पेन-प्रेम

Submitted by विद्या भुतकर on 13 February, 2018 - 20:05

काल संध्याकाळी एका अपॉइंटमेंट नंतर नवऱ्याची वाट बघावी लागणार होती. मग शेजारीच असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये गेले. इथले मेडिकल स्टोअर म्हणजे अख्खा बिग बझारच म्हटले पाहिजे. कॉस्मेटिकपासून दूध,ब्रेड अंडी आणि शिवाय औषधे असं सर्वच मिळतं. असो. त्या दुकानात गेले तर व्हॅलण्टाइन डे चे मोठाले बुके समोरच मांडलेले होते. त्याच्यापलीकडे मग ग्रीटिंग्ज वगैरे. आता या सगळ्या वस्तूत मन रमत नाही. त्या पलीकडे होती ती स्टेशनरी. आजपर्यंत डॉलर स्टोअर पासून आर्टस् स्टोअर पर्यंत सर्व ठिकाणाहून सर्व प्रकारचे पेन, पेन्सिल, रंग, कॅनवास उचलून आणल्या आहेत. तरीही पेन, पेन्सिल, रंगीत स्केचपेन असं दिसायला लागलं की मी तिथंच थांबते. त्यात मी एकटीच होते दुकानात, सोबत मुलं नाहीत म्हणजे अजून निवांतपणे बघायला मिळालं.

तिथेच मला दिसलं,"फाऊंटन पेन". त्यासोबत रिफिलची नळीही होती. एक उचलून घेतला. त्या आनंदात असतानाच मला अजून एक पेन दिसलं,"Pilot" लिहिलेलं. त्या पॅकेटमध्ये दोन पेन होते. मग तेही एक घेतलं. नवरा पोहोचला आणि मला निघावं लागलं. मुलांच्या क्लासला जायचं होतं. तर वाटलं, आता कधी मिळणार हे पेन उघडायला? मग त्यांच्या क्लासच्या बाहेरच एक पेपर घेतला आणि ते फाऊंटन पेनचं पाकीट उघडलं. त्या पेनमध्ये शाई घालण्यासाठी काही नव्हतं. ती शाई असलेली नळी फक्त पेनात बसवायची. नळी बसवून थोडं झटकायची सूचना दिली होती पाकिटावर. मी आपलं नाजूक हातानी झटकत होते, नवऱ्याने मस्त जोरात झटकला आणि 'हे घे' म्हणून हातात दिला. पेनातून शाई कागदावर उतरली आणि कित्येक वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या. Happy

तिसरीत असताना आई रोज पुस्तकातलं एक पान वहीत लिहायला सांगायची. आता मुलांची अक्षरं पाहता, तिने तसं का केलं असावं याचा अंदाज येतो. तेव्हा राग यायचा कधी कधी, पण एकदा तंद्री लागली की उगाच लिहीतही बसायचे. शाळेत असताना पेन्सिल जाऊन पेनने लिहायला कधी सुरुवात झाली ते आठवत नाही. पण हे नक्की आठवतं की शाईपेनची सुरुवात साधारण सातवीत झाली. आजोबांनी घेऊन दिलेलं. मोठं जाड शाईपेन मिळायचं ना, तसलं. खूप भारी वाटायचं. शाळेत जाताना पेनात शाई आहे ना हे पाहणं एक महत्वाचं काम होतं. नाहीतर ऐनवेळी शाई संपली की लोकांकडून उधार पेन मागावे लागायचे, तेही मिळाले नाहीत तर बसा तसेच. तर शाई भरण्यासाठीचे स्किल येण्यासाठीही बराच काळ गेला. ते ड्रॉपरने शाई भरून हात खराब न होऊ देणे फार जिकिरीचं काम होतं. शाईपेनने लिहिण्याची सवय लागल्यावर बाकी सर्व पेन फिके वाटू लागले होते. अगदी बाकी सर्वांकडे रेनॉल्डचे पेन आले ना तेव्हाही. फक्त एक प्रॉब्लेम होता, काही कागदांवर शाई पसरायची. मग त्यासाठी खास रेनॉल्डचे पेन वापरायचे. त्यातही ती नळी संपली की परत उधारी आलीच.

