जादुई माजघर

Submitted by मनीमोहोर on 10 February, 2018 - 04:34

ओटी, पडवी आणि सैपाकघर यांच्या कोंदणात बसवलेलं माजघर म्हणजे कोकणातल्या आमच्या घराचा प्राण आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही .

आमचं घर तसं मोठंच असल्याने साहजिकच माजघर ही मोठंच आहे . पु लं च्या शब्दात सांगायच तर एका वेळेला पंचवीस पानं सहज उठेल एवढं मोठं . माजघरात सगळं सामान भिंती कडेलाच असल्याने ते जास्तच मोठं आणि मोकळं वाटतं. घराच्या मधोमध असल्याने फार सूर्यप्रकाश आणि उजेड यायला वाव नाहीये पण काचेच्या कौलांमुळे दुपारी मात्र भरपूर प्रकाश असतो माजघरात . भिंतीमध्ये कोनाडे आणि खुंट्या अजून ही आहेत .भिंतीतल्या कोनाड्यात नेलकटर, पावडरचे डबे, टिकल्यांची पाकीट, रोज लागणारी औषधं, मुलांचे छोटे मोठे खेळ, त्यांची पेनं, गोष्टींची पुस्तकं अशा एकमेकांशी संबंध नसलेल्या अनेक वस्तू सुखेनैव नांदत असतात. आणि खुंटयांवर मुलांची दप्तर, पिशव्या, शर्ट, हात पुसायचे टॉवेल पावसाळ्यात कंदील, वैगेरे वगैरे ...

आमचं घर तसं फार जुन्या वळणाच नाहीये पण तरी ही माझ्या तिथल्या सासूबाईंचा वावर सैपाकघर आणि माजघर इथेच जास्त असे . त्यांना खरं तर झोपाळा फार आवडत असे, पण फक्त दुपारी जेवण झालं की जेव्हा पुरुष मंडळी वामकुक्षी घेत असत तेव्हाच फक्त त्या थोडा वेळ ओटीवरच्या झोपाळ्यावर येऊन बसत असत . एरवी कधी त्या ओटीवर फारशा येत नसत. अगदी टीव्ही ही त्या माजघरातूनच बघत असत. जणू काही माजघराचा उंबरठा ही मर्यादाच घालून घेतली होती त्यांनी स्वतः साठी.

आमच्या जॉनी ने मात्र उलटी मर्यादा घालून घेतली आहे . तसा त्याचा घरात अगदी मुक्त आणि सर्वत्र संचार असतो . मुलं सुट्टीच्या दिवशी उशीरापर्यंत झोपलेली असली किंवा बराच वेळ खोलीत अभ्यास करत असली आणि याला दिसली नाहीत तर एखाद्या मोठया माणसासारखं दार उघडून मुलांची खबरबात घ्यायला खोलीत ही जातो. पण कधी ही माजघराचा उंबरठा ओलांडुन आत येत नाही . अगदी भुकेने व्याकुळ झाला असला तरी उंबरठ्यावर बसून रहातो पण माजघरात मात्र पाऊल टाकत नाही.

