त्याची "मैत्रीण"

Submitted by स्वप्नाली on 21 December, 2017 - 12:02

ठरवलेल्या वेळेवर ती यायची नाही
आल्यावर सॉरी-बीरी नाहीच नाही
वाट पाहून कन्टाळालेला तो,
जराही रागावायचा नाही, कारण
ती त्याची मैत्रीण होती...

खूप बोलायची, खूप ऐकायची
मन-मोकळं हसायची
अवघड प्रश्न विचारून त्याला
अनुत्तरीत नाही करायची, कारण
ती त्याची मैत्रीण होती...

मुक्त-छन्द कवितेसारखी
साचेबंद राहायची नाही
रक्ताहून जास्त असलेल्या
नात्याला नावात बांधायची नाही, कारण
ती त्याची मैत्रीण होती...

हक्काची असून सुद्धा
हक्क गाजवायची नाही
त्याला प्रेम-पत्र लिहायची नाही,
ना कधी हिशेब मान्डायची, कारण
ती त्याची मैत्रीण होती...

सुख सांगायची, दु:ख मान्डायची
क्वचीतच कधीतरी भांडायची
रूसायाची नाही, ना
रूसवा काढायची, कारण
ती त्याची मैत्रीण होती...

त्याच्या डोळ्यातले वाचायची,
पण डोळ्यात हरवायची नाही
शपथा नाही, आणा-भाका नाही
पुढच्या भेटीचं वचन सुद्धा नाही, कारण
ती त्याची मैत्रीण होती...

भूतकाळाची उजळणी नाही
भविष्याबद्दल वर्तकं नाही
हसून निरोप घेताना, ती
मागे वळून कधी बघायची नाही, कारण
ती त्याची फक्त "मैत्रीण" होती...

-स्व.प्ना.ली.
१२/२१/२०१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users