मला आवडायचं ते रात्री कधी लाईट गेली तर मेणबत्तीच्या उजेडात शाईपेनाने लिहिताना, चमकणारी अक्षरे. उगाचच एरवीपेक्षा जास्त सुंदर वाटायचं अक्षर. माझ्या वडिलांची त्यांच्या शाळेतील एक छोटी डायरी तेव्हा आम्हाला मिळाली होती, त्यात त्यांचे सुंदर अक्षरांत लिहिलेले सुविचार वगैरे होते. ते पाहिलं की आपणही असंच अक्षर काढावं असं वाटायचं. तर त्यांनी ते बहुदा बोरुच्या पेनाने लिहिले होते. म्हणजे लाकडी कोरीव टोक असलेली लाकडी लेखणी. अनेकदा मग तसेच पेन बनवून लिहिण्याचाही प्रयत्न केला होता. एकूण काय तर ते शाईपेनवरचं प्रेम फारच. आठवीत असताना एक माझा आवडता पेन हरवला आणि कित्येक महिने सापडला नाही. नवीन पेन आणला तरी त्या जुन्या पेनची आठवण यायची. तो परत सापडला पण त्यातली शाई सुकल्यामुळे त्याचे निब गंजले होते. मग पुन्हा तो कधी पूर्वीसारखा लिहिता झाला नाही. असो.

कॅम्लिनचे जाड मोठे निब असलेले पेनने लिहिणे म्हणजे कसरतच असायची. निब तुटले की ते आणून पुन्हा बसवणे हेही अवघड काम. त्यात हात खराब होणे ठरलेलं. मग एखादा चुकून ड्रेसला लागला तर झालंच. शिवाय शाई पेनाच्या टोकापर्यंत येण्यासाठी कितीतरी वेळा झटकावा लागायचा. असेच अनेकदा पेन झटकून शेजारच्या मुलं-मुलींच्या अंगावर शाई उडाली आहे. निबच्या आजूबाजूला कधी घाण अडकत असे, (कदाचित कागदाची असावी, माहित नाही), तर ती काढण्यासाठी वडलांच्या दाढीच्या ब्लेडचा वापर सर्रास व्हायचा. आता विचार केला तर किती मोठं 'सेफ्टी हॅझार्ड' होतं ते. असो. तेव्हा ते कधी वाटलं नाही. पुढे ते कॅम्लिनच्या मोठ्या निबचे पेनच्या जागी एकदम फक्त टोक दिसणारे, बाहेरून छान चकचकीत असलेले हिरोचे शाईपेन आले. त्यात शाई भरणेही सोपं होतं. पेनाच्या आतली नाली फक्त शाईच्या बाटलीत घालून ड्रॉपरसारखी वापरायची. सोपं काम होतं. त्यातही मला माझ्यापेक्षा माझ्याएका मैत्रिणीचं अक्षर तसल्या पेनाने छान येतं असं वाटायचं. आजही तिचं ते पेन आणि अक्षर आठवतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी वडिलांनी पायलट पेन घेऊन दिला. क्रीम कलरचा पेन, एकदम टोकदार असलेली निब आणि त्यातून येणारं सुरेख अक्षर.आवडलं होतं तेही. १०-१२ चे पेपर त्यानेच लिहिले. मधेच सोबतीला शाईपेन असायचंही.