पूर्वी आंमच्याकडे दुपारची आणि रात्रीची जेवणं तर माजघरात पंगत मांडून होत असतच पण सकाळची भात पिठल्याची न्याहारी ही पंगत मांडूनच होत असे. दुपारची पंगत वाढताना घरच्या सगळ्यानी कपडे बदलून तयार व्हायचं हा आमच्या घरचा शिरस्ता. कामा करताना सकाळपासूनची साडी खराब झालेली असते म्हणून माझ्या सासूबाई ही साडी बदलत असत. आणि आम्ही कधी कंटाळा केलेला ही त्यांना चालत नसे. पानं मांडून तयारी झाली की माझे तिथे राहणारे सासरे घंटा वाजवत असत. त्या आवाजाने दोन मिनटात सगळी जण पानावर हजर होत असत . आता त्यांच्या नंतर मात्र ही डिनर बेल बंद झाली आहे . मध्यंतरी माझ्या मुलीने मला परदेशातून एक डिनर बेल भेट म्हणून आणली आहे . सगळयांना 'जेवायला चला ' असं सांगणारी ती बेल इथल्या भातुकलीच्या संसारात काही वापरली जात नाही, पण तरीही मी ती जेवणाच्या टेबलावर ठेवली आहे . तिच्याशी माझ्या सासऱ्यांची आणि माजघरातल्या पंगतींची आठवण जोडली गेली आहे म्हणून. ... आता बदललेल्या काळानुसार रोजची माजघरातली पंगत बंद झाली असली तरी अजूनही सणावरी, कार्यप्रसंगी किंवा कोणी पाव्हणे आले असतील तर माजघरात पंगत मांडूनच जेवणं होतात. वाढायच्या वेळी कपडे बदलून तयार होण्याची परंपरा अजून ही आवर्जून पाळली जाते. मुख्य अतिथीचे पान सर्वाना त्यांच्याशी बोलणे सोईचे होईल असे मांडले जाते. बाकीची मंडळी वयाच्या जेष्ठतेनुसार बसतात. एरवी स्वतःच्या हाताने जेवायचा कंटाळा करणारी लहान मुलं ही आनंदाने पंगतीत बसतात आणि छान व शिस्तीने जेवतात . हसत खेळत जेवणं होतात. अशी पंगत बघणं हा ही माझ्या आनंदाचे निधान आहे.

गणपती, नवरात्र ह्या उत्सवांच्या दिवसात माजघरात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो . कारण गणपतीची स्थापना देवघरात न होता माजघरातच केली जाते . किती ही आधी पासून तयारी करू या असं ठरवलं तरी रात्री जागून गणपतीची सजावट करणं ही आमच्या घरची रीत आहे त्यामुळे त्यादिवशी माजघराला ही झोप मिळत नाही. असो . गणपतीच्या दिवसात गणपतीपुढे काढलेल्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या, हौसेने केलेली सजावट, मंदपणे तेवणाऱ्या समया, उदबत्त्या, फुलांचा माजघरात भरून राहिलेला वास, पेटी, तबला, झांजा, मृदंग यांच्या साथीमुळे रंगलेल्या आरत्या, भजनं, अथर्वशीर्षाची केली जाणारी आवर्तनं , जेवणाच्या उठणाऱ्या पंगती, दर्शनासाठी येणारे परिचित, या सगळ्या मुळे माजघरात एक वेगळंच चैतन्य नांदत असत .

हरतालिका पूजन, हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसं, महालक्ष्मी पूजन असे खास स्त्रियांचे समारंभ माजघरातच साजरे होतात. पण खऱ्या अर्थाने माजघर दणाणून जातं ते घरात कोणाची मंगळागौर असेल तर. एरवी ही माजघरावर सत्ता असते ती स्रियांचीच पण मंगळागौरीच्या दिवशी पुरुषांना मज्जावच असतो माजघरात. चौरंगावर फुलांच्या सजावटीत विसावलेली देवी आणि आजूबाजूला चेष्टा मस्करी, हास्य विनोद, उखाणे, झिम्मा, फुगड्या, नाच ग घुमा, बस फुगडी, कोंबडा असे निरनिराळे खेळ खेळण्यात रमलेल्या बायका आणि मुली ... ह्या सगळ्यात रात्र कधी सरते ते कळत ही नाही . पहाटे पहाटे खास जायफळ घातलेली कॉफी घेऊन मगच सगळ्या आपापल्या घरी जातात तेव्हाच माजघराला विश्रांती मिळते .

