पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त – ६. चुपके चुपके (१९७५)

Submitted by स्वप्ना_राज on 10 February, 2018 - 05:38

हिंदी चित्रपटात ज्याला प्रेमाने 'नीली छत्रीवाला' किंवा 'उपरवाला' म्हणतात त्याची एक सवय मला आता पक्की ठाऊक झालेय. तुमच्या ज्या मोठ्या इच्छा असतात ना त्या तो उशिराने धावणाऱ्या लोकलसारखा उशिराने पूर्ण करतो किंवा रद्द झालेल्या लोकलसारख्या पार निकालात काढतो. पण ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात त्या मात्र पूर्ण करतो. आता हेच बघा ना.......’बुढ्ढा मिल गया' वर लिहिलं तेव्हा २-३ जणांनी 'चुपके चुपके' मध्ये सुद्धा ओमप्रकाशची चांगली भूमिका असल्याने तो पहायचा सल्ला दिला. आणि नेमकं १-२ दिवसात एका चॅनेलवर तो पहायची संधी मिळाली. असो 'हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिशपे दम निकले' अशी आपल्या सर्वांचीच स्थिती असताना इच्छा छोटी असो वा मोठी, ती पूर्ण झाल्याचं समाधान आहेच. नाही का?

तर आता कथेविषयी. ह्या कथेचा नायक आहे डॉक्टर परिमल त्रिपाठी. बॉटनीचा प्रोफेसर. चित्रपट सुरु होतो तेव्हा कुठल्याश्या हिलस्टेशनवर तो सरकारी बंगल्यात काही दिवस रहात असतो. बंगल्याच्या म्हातार्या रखवालदाराचा नातू आजारी असतो पण त्याची एक दिवसाची सुट्टी मंजूर झालेली नसते म्हणून डॉक्टर परिमल त्याला तिथून चालत चार-पाच तासांच्या अंतरावर असलेल्या गावात जायची परवानगी देतो. रखवालदार डोंगर उतरून जातो आणि १-२ दिवसानंतर येणार असणारी मुलींच्या कॉलेजची स्टडी ट्रीप आधीच येऊन पोचते. आता रखवालदाराची नोकरी वाचवायला त्याची भूमिका निभावण्यावाचून डॉक्टर परिमलला गत्यंतर नसतं. भरीत भर म्हणून ह्या पोरीना डॉक्टर परिमलने लिहिलेलं पुस्तक अभ्यासाला असतं, त्यामुळे त्याचं नाव खोलीच्या बाहेर लिहिलेलं पाहून त्या ह्याला त्याच्याबद्दल विचारतात. तो बाहेर गेलाय असं सांगून तो वेळ मारून नेतो. पण त्यातली एक मुलगी, सुलेखा, मात्र त्याला डॉक्टर परिमलबद्दल बरीच माहिती विचारते. दुसर्या दिवशी खरा रखवालदार येतो तेव्हा तो आपला काका असल्याची थाप परिमल मारतो. पण सुलेखा मात्र त्यांचं बोलणं ऐकते. डॉक्टर परिमलने रखवालदाराची नोकरी वाचवायला त्याचं काम केलं हे पाहून ती बरीच इम्प्रेस होते. डॉक्टर परिमलसुध्दा तिच्याकडे आकर्षित होतो.

आणि मग दोघांच्या लग्नाची बोलणी सुरु होतात. परिमलचे भाऊ आणि भावजय इंग्लंडमध्ये स्थायिक असल्याने ५-६ दिवसांवर असलेला मुहूर्त इलाहाबादमधल्या लग्नासाठी पक्का केला जातो. मुंबईला असलेली सुलेखाची मोठी बहिण सुमी आणि तिचा नवरा राघवेंद्र मात्र त्यांची धाकटी मुलगी रत्ना तापाने आजारी असल्यामुळे लग्नाला येऊ शकत नाहीत. त्या दोघांनी 'परिमलचा फोटो पाठव' म्हणून सांगितलेलं असतं खरं पण चेष्टेखोर स्वभाव असलेला परिमल त्याचे लहानपणचे फोटो पाठवून देतो. एव्हाना तो सुलेखाच्या तोंडून तिच्या जिजाजीची, म्हणजे राघवेंद्रची, स्तुती ऐकून जाम वैतागलेला असतो. लग्नानंतर मित्रमंडळीच्या घरी पार्ट्या अटेंड करून करून परिमलच्या पोटाची वाट लागते. सुलेखा परिमलची शपथ घेऊन जाहीर करते की काही दिवस ती त्याच्यासोबत कुठेही येणार नाही. तेव्हढ्यात तिचा मोठा भाऊ हरिपाद सुमी आणि राघवेंद्रचा निरोप घेऊन पोचतो. त्यांनी परिमल आणि सुलेखाला मुंबईला राहायला बोलावलेलं असतं. राघवेंद्रने हरिपादवर आणखी एक कामगिरी सोपवलेली असते ती म्हणजे एक शुद्ध हिंदी बोलणारा ड्रायव्हर इलाहाबादवरून पाठवणे. त्याचा सध्याचा ड्रायव्हर जेम्स अशुद्ध भाषेत बोलत असल्याने शुद्ध भाषेचा पुरस्कर्ता असलेला राघवेंद्र त्याला पार कंटाळलेला असतो.