शाळेत असताना अनेकदा वाटायचं, मैत्रिणीसारखं पेन असेल तर आपलं अक्षर किती भारी येईल. तिच्या पेनाचा आणि अक्षराचा हेवा वाटायचा. आजही त्या सर्व मैत्रिणीचं अक्षर ही त्यांची डोक्यात बसलेली एक जुनी ओळख आहे. तेव्हा एक पेन असताना दुसरा मागणं म्हणजे 'उधळपट्टी' होती. पोरं इकडे तिकडे वाटेल तसे पेन पेन्सिल टाकताना पाहिलं की आई-वडिलांचा व्हायचा तसाच माझाही संताप होतो. वडिलांच्या, आजोबांच्या पेनाला हात लावण्यास मनाई होती. काल नवीन पेन आणल्यावर मुलाने हात लावला, आणि मीही त्याला ताकीद दिली,"माझ्या पेनला हात लावलास तर बघ'. Happy चित्र रंगवण्यासाठी म्हणून काही रंगीत जेलपेन घेऊन आलेय तेही मुलांनी एकेक करुन वापरायला सुरुवात केली आणि मग ते इकडे तिकडे पडू लागले. तेव्हा कळू लागलं की मोठ्यांच्या पेनांना हात लावायची मनाई का होती. Happy

कविता,प्रेमपत्रं वगैरे लिहीपर्यंत नियमितपणे पेन वापरला जायचा. मध्ये अनेक वर्षं ते बंद झालं होतं. दीडेक वर्षांपूर्वी पेनाने कविता एका डायरीत लिहायला सुरुवात केलीय आणि तेव्हापासून हे पेन-प्रेम पुन्हा बळावत आहे. अगदी काहीवेळा छान लिहितेय म्हणून एखाद्या कॉन्फरन्सला देतात ते पेनही घरी घेऊन आलेय आणि अजूनही कधीमधी त्याने लिहिते. हात पूर्वीसारखा वळत नाहीये, तरीही इच्छा जात नाही. काल पायलट पेन आणि शाईपेन दोन्हीही एका दुकानात मिळाले तर इतकं भारी वाटलं. कालच लगेच कॅम्लिनचे होते तशा पेनचीही ऑर्डर दिली. पूर्वी एखादा पेन घ्यायची इच्छा असताना घेता यायचा नाही, आता परवडते तर का नाही घ्यायचे? काही दिवसांपूर्वी एक पेन हरवला आहे, घरातच, पण तो सापडत नाही म्हणून बेचैन व्हायला होतं. अशावेळी वाटतं की अजूनही पूर्वीचं काहीतरी आहे माझ्यात. कदाचित सर्वच काम लॅपटॉप वर असल्याने मला पेनचं आकर्षण वाटत असावं. बाकी क्षेत्रातील लोक अजूनही वापरत असतीलच की पेन. असो. उगाच नॉस्टॅल्जीक पोस्ट लिहायच्या नाहीत असं ठरवलं तरी, काल पेन पाहून जे वाटलं ते शब्दातीत होतं. त्यामुळे सगळं उतरवून काढलं आणि त्यांचे फोटोही शोधून पाहिले. हे काही डाऊन्लोड केलेले फोटो.

आणि हो, ते हँडमेड पेपर, डायऱ्या, रंगीत कागद यांच्यावर पुन्हा कधीतरी. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

camlin pen.jpghero pen.jpgLuxor-White-Pilot-Pen-Pack-SDL131538481-1-7afc7.jpgcamlin-ink-bottle-60ml.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy पायलटच असच पेन माझ्याकडे पण होतं. तेव्हा ५ रुपयांना मिळायचं, म्हणजे तसं महागच!

म्या पण शाईपेनाचा फॅन,
मी अजुनही हिरो आणि पायलटचा पेन वापरते.. पण फक्त काळी शाई>>>
यम्टेक पर्यंत शाईपेन वापरणार मी एकुल्ता एकच होतो. हाफिसात पण ink pen वापरतो ..

पायलट पेनाची शाई थोडी हिरवट निळी असायची त्यामुळे उठून दिसायची.
माझ्याकडे पार्करचं शाई पेन होतं.. फार सुंदर लिहिता यायचं त्याने!

