं ही दिसून आलं आहे की व्यसनी व्यक्तीमुळे घरातील इतर अनेक मंडळी डिप्रेशनने ग्रासलेली आढळतात. विशेषतः व्यसनी व्यक्तीच्या बायकांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. त्याबद्दल बोलताना मैथिलीमॅडमनी हा प्रश्न सर्व बाजूंनी विचारात घेतला.

त्या म्हणाल्या बायकांनी आपल्या नवर्‍याचं व्यसन हा आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू होऊ देऊ नये. तसे असल्यास नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते. त्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देण्यास सुरुवात करावी. मुलांकडे लक्ष देण्यास सुरुवात करावी. स्वतःच्या कामात रस घ्यावा. मुलांच्या अभ्यासात रस घ्यावा. नवर्‍याव्यतिरिक्त घरात इतर अनेक भावनिक नाती असू शकतात. त्या भावनिक विश्वाकडे लक्ष द्यावे. उदाहरणार्थ सासू सासरे असतात. त्यांच्याशी भावनिक संबंध जोडावे. मुले तर असतातच. त्यांच्या आयुष्याशी संबंध जोडावेत. स्वतःला एखादा छंद असेल तर तो विकसित करावा. आपण निव्वळ एका नवर्‍याची बायको नसून आई आहोत, सुन आहोत, बहिण आहोत, मुलगी आहोत हे विसरू देऊ नये. या नात्यांना महत्त्व द्यावे. आयुष्यातील सकारात्मक गोष्टींवर सर्व लक्ष केंद्रित करावे. हे झाले नवरा व्यसन करताना कसे वागावे याबद्दल. अनेकदा असे होते की नवर्‍याने व्यसन सोडले तरी बायकोच्या मनात कडवटपणा शिल्लक राहतो. जुन्या जखमा बुजत नाहीत. वळ नाहिसे होत नाहीत. त्यामुळे काही बायका नवर्‍यांना क्षमा करु शकत नाहीत. मनातल्यामनात कुढत राहतात. अशावेळी देखिल निराश वाटण्याची शक्यता असते. आणि व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालणार्‍या माणसासाठी पत्नी दाखवत असलेला कोरडेपणा धोकादायक ठरु शकतो. अशावेळी स्त्रीने भूतकाळाला वर्तमानात आणून आजचा दिवस खराब करु नये. आपल्या नवर्‍याला व्यसनाचा आजार आहे हे लक्षात घ्यावं आणि त्याने व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रामाणिकपणे जे प्रयत्न चालवले आहेत त्यावर लक्ष द्यावं. आज त्याच्या व्यसनमुक्तीमुळे आयुष्यात जो आनंद उपभोगायला मिळतो आहे त्याचा आस्वाद घ्यावा. भूतकाळ उगाळून वर्तमानाचा सत्यानाश करु नये. मुलाखत संपवताना मैथिली मॅडमनी भारतात असलेल्या डिप्रेशनच्या आजाराबद्दलच्या अनास्थेबाबतही कळकळ व्यक्त केली. अलिकडे व्यसनाचा आजार हा अगदी किशोरवयातल्या मुलांमध्येही दिसून येतो आहे. त्यामागे डिप्रेशन असण्याची शक्यता असते. आणि तसे असल्यास ते शोधून काढणे कठिण असते कारण मुलांना आपले नैराश्य कळतही नाही आणि सांगताही येत नाही. मात्र अगदी सुशिक्षितांमध्येही या आजाराबाबत असलेले अज्ञान धक्कादायक आहे असे त्यांच्या म्हणण्यावरून जाणवले. एखादा माणून डिप्रेस्ड असल्यास मित्र त्याच्या पाठिवर थोपटून असे एवढ्या तेवढ्याने कसला निराश होतोस? चल फिरायला जाऊ वगैरे सांगतात. आणि आजाराला उडवून लावण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती मात्र अगदी याउलट असते.