हे ऐकून मिश्कील परिमलला एक कल्पना सुचते. एवीतेवी सुलेखाच्या प्रतिज्ञेमुळे त्या दोघांना मुंबईला एकत्र जाता येणार नसतं. मग परिमलने ड्रायव्हर प्यारेमोहन बनून आधी जावं आणि मागून सुलेखाने एकटीने जावं. सुलेखा आणि हरिपाद त्याला सांगून पाहतात की राघवेंद्र इतका हुशार आहे की तो लगेच ओळखेल. पण परिमल आपल्या हट्टावर कायम राहतो. परिमलला पटण्याला लेक्चर्स द्यायची असल्याने तो नंतर येईल असं राघवेंद्र आणि सुमीला सांगितलं जातं. प्यारेमोहन अतिशुद्ध हिंदी बोलून आणि इंग्रजीबद्दल प्रश्न विचारून (अगर डी ओ डू होता है और टी ओ टू होता है तो जी ओ गु क्यो नही होता?) राघवेंद्रला काव आणतोच. पण जेव्हा सुलेखा तिथे पोचते तेव्हा ती आणि प्यारेमोहन असा काही अभिनय करतात की राघवेंद्र आणि सुमीची खात्रीच पटते की महाबोअर परिमलसोबत सुलेखा खुश नाही आणि म्हणून ड्रायव्हरसोबत फिरतेय.

परिमलचा जिवलग मित्र सुकुमार हा परिमल बनून मुंबईला दाखल होतो तेव्हा तर ह्या सावळ्या गोंधळात अधिकच भर पडते. तो यायच्या आधी सुलेखा आणि प्यारेमोहन घरातून गायब होतात. आपली बायको घरी नाही म्हणून रागावून (!) परिमल उर्फ सुकुमार त्याचा मित्र प्रशांतच्या घरी राहायला जातो. तर तिथे असलेली प्रशांतची मेहुणी वसुधा डॉक्टर परिमल समजून त्याला बॉटनीबद्दल प्रश्न विचारून हैराण करते. सुकुमार वसुधावर खुश असूनही परिमलच्या भूमिकेत असल्याने त्याला 'प्यारका इजहार' करायची चोरी होते. मेहुणी ड्रायव्हरसोबत पळून गेलेय आणि तिचा नवरा दुसर्याच मुलीच्या मागे लागलाय हे जेव्हा राघवेंद्रच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इथे शादीशुदा परिमल आपल्या बहिणीच्या मागे लागलाय हे बघून प्रशांतची बायको हवालदिल होते. आणि हे सगळं रामायण बघताना आपली मात्र झक्कास करमणूक होते. यथावकाश सगळा गुंता सुटतो तेव्हा स्वत:ला तिस्मारखां समजणाऱ्या राघवेंद्रची होणारी लोभस प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