आईग्ग ..एकदम खुपच्या खुप नॉस्टॅल्जिक झाले.
हीरो शाईचं पेन...रॉयल ब्लु शेड ची कॅमल वाली शाई...सगळं सेम टु सेम...
मी पण १०-१२ सगळे पेपर शाई पेन नेच लिहिले...आणि पेपर ला जाताना शाई ची बॉट्ल घेउन जायचे ते पण आठवलं...एक तिकडचे एक्सामिनर मला हसले होते की काय शाईची बाटली वगैरे घेउन आलीये म्ह़णुन... Happy
खुप मस्त लिहिलय...

मस्त लेख. एकदम सगळ्या आठवणी जाग्या झाल्या शाई पेन च्या.
तेव्हा चेलपार्क ची शाई वापरायची टूम निघाली होती मधे. कारण काय तर कॅम्लिन ची शाई सगळेच वापरतात.
छोट्या छोट्या गोष्टिंमधून मोठा आनंद देणारे जादुई दिवस होते ते Happy

camlin च्या शाईची सर पार्कर ला पण नाही, मी पुण्याला आलो की दोन गोष्टी आठवणीने घेउन जायचो, महाभ्रुंगराज तेल आणि camlin ची निळी शाई. बाकी चायना पेनची शाई काही दिवस वापरला नाही तर सुकुन जायची, मग परत पेनाच स्नान वगैरे करावं लागायच, पार्कर ला हा प्रॉब्लेम कधि आला नाहि.
माझि शाई पेनची सुरुवात एअरमेल ने झाली होती, त्यावेळी तो बहुतेक १० रु ला मिळायचा, (सध्या बहुतेक १०० रु ला आहे) नंतर एका मित्राने चायना पेन दिला होता मला आवडला म्हणून (त्यावेळेस ४० ला मिळायचा आणि ते तेंव्हा खुप खुप जास्त वाटायचे). त्याने अक्षर चांगलं यायचं.

मी पण पेन प्रेमी..शाईपेन,बॉलपेन,पायलट,जेलपेन अशी सगळीच पेन आवडतात.विशेषत: बॉलपेन ने लिहील्यावर त्या शाईचा वास कागदावर घ्यायला प्रचंड आवडतं मला..

नेहमीप्रमाणेच मस्त लेख विद्या. तू छोट्या छोट्या गोष्टी खूप छान फुलवून सांगतेस. मी तरी बर्‍याच वेळेला वाचता वाचता खूप रिलेट करते.
लहानपणी माझे अक्षर माझ्या बहिणीपेक्षा डावे होते. (अजूनही आहे) पण अगदी घाण नाही Happy तिला माझ्या आत्याने राजापाटी आणून दिली होती, बोरू आणि टाक सुद्धा. मला यातले काही मिळाले नाही पण पेन च्या बाबतीत आमची शाळाच आग्रही होती. शिवाय वडिल सुद्धा शाईचे पेन वापरावे याच आग्रहाचे होते. माझ्याही अनेक मैत्रिणी शाळेत शाईचेच पेन वापरायच्या. त्यामुळे कधी शाई संपली तर शाई, (काळी निळी आणि एक मैत्रिण तर जांभळी वापरायची) असे सर्व रंग उपलब्ध व्हायचे, ड्रॉपर, शाई पुसण्याचे कापड्. शिवाय ब्लेडही. आम्ही लिहिता लिहिता कधी अक्षर फिकट झाले तर ते ब्लेड चे पाते त्या निब मधून फिरवायचो मग शाईचा प्रवाह व्यवस्थित होऊन अक्षर पुन्हा ठळक दिसू लागायचे.
रेनॉल्ड चे पेन तेव्हा मला वाटते २ रुपयांना मिळायचे. पहिल्या पहिल्यांदा ते मला हातात धरताच यायचे नाही. कारण शाईचे जाड् पेन धरून इतकी सवय झालेली असायची की ते रेनॉल्ड चे पेन गळून पडायचे. मी दहावीची बोर्डाची परिक्षा सुद्धा शाईच्या पेन नेच लिहिली.
पायलट चे पेन हे दुर्मिळ होते आमच्यासाठी, ते कधी मधी फक्त हाती धरायला मिळे. मग हळूच एखादी सही किंवा आपले नाव त्या पेनने लिहून पाहिल्याचे आठवते आहे. अगदीच उदार झाले बाबा तर एखादा दिवस वापरायला द्यायचे शाळेत पण मोस्टली नाहिच.
रिफिल ला आमच्या काळी 'शिस' म्हणत. ती २५ पैश्याला मिळे. त्याचे ही लिहिणे कधी मधी फिकट झाले तर आम्हि पुढचे टोक काढून दुसर्‍या बाजूने फुंकुन त्या चिकट शाईचा प्रवाह रेग्युलर करत असू आणि परत ते टोक लावून लिहत असू. मात्रं ती शाई जर दुसर्‍या टोकाकडून बाहेर आली तर मात्र अत्यंत वाईट Sad ती एकतर चिकट असे आणि लगेच जात नसे. शाई च्या पेनची शाई परवडली पण बॉलपेन ची शाई नक्को रे देवा.
शाळेत जाताना रोज काही आम्ही शाईच्या बाटल्या न्यायचो नाही (निदान मी तरी) कारण त्या बाटल्या आपटून फुटणे हे ठरलेले असायचे. मग रोज शाळेला जाताना चेक करून त्यात शाई भरायची. अगदीच विसरली तर शाळेजवळ शिवस्वरूप नावाचं स्टेशनरीचं दुकान होतं तिथे १० की २५ पैश्याला हवी ती शाई भरून मिळे.

