'शापित जग' (लघु विज्ञानकथा) [दै. दिव्य मराठी, 'मधुरिमा' दिवाळी अंकामध्ये पूर्वप्रकाशित]

Submitted by Vaibhav Gilankar on 27 November, 2017 - 21:35

समोर हिरव्यागार डोंगरांची रांग... त्याच्यापुढे घनदाट झाडांची वर्दळ पसरलेली आहे.... पक्ष्यांचे थवेच्या थवे किलबिलाट करत जाताहेत.... एखादा थवा जातो न जातो, तोच दुसरा लगेच मनाला गुदगुल्या करणारा आधीपेक्षाही मधुर किलबिलाट करत जातो.... त्यांच्या किलबिलाटानेच सिद्ध होतं कि बाहेरचं वातावरण किती आल्हाददायक असेल...
असं वाटतं कि लगेच खिडकी उघडावी आणि बाहेरील वातावरणाचा मनसोक्त श्वास घेऊन आस्वाद घ्यावा...
पण नाही, तसं जर केलं तर उलट शरीर आतून जळायला लागेल, माझ्यासमोर तर हि फक्त खिडकी आहे, ती जर उघडली तर सत्यतेची जाणीव होईल, हा 'देखावा' निघून जाईल आणि त्या जागी धुळकट, राखाडी वातावरणातील अवाढव्य, राक्षसी इमारतींचे जंगल नजरेसमोर दिसेल!

मानवाने २०५५ पर्यंत पृथ्वीची नरकासमान अवस्था केली आणि या नरकात राहत असूनसुद्धा स्वर्गात असल्याचे भासवण्यासाठी या 'फसवे देखावे' दाखवणाऱ्या खिडक्या तयार केल्या.
"बाहेरील वातावरण आवडत नाही? मग आजच आपल्या घराला लावा abc कंपनीच्या 'व्हर्चुअल विंडोज' आणि पाहिजे ते दृश्य खिडक्यांवर पहा" अशा जाहिराती, आश्वासने दिली गेली आणि हळूहळू सगळे जण निर्लज्जपणे स्वतःचीच फसवणूक आनंदाने करून घेऊ लागले. माझं मत विचाराल तर ह्या खिडक्या दुसरं कोणतंही नाही तर फक्त माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताहेत. लहानपणी मी जी दृश्ये आई, बाबा, आजी, आजोबांसोबत प्रत्यक्ष पाहिली, ज्यांच्यामुळे मला जग सुंदर असल्याची शाश्वती मिळाली ती आजच्या या भेसूर जगात अशा कृत्रिम पद्धतीने पाहताना पाहून हृदयावरून बाभूळ फिरवल्यासारखे वाटते. हा काळ जगण्याच्या का लायक नाही याचे अजून एक कारण मिळते आणि कधी कधी तर असे वाटते की -
"भू! भू!! भू!", माझं विचार चक्र थांबलं, नजर पायापाशी गेली.

पायापाशी रॉनी घुटमळत होता, त्याच्या पाठीवर ९:०० ची वेळ चमकत होती... अरे हो! त्याची पायापाशी घुटमळण्याची, भुंकण्याची, खेळण्याची वेळ झालं होती नाही का! त्याच्या त्या धातूच्या चेहऱ्यावर लडिवाळपणाचे भाव आले होते, निळे डोळे (एल. इ. डी.) चमकत होते, तोंडातून कुत्रे जसे जीभ काढून श्वास घेते (आता ‘घेत होते’ असेच म्हणावे लागेल) तसा आवाज तो काढत होता. हा रॉनीसुद्धा या कृत्रिम जगाचाच एक सदस्य...
खिन्न होऊन मी सोफ्यावर बसलो, त्याला जवळ बोलावलं, तो आला आणि मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागलो. जिथे मऊ, उबदार फर जाणवायला हवे तिथे थंड, टणक धातू जाणवत होता; जिथे करुणा, प्रेम उत्पन्न झाले पाहिजे तिथे त्याच्या त्या धातूसारखेच थंड आणि रिकामे भाव निर्माण होत होते. मग मला एक आठवण आली... मी थोडा विचार केला आणि रॉनीची शेपटी पकडून जोरात पिरगाळली! एखादा खरा कुत्रा असता तर एव्हाना वेदनेने खूप तडफ़डला असता पण रॉनी? तो मघाचेच ते लडिवाळ भाव दाखवत माझ्याकडे बघत होता! त्याची शेपटी, त्याचं शरीर खरं नाही हे न समजायला मी काय मूर्ख नव्हतो, माझ्या या क्रियेमुळे होणारी त्याची प्रतिक्रिया मला पाहायची होती असेही नाही पण मनाला एक विशिष्ट (निर्दयी नव्हे!) भूक लागली होती, ती शमवण्याचाच हा प्रयत्न होता. माझी पकड अजून घट्ट होणार इतक्यात -
"वैभव!" मागून जोरात हाक ऐकू आली.
मोनिका भरा भरा माझ्या जवळ आली, मी तोपर्यंत रॉनीची शेपटी सोडली होती.
"रॉनी, गो चार्ज युवर सेल्फ!", जवळ येऊन मोनिकाने रोनीला कमांड दिली. रॉनी यंत्राला शोभेल अशा चालीत आतल्या खोलीत गेला.