पिक्चरचे हिरोज अर्थात राघवेंद्र बनलेला ओमप्रकाश आणि परिमल झालेला धर्मेंद्र. ओमप्रकाशने मेहुणीची थट्टामस्करी करणारा, 'मै आदमीको सूंघकर उसे पहचान लेता हूं' अशी बढाई मारणारा, प्यारेमोहनच्या कारवायांनी त्रासलेला, मेहुणीच्या काळजीने ग्रासलेला, प्रेमळ, कुटुंबवत्सल राघवेंद्र मस्त साकारलाय. धर्मेंद्रला कॉमेडी जमेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं पण त्याने परिमलचा मिस्कीलपणा बरोबर पेललाय. विशेषत: त्याच्या एखाद्या कृतीने राघवेंद्र त्रासला की तो जो काही हसतो त्या निरागस हास्यावर मी टोटल फिदा झाले. अमिताभला सुकुमारच्या भूमिकेत फार थोडा वेळ मिळालाय. बाकीचा वेळ तो अत्यंत रुक्ष असा डॉक्टर परिमल असल्याची अ‍ॅक्टिंग करत असल्याने नाकावर घसरलेला चष्मा सावरून घेण्यापलीकडे त्याला फारसं काम नाही. शर्मिला टागोरने सुलेखाच्या भूमिकेत चक्क नैसर्गिक अभिनय केलाय. अहो आश्चर्यम! बाकी भूमिकांत जया भादुरी (वसुधा), असरानी (प्रशांत), डेविड (सुलेखा आणि सुमीचा मोठा भाऊ हरिपाद), उषा किरण (सुमी) आणि केश्तो मुकर्जी (ड्रायव्हर जेम्स) आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला शर्मिलाबरोबर कॉलेजातल्या मुलींचा जो ग्रुप येतो त्यात मराठी अभिनेत्री नयना आपटेसुद्धा दिसते.

हिंदी चित्रपटांचा अविभाज्य भाग म्हणजे गाणी. ह्या चित्रपटात दोन झक्कास गाणी आहेत - अबके सजन सावनमे आणि चुपके चुपके चल री पुर्वैय्या. 'अबके सजन सावनमे' चं पिक्चरायझेशनसुध्दा पुन्हापुन्हा बघावं असंच. घरच्या सगळ्या लोकांपासून चोरून पडद्यामागून धर्मेद्रचा हात धरून गाणारी शर्मिला, ती शंका आल्याबरोबर सहज उठल्यासारखं दाखवून पडदा चेक करणारा ओमप्रकाश, म्युझिकच्या तालावर केकचा तुकडा मटकावणारा असरानी आणि जिन्यात लपून गाणं ऐकणारा ड्रायव्हरच्या वेशातला धर्मेंद्र. ‘सारेगमा' आणि 'बागोमें कैसे ये फूल खिलते है' ठीकठाक.

एक-दोन गोष्टी पटल्या नाहीत. हिलस्टेशनवरच्या भेटीनंतर लगेच सुलेखाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन बंगल्याचा चौकीदार येतो. वसुधा आणि सुकुमारच्या बाबतीत सुध्दा ‘झट मंगनी पट ब्याह' हे काही झेपलं नाही. सुकुमारला भेटल्यावर सुलेखा 'बहिणीच्या मोठ्या मुलीला हे स्थळ चांगलं आहे' असं परिमलला म्हणते तेव्हा तो 'सुकुमारला प्रशांतची मेहुणी आवडते' असं म्हणतो पण वसुधाने सुकुमारला पाहिलेलंच नसतं. कदाचित माझी ऐकण्यात चूक झाली असेल किंवा चित्रपट एडिट करून दाखवला गेला असेल. आणि हो, आजकालच्या एव्हढ्यातेव्हढ्यावरून अस्मिता दुखावण्याच्या काळात हा चित्रपट रिलिज झाला असता तर ड्रायव्हर्सनी तोडफोड केली असती का असा विचार मनात येऊन गेलाच. Happy

२४ * ७ ब्रेकिंग न्यूजच्या, सोशल मिडियाच्या ह्या बिझी जमान्यात एक हलकाफुलका, डोक्याला जास्त शॉट न देता निर्भेळ करमणूक करणारा कौटुंबिक चित्रपट पहायची इच्छा असेल तर हा चित्रपट नक्की पहा. सॅटीस्फॅक्शन गॅरन्टीड. आपुनका वादा है दोस्त!!
-------
विकी ट्रिव्हिया: ह्या चित्रपटाच्या वेळेस जया भादुरी गरोदर होती पण तिचे शॉट्स इतक्या कुशलपणे घेतलेत की हे आपल्या लक्षातही येत नाही. नेटवरून अशीही माहिती मिळते की बंगल्यातले काही शॉट्स एन.सी. सिप्पीच्या बंगल्यात घेतलेत जो आता अमिताभचा बंगला 'जलसा' आहे. १९८० च्या फेब्रुवारीत लोकांनी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये म्हणून सरकारने हा चित्रपट दूरदर्शनवरसुध्दा दाखवला होता म्हणे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेयस... तूच लिहू जाणे एवढे सगळे.

