बिलिरुबिन : काविळीतला पिवळा डँबिस

Submitted by कुमार१ on 18 December, 2017 - 05:11

बिलिरूबिन – हा शब्द काहीसा परका वाटला असेल ना? मला कल्पना आहे की सामान्यजनांना ग्लुकोज, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल हे शब्द खूप परिचित आहेत. पण बिलिरूबिन तसा पटकन लक्षात येत नाही. आता मी जर ‘कावीळ’ हा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर लगेच डोळे पिवळे झालेला रुग्ण येतो की नाही? मग सोप्पंय. हा जो पिवळेपणा येतो तो बिलिरूबिन या शरीरातील रंगद्रव्यामुळे.

निरोगी अवस्थेत हे बिलिरूबिन आपल्या रक्तात अल्प प्रमाणात असते. त्यामुळे त्याचा पिवळा रंग आपल्या अवयवांत बिलकूल दिसत नाही. पण काही रोगांमध्ये जेव्हा ह्याचे प्रमाण वाढू लागते तेव्हा हळूहळू विविध पेशी पिवळ्या होऊ लागतात. हा पिवळेपणा डोळ्यांमध्ये अगदी सहज दिसून येतो आणि यालाच आपण ‘कावीळ’ म्हणतो. कावीळ जसजशी तीव्र होत जाते तसे रुग्णाची जीभ व नंतर त्वचाही पिवळी पडते.

काविळीच्या मुळाशी असणारे हे बिलिरूबिन शरीरात तयार कसे होते, त्याचा चयापचय कसा होतो आणि या यंत्रणेत बिघाड झाल्यास कावीळ कशी होते, हे सर्व आपण या लेखात समजून घेणार आहोत.

आता लेखाचे तीन भाग करतो:
१. बिलिरूबिनचे उत्पादन
२. बिलिरूबिनवरील प्रक्रिया व उत्सर्जन आणि
३. काविळीचा आढावा

बिलिरूबिनचे उत्पादन
सुरवात करुया आपल्या परिचित हिमोग्लोबिनपासून. हे प्रथिन रक्तातील लालपेशीमध्ये असते. प्रत्येक लालपेशी ही तिच्या जन्मानंतर १२० दिवसांनी मरते. त्यानंतर त्यातील हिमोग्लोबिन बाहेर येते आणि त्याचे हीम + ग्लोबीन असे विघटन होते. मग हीममधील लोह सुटे होते आणि ते शरीरातील लोहाच्या साठ्यात जमा होते.

नंतर हीमच्या अवशेषाचे विघटन होऊन बिलिरूबिन तयार होते. शरीरात रोज काही अब्ज लालपेशी मरत असल्याने बिलिरूबिन बऱ्यापैकी प्रमाणात तयार होते. मात्र ते रक्तात खूप साठून राहणे चांगले नसते. जर का ते प्रमाणाबाहेर साठले तर ते थेट मेंदूत घुसू शकते आणि तिथे गंभीर इजा करते. म्हणूनच त्यावर प्रक्रिया करून त्याला सौम्य करण्याची जबाबदारी आपल्या यकृताने घेतलेली आहे.

बिलिरूबिनवरील प्रक्रिया व उत्सर्जन
बिलिरूबिन हे पाण्यात विरघळू शकत नसल्याने त्यावर यकृतात काही प्रक्रिया करणे आवश्यक असते. यकृताच्या पेशींमध्ये बिलिरूबिनचा अन्य रसायनाशी संयोग होतो आणि ‘संयुगित बिलिरूबिन’ तयार होते. ते पाण्यात विरघळणारे असते हा मोठा फायदा.
पुढे ते पित्तनलिकेत सोडले जाते. काही प्रमाणात ते पित्तरसात(bile) राहते. शेवटी ते मोठ्या पित्तनलिकेमार्फत आतड्यांमध्ये पोचते. तिथे त्यावर अजून प्रक्रिया होऊन stercobilin हे पिवळसर तपकिरी रसायन तयार होते आणि ते शौचावाटे बाहेर पडते. या stercobilin च्या रंगामुळेच आपल्या विष्ठेला तो रंग येतो. निरोगी अवस्थेत विष्ठा नेहमी या रंगाची असते.