आमचं घर आहे मोठं पण पै पाव्हणे ही असतातच. अगदी छोटासा समारंभ असेल तिकडे तरी ही सगळे जीवाचा आटापिटा करून घरी जातात. त्यामुळे पाव्हणे असले की जागा कमीच पडते झोपायला . अशा वेळी मग मध्ये जायला यायला वाट सोडून दुशीकडे लायनीत गाद्या घातल्या जातात . गादीवर पडून गप्पा मारत मारत मंडळी झोपी जातात. पण एक आहे रात्री मांजरांचा मुक्त संचार असतो माजघरात आणि ती हमखास आपल्या गादीत येऊन आपल्याला चिकटतात. हे ज्याला सहन होत नाही तो नाही झोपू शकत माजघरात.

घरात चिमुकल्या बाळाचं आगमन होणार असलं की आधीच मायाळू असलेलं माजघर जास्तच मायाळू बनत. तसं तर बाळंतिणीची खोली आहे सेपरेट पण बाळाचा पाळणा टांगायचा मान माजघरातल्या वाशालाच मिळतो. बाळा बरोबरच आईला ही विश्रांती मिळावी म्हणून एखादा माचा ही टाकला जातो पाळण्या शेजारी. आधीच शांत आणि काळोखं असलेलं माजघर मग अधिकच शांत बनत, बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून . आपली सगळी माया त्या लहानग्या जीवावर पाखरत राहत . उदाधुपाचा आणि वेखंडचा वास,खुळखुळ्याचा आवाज, थोड्या मोठ्या मुलांचा बाळाला खेळवण्यासाठी वाढलेला माजघरातला मुक्काम, हळू आवाजात म्हटलेल्या ओव्या आणि अंगाई, बाळाचं वेळी अवेळी सुरू होणार रडणं आणि मोठयांचं त्याला शांतवणं ... माजघराला ही ह्या सगळ्याची भुरळ पडत असेल.

कधी तरी आपल्याला उदास, एकट वाटत असेल तर माजघरात थोडा वेळ बसलं तर आपली उदासी नाहीशी होते. एरवी काळोख आपल्याला जास्त उदास करतो पण काय जादू आहे माहीत नाही माजघरातला काळोख, तिथला गारवा , तिथली शांतता आपल्या मनाला मायेने थोपटत रहातात आणि आपलं मन थोड्याच वेळात शांत होत ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाफा, पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.

दु बरोबर आहे. >> धन्यवाद पाफा. वाटत होत बरोबर आहे असं पण थोडा डाऊट होता.

छान वर्णन!
आमचं माजघर कोकणातल्या स्टॅंडर्डने लहान आहे, पण जिव्हाळा मात्र सगळा हाच! उन्हाळ्यात दुपारी माजघरात थंड वार्याच्या झुळका येतात! तेव्हा तिथे गप्पा मारत बसण्याचे सुख काय सांगावे Happy

आदू, माजघर म्हणजे सामान्यतः मधली खोली. कोकणातल्या घरात साधारणपणे ओटी ( बाहेरची खोली), माजघर, स्वैपाकघर असा क्रम असतो. पडवी म्हणजे बाहेरच्या बाजूला असलेली सामान्यतः उतरतं छप्पर असलेली , एक/दोन/तीन बाजूंनी उघडी असलेली खोली. पडवी ओटीच्या पुढे असू शकते, स्वैपाकघराच्या मागे असू शकते किंवा घराच्या डाव्या/उजव्या बाजूलाही असू शकते. माजघर मात्र घराच्या मध्यभागीच असतं सामान्यतः.

मस्त लिहिलंस ग हेमा.

तुझ्या घराबद्दल व माणसांबद्दल वाचून खूप बरे वाटते. हल्ली एकत्र कुटुंबात जिव्हाळा तितकासा राहिलेला नाहीय, आशा वेळी तुझे कुटुंब अगदी स्वप्नवत वाटते.

डिनर बेलची कल्पना खूप आवडली.

