छळू लागले जीवनाचे फिरंगी इशारे पुन्हा!

Submitted by सत्यजित... on 6 February, 2018 - 15:25

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा
छळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा!

कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली
तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा!

कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला
फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

पुन्हा लेखणीला नवा बाज चढला,लिहू लागलो
तुला पाहिले अन् जुने स्वप्न झाले,कुंवारे पुन्हा!

तुझी लाट झालो तसे वाटले की,विरावे अता
कुण्या वादळाने नको दाखवाया,किनारे पुन्हा!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users