पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ७. खामोशी (१९६९)

Submitted by स्वप्ना_राज on 12 February, 2018 - 05:53

रात्रीची शांत वेळ. कुठलंतरी हॉस्पिटल. पांढर्या कपड्यातल्या नर्सेसची तुरळक ये-जा. मंद वार्याच्या झुळुकीने हलणारे खिडकीचे पडदे. खिडकीला टेकून बाहेर बघत गात असलेला पाठमोरा तो. आणि हातात कालिदासाच्या 'मेघदूत' ची कॉपी घेऊन शांतपणे पायर्या चढत जाणारी ती. अधाश्यासारखं किती वेळा हे गाणं पाहिलंय आणि ऐकलंय काय माहित. काळीज कुरतडणाऱ्या चिंता आणि मेंदूचा भुगा करणारे प्रश्न दोन्हीच्या तावडीतून सुटायला दर वेळी ह्याच गाण्याने हात दिलाय. वेड लावणारी चाल आणि फक्त 'haunting’ ह्या एकाच शब्दाने वर्णन करता येतील असे शब्द.... "तुम पुकार लो......तुम्हारा इंतजार है". मरताना 'ही अप्रतिम गाणी ह्यापुढे ऐकायला मिळणार नाहीत' हे दु:ख होण्याएव्हढी शुद्ध देवाजीने बाकी ठेवलीच तर त्या गाण्यांच्या लिस्टमध्ये हे गाणं माझ्यासाठी 'पहले पायदानपे' असेल.

खूप वाट पाहायला लावली ह्या चित्रपटाने मला. आणि मग अचानक २०१७ संपताना एके दिवशी ब्लॅक अँड व्हाईट चॅनेल लावलं तेव्हा राजेश खन्ना एका तरुणीशी बोलताना दिसला. ती त्याच्याशी सगळे संबंध तोडत होती. अरेच्चा! ही तर ती 'हमने देखी है उन आंखोकी महकती खुशबू' गाणारी. मी अक्षरश: श्वास रोखून बसले. आणि तेव्हढ्यात स्क्रीनच्या खाली टिकर दिसलं 'You Are Watching Khamoshi’. देव पावला!

सुरुवातीलाच हे सांगून टाकलेलं बरं की मला एकंदरीत शोकांतिका आवडत नाहीत. आणि देवदास-स्टाईल प्रेमापेक्षा 'तू नही तो कोई और सही. कोई और नही तो फिर कोई और सही' ही विचारधारा मला जास्त प्रॅक्टीकल वाटते. पण असं असूनही ह्या चित्रपटाच्या कथेने मनावर गारुड केलंच. विषय पुरातन. प्रेमाचा. जीव लावण्याचा. ताटातूटीचा. विरहाचा. कथेची नायिका राधा. पेश्याने एका मानसोपचार करणाऱ्या हॉस्पिटलमधली नर्स. नुकतंच तिने देव नावाच्या तरुणाला प्रेमभंगानंतरच्या मानसिक धक्क्यातून सावरून पुन्हा माणसात आणलंय. स्त्रियांवरचा विश्वास गमावून बसलेल्या देवचा विश्वास संपादन करून, नंतर त्याच्या प्रेमात पडल्याचं नाटक करून हळूहळू त्याला त्याच्या मानसिक आजारातून बरं करणं हे ह्या उपचारांचं स्वरूप असतं. पण राधाचं दुर्दैव हे की नाटक करता करता ती खरंच देवच्या प्रेमात पडते. ज्या दिवशी ती त्याला हे सांगणार त्याच दिवशी त्याची आई तिला सांगते की देवची ती प्रेयसी परत आली आहे आणि त्यांचं लग्न ठरतंय.