बिलिरूबिनचे अशा प्रकारे शरीरातून उत्सर्जन झाल्यामुळे आपल्या रक्तात ते अल्प प्रमाणात राहते. त्यामुळे निरोगी अवस्थेत त्याचा पिवळा रंग हा आपल्या आपल्या बाह्य अवयवांमध्ये दिसू शकत नाही. काही आजारांमध्ये जर बिलिरूबिनचे रक्तातील प्रमाण नेहमीपेक्षा किमान अडीचपट झाले तरच बाह्य अवयव पिवळे दिसतात. यालाच आपण कावीळ म्हणतो.

काविळीचा आढावा
सर्वप्रथम एक लक्षात घेतले पाहिजे की ‘कावीळ’ हे शरीरातील काही आजारांचे बाह्य चिन्ह (sign) आहे. ‘पेशी पिवळ्या होणे’ हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. हा पिवळेपणा रक्तातील वाढलेल्या बिलिरूबिनमुळे येतो. तसे होण्यास यकृताचे किंवा लालपेशींचे काही आजार कारणीभूत ठरतात.
एक प्रकारची कावीळ मात्र ‘आजार’ समजला जात नाही. ती म्हणजे तान्ह्या बाळाची अल्प मुदतीची कावीळ. बऱ्याच बाळांच्या जन्मानंतर तिसऱ्या ते दहाव्या दिवसापर्यंत त्यांना सौम्य काविळ असते. याचे कारण म्हणजे बिलिरूबिनवर प्रक्रिया करणारी यकृतातील यंत्रणा तोपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसते. त्यामुळे रक्तातील असंयुगित बिलिरूबिनचे प्रमाण काहीसे वाढलेले राहते. दहाव्या दिवसानंतर ती यंत्रणा कार्यक्षम झाल्याने कावीळ दिसेनाशी होते. जर ती टिकून राहिली तर मात्र दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार घ्यावे लागतात.

मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमध्ये मात्र ही कावीळ तीव्र होण्याची शक्यता वाढते. त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते कारण या काविळीतील असंयुगित बिलिरूबिन जर प्रमाणाबाहेर वाढले तर थेट मेंदूला इजा करते.

आता विविध आजारांमुळे होणाऱ्या काविळीकडे वळूयात. तिच्या कारणानुसार तिचे तीन प्रमुख गटांत वर्गीकरण केले जाते:
१. लालपेशींच्या आजाराने होणारी
२. यकृतातील बिघाडाने होणारी आणि
३. पित्तनलिकेत अडथळा झाल्याने होणारी
आता या प्रत्येक गटातील एका आजाराचे उदाहरण घेऊन संबंधित कावीळ समजून घेऊ.

लालपेशींच्या आजाराने होणारी कावीळ
लालपेशींमधील हीमचे विघटन होऊन बिलीरुबिन तयार होते ते आपण वर पाहिले. शरीरात रोज ठराविक लालपेशी नष्ट होतात आणि त्या प्रमाणात बिलीरुबिन तयार होते. समजा एखाद्याला या पेशींचा ‘सिकलसेल’ आजार आहे. यात त्या पेशींचे आयुष्य नेहमीच्या फक्त एक षष्ठांश असते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा नाश होतो. त्यानुसार आता खूप मोठ्या प्रमाणात बिलीरुबिन तयार होते.
आता मात्र त्यावर प्रक्रिया करण्याची यकृताची क्षमता (अधिक काम करुनही) अपुरी पडते. त्यामुळे संयोग न झालेले बिलीरुबिन रक्तात साचते आणि रुग्णास कावीळ होते. हे बिलीरुबिन पाण्यात विरघळणारे नसल्याने ते लघवीवाटे उत्सर्जित होत नाही. अशा रुग्णामध्ये डोळे पिवळे पण लघवी मात्र नेहमीच्याच (normal) फिकट रंगाची असे वैशिष्ट्य दिसून येते.