माझ्या आईच्या माहेरच्या घरी असेच पडवी, लोटा, माजघर, सैपाकघर अशी रचना होती. तू ज्याला ओटी म्हणतेस त्याला आमच्याकडे लोटा म्हणतात. मुंबईत हॉल Happy

प्रत्येक खोलीत एक कौल काचेचे लावून प्रकाशाची सोय केलेली होती. दिवसा कवडसे आले की त्यात हजारो कण तरंगताना दिसत. बाकी खोली रिकामी मग कवडश्यात इतके कण कुठून? म्हणत मी ते पकडायचा प्रयत्न करे. सैपाकघर पण प्रशस्त होते, एक घुसळखांब होता. आम्ही कायम माजघरात जेवायला बसायचो. पाट मांडून त्यावर बसून जेवण व ताटासमोर तीनचार मांजरी आमचे वरखाली होणारे हात पहात बसलेल्या. Happy

आंबोलीत गरमी अशी कधी नव्हतीच पण तरीही बाहेरन काळोख्या दिसणाऱ्या ह्या कौलारू घरांमध्ये खूप थंडावा असायचा. आता गावी लोकानी सिमेंटची घरे बांधली व चित्रविचित्र लादी बसवून सगळी शोभा घालवली.

किती सुंदर लिहिता तुम्ही.
माजघराबद्दल वाचुन माझ्या गावचं जुनं घर जाउन सगळ्या सुख सोयींनी युक्त बंगला आल्याचा आज खेद वाटला जरा. Happy
पण आम्हीही मोठ्या हॉलमधे बसवतो पंगती. Happy

मी दुर्दैवाने असं जादुई माजघर पाहिलेलं नाहिये. पण खूप लहानपणी बाबांच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो त्यांचा वाडा होता आणि त्यांचं माजघर, स्वयंपाक घर वगैरे शी मला हा लेख वाचून फार रिलेट करता आलं.
ते असंच अंधारं होतं, त्याच्या पुढे एक अजून खोली त्यात न्हाणिघर आणि स्वच्छतागृह आणि बाहेर आंगण. (परसदार)
तिथे वेगवेगळी फुल झाडं आणि विहिर. मी माझ्या आयुष्यात भारद्वाज तिथे पहिल्यांदा पाहिला.
त्या घरात काकू कैरीची आमटी करायच्या आणि सकाळी न्याहरी ला ती शिळी आमटी आणि भाकरी आम्ही खाल्लेली मला आठवते आहे.
खूप छान लिखाण.

हेमा, काय लिहिले आहेस गं! घराचा गाभाच माजघर म्हणजे.पण त्या रिकाम्या माजघरात किती सुंदर रंग भरलेस निरनिराळ्या भावनांचे! मोठ्या कागदावर रेखाटलेले उत्तम शब्दचित्र मनाला शांती व आनंद देऊन गेले. आणखी काय हवं असतं आपल्याला काही वाचताना? तुझ्या लेखनशैलीचं खूप कौतुक वाटतं.

खूप सुंदर !! कोकणात नाही पण माझ्या आजोळी असाच मोठ्ठा वाडा होता .त्यात ओटा, माजघर, बाळंतिणीची मिट्ट अंधारी एक खिडकिवाली खोली, पडवी वगैरे होते.
अगदी माझी दहावी होईपर्यंत मी दर वर्षातून महिनाभर हे वाडा सुख अनुभवलंय. जेवणाची पंगत रोज असायची. मातीच्या भिंती आणि कडीपाटाचे व तुळयांचे छप्पर ज्यात भर उन्हाळ्यातही गार वाटायचे.
भिंतीत कोनाडे, दोन कोनाड्यांच्या मध्ये खुंट्या आणि वरच्या बाजूला ब्लॅक अँड व्हाइट पूर्वजांच्या तसबिरी , जोडीला असंख्य देवतांच्या मोठ्या तसबिरी असायच्या . टोले देणारं एक मोठं घड्याळ ही होतं . आणि प्रशस्त देवघर असायचं . रोज नैवेद्य झाल्याशिवाय जेवणं होत नसत.
आता सगळं आठवणीत उरलंय. त्या काळी फोटो फारसे नसतंच. फार थोडे आणि ते पण अंगणात काढलेले. त्यामुळे आपल्याच मुलालाही हे सगळं दाखवता येत नाही.
सगळं आठवलं हे वाचून .