कुठल्याही प्रेमात पडलेल्या व्यक्तीचं हे कळल्यावर जे होईल तेच राधाचं होतं. तिला धक्का बसतो पण ती सावरते. कोणालाच ह्याबद्दल काही सांगत नाही. अगदी देवसारखीच केस असलेल्या अरुण चौधरीवर तिला तिचा बॉस तसेच उपचार करायला सांगतो तेव्हाही ती देववर जडलेल्या आपल्या प्रेमाबद्दल चकार शब्द काढत नाही. स्वत:च्या प्रेमभंगाचं दु:ख ताजं असताना त्याहून वाईट स्थिती असलेल्या दुसर्या व्यक्तीशी प्रेमाचं नाटक करणं आपल्याला जमणार नाही हे लक्षात येऊन ती आधी अरुणवर उपचार करायला नकार देते. पण तिच्याऐवजी अरुणवर तसेच उपचार करायला जी दुसरी नर्स नेमली जाते तिच्या हातून राधासारखं काम होत नाही. आणि असाईनमेंट नाकारल्याने राधाचा बॉस तिच्यावर नाराज असतो. नाईलाजाने राधा अरुणवर उपचार करायला तयार होते. देववर जसे उपचार केले होते तसेच ती अरुणवर करते पण दैवाचे फासे असे पडतात की ह्यावेळी अरुण तिच्या प्रेमात पडतो. तो सुधारायला लागतो पण........

अहंहं......तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर कृपया ह्यापुढे वाचू नका. चित्रपट पहा Happy

मी ह्याआधी फारसे जुने चित्रपट पाहिले नसल्याने वहिदा रेहमानला फक्त गाण्यांत, कोहरा, बीस साल बाद अश्या चित्रपटांत आणि हो...त्या कुठल्याश्या चॉकलेटच्या जाहिरातीत मिस्कीलपणे शेवटचा तुकडा मटकावताना पाहिलं होतं. त्यामुळे तिच्याबद्दल माझं स्वत:चं बरं-वाईट असं काहीच मत नव्हतं. पण हा चित्रपट पाहिल्यावर मात्र एक स्त्री असून तिच्या प्रेमात पडायला झालं. प्रेमात पडलेली, कालिदासाचं मेघदूत घेऊन देवकडे आपलं प्रेम व्यक्त करायला जात असलेली हसरी मुग्ध तरुणी ते आपल्या व्यवसायाचा, कर्तव्याचा एक भाग म्हणून अरुणवर उपचार करायला तयार होणारी नर्स ते अंर्तबाह्य कोलमडून पडलेली स्त्री ही राधाच्या आयुष्यातली सगळी स्थित्यंतरं तिने विलक्षण उत्कटतेने साकार केली आहेत. कुठेही भडकपणा किंवा नाटकीपणा येऊ न देता. ‘तुझको रुसवा ना किया खुदभी पशेमा न हुये. इश्ककी रस्मको इस तरह निभाया हमने' म्हणणाऱ्या उमराव जानची आठवण होते. इथे एक नमूद करावंसं वाटतं की राधाच्या मानसिक स्थितीत फरक पडू लागल्यानंतर ती पायरीपायरीने ढासळलेली न दाखवता एका क्षणी एकदम पूर्णपणे कोलमडलेल्या अवस्थेत दाणकन समोर येते. कदाचित टीव्हीवर एडीटटेड चित्रपट दाखवला गेला असावा. किंवा तिच्यात झालेला हा बदल असा अचानक दाखवून प्रेक्षकांना शॉक देण्याचा दिग्दर्शकाचा हेतू असावा. तसं असेल तर तो नक्कीच साध्य झाला असणार. चित्रपटाची कथा माहित असूनही राधाची दशा पाहून मी हादरले. मात्र हेही कबूल करायला हवं की कितीही नाही म्हटलं तरी चित्रपट पहाताना मला राधाचा थोडा रागही आला. तिने अरुणची केस आपल्याला का घ्यायची नाही हे बॉसला स्पष्ट सांगायला हवं होतं की नाही?