"वैभव, काय झालं? तू बरा तर आहेस ना? रॉनीशी असले भयंकर प्रकार का करत होतास?.."मोनिकाने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. पण मी तिच्याकडे नाही, त्या 'खिडकीकडे' पाहत होतो. आता तिथे समुद्रकिनाऱ्याच्या देखावा दिसत होता, समुद्राच्या लाटांचेही आवाज येत होते पण त्याचा माझ्या मनावर काडीचाही परिणाम होत नव्हता. मी मोनिकाला म्हणालो, "मोनिका, बस माझ्याशेजारी". ती माझ्याशेजारी बसली. मग मी तिला विचारलं, "तुला जाणून घ्यायचंय ना कि मी आता रॉनीशी असा का वागलो ते?"
"हो मला जाणून घ्यायचंय", मोनिका म्हणाली.
"ऐक तर मग", मी सांगू लागलो,
"मी जेव्हा लहान होतो म्हणजे अंदाजे १०-११ वर्षांचा असतानाची गोष्ट. आम्ही नुकतेच आमच्या नवीन घरी राहायला गेलो होतो. तेव्हा आमच्या घराच्या आसपास पहिले काही वर्षं खूप कमी वस्ती होती आणि अशा कमी वस्तीत एकटेपणाच्या भीतीमुळेच आम्हाला घरात एक पाळीव कुत्रा असायला हवा असे वाटू लागले. त्या परिसरातल्या एका भटक्या कुत्रीने आमच्या घराच्याच व्हरांड्याला लागून काही पिलांना जन्म दिला. आम्ही त्याच्यातील एकाला घरात ठेवले आणि त्याचे नाव ठेवले 'टॉमी'.
टॉमीला अगदी जीवापाड प्रेम करून वाढवले. इतर लोक कदाचित त्यांच्या पाळीव प्राण्याला एक पाळीव प्राणी समजूनच वाढवतील पण आम्ही टॉमीला फक्त आमचा एक आयुष्याचा भाग म्हणूनच वाढवलं आणि त्यामुळेच टॉमीला कधीही माणसांची भीती वाटली नाही, कारण तो स्वतःला माणसांमधलाच एक समजू लागला होता. त्याचीच लक्षणे त्याच्या वर्तनात सुद्धा दिसायची. उदाहरण द्यायचे म्हटले तर आपण आपल्या घरातल्या समवयीन किंवा लहानग्या सदस्यांवर रागवतो, ओरडतो पण आपल्या आई, बाबांशी आपण कधीच उद्धट बोलत नाही, वागत नाही त्याचप्रमाणे टॉमी इतका माणसाळलेला होता कि तो मला आणि माझ्या दादाला त्याच्याच वयाचा समजायचा आणि कधी कधी तो आमच्यावरही गुरगुरायचा, भुंकायचा पण तो माझ्या आईवर किंवा बाबांवर कधीही साधे गुरगुरला सुद्धा नाही कारण त्याच्या डोळ्यातच आई, बाबांसाठी एक आदर दिसत असे.
आता आज मी रॉनीसोबत जे केलं ते करण्याचं कारण सांगतो, एकदा माझा पाय चुकून टॉमीच्या शेपटीवर पडला आणि टॉमी मला चिडून चावला होता आणि त्याच घटनेनंतर काही दिवसांनी मी ५ दिवस गावाला जाऊन आलो होतो तेव्हा मी परत आल्याचे पाहून टॉमीने मला अत्यांनंदाने चाटायलाच सुरुवात केली होती!
रॉनीची आणि टॉमीची तुलना मनात केल्यावर आज मला त्या दोघांमधला फरक जाणवला,
एक असा जीव आहे जो माझं चुकल्यावर मला शिक्षाही करतो पण मी फक्त ५ दिवस न दिसल्यावर कासवीसही होतो आणि दुसरीकडे एक गुलाम जो आज मानवांनी फक्त करमणुकीसाठी त्या जीवाच्या जागी स्वीकारला आहे; ज्याला आपल्याशिवाय बैचेन होणं तर दूरच पण साधी स्वतःची रक्षण करण्याएवढी मर्जी सुद्धा नाही.
आजच्या या शरीरासोबत, मनानेही पांगळ्या होणाऱ्या जगात मी ते टॉमीसोबतचे आयुष्य फक्त ५ मिनिटांसाठी परत मिळवण्यासाठी अगदी काहीही करेन कारण थंड, निर्जीव गुलामापेक्षा मला माझ्यावर प्रेम करणारा, माझ्याशी खेळणारा आणि कधी कधी रागावणारा सोबतीच जास्त मूल्यवान वाटतो.
मोनिका, मी माझं हे दुःख तुला हजारदा सांगितलं असेल पण तू -"
मोनिकाकडे नजर गेली. तिच्या निर्जीव डोळ्यांमधले दिवे हळू हळू लुकलुकत होते आणि तिच्या कपाळावर अक्षरे उमटत होती,
'चार्जिंग... चार्जिंग... चार्जिंग...'

