व्यथा एका चिमणीची

Submitted by Pradipbhau on 26 February, 2018 - 06:32

व्यथा एका चिमणीची
सकाळची वेळ. गच्चीत फेऱ्या मारून व्यायाम करून खुर्चीवर विश्रांती घेत बसलो होतो. तेवढ्यात गच्चीच्या भोवताली चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडला. त्यातील एक चिमणी माझ्या बाजूला येऊन बसली. मी एकटक तिच्याकडे पहात होतो. मला जाणवले की तिला काहीतरी मला सांगायचंय. माझ्याशी संवाद साधायचाय. मलाही जरा आश्चर्यच वाटले.
ती चिमणी माझ्याशी बोलू लागली. आजचे वर्तमानपत्र पाहिले अन थक्कच झाले. मी जरा सावरूनच बसलो. कारण ती चिमणी आजच्या वृत्तपत्रातील एका बातमीविषयी बोलत होती. मोराची जशी राष्ट्रीय पक्षी म्हणून गणना झाली आहे तशी आम्हा चिमण्यांची गणना आता राज्य पक्षी म्हणून होणार असल्याचे वनमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आम्हाला आता राज्य पातळीचा दर्जा मिळणार.
पण भाऊ मला एक समजत नाही. राज्य पातळीपेक्षा आम्हाला जागतिक पातळीचा दर्जा द्यावयास हवा होता. कारण सवलती ध्यायच्या झाल्या तर राज्यपातलीवरील चिमण्या ओळखणार तरी कशा? आमच्यात भांडणे लावण्याची ही राजकारणातील नवी खेळी दिसतेय. मीही अंतर्मुख होऊन विचार करू लागलो.
ती चिमणी म्हणाली, तू मानव आहेस त्यात पुन्हा स्वार्थी. तुला काय कळणार आमच्या व्यथा. पूर्वी कसा आम्हाला मान होता. घराच्या अंगणात जाऊन बसले की मुठीने धान्य आमच्यापुढं फेकलं जायचे. पाणी पिण्यासाठी काठोकाठ पाण्याचे हौद भरून ठेवले जायचे. घरात गच्चीवर मुक्त प्रवेश होता. काळ बदलला. कौलारू घरे गेली. सिमेंट काँक्रेट चे बंगले झाले. घरटी बांधण्याची जागाच गेली.
तुला माहीत आहे आमच्या जातीत मानवाविषयी फार घृणा आहे. तुम्ही आम्हाला साधा स्पर्श केलात तरी आम्हाला पुन्हा आमच्या समूहात मिसळून घेतले जात नाही. त्यासाठी तर तुमच्यापासून आम्ही दूर असतो. अर्थात सगळीच मानवजात वाईट नाही. आजही काही घरात आम्हाला जागा आहे. तयार घरटी लटकवलेली असतात. त्यात आम्ही आमचे घर म्हणून सुखाने राहतो.
आता राज्यपक्षी दर्जा देऊन काय होणार आहे. शासनाकडे काही मागायला भांडत बसायला आम्ही काय मानव आहोत का? आमची ना संघटना. ना नातलग. चिमणा चिमणीचा आयुष्यभर जोडा. पोरबाळ झाली तरी पंखात ताकद आली की ते जातात भुर्रर्रकन उडून. ना त्यांना आमची काळजी ना आम्हाला त्यांची काळजी. पुढच्या पिढीसाठी साठवुन ठेवण हा तुमच्यासारखा प्रकार आमच्याकडे नाही.
असो आज खूप बोलले. मन अगदी हलक झाला. भेटू पुन्हा असे म्हणून ती बिचारी चिमणी भुर्रर्रकन उडून गेली. मी पुन्हां तिच्याकडे एकटक पहात राहिलो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच आमच्या टेरेसमध्ये चिमण्यांची तिसरी पिढी फुलतेय. तीन पिल्लांच्या चोची दिसतात. समाधानाची गोष्ट म्हणजे चिमण्यांनी परत घरोबा केला. मागच्याच वर्षी चिमण्यांचे घरटे आणले होते.