अरुण बनलेला राजेश खन्ना एकाच वेळी cute and vulnerable दोन्ही दिसतो. मान हलवायची लकब त्याच्या गळ्यातली धोंड बनायच्या आधीचा हा चित्रपट असावा कदाचित त्यामुळे ती लकब इथे दिसत नाही. प्रेम ठरवून करता येत नाही हे ठाऊक असूनसुध्दा राधा ह्याच्या प्रेमात कशी पडली नाही ह्याचंच आश्चर्य वाटत राहतं. मी जिथून चित्रपट पाहायला सुरुवात केली त्यानंतर धर्मेंद्रचा चेहेरा अजिबात प्रेक्षकांसमोर आला नाही. 'तुम पुकार लो' मध्ये तो पाठमोरा आहे आणि नंतर राधाला पाठवलेल्या पत्रातून त्याचा फक्त आवाज ऐकू येतो. पण त्याचा चेहेरा पूर्ण चित्रपटात दाखवला आहे की नाही मला माहित नाही. तरी स्वत: प्रेमभंगातून गेल्यावर आपल्यावर एखादी व्यक्ती जीव तोडून प्रेम करतेय हे त्याच्या लक्षात कसं येत नाही कोणास ठाऊक. ललिता पवारसारख्या मातबर अभिनेत्रीला मेट्रनचा तुलनेने छोटा रोल देऊन वाया घालवलंय. देवेन वर्मा आणि अन्वर हुसेन ह्यांना विनोदनिर्मितीचं काम आहे जे ते यथास्थित पार पडतात. पुरातन कालापासून इन्स्पेक्टरचं काम करणारा इफ्तखार चक्क डॉक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळतो. अन्वर हुसेनला तो पेशंट समजतो तो सीन मस्तच आहे. इफ्तखारला छानपैकी हसता येतं हाही शोध आपल्याला त्यात लागतो.

पण ज्या व्यक्तिरेखेची मला सर्वात जास्त चीड आली ती म्हणजे राधाच्या बॉसची. नेहमी मुलीच्या गरीब बिचार्या बापाची भूमिका साकारणाऱ्या नसेर हुसेनने इथे थोडा over-the-top अभिनय केलाय असं मला वाटलं. अर्थात ही व्यक्तिरेखा केवळ 'देवप्रमाणेच अरुणसुध्दा राधाच्या उपचारांनी बरा झाला तर आपल्याला वैद्यकीय जगात केव्हढी प्रसिद्धी मिळेल' असा विचार करणाऱ्या आत्मकेंद्री व्यक्तीची असणं अपेक्षित असेल तर त्याने ती चांगली वठवली आहे असं म्हणावं लागेल. तो राधाला सांगतो की अरुणवर उपचार करायला तो तिला भाग पाडतोय कारण अरुणला आयुष्यात दुसरी संधी मिळायला हवी. पण हे सांगणं मला पटलं नाही. तो आपल्या कृतीचं लंगडं समर्थन करतोय असंच वाटलं. राधाची ढासळती अवस्था त्याला दिसत असणारच पण तो तिथे दुर्लक्ष करतो हे एक डॉक्टर, माणूस आणि बॉस म्हणून केवळ अक्षम्य आहे.