क्वचित आढळणार्‍या आत्महत्या वगळल्या तर डिप्रेशनमुळे माणुस मरत नाही. मात्र डिप्रेशनमुळे माणसाचे जे वैयक्तिक, आर्थिक, भावनिक नुकसान होते ते मात्र प्रचंड असते. माणसाची निर्मितीक्षमताच डिप्रेशनमुळे नाहिशी होते. काहीही करावेसे वाटत नाही . आणि काही केले तरी ते धड होत नाही. अशावेळी नैराश्याने पछाडलेल्या माणसांमुळे एकंदरीत समाजाचीच निमितीक्षमता, कार्यक्षमता कमी झालेली असते. डिप्रेशन हा माणसाचे व्यक्तीमत्व, त्याचा आत्मविश्वास, त्याची स्वप्रतिमा, त्याचे शारिरिक, मानसिक आरोग्य, त्याची जगण्याची उमेद, त्याची स्वप्ने, त्याची सृजनशीलता या सार्‍यांना कुरतडून माणसाला सर्वाथाने खिळखिळे करणारा आजार आहे. या आजारामुळे समाजाला आणि व्यक्तीला प्रत्यक्ष किंमत तर मोजावी लागतेच पण त्याहीपेक्षा फार मोठी किंमत अप्रत्यक्षपणे मोजावी लागते. कारण डिप्रेशनमुळे माणसाचा बराचसा र्‍हास हा पडद्याआड कुणालाही नकळत असा होत असतो. आशेची गोष्ट ही की त्यावर अत्यंत परिणामकारक उपाय उपलब्ध आहेत. खुपच डिप्रेशन असल्यास औषधोपचार आणि ते कमी झाल्यावर समुपदेशन अशा तर्‍हेने उपाययोजना केल्यास डिप्रेशनचा आजार नक्की बरा होऊ शकतो. असा निष्कर्ष मॅडमच्या बोलण्यातून निघाला. मुलाखत संपली. आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमात मॅडमनी मला वेळ दिली होती. मुलाखत सुरु असतानादेखिल माणसे येत जात होती, पेपर्सवर मॅडमच्या सह्या घेतल्या जात होत्या. त्यांचा सल्ला विचारला जात होता. उत्तरे देताना मैथिली मॅडम हसतमुखच होत्या. मी बाहेर पडलो. वळून पाहिले तर पुन्हा केबिनमध्ये कुणीतरी आले होते आणि मॅडम त्यांच्याशी बोलण्यात गुंतल्या होत्या. त्या प्रचंड इस्पितळात असंख्य माणसांचे दु;ख, वेदना, नैराश्य त्यांना पहावे लागत असेल. त्या मानसोपचार तज्ञ असल्याने उपाययोजना करण्याआधी अनेकांची दु:ख लक्षपूर्वक ऐकावी लागत असतील. अशावेळी मला गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली अनासक्ती आठवली. काम तर झोकून करायचं मात्र त्यात कुठेही आसक्त व्हायचं नाही. मैथिली मॅडमची काम करण्याची पद्धत पाहून आणि इतकं दु:ख आजूबाजुला वावरत असतानादेखिल त्यांच्या चेहर्‍यावरील न मावळणारे हसू पाहून ही अनासक्ती त्यांनी आपलिशी केली आहे असेच मला वाटले.

अतुल ठाकुर

(आनंदयात्री मध्ये पूर्वप्रकाशित)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<औषधोपचार आणि ते कमी झाल्यावर समुपदेशन अशा तर्‍हेने उपाययोजना केल्यास डिप्रेशनचा आजार नक्की बरा होऊ शकतो>>

समुपदेशन म्हणजे काय?
माझे अनुभव असे - ज्याला नैराश्य येते तो माणूस इतरांच्यात जास्त मिसळत नाही, इतरांची चौकशी, त्यांच्याशी बोलणे हे कमी करतो. मग आजूबाजूचे पण त्याच्याकडे लक्ष देईनासे होतात. नोकरी करणार्‍यांचे तर आणखी हाल - त्यांचा कामातला उत्साह कमी झाला तर नोकरी टिकणेहि कठीण नि दुसरी नोकरी मिळवणेहि कठीण.

बहुतेकदा ज्याला नैराश्य आले आहे त्यालाच कल्पना नसते की त्याच्या मनासारखे होत नाही याला कारण त्याचे नैराश्य आहे. पण इतरांना ते लक्षात येते. अश्या वेळी नुसते - काही नाही सगळे मनाचे खेळ आहेत, तू उगीच बाऊ करून घेतो आहेस, असे फुकटचे उपदेश करून काही उपयोग नाही.

जर नैराश्य आलेल्या माणसाला काही वेगळ्या विषयात, जसे खेळ, संगीत इ. मधे ओढले, किंवा त्यानेच आपणहून ठरवले की काही तरी केले पाहिजे, तर हळू हळू त्याला स्वतःलाही आनंद होऊ लागेल नि लवकर सुधारेल.
मी स्वतः काही उपाय केले ते म्हणजे माझे मित्र किंवा जवळचे यांना ज्या विषयात रस नाही ते विषय निवडले - बेसबॉल खेळणे, फूटबॉल पहाणे, गाणी ऐकणे ब्रिज क्लब, व्यायमशाळा इथे जाणे इ. नवीन मित्र, नवीन विषय.
चुक्कुनहि कुठल्याहि विषयावर कुणाशीहि चर्चा करू नका - ज्याला त्याला वाटते स्वतःलाच जास्त समजते! मग पुनः तुम्हाला वाईट वाटते.
कुठल्याहि वादविवादात मधे पडू नका, अगदी आपली बायको, मुले, जवळचे नातेवाईक असतील तरी. तुमच्या नैराश्यापायी तुम्ही जे सांगाल ते बहुधा बरोबर नसेल, मग पुनः मनःस्ताप!
फक्त स्वतःला आनंद होईल अश्याच गोष्टीत लक्ष घालावे!
म्हणजे हळू हळू तुम्हाला पुनः नेहेमीच्या मित्रमंडळात मिसळणे सोपे होईल.