नन्तर शाईच्या पेन शी संपर्क तुटला. पण इथे नोकरीला लागल्यावर मी पुन्हा एकदा शाईचे पेन जवळ जवळ ५.५ वर्ष वापरलं इतकं सुंदर होतं ते. फक्त त्याची निब छोटी होती. पुण्याच्या व्हिनस मधून घेतलं होतं (कोथरूड ब्रँन्च) नन्तर ते खराब झालं. पुन्हा तसं पेन मला मिळालं नाही ते फक्त ३० रुपयांचं होत्तं. नन्तर अनेक पेन वापरून पाहिले पण जम्या नही. अगदी १००-२०० ३०० रुपयांची ही पेनं आणून वापरून पाहिली, पण वो बात जमी नही.

आता बॅक टू बॉलपेन. पण मनात शाईच्या पेन च्या आठवणी ताज्या झाल्या तुझ्या लेखाने Happy

खुपच नॉस्टॅल्जिक केलत ब्वॉ तुम्ही. एकदम जिव्हाळ्याचा विषय. शब्द नि शब्द आवडला.
हिरो चा पेन आपल्याकडे असणे, हा एक स्टेटस सिंबल होते. तो पेन मिळवण हे शेवटी स्वप्नच राहीलं. नाही म्हणायला एक वालेटी चा खूप सुंदर पेन होता, पण तो चोरीस गेला.

w5_1.jpg

मस्त लेख. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मलापण लिहायला खूप आवडायचे, पाचवी सहावीला असतांना एकदा मला गणपतीमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत एक पेन बक्षीस मिळाले. ते माझे पहीले शाईचे पेन, आणी त्या नंतर जी लिहायची आवड लागली, ती नंतर बरीच वर्ष होती.