सुरेख! कोकणात गर्मी अशी कधी नसते बहुधा पण या कौलांच्या घरात खूप शांत आणि गारवा ही असतो. मी एकच दिवस राहलोय पण त्या आठवणी पक्क्याच झाल्यात डोक्यात.
त्या तिकडे वाचला होता काल का परवा... Happy

जादुई शब्दचित्र! ममो, तुझं घर, त्या घरातल्या माणसांनी माझ्या मनात घर केलंय ... भुरळ पाडलीये..... एकदा नक्की पाहाचयं...

अहाहा जीव थंडगार झाला हे वाचून. किती भाग्यवान आहात तुम्ही..

मी गंध नावाच्या मराठी पिक्चरमधे बघितलं असं घर... नीना कुलकर्णी आहे त्यात.

मनीमोहोर खूपच सुंदर लेखन.
आमच पण कोकणात घर आहे असंच ,अक्षरशः जसाच्या तसं वाटत होतं . बाहेर देशात असल्यामुळे वर्षभर तिथे जाणं नाही झालायं . पण ह्या लेखामुळे जास्तच आठवण झाली . लहान असताना ह्याच माजघरात काचेच्या कौलातून येणारे कण बघत तासन तास काढलेत, भरपूर पुस्तकं वाचली आहेत. ज्या वेळी मुलं शिक्षणासाठी पुण्या-मुंबईत जातात त्या वयात याच घरात राहून गावाजवळच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये मी शिक्षण घेतलंय. खूपच सुंदर वर्ष होती ती.
उन्हाळ्यात घरासमोर मांडव टाकला जायचा त्यात झोपायला खूप मज्जा यायची . आता बिबट्या आणि जनावरांच्या भीतीमुळे मांडव घालणं बंद झालाय पण घर अजून तसच आहे . गंध चित्रपटात दाखवलेला घर पण तसच आहे . "घर आमचं कोकणातलं" या राजा राजवाडे यांच्या पुस्तकाची पण आठवण झाली.

नेहमीप्रमाणेच खूप सुंदर वर्णन !
अश्या एक नाही दोन दोन माजघरांचं (सावंतवाडी + हलशी) भाग्य लहानपणी अनुभवलं असल्याने, वर्णनाशी मस्त कनेक्ट होता आलं !

प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार सगळ्यांचे. ह्या लेखामुळे खूप जणांच्या माजघरा विषयीच्या त्यांच्या आठवणीना उजाळा मिळाला , आणखी काय हवे ?

वावे किती छान एक्स्प्लेन केलं आहेस माजघर म्हणजे काय ते.

साधना हो खरच आमचं घर आहे खूप वेगळं. हल्लीच्या काळात अस असणं म्हणजे देवाची कृपाच म्हणावं लागेल.
हल्ली नवीन बांधकाम सगळं स्लॅबचच असतं. आमच्या गावात काही जणांचे तर शहरात असतात तसे बंगलेच झालेत रिनोवेशन नंतर. आमच्या घरी पण नवीन झालेलं बांधकाम स्लॅबचच आहे पण सुदैवाने ते घराच्या मागच्या बाजूला झाल्याने पुढून पाहिलं तर घराच्या कौलारू बाजाला धक्का लागला नाहीये.

दक्षिणा, अंजली काल घरासाठी तो गंध सिनेमा मुद्दाम पहिला.

मंजू, नक्की जाऊ या नाडणला.

म.मो., किती गोड...दोन दिवसांपूर्वीच वाचला होता पण वाचून झालं की सारखं मन भरून यायचं...आज प्रतिसाद देतेय. तुम्हाला एक जादूकी झप्पी .

Pages