गाण्यांबद्दल म्या पामराने काय लिहावं? सगळीच गाणी मायबोलीकरांच्या भाषेत सांगायचं तर 'ऑटाफे' Happy ‘तुम पुकार लो' बद्दल तर लिहिलं आहेच. त्यातली 'मुख्तसरसी बात है, तुमसे प्यार है' ही ओळ अशक्य आवडते. आयुष्यात कितीही उलथापालथ असली तरी क्षणात एकदम आतून खूप शांत शांत करून टाकण्याचं विलक्षण सामर्थ्य ह्या गाण्याच्या शब्दांत, संगीतात आणि चित्रीकरणात आहे. ही जादू त्या काळच्या गीतकार, संगीतकार आणि दिग्दर्शकांना कशी जमायची त्यांनाच ठाऊक. काही कोडी सोडवता न येण्यातच गंमत असते. ‘हमने देखी है' सुध्दा प्रचंड आवडीचं. 'हाथसे छुके इसे रिश्तोका इल्जाम न दो' हे शब्द वर्णन करता येत नाही अशी कालवाकालव करणारे. पण हे गाणं फक्त ऐकायची चीज आहे. माईकला उद्देशून म्हणते आहे की काय असं वाटावं अश्या थाटात मन उंच करून लाडिक हावभाव करत गाणारी ती बया मला अजिबात आवडत नाही. ‘वो शाम कुछ अजीब थी' च्या दोन कडव्यामधल्या म्युझिकने मला आयुष्यभरासाठी घायाळ करून ठेवलंय. ‘न जाने क्यो लगा मुझे के मुस्कुरा रही है वो' हे शब्द जिव्हारी लागले नाहीत त्या व्यक्तीने प्रेम केलं नाही हे खुशाल समजावं. Happy

मला एक गोष्ट मात्र कळली नाही. राधा अरुणच्या प्रेमात पडते का नाही? कारण शेवटी ती आपल्या बॉसला सांगते की मी कधीच प्रेमाचं नाटक केलं नाही कारण मी असं नाटक करूच शकत नाही. पण जर तिचं अरुणवर प्रेम असेल तर ती मानसिक रुग्ण का होते? कारण अरुणचं तर तिच्यावर प्रेम असतं.

खरं सांगते, पूर्ण चित्रपट कोरड्याठाक डोळ्यांनी पाहिला मी. पण शेवटी जेव्हा अरुण राधाच्या खोलीच्या बंद दरवाज्यासमोर येतो आणि म्हणतो की 'तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस ह्यावर माझा कधीच विश्वास बसणार नाही आणि कितीही वेळ लागला तरी मी तुझी वाट बघेन' तेव्हा मात्र डोळ्यांपुढली 'The End’ ही अक्षरं पार दिसेनाशी झाली.

पाडगावकर म्हणतात 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं नि आमचं अगदी सेम असतं.' विथ ऑल ड्यू रिस्पे़क्ट पाडगावकर....'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण काही काही व्यक्तींचं अगदी डिफरन्ट असतं'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंस. मी पाहिलाय चित्रपट, शेवटही आठवतोय पण त्याची संगती नीटशी आठवत नाही.

गाणी असामान्य आहेत. तुम पुकारलो तर निव्वळ अप्रतिम. कथा पुढे नेणारी अर्थपूर्ण गाणी व कृष्ण धवल चित्रीकरण... हा चित्रपट सगळ्या बाबतीत क्लासिक आहे. राजेश खन्ना कातील दिसलाय Happy धर्मेंद्र पण कातीलच आहे पण यात नीटसा आठवत नाही. परत पाहायला हवा.

अप्रतिम लिहीलस.

पुर्वी छायागीत मध्ये हे लागायच आणि चित्रपट न पहाता देखिल एक भीतीची भावना यायची . या गाण्यालाच वहीदाच्या प्रेमात असलेल्या कोणीतरी तिच्या अभिनयाची तारीफ करत कथानक सांगून टाकलं. त्यामुळे हिंमत नाही झाली पहायची.

गाणी अतिशय सुंदर.
या पिक्चर ची कथा माहिती आहे.बघण्याचा योग अजून आला नाही.

हा लेख सगळ्यांत जास्त आवडला. शेवटच्या दोन ओळी सोडून. खरं तर थोडा भीत भीतच उघडला होता.

<मला एक गोष्ट मात्र कळली नाही. राधा अरुणच्या प्रेमात पडते का नाही? कारण शेवटी ती आपल्या बॉसला सांगते की मी कधीच प्रेमाचं नाटक केलं नाही कारण मी असं नाटक करूच शकत नाही. पण जर तिचं अरुणवर प्रेम असेल तर ती मानसिक रुग्ण का होते? कारण अरुणचं तर तिच्यावर प्रेम असतं.>

स्पॉयलर अ‍ॅलर्ट.