मी हताश झालो.
" - पण तू माझं दुःख नुसतं ऐकण्यापलीकडे काय करू शकते? शेवटी तूलाही त्याचसाठी तर बनवले आहे.."
मी भरल्या डोळ्यांनी परत 'खिडकीकडे' नजर टाकली.
देखावा बदलला होता.
दिसत होता खेळणारा एक लहान मुलगा….
.......आणि त्याच्यासोबत बागडणारे एक गोंडस कुत्र्याचे पिलू....

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवरचे लेखन पुनः प्रकाशित करताना सहसा
शीर्षक
लेखन
कुठे प्रसिद्ध झाला त्याचा संदर्भ
लेखकाची व्यक्तिरेखा
अशा प्रकारे प्रकाशित केले जाते आणि सहसा इतर प्रकाशकांना ते चालतेही. उदा
https://www.maayboli.com/node/64513

संदर्भ देताना कुणाचे व्यक्तीगत आभार मानायचे असले तर तेही मानता येतात.
उदा. https://www.maayboli.com/node/62750

ही पद्धत फक्त मायबोलीची नसून पूर्वापार प्रकाशन व्यवसायात चालत आली आहे.
तुम्ही ज्या पद्धतीने शीर्षक दिले आहे त्या मुळे अधिक व्यक्तींचे किंवा संस्थांचे आभार मानणे थोडे अवघड पडेल.
शीर्षकात मूळ प्रकाशन सहसा देत नाहीत. त्यामुळे तुमच्या मूळ शीर्षकाला बाधा येत नाही.
इतर लेखकांच्या उदाहरणामुळे, तुम्हाला समजेल असे सहज सुचवले आहे.

पण सध्या आहे तसेच ठेवले तरी आमची हरकत नाही.

भारी !!!

छान.

छान आहे. असे होणार आहे खरेच. मिनरल वॉटर विकावे तसे हिमालयातील शुद्ध हवा सिलेंडरमध्ये भरून विकायला सुरुवातही झाली आहे.

ऋन्मेऽऽष ,
Thanks आणि अगदी बरोबर आहे तुमचं आणि अजून एक म्हणजे मी हि कथा लिहील्याच्या बरोबर एक आठवड्यांनी जपानमध्ये AIBO पेट रोबोट सादर झाला जो खऱ्याखुऱ्या कुत्र्यासारखा वागतो. हि पण एक प्रकारे Idiocy ची सुरुवात आहे, आता माणसं खऱ्या पाळीव प्राण्यांना जास्तीचं अन्न देऊ लागू नये म्हणून रोबोट घरी आणू लागतील आणि अनाथ मुक्या प्राण्यांकडे दुर्लक्ष होईल. यावर मी एक लेखही लिहिला होता तो काही दिवसांनी मायबोलीवर सादर करेन.

खुप छान... दूर्दैवी भविष्याचे सत्य दर्शन... मानवाने अजुनही स्वत:ला बदलावे

कथा आवडली. कधी कधी वाटतं की मायबोलीवरचा वावर असाच खोटा खोटा.... इथे माणसं नाहीत नुसते आयडी.... इथे गुंतून पडलो तर खर्या दुनियेत वावरता येईल का सहजपणे?

धन्यवाद एस,
मला वाटतं खरी दुनिया आणि खोटी दुनिया यात आनंदी आणि नैतिक कुठली हे आपल्यालाच ठरवता येते.

