लिंगाणा

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

शिवसहस्त्र नामावलीतील 'चंद्रमौळी' या तेराव्या नावाचा महिमा अनुभण्याचा योग आला तो गेल्या वर्षीच्या माघ कृष्ण सप्तमीला.. सह्याद्रीच्या खांद्यावर ध्यानस्थ बसलेल्या लिंगाण्याच ते दुर्गम रुप म्हणजे तालमीतल्या मातीत रंगलेला मल्लंच जणू... त्याच्या कातील धारेवरिल चढाईतील जरब इतकी की, शड्डू ठोकत आव्हान देणार आखाड्यातला नरविरच भासावा... घोटीव शरिरबंधावर रुंद कपाळीचा कडा, वार्‍यालाही थारा न देणारा निमुळता माथा आणि त्यावर झळकणारी सप्त्मीची चंद्रकला... वाह!

आमच्या चढाईचा मुहुर्त थोडा लांबला हे एका अर्थी बरच झालं... नाहितर इतक्या सुंदर देखाव्यास आम्ही मुकलोच असतो. हेमच्या लिंगाणा मोहिमेतून स्पुर्ती घेऊन मायबोली वरिल तब्बल १८ भटके लिंगाणा मोहीमेत सहभागी झाले होते. सतिश, वासू, कुशल आणि सुनिल या आघाडीच्या चढाईपटूंच्या हाती आमच्या आयुष्याचे रोप असल्याने आम्ही निर्धास्त होतो. आमचे दोन मावळे सोडले तर बाकीचे सगळेच गुहे पर्यंतची चढाई करण्यात यशस्वी झाले. मात्र गुहे पर्यंतचा टप्पा गाठण्यास आम्हाला दुपारचे दोन वाजले होते. सोबत आणलेल्या शिदोरीवर ताव मारुन पुढिल चढाईस तयार झालो.

गुहेच्या मागून चढाईचा खडतर टप्पा सुरु होतो... त्यातील पहिलाच टप्पा ७० फुटांचा.. सतिशने शूज उतरवून अनवाणी पायांनी त्या तापलेल्या कड्याला घवसणी घातली... खालून लिडरला belay देण्याच काम कुशल ईमानेइतबारे करत होता. दरम्यान आम्ही पश्चिम टोकाकडील पाण्याच्या टाक्यां मधून पाणी भरुन घेतलं... बराच वेळ कड्याशी झटापट करुन सतिश वर पोहचला खरा... पण सतिश सारखी चपळाई आम्हा सगळ्यां मधे नव्हती. दुपारचे उन, पाण्याची कमतरता, चढाईच्या क्षेत्रातील नवखेपण, परतीच्या प्रवासातील बोराटा नाळेतील खडा चढ आणि हाताशी असलेला अपुरा वेळ.. या सगळ्याचा विचार करुन आम्ही वेळेचे गणित मांडले, तर ते जुळत नसल्याची खात्री पटली. मग जड अंतःकरणाने सर्वांनुमते माघारी फिरण्याचा सुज्ञ निर्णय घेण्यात आला.. सर सलामत तो पगडी पच्चास...

पुढल्या वेळी योग्य तयारी आणि पाठीशी पुरेसा वेळ घेऊन परत येऊ, असं मनाशी ठरवून परतीचा प्रवास सुरु केला. चढाई पेक्षा उतराई जास्त भितीदायक होती कारण पाया खाली थेट ४००-५०० फुटांची खोल दरी... Top Belayच्या सहाय्याने rappelling करत खाली उतरलो. दिवसभराच्या मेहनीतीने सगळे दमून गेलो होतो.. लिंगाणा आणि रायलिंगच्या खिंडीत बसून leader लोकांच wind up बघत थोडा वेळ आराम केला. लिंगाणाच्या पश्चिमेकडे सरकलेला किरमाणी हात उंचावून अभिवादन करत होता. जणू काही म्हणत होता... फुरसत मधे या.. तुमच्या लाडक्या दोस्ताशी दोन हात करायला.

क्षणचित्रे
१.

२.

३.

४.

५. साधारण ४०० फुटांवरिल थरार..

६.

७.

८.

९.

१०.

प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्त....
पुढच्या यशस्वी चढाई साठी अॅडव्हान्स शुभेच्छा..!!