.
.
.
.
देवच्या वेळी जे झालं तेच आताही होणार असं तिच्या मनाने ठरवून टाकलं असेल आणि त्या ताणानेच ती मनोरुग्ण झाली असेल.

असित सेन, गुलजार, हेमंतकुमार यांचे ऋणनिर्देश हवेत. ललिता पवार त्या शेवटच्या सीनमध्ये पेशंटचा नंबर उच्चारते त्यात बाईंच्या अभिनयाची ताकद कळते.
माझ्या वाचनात आलेलं की राजेश खन्नाला हा रोल वहिदाच्या सांगण्यावरून मिळालेला.

मस्त.

ह्या पिक्चरचं नाव काढलं तरी अजूनही डोळ्यातून पाणी येतं.

माझं सर्वात आवडतं गाणं ' वो शाम कुछ अजीब थी, ये शामभी अजीब है'

हमने देखी है उन आंखोकी महकती खुशबू , हेपण खूप आवडतं.

ह्या मूवीची गोष्ट शोकंतिकाच वाटते( सदमा मूवीसारखी ; म्हणजे शेवट जवळपास).
अशी काही मानसपोचार पद्धती होती का पुर्वी माहित नाही पण मूवी खूपच आवडला तेव्हा पाहताना तितका विचार केला नाही.

अतिशय आवडते गाणं,

वोह श्याम कुछ अजीब थी...
एकले की जराशी भुतकाळात जावून उगाच हळ्हळ वाटते. नक्की कसली समजत नाही. काका क्युट दिसलाय त्याच्या टर्ट्ल्नेक स्वेटर्स मध्ये.

>>>>> ‘वो शाम कुछ अजीब थी' च्या दोन कडव्यामधल्या म्युझिकने मला आयुष्यभरासाठी घायाळ करून ठेवलंय. ‘न जाने क्यो लगा मुझे के मुस्कुरा रही है वो' हे शब्द जिव्हारी लागले नाहीत त्या व्यक्तीने प्रेम केलं नाही हे खुशाल समजावं. Happy<<<<<
+१११११११११११११

बर्‍याच गोष्टी माणसं भितीनं घालवतात किंवा मिळवतात.
खास करून अपयशाची भिती. वहिदा आवडलेली ह्यात.

वहिदाने , काकाचे नाव सुचवले होते म्हणे ह्या मूवीकरता डायरेक्टर्स्ला.

तो राजेश खन्ना शेवटी म्हणतो ना की मी वाट बघेन. ती बरी होऊन आली वगैरे हे मी मनात म्हणते. तसा का नाही दाखवला असं वाटत रहाते. पण tragic end चं ठेवलाय.

छान लिहीलं आहे.
पिक्चर (परत) बघायला हवा. पण शर्मिला चा एक जुना लेख आणि आता हा वाचून असं वाटतंय की राधा फक्त देव वर प्रेम करते. अरूणवर तिचं प्रेम नसतंच. म्हणून तर "वो शाम कुछ अजीब थी" मध्ये तिच्या चेहेर्‍यावर अजिबात कसलेच भाव दिसत नाहीत.
तेव्हा त्यांनीं शेवट असा दाखवला असावा कारण दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तेव्हा दात नाहीत अशा हेल्पलेस सिच्युएशन मध्ये ती असते आणि ती परिस्थिती तिला सहन करता येत नाही.

हम्म्म. कोसळतेच ती मानसिकदृष्ट्या. पण दोन्ही situation मध्ये ती अलिप्त नसते. पण प्रेम धर्मेंद्र वर असतं हे जाणवतं पिक्चरमध्ये.