यकृतातील बिघाडाने होणारी कावीळ
या गटात ‘हिपटायटीस –ए’ या विषाणूमुळे होणारा संसर्ग हे आपल्या आणि अन्य अविकसित देशांमधले महत्वाचे कारण आहे. हा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या विष्ठेतून हे विषाणू पसरवले जातात. आपल्याकडे दाट लोकवस्ती, गलिच्छ राहणीमान आणि मैलावहनाच्या सदोष यंत्रणा हे सर्व एकत्रित आढळून येते.
त्यामुळे हे विषाणू अन्न व पाण्याला दूषित करतात. त्यातून पसरणाऱ्या या आजाराच्या साथी हा काही वेळेस गंभीर विषय असतो. या रुग्णांमध्ये डोळे व लघवी दोन्ही पिवळ्या रंगाचे असतात. दर पावसाळ्यात अनेक सरकारी रुग्णालये ही या काविळीच्या रुग्णांनी ओसंडून वाहत असतात. या साथींच्या दरम्यान सार्वजनिक निवासांतून राहणारे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी यांनी विशेष सावधगिरी बाळगायची असते.

पित्तनलिकेत अडथळा झाल्याने होणारी कावीळ
या गटात ‘पित्तखडे’(gallstones) हे उदाहरण बघूया. हे खडे आपल्या पित्त यंत्रणेत काही कारणांमुळे तयार होतात. ते जर पुरेशा मोठ्या आकाराचे झाले तर ते नलिकेत मोठा अडथळा आणतात. त्यामुळे पित्ताचा प्रवाह थांबतो आणि यकृतातून सोडलेले संयुगित बिलिरूबिन आतड्यांत पोचत नाही. मग ते रक्तात साठते आणि कावीळ होते. हे बिलिरूबिन लघवीतून उत्सर्जित होते.
या रुग्णांमध्ये आतड्यात stercobilin तयार न झाल्याने त्यांच्या विष्ठेचा रंग हा पांढुरका असतो. जर खूप मोठ्या खड्यांमुळे नलिका पूर्ण बंद झाली तर हा रंग चक्क चुन्यासारखा असतो. थोडक्यात पिवळे गडद डोळे, पिवळीजर्द लघवी मात्र पांढुरकी विष्ठा ही या रुग्णांची वैशिष्ट्ये होत.
पित्तखड्यांचा आजार हा समाजातील सधन वर्ग आणि विकसित देशांमध्ये तुलनेने अधिक आढळतो. रिफाईन्ड साखरेचे पदार्थ भरपूर खाण्याशी त्याचा जवळचा संबंध आहे.

वरील विवेचनावरून काविळीचे मूलभूत प्रकार आणि त्यांच्यातील फरक वाचकांच्या लक्षात यावेत. त्या प्रत्येक प्रकाराची अनेक कारणे असतात पण त्यांची जंत्री करणे हा या लेखाचा उद्देश नाही. आपल्या शंकांच्या अनुषंगाने योग्य ती पूरक माहिती प्रतिसादांतून देता येईल.

समारोप

हिमोग्लोबिनच्या ‘हीम’चे विघटन होऊन बिलिरूबिन तयार होते. त्यावर यथायोग्य प्रक्रिया करण्याचे महत्वाचे काम यकृत करते. निरोगी अवस्थेत ते रक्तात अल्प प्रमाणात असल्याने जणू गोगलगायीसारखे गरीब असते. पण जेव्हा काही आजारांमध्ये त्याचे प्रमाण वाढू लागते तेव्हा मात्र ते नागासारखा फणा वर काढते ! असंयुगीत बिलिरूबिन जर रक्तात खूप वाढले तर ते मेंदूला गंभीर इजा करते. हे लक्षात घेता काविळीच्या रुग्णाने कुठल्याही अशास्त्रीय उपचाराच्या नादी न लागता तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. समाजात ‘हिपटायटीस –ए’मुळे नित्यनेमाने होणारी कावीळ ही सार्वजनिक आरोग्यरक्षण फसल्याचे निदर्शक असते. तर तान्ह्या बाळाची औट घटकेची सौम्य कावीळ हा सामान्यजनांसाठी कुतूहलाचा विषय असतो.
************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्या,
एक लक्षात घ्या की ' कावीळ' हे रोगनिदान नाही. तिची अनेक कारणे आहेत व त्यानुसार उत्तर ठरेल. पुन्हा प्रत्येक रुग्णानुसार ते वेगळे राहील
हिपटायटीस A मध्ये बरेच रुग्ण ३-४ महिन्यात बरे होतात.