व्वा एकापेक्षा एक भारी कमेंट्स आहेत.
दक्षिणा, ते दुकानातून २५ पैशाला शाई भरुन आणणं विसरलेच होते मी. आणि बॉलपेनच्या नळीतून फुंकून पुढे ढकलनेही. मस्त आठवण करुन दिलीस.
हस्ताक्षर स्पर्धेत माझा नंबर कधी आला नाही, तो नेहमी माझ्या नंतर जास्त घट्ट झालेल्या मैत्रिणीचा असायचा. आता तिच्या मुलाचं सुंदर अक्षर पाहिलं की ते दिवस पुन्हा आठवतात.
चेलपार्क कधी वापरली नाही मी. कॉलेजच्या पहिल्या वर्षी ज्यादा पेन न्यायची सवय होती, त्याप्रमाणे घेऊन गेले होते. माझ्या मागे बसणारा एक क्लासमेटने त्याची शाई संपली म्हणून एक पेन उधार घेतला होता. तेव्हा एव्हढी ओळख नव्हती, पण त्यानंतर पुढे चार वर्ष ही आमची परंपरा झाली होती, मी त्याच्यासाठी एक ज्यादा पेन ठेवण्याची. Happy
हिरवट निळी शाई, काली शाई, जांभळी शाई, किती ते प्रकार. बोलू तितकं कमीच आहे. लिहिताना खूप वाहवत गेल्यासारखं वाटत होतं. प या सर्व कमेंट पाहून आपण एकटेच नाही याचा आनंद झाला.

आणि हो, हा लेख लिहिला १२-१३फेबु ला. आणि आज १४ सकाळी, नवऱ्याने पार्करचे सुंदर शाईपेन व्हॅलेन्टाईन्सचे गिफ्ट म्हणून दिले. त्याने सरप्राईज म्हणून आधीच आणून ठेवले होते. म्हणे, काल रात्री पोस्ट वाचली तेव्हाच देणार होतो. मी दोन पेन घेऊन आले तेव्हा तर फारच त्रास झाला त्याला. Happy असो, पेन भारी आहे. पण ऐकूनही घ्यावं लागलं की, "यासाठी तुला सरप्राईज गिफ्ट घेत नाही. :))
असो.
खूप छान कमेंटबद्दल धन्यवाद.
WhatsApp Image 2018-02-15 at 1.52.23 AM.jpeg
विद्या.

छान, नोस्टाल्जिक एकदम Happy तसंच शाळा सुरू झाली, की बाबांसोबत नवीन वह्या घेण्यासाठी जायचो. तेव्हा किंमत ऐकून बाबा चार दुकानं फिरवायचे. कळायचंच नाही की एवढं काय त्यात? चकचकीत , छान छान चित्र, मऊ आणि शुभ्र पानं असलेली वही मिळणं म्हणजे स्वर्ग ... पानांच्या क्वालिटीनुसार पेन वापरायचो मग. दहावीला अत्यंत गचाळपणे बॉलपेन वापरून पेपर लिहिले होते, बारावीला मात्र व्यवस्थित चायनाचा शाईपेन वापरून, सुंदर (माझ्या मते) अक्षरात सगळे पेपर लिहिले होते Happy

किती छान लिहिल आहेस, माझ्याकडे पण होता हिरो पेन आणि पायलट पण. परीक्षेच्या वेळी मात्र शाई पेनाला रजा कारण हात लागून शाई पसरायचा धोका असायचा Happy
मस्त क्युट आठवणी..

शाईपेनाच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. जूनमध्ये शाळा सुरू झाल्या की माझी आत्या मला दरवर्षी कॅम्लिनचा राखाडी रंगाचा नवीन पेन द्यायची.

हाच शाईचा पेन शाळेत एकमेकांच्या शर्टावर झटकून आम्ही मुले होळीच्या आदल्या दिवशी रंगपंचमी खेळायचो. आणि घरच्यांचा मारही खायचो.

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी एक जाडा ढोला, थोडासा बुटका, शेंदरी रंगाचा एक शाईपेन मिळायचा. मला फार आवडायचा. कोणाला आठवतोय का तो?

मी पण शाई पेन प्रेमी! पण मला fountain pen किंवा Pilot pen पेक्षा Stick Pen खूप आवडायचे. कारण त्यावर छान cartoons चे design असायचे!!!
Gel pen मध्ये Montax Hi-Speed अजूनही आवडीचे. (कारण ते माझ्यासारखेच slim आहे!!!)