>>>हम्म्म. कोसळतेच ती मानसिकदृष्ट्या. पण दोन्ही situation मध्ये ती अलिप्त नसते. पण प्रेम धर्मेंद्र वर असतं हे जाणवतं <<<<<

बरोबर.
राधा फक्त देववरच प्रेम शेवटपर्यत करते आणि करत असते. ती त्याच भुतकाळात जगत असते. आणि असे दाखवलेय चित्रपटात की जी दुसर्‍याचा इलाज करते, पण तिच्याकडे , तिच्या दुखा:वर औषध नाही. आणि जी दुसर्‍याला समजून घेते, तिला कोणीच समज्त नाही. आणि ती सुद्धा सांगू शकत नाही शेवटपर्यन्त. एक आय्र्नीच, शोकांगिका जणू.
प्रेमभंगाचे दुखः काय असते ह्या जाणीवेने आणि नोकरीच्याजबाबदारीने, ती अरुणला मदत करते. समरसून करते ती सेवा, त्यात आपुलकी आणि माया असते, प्रेम नसते. होडीवर मिठी मारतो अरुण, तेव्हा ती दूरवर बघत अस्ते, तिच्या डोळ्यात यातना दिसतात. अरुण त्या आपुलकीला प्रेम समजतो. राधाला हे अरुणची भावना समजल्यावर ती घाबरते , गोंधळते कारण तिला बहुधा असे वाटते की, ती समर्थ नाहीये आता हे पेलायला. परत देवला विसरून जाणं अशक्य आणि आता अरुण सुद्धा पुन्हा एकदा दुखवणार आपल्यामुळे हि अपराधी भावना. ह्या कच्याट्यात तीचे संतुलन जाते. ( अ. आ. मा. म.)

स्वप्ना अप्रतिम लेख.
हा पण सिनेमा डाउनलोड करून पाहणार आता.
अगदी अगदी प्रत्येक गोष्ट डोळ्यांसमोर उभी राहिली.

छान लेख. हा जमला आहे. वो शाम माझे आव ड्ते गाणे. किशोर इतके हळूवार कसे गाउ शकतो असे वाट्ते. मी फार पूर्वी दूर दर्शन वर पाहिला होता तेव्हा तो समजलाच नव्हता. ताई लोकांबरोबर बसून पाहिला होता. आता पूर्ण बघेन.

चांगलं लिहिलेय .या चित्रपटाची गाणीही सुंदर आहेत. वो शाम कुछ अजीब थी हे ऑटोफे .

या चित्रपटावर शर्मिला फडकेनी लिहिलेलं आठवत आहे. मायबोलीवरच असावे .

मी कॉलेजात असतांना पाहिलेला हा चित्रपट. हाँटिंग संगीत अन राजेशच्या अदाने वेड लावले होते.
स्वप्ना जी. अतिशय सुंदर

वोह शाम आणि तुम पुकार लो ही दोन्ही गाणी प्रचंड आवडीची, गुलजारसाहेबांची अप्रतिम शब्दरचना आणि हेमंतदांचं समर्थ संगीत. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट असल्याने या दोन्ही गाण्यांचं चित्रिकरण देखिल तितकंच सुंदर झालंय.

'वोह शाम' हेमंतदांच्या आवाजातदेखिल तितकंच सुंदर झालं असतं हेमावैम. किशोरने हे गाणं हेमंतदा स्टाईलमधेच म्हटलंय.

माझं प्रचंड आवडतं गाणं ' वो शाम कुछ अजीब थी, ये शामभी अजीब है'
महकती खुशबू पण आवडतं.
सिनेमा पाहिलाय. आता पुन्हा बघेन. राजेश खन्न्ना कातिल दिसतोय ह्यात.

आज खामोशी बघायला सुरुवात केली. इथेही देवेन वर्मा दिसला. Happy
थोडाच बघितला. पण सगळे मेल पेशंट्स आणि त्यांच्यासाठी फीमेल नर्स हे जरा खटकलंय. पुढे बघते.