भविष्यातील विज्ञानकथा लिहिताना अथवा चित्रपट पाहताना एक गोष्ट नेहमीच खटकते . आशावादी असो की निराशावादी, सगळ्या कथा कादंबर्यात अन चित्रपटात काळ नेहमी चुकीचा दाखवतात .
तुमच्या कथेत देखील घडणार्या गोष्टी ह्या कमीतकमी २१२५ वगैरे साली दाखवल्या असत्यात तर ते तर्कविसंगत वाटले नसते . पुढच्या वीसेक वर्षात एवढ्या वेगाने परिस्थिती बदलणार नाही हे सत्य आहे . फॅन्टसी असली तरी ती कालसुसंगत असावी. हॉलिवूड फिल्म्स बघताना तर लेखक दिग्दर्शकांच्या बुद्धीची कीव येते .
मला एक गंमत वाटते की आजही २०२५ साली मंगळावर वसाहती करण्याची दिवास्वप्ने बघणारे महा(मूर्ख्)पुरुष वास्तवाशी थोडीतरी नाळ जोडून विचार करतील का? विज्ञान तन्त्रज्ञानाची प्रगती होते हे मान्य , पण त्या वेगालाही काही नियम / मर्यादा असतात ह्याचे भान ठेवावे एवढीच अपेक्षा !

Mandar Katre,
महाशय, या गोष्टींचे एक स्वतंत्र असे ब्रह्मांड (story universe or fictional universe) असते जेथे वास्तव जगातील नियम नसतात तर लेखकाच्या दृष्टीने घडवलेले नियम असतात. या गोष्टींकडे तुम्ही एक प्रकारे parallel universe म्हणूनही बघू शकतात.
उदा., हीच गोष्ट घेऊया. या कथेत मी आपल्या जगातील विज्ञान प्रगती वेग विचारात घेतलेला नाही, या कथेतील जगातील विज्ञान तंत्रज्ञान विकास गती आपल्या जगापेक्षा जास्त आहे, म्हणून इथे 2055 सालीच तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे. तुम्ही theory of multiversity बद्दल ऐकले, वाचले आहे का? आपल्या पृथ्वीवर आता एवढीच प्रगती झाली आहे याचा अर्थ असा नाही की फार दूर वरच्या एखाद्या समांतर विश्वातील पृथ्वीवरही याच गतीने माणूस विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती करत असेल. तो कदाचित आपल्यापेक्षा मागेही असू शकतो किंवा पुढेही असू शकतो. या कथांकडे त्याच दृष्टीने बघायचं असतं आणि जर तुम्ही विज्ञानकथेतही बंधनं वापरणार असाल तर मग एकही चांगली कथा तुमच्या हातून घडणार नाही. जेव्हा Jules Verne ने त्याच्या बऱ्याच कथांत प्रगत तंत्रज्ञानाचा उल्लेख केला होता तेव्हा त्याने त्या कथांतील timeline वर्तमानकाळाशी समांतरच ठेवली होती, पण ते एक fictional universe होते पण तरीही त्याच्यापासून प्रेरणा घेऊन खरी पाणबुडी आणि अजून बरेचसे प्रगत तंत्रज्ञान तयार झाले. तुम्ही हॉलिवूड चे चित्रपट बघताना निर्मात्याच्या बुद्धीची कीव करण्यापेक्षा ते Disclaimer वाचत जा, ज्यात लिहिले असते की या कथेचा, पात्रांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, याचाच अर्थ त्या कथेतील जगाचा, तिथल्या नियमांचाही खऱ्या जगाशी काही संबंध नाही. Think out side of the box!

>>पुढच्या वीसेक वर्षात एवढ्या वेगाने परिस्थिती बदलणार नाही हे सत्य आहे>>
आता science fiction चे रूपांतर science fact मध्ये होते आहे याचा थांगपत्ता तरी आहे का तुम्हाला?
तुम्ही वर्तमानपत्र, बातम्या बघतात का नाही? या कथेत दिलेल्या बहुतांश गोष्टी आधीच सुरु झालेल्या आहेत. उदा., मला पक्के आठवतंय, मी हि कथा दिव्य मराठीमध्ये प्रकाशित केल्याच्या दुसऱ्याच महिन्यात जपानमध्ये AIBO पेट रोबोट सादर झाला जसा या कथेत उल्लेख आला आहे. कुठल्या शतकात राहता आहात तुम्ही? उलट आज तंत्रज्ञान एवढ्या जलद गतीने विकसित होतंय कि तुम्ही आणि मी काय, एखादा विद्वानही छातीठोकपणे सांगू शकणार नाही की पुढच्या पाच वर्षात काय होऊ शकेल. माफ करा पण जरा तुमचे vision आणि creativity जागृत करा, तुम्ही सुद्धा कल्पना करू शकणार नाही. माहिती काढल्याशिवाय लोकांच्या कल्पना शक्तीला मूर्खपणाचे नाव देऊ नका प्लिज.

Pages