माझ्या फेव टेन विनोदी चित्रपटामध्ये हा टॉप 5 मध्ये आहे. पहिला नंबर अंगुर. तू अंगुर कधी बघतेस याची वाट पाहतेय आता Happy Happy

छान लिहिलस.
माझा फेव्हरेट सिनेमा. एनी टाईम वॉच कॅटेगरी.

मस्तच!!!मजा येते या पिक्चर मध्ये
मेरा नाम पाघव नही है, रत्ना का नाम पतना नही है, सुलेखा का नाम पुलेखा नही है, तो सोचो ये रुमाल किस का होगा?

मीपन पाहिलाय.. मस्तच ..
आणि दोन्ही गाणी खुप आवडती..
आणखी एक...शर्मिला निव्वळ सोहा अली खान दिसते यात.. Happy

अंगुर कुठला साधना? बघावा लागेल..

अंगुर एक भयंकर एपिक क्लासिक कॉमेडी आहे.
आमच्याकडे अंगुर चा कोणताही डायलॉग कुठूनही चालू करायची पद्धत आहे.
स्वप्ना लिहाच अंगुर बद्दल.

मस्त लिहिलंय.
जिजाजींची जी मुलगी आजारी असल्याने ते लग्नाला येत नाहीत, ती मुलगी पुढे दिसते का चित्रपटात?
आता वाचताना वाटतंय की ओमप्रकाश आणि डेव्हिड हे शर्मिलाचे भाऊ आणि मेव्हणे म्हणून खूप मोठे आहेत. पण सिनेमा बघताना खटकलं नाही.

बागों में कैसे ये फूल खिलते हिं गाण्यातल्या बागोंतला ग चा उच्चार मुद्दाम ऐकण्यासारखा आहे.

ओमप्रकाश अत्यंत आवडता अभिनेता. आत्ता आलाप )अमिताभ सोबत) आणि `आँधी चटकन आठवले.
मग प्यार किए जा, अन्नदाता, अमर प्रेम, ज्युली, शराबी.

गेट वे ऑफ इंडिया (दो घडी वो जो पास आ बैठे) हा त्याने प्रोड्युस केलेला चित्रपट.

>>जिजाजींची जी मुलगी आजारी असल्याने ते लग्नाला येत नाहीत, ती मुलगी पुढे दिसते का चित्रपटात?>> हो, धर्मेंद्र आणि शर्मिला जिला गाडीत बसवून आईस्क्रिम देतो म्हणतात तीच ती मुलगी रत्ना.
परवाच पाहिला. मजा आली. ओम प्रकाश, धर्मेंद्र बेस्ट. सगळ्यांचीच कामं मस्त झाली आहेत.

माझा पण ऑटाफे सिनेमा. अंगूर तर काय बोलायलाच नको.
स्वप्ना, छान लिहिलंय. आता परत एकदा चुपके चुपके आणि अंगूर दोन्ही बघायला हवे.

तुम्ही
अंगूर, छोटी सी बात, किसी से ना केहना वर लिहा ना.

बाकी, चुपके चुपके माझा फेव आहे.

माझा अतिशय आवडता पिक्चर. शाळेत असताना टीव्हीवर पहिल्यांदा बघितला. जबरदस्त हसून हसून पुरेवाट होते अजूनही सर्व आठवून.

१९८० च्या फेब्रुवारीत लोकांनी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये म्हणून सरकारने हा चित्रपट दूरदर्शनवरसुध्दा दाखवला होता म्हणे. >>> हा नाही गुड्डी दाखवलेला. मी खूप लहान होते पण आमच्याकडे tv नव्हता आणि बाबांनी शेजारी पाठवलं नव्हतं बघायला त्यामुळे आवर्जून लक्षात राहीलंय.

मस्त लिहिलंय! धर्मेंद्रने क्यूट काम केलं आहे यात!
अंगूर मी २-३ वेळा अर्धवट पाहिलाय. आता कधी पूर्ण पहायला मिळतोय कुणास ठाऊक ! Happy

मला जुने सिनेमे नाही आवडत ईतके, पण हा आवडता चित्रपट
मम्मीमुळे इच्छा नसताना पहिला सुमारे दीडदोन वर्षांपूर्वी, पण खूप खूप आवडला
मस्तच आहे

सिनेमा छान. तुम्ही फक्त जुजबी ओळख करून दिली आहे. अजून डीप जाउन लिहा.
त्यातले फन स्पिरिट अमेझिंग आहे. सारेगामा गाणे मस्तच आहे. ओमप्रकाशला परिमल शिरीमान टकलाजी महाराज म्हणतो. फिदी फिदी...