कृष्ण-धवल चित्रपट कंटाळवाणे होतात मला + शोकांतिका आवडत नाहीत त्यामुळे हा चित्रपट पाहिला नव्हता. आणि कदाचित पहाणारसुद्धा नाही. पण तुम्ही छान लिहिले आहे स्वप्ना. तुमची सिरीजही खूप छान सुरु आहे.

पुढचा चित्रपट कोणता ह्याची वाट पहाते आहे.

कृष्ण-धवल चित्रपट कंटाळवाणे होतात मला + शोकांतिका आवडत नाहीत>> पण चांगली कथा वस्तू, दिग्दर्शन व अ‍ॅक्टिंग असू शकते अश्या चित्रपटांत . टेकिंग जरा स्लो असते. पण पूर्वीचे राज कपूरचे अनाडी, श्री चारसो बीस, चोरी चोरी, बूट पॉलिश वगैरे का पा असून मनोरंजक आहेत. कधी कधी मला त्या मानानए आजचे रंगीत व हाय्टेक चित्रपट दिसायला छान पण बेकार कंटेंट असे वाटतात. जुन्या लोकांनी कथानकांत पण अनेक प्रयोग केलेले आहेत. सुनील दत्तचा यादें एक हि गाणे नाही व एकटाच अ‍ॅक्टर असा सिनेमा आहे. जुना देवदास बिमलदांचा फार बेटर आहे.
सुजाता, मधुमति.. पण कापा आहेत. स्मिता ह्यांव र ही लिहा. ज्वेल थी फ गाइड वर लिहा. तुमचे टेक वाचायला छान वा टते. मी काल एअर्पोर्ट वर उरलेली मालिका वाचून काढली.

अ‍ॅड टू वॉच लिस्टः खुश्बू, परिचय, छोटी सी बात, मासूम, मौसम, अंगूर, स्वामी, गुड्डी, कोशीश, आंधी, परिचय, बावर्ची, आनंद.

चांगली लेखमाला तयार होईल.

आनंद..
माझा ऑटाफे मुव्ही..
आनंद मरा नही..आनंद मरते नही..

जुन्या लोकांनी कथानकांत पण अनेक प्रयोग केलेले आहेत. >>> खरे आहे तुमचे अमा. बघायला हवेत असे चित्रपट. सुजाता, मधुमती, सरस्वतीचंद्र सारखे हातावर मोजण्याइतकेच कृष्ण-धवल चित्रपट पाहिले आहेत. लोकसत्तामध्ये सद्ध्या मधुबालावर एक सिरिज लिहित आहेत कोणीतरी. ती वाचून महल बघायला चालू केला आहे पण ३ दिवस झाले अजून संपत नाहीये. आज संपवेनअसे म्हणते आहे.

लोकसत्तामध्ये सद्ध्या मधुबालावर एक सिरिज लिहित आहेत कोणीतरी. ती वाचून महल बघायला चालू केला आहे पण ३ दिवस झाले अजून संपत नाहीये. आज संपवेनअसे म्हणते आहे.>>>
ती सिरीज सध्या वाचत आहे. महल पाहिला आहे. त्या काळाच्या मानाने तो जरा 'हटके'च म्हणायला लागेल.

अंगूर, कोशिश, आंधी - अतिशय आवडते चित्रपट! संजीवकुमारचे बहुतेक सगळेच आवडतात. त्याच्या शेवटच्या 'कत्ल' या चित्रपटात त्याने अंध व्यक्तीचं जबरदस्त काम केलं होतं. त्याच्या अभिनयाची रेंज जबरदस्त होती. म्हातारा माणूस (त्रिशूल, आंधी, शोले, परिचय), वेडसर माणूस (खिलौना), मूकबधिर व्यक्ती (कोशिश), अंध व्यक्ती (कत्ल), विनोदी टायमीग ( अंगूर), रोमाण्टिक व्यक्तिरेखा (मनचली, अनामिका)..मला नाही वाटत दुसर्‍या कोणी अभिनेत्याने एवढ्या विविध पध्दतीच्या भूमिका केल्या असतील Happy

Pages