मला वाटलं होतं पूर्वीच्या काळी जसे पेन-फ्रेंड असत तसे तुमचे कोणी पेन-प्रेम होते त्याविषयी लिहिलं असेल.

लेख अगदीच मुक्तपीठीय झाला आहे. किंवा एखाद्या निबंधासारखा म्हणता येईल.>> हे लिहिताना इतकी आनंदात होते पेन मिळाल्याच्या की फक्त बेसिक शुद्धलेखन ठिक आहे ना इतकेच पाहिले आहे. कसा असावा याचा विचार न करता लिहिला आहे.

मला वाटलं होतं पूर्वीच्या काळी जसे पेन-फ्रेंड असत तसे तुमचे कोणी पेन-प्रेम होते त्याविषयी लिहिलं असेल.>> ते लिहायचं राहिलंच. कॉलेजच्या तिसर्या वर्षी एका सिनियर्ला पत्र लिहायचे पेन फ्रेंड म्हणून. त्याचेही अक्षर सुंदर होते आणि छान कविता लिहायचा. आता प्रत्यक्षात ओळख आहे. तेव्हा फेबु वगैरे नसल्याने केवळ पत्रातून्च भेट व्हायची. हौस म्हणून झाले ते, नंतर कधी बंद पडले आठवत नाही. Happy

>>>>दीडेक वर्षांपूर्वी पेनाने कविता एका डायरीत लिहायला सुरुवात केलीय आणि तेव्हापासून हे पेन-प्रेम पुन्हा बळावत आहे. >>>>> वाह!!!

छान लिहिलं आहे. शाळेचे दिवस आठवले.

शाळेत मग वर्षातनं एकदोनदा पेन विकणारे लोक यायचे. प्रार्थना झाली की तो विक्रेता काहीतरी अद्भुत रंगाचे, अद्भुत प्रकारचे पेन दाखवायचा. एका टोकाला निळा बॉलपेन, दुस-या टोकाला लाल. शिवाय निळा, काळा, हिरवा, लाल असे चार खटके चार बाजूंना असणारा जाड पेन. जो खटका दाबू त्या रंगाच्या नळीचं टोक बाहेर येई. कचकड्याच्या प्लास्टीकच्या डबीतला दोन नीबचा सेट. पूर्ण पारदर्शक शाईपेन. एका बाजूला शाईपेन, दुस-या बाजूला बॉलपेन. छोटा ३-४ इंचाचा शाईपेन. खूप काही न पाहिलेलं.

सगळ्यात शेवटी हमखास पांढ-या रुमालावर, शर्टवर, टोपीवर शाई ओतून पोराला रडकुंडी आणायचं. आम्ही डोळ्यात प्राण आणून पहात राहू ‘आता?’ मग तो हुकमी प्रयोग. एक छोटी बाटली काढून त्यातलं ते पाणी त्या डागावर शिंपडलं की डाग गायब. आमचे डोळे या जादूनं तृप्त होत. ‘शॉल्लेट, आपल्याला पायजेच.’ पण पैसे कुठले इतके खिशात? मग तिथंच २-३ उधा-या करायच्या आणि ती बाटली अल्लाद दप्तरात ठेवायची.

त्याच दिवशी मग वर्गात ५-६ तरी पोरांच्या वहीत, शर्टवर शाईचे डाग पडायचे. त्या पोरांमध्ये बाटली घ्यायला उधारी दिलेलेच बहुत करून असायचे. मग सामाजिक बांधिलकी म्हणून मोठ्या जबाबदारीनं आपल्याकडच्या त्या जळजळ वास येणा-या बाटलीतल्या पाण्यानं ते डाग साफ करून देणे. हे कर्तृत्व वर्गातल्या मुलींनी पाहावं याची खास काळजी घ्यावी लागे.