ह्या सर्व सिनेमांतले साधे सोपे संवाद व नैसर्गिक कौटुंबि क वातावर ण आता बघायला मिळत नाही. आता एक तर एन आराय नाहीतर उच्च रायचंदी हवेल्या, ..... मध्यमवर्गीय जीवन व नर्म विनोद हे चुपके चुपके सारख्या सि नेमांचे वैशि ष्ट्य आहे.

इथे अंगूर वर धागा ऑल्ररेडी आहे. बावर्ची , जुना खू ब सूरत, जुना गोलमाल नमकहराम वर पण लिहा. सर्व यूट्यूब वर उपलब्ध आहेत.

अन्जू.....विकीवर चुकीची माहिती आहे वाटतं.

अमा.....हे चित्रपट न पाहिलेल्यांनी पाहावेत असा एक हेतू ह्या लेखमालिकेमागे आहे. त्यामुळे चित्रपटाचे जास्त तपशील देऊ शकत नाहीये ह्या लेखांत. Sad उद्या बहुतेक 'गोलमाल' आहे टीव्हीवर. पाहिला तर नक्की लिहेन त्यावर. मी सध्या तरी मुव्हीज डाऊनलोड करून पहात नाहिये.

सर्वांचे आभार!

छान लिहीले आहेस स्वप्ना!

नुकताच पुन्हा पाहिला. टोटल धमाल आहे. धर्मेन्द्र आणि ओमप्रकाश आणि नंतर बच्चन सुद्धा. याआधी फार फार पूर्वी पाहिलेला होता व साधारण थीम सोडल्यास अजिबात लक्षात नव्हता.

हृषिकेष मुखर्जींच्या चित्रपटात मुख्य बुजुर्गाचा रोल सहसा उत्पल दत्त करत असे. पण इथे ओमप्रकाश ने तो स्वतःच्या पद्धतीने जबरदस्त केला आहे. त्याचे अनेक सीन्स आणि संवाद धमाल आहेत. 'अब के सजन सावन मे' मधे तो संशयाने उठून पडद्यापर्यंत येउन जातो आणि मग काही दिसत नाही तेव्हा पुन्हा गाणे एन्जॉय करतो तो सगळा पीस मस्त आहे.

'अब के सजन सावन मे' आणि 'चुपके चुपके' गाण्याची चाल, संगीत आणि गायकी सुपर रोमॅण्टिक टोन मधे आहे. मात्र आनंद बक्षी ने अगदीच काहीतरी लिहीली आहेत गाणी. साहिर किंवा गुलजार ने मजा आणली असती. विशेषत: चुपके चुपके गाण्यात कन्हैय्या ला यमक म्हणून दैय्या रे दैय्या, ताथैय्या ताथैय्या वगैरे काय वाट्टेल ते वापरले आहे. अगदी पुलंच्या "एक थोडं गच्ची बसतंय का बघा" लॉजिक वापरून लिहीलेले Happy

यात बच्चन ला काम कमी आहे पण त्यानेही मस्त केले आहे. साधारण याच वर्षातील इतर चित्रपटांमधून आणि नंतर पुढे कायमच दिसलेला स्क्रीन प्रेझेन्स आणि एकूण स्टाइल अजिबात न वापरता साधा सरळ वावर आहे त्याचा. एखादी भूमिका stylize न करता कॅरेक्टर मधे पूर्ण शिरलेला अमिताभ इथे जसा दिसतो तसा यानंतर (७५ सालानंतरच्या चित्रपटांमधे) फार क्वचित दिसला आहे.

ओमप्रकाश चा अमिताभ बरोबर 'जंजीर' मधे ही छोटा पण महत्त्वाचा रोल आहे.

'सुकुमारला प्रशांतची मेहुणी आवडते' असं म्हणतो पण वसुधाने सुकुमारला पाहिलेलंच नसतं. कदाचित माझी ऐकण्यात चूक झाली असेल किंवा चित्रपट एडिट करून दाखवला गेला असेल.