समानशीले व्यसनेषु सख्यम| समव्यसनी माणसे चटकन मित्र होतात.इतके की ते मित्रासाठी चड्डी पण काढून देतील. वर्कहोलिक असणे हे पण व्यसनच. वाचनाचे व्यसन, खेळाचे व्यसन. खरेदीचे व्यसन, हॉटेलमधे जाउन चांगले चांगले खाण्याचे व्यसन, परोपकाराचे व्यसन.... अनेक यादी होईल. कुठल्याही छंद किंवा विरंगुळ्याचा अतिरेक हा व्यसनात रुपांतरीत होतो. कुठल्या मर्यादेपर्यंत त्याला छंद विरंगुळा म्हणायचे व त्यापुढे व्यसन म्हणायचे हे गणित बदलू शकते.ती सीमा काही वॉटर टाईट कपार्टमेंट नाही. सदगुण विकृतीमुळे देखील मानसिक कोंडमारा होउन माणसे कुठल्यातरी व्यसनाला जवळ करतात
एक चांगला लेख दिल्याबद्दल अतुल व डॉ मैथीली यांचे आभार

फक्त स्वतःला आनंद होईल अश्याच गोष्टीत लक्ष घालावे!
नन्द्या४३, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खरं म्हणजे डिप्रेशनच्या आजारात साधी सुई टोचली तरी सुरी भोसकल्यासारख्या वेदना होतात. प्रॉब्लेम हाच असतो की अनेकांना या दुखण्याचे गांभीर्यच कळत नाही. काहीवेळा एखाद्या घटनेमुळे आलेले नैराश्य ती घटना किंवा दु:ख संपले की जाते, जाऊ शकते, जायला हवे असा अनेकांचा समज होतो. पण तसे होत नाही. माणसाची उदासीनता तशीच राहते. मग उपचार करावे लागतात.

घाटपांडे काका आभार. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

<<घटना किंवा दु:ख संपले की जाते, जाऊ शकते, जायला हवे असा अनेकांचा समज होतो. >>
हे बरोबर आहे - ज्याप्रमाणे मेकॅनिक्स या विषयात शिकवतात त्या प्रमाणे एकाच वेळी अनेक फोर्सेस असतात, त्यांचा रिझल्टंट कसा काढायचा ते माहित पाहिजे, तरच कितपत परिणाम झाला, तो कमी करायचा असेल तर काय काय करावे लागेल हे सगळे शिकवतात. तसेच मानसिक रोगांचेहि आहे. फक्त मेकॅनिक्स मधे हे सगळे मोजता येते, फॉर्म्युले तयार आहेत, तितके मानसशास्त्रात सोपे नाही, म्हणून मानसोपचार तज्ञ लागतात.

मी गेलोहि होतो, पण शेवटी, लक्षात आले की माझा इलाज मलाच केला पाहिजे. मग पाच सहा वर्षे नुसते वाचन, नि चिंतन केले. यादी केली कशा कशामुळे नैराश्य आले, त्यावर काय उपाय करता येईल याचा विचार केला. फक्त माझ्या बाबतीत माझे नैराश्य माझ्या ज्या चुका लहानपणीच झाल्या त्यांच्या मुळे आहे पण त्या आता सुधारता येणार नाहीत. म्हणून मग आता काय करायचे हा विचार केला. त्यातहि एकच उपाय नाही, अनेक असतात. माझ्या बाबतीत -
१. पहिले दारू पिणे बंद केले. दारू फार वाईट. अगदी क्वचित प्यायलो तरी नैराश्याचा विचार बळावतो, म्हणून आता दारू बंद.
२. बोलताना, वागताना, अत्यंत जपून. फार मनमोकळेपणा करू लागलो, तर त्यातूनहि काहीतरी घडतेच म्हणून मग नवीन मित्र, नवीन विषय.
३. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त स्वतःला आनंद होईल अश्याच गोष्टीत लक्ष घालावे!
इ. इ.