स्विझर्लंड : स्विस स्केप्स आगगाडीच्या रुळांवरुन...

Submitted by अ'निरु'द्ध on 18 January, 2018 - 12:24

स्विझर्लंड : स्विस स्केप्स आगगाडीच्या रुळांवरुन...

Switzerland