होय तुझी थोडी चूक झालीये. परिमल म्हणतो प्रशंत को सुकुमार पसंत है, म्हणजे बहिणीसाठी स्थळ म्हणून तो सुकुमार ला पसंती देतोय आशा अर्थाने.
पण ती गोष्ट अजून अमिताभला माहिती नसते. म्हणूनच प्रशांत त्यांना पळून जायला एवढा उत्साह दाखवतो कारण बाकी गोष्टी त्याने आधीच ठरवलेल्या असतात

हा सिनेमा धर्मेंद्र-ओम प्रकाशचा जितका आहे, तितकाच अमिताभचाही आहे.

अमिताभच्या कॉमेडी सेन्सचे बारकावे पाहावेत तर चुपके-चुपकेमध्ये! त्यामुळे हा सिनेमा एकदा धर्मेंद्र-ओम प्रकाशच्या जुगलबंदीसाठी पाहावा आणि एकदा फक्त अमिताभसाठी !! (सारेगामा गाण्यात पाया रचला जातो. आणि `हू ना नहीं, है ना' - हा सीन म्हणजे कळसाध्याय!)
सारेगामा गाण्यातले अमिताभच्या चेहर्‍यावरचे बारीकसारीक हावभाव पाहावेत आणि त्या मनुष्याला मनोमन सलाम ठोकावा.

पुढे पुढे असं होत जातं, की या सिनेमाची जितकी पारायणं करत जाऊ, तितकी सिनेमा सुरू झाल्यावर अमिताभ कधी पडद्यावर येतो याची अधिकाधिक वाट पाहिली जाते.

धर्मेंद्र-ओम प्रकाश लक्षात राहतात कारण त्यांना कथानकात तेवढं फूटेज आहेच; त्यात ते धमाल करतात... अमिताभला तितकं फूटेज नाही; पण त्याने त्याला काहीही फरक पडत नाही.

मस्तच आहे हा सिनेमा
"मुझसे ये और बरदाश्त नही होता.मै सब बता दूंगा आप कौन है, मै कौन हूं, प्रशांत भैय्या कौन है"
"अरे लेकीन मै तो मै ही हूं"
"तो क्या हुवा,फिरभी बता दूंगा."
नक्की डायलॉग आठवत नाही पण हाईट आहे तो सीन Happy

चित्रपट न पाहिलेल्यांनी पाहावेत असा एक हेतू ह्या लेखमालिकेमागे आहे. >> टोटली अ‍ॅग्री स्वप्ना.
तुझे लिखाण आणि इथली चर्चा वाचून मी बुढ्ढा मिल गया पाहिला. अन्यथा इतकी वर्ष फक्त रातकली ऐकून गप्प बसत होते. अनुपमा पाहिला होता आधिच पण तिथली चर्चा वाचून देवर डालो केला.

चुपके चुपके पण पाहिला आहे अनेकदा. सुरेखच लिहिले आहेस. असंच लिहित रहा आणि चांगल्या सिनेमांची ओळख करून दे. मी पाहत जाईन. हिंदिच नव्हे, इंग्रजी किंवा इतर भाषेतले सुद्धा चालतील. Happy

पुलेशू!

गोलमाल, छोटी सी बात, दामाद, अंगूर, रंग बिरंगी, किसी से ना कहना
अजून बरेच बाकी आहेत Happy लिहीत रहा.
तसा झुक गया आसमान पण लिहीणेबल आहे.

झी क्लासिक वर बर्‍याचदा लावतात हा पिक्चर.. भन्नाट कॉमेडी आहे..

अंगूर तर एक नंबर आहे.. डबल रोल डबल धमाल..

छोटी सी बात सुद्धा असाच पारायण करु शकु असा मूवी आहे. हे आपले तुम्ही ह्या मूवीवर लिहावे म्हणून उगीच.

छोटी सी बात
बातों बातों में
खट्टामिठा (जुना)
हमारी बहु अलका
किसिसे न केहना
रन्ग बिरन्गी
साहेब
चमेली की शादी
लाखों की बात (बरा आहे तसा)
प्यार किये जा (सेम टु धुमधडाका)
साधु और शैतान
जोरू का गुलाम (नन्दा राजेश खन्ना)
पडोसन
पती पत्नी और वो

सध्या इतके बास Happy
जमतील ते पहा आणि लिही. यातले मी अनेक पाहिले आहेत पण लक्षात नाहित जास्ती डिटेल्स. सो तुझ्या लिखाणानंतर पाहताना मजा येइल Happy

Pages