मग ती बाटली अशीच कुठंतरी धक्का न लागेल अशी जपून जपून ठेवायची. कधीतरी खरंच वहीत शाईचा डाग पडतो. ती बाटली कुठं ठेवली हे आठवायचं म्हणजे अवघडच. भावशी भांडण, आईवर चिडचिड करून शेवटी ती बाटली सापडायची. कोरडीठक्क झालेली आणि आत पांढ-या पावडरचा थर.

आता परत ते पेनवाले येतीलच. तेंव्हा बाटली घेऊन आता नीट ठेवू. अशा ३-४ बाटल्या झाल्या. त्याच्या वापरापेक्षा खरेदीचा आनंद देऊन गेल्या.

त्यावेळी एअरमेलचे शाईपेन प्रसिद्ध. पाचवीला घेतलेला पेन दहावीपर्यंत एखाद्या वेळेला बदलावा लागे. फारतर फार नीबसाठी वर्षातनं एक दोन वेळा पैसे मिळत. शाळेत हरवला तर शोधल्याशिवाय घरी यायची सोय नव्हती.

आता पोरांना पेनचं ‘ते’ प्रेम उरलं नाही. लिहिताना थोडा अडकला तर त्यावर कोणताही उपचार करणार नाहीत. लगेच नवा पेन. नळीचं टोक काढणं, ती फुंकणं, हातात फिरवून गरम करणं, एका नळीचं टोक काढून दुस-या नळीला लावणं हे उद्योग त्यांना कमी प्रतीचे वाटतात. मग वर्षात ५-७ पेन होतात, जास्तीच. ४० रुपयांच्या पेनला ३० रुपयांची नळी. त्यामुळं नळ्या मिळतातच असंही नाही. (आता नळी म्हटलं तर दुकानदार विचित्र पाहतो. रिफील म्हणायचं ‘रि.....फी.....ल.)

शाळेचे पेनचे दिवस आठवून pain होतं मात्र आता. ‘गेले ते दिन गेले’. फारसं जाणं होत नाही. ती शाळा दिसत नाही. 'बे एक्क बेएएऽऽऽऽ' ऐकू येत नाही. शाईचे डाग पडलेले पोरांचे शर्ट, निळी निळी बोटं दिसत नाहीत.

सुकलेली शाई
झुकलेली शाळा
जुन्या आठवणींना
रुपेरी उजाळा

त्या दिवसांची आठवण करून दिलीत तुम्ही. धन्यवाद. खूप छान लिहीलंत. मस्त खुलवला आहे लेख.

खूप छान, आपण काही सुंदर गोष्टी मागे टाकून आलो ह्याचं वैषम्य वाटतंय,आतातर मी पांढऱ्यावर काळं क्वचितच करते सगळा की बोर्डचा मामला,लेख उत्तम

मी मुलगा झाल्यावर नोकरी सोडली. त्यानंतर आपली नोकरी सुटली यापेक्षा, आपली अन पेनची संगत सुटली यागोष्टीचेच फार वाईट वाटे. माझे अक्षर खूप सुरेख होते. काही वर्षांनी मुलाला शाळेसाठी पेन खरेदी करायची वेळ आली तेव्हा अगदी लहान मुलाच्या उत्साहाने खरेदी केले. मग लिहायला माझेच हात शिवशिवायला लागले तेव्हा उगीच घरात लागणार्या वस्तूंची यादी करायच्या निमित्ताने छोटी डायरी घेतली. मग आपसूकच डायरीत लिहिण्यासाठी म्हणून स्वतःसाठी एक पेन घेतले. त्यानंतर आजतागायत सतत डायरीत लिहिण्यासाठी म्हणून माझ्याकडे स्वतंत्र पेन असते जे मी घरात कुणालाही हात लावू देत नाही. डायरीत साधी वस्तूंची यादी लिहिली तरी आपलेच अजूनही बर्यापैकी असलेले हस्ताक्षर बघून मनातच खूप समाधानी वाटते.