यंदाचे ‘नोबेल’ हिपटायटीस- C या विषाणूच्या शोधाबद्दल मिळालेले आहे. त्याच्यामुळे होणाऱ्या यकृतदाहाची माहिती :

* जागतिक व्याप्ती : १७ कोटी जणांना संसर्ग; त्यापैकी ७ कोटी लोकांचा हजार दीर्घकालीन होतो.

* संसर्गाचे मार्ग:
१. इंजेक्शन द्वारा अमली पदार्थ घेणे( सुया निर्जंतुक नसल्याने )
२.पुरुष समलैंगिकता; गुदसंभोग

३. गोंदणे, दाढीच्या वस्तर्यांचा सामायिक वापर
4.Acupuncture (दूषित सुया)
५.गर्भवती कडून बाळास

*आजाराचे स्वरूप : 75 टक्के लोकांमध्ये तो दीर्घकालीन होतो. त्यातून यकृत कठिणता (cirrhosis) आणि पुढे कर्करोग होऊ शकतो.

* रोगनिदान : रक्तावरील अँटीबॉडीज व आरएनए चाचण्या

* भवितव्य : प्रभावी विषाणूविरोधी औषधांमुळे बरा होऊ शकतो.

डॉक्टर ज्या व्यक्तीला लिव्हर सिरॉसिस आजार होण्याची अधिक शक्यता असते त्या व्यक्तीने काय काय पथ्ये पाळावी. नारळ पाणी पिणे, वजन कमी करणे याव्यतिरिक्त प्लीज सांगाल का?

सामो,
• आहारामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असावीत
• दिवसातून ५-६ वेळा विभागून खावे आणि पुरेसे उष्मांक अन्नातून मिळावेत

• जर जलोदर होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली असेल तर आहारातील मिठावर नियंत्रण
• चालण्याचा आणि अन्य सोयीस्कर व्यायाम नियमित करावा

• मद्यपान हे जर मूळ कारण असेल तर ते पूर्ण बंद करणे हे वेगळे सांगणे न लगे !

>>>>>>>> आहारामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असावीत
ओहोहो!!! खूप मोलाचा सल्ला आहे हा.
>>>>दिवसातून ५-६ वेळा विभागून खावे आणि पुरेसे उष्मांक अन्नातून मिळावेत
धन्यवाद
>>>>मद्यपान हे जर मूळ कारण असेल तर ते पूर्ण बंद करणे हे वेगळे सांगणे न लगे !
नाही नाही कोणीच पित नाही आमच्याकडे.

हिपॅटायटिस या आजाराची गंभीर जागतिक व्याप्ती दर्शविणारा डब्ल्यूएचओचा अहवाल (२०२४) नुकताच जाहीर झाला आहे. त्यातील काही ठळक मुद्दे :

1. संसर्गजन्य रोगांनी होणाऱ्या वार्षिक मृत्यूमध्ये हा आजार आणि क्षयरोग समान स्थानावरती आहेत.
2. आजच्या घडीला हिपॅटायटिस (बी + सी मिळून) 30 कोटी लोक बाधित आहेत.

3. बी + सी मिळून दररोज ३५०० लोकांचा मृत्यू होतो.
4. हा अहवाल एकूण 187 देशांचा अभ्यास करून काढण्यात आला आहे. या आजाराचे दोन तृतीयांश रुग्ण दहा देशांमध्ये एकवटलेले असून त्यामध्ये भारत-पाक-बांगलादेश, फिलिपिन्स आणि रशिया यांचा समावेश आहे.

5. हा आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची प्रमुख कारणे :
. असुरक्षित रक्तसंक्रमण, औषधी इंजेक्शने आणि असुरक्षित शस्त्रक्रिया
. ड्रग्सची व्यसनाधीनता
. वेश्याव्यवसाय आणि असुरक्षित पुरुष समलैंगिकता

https://www.who.int/publications/i/item/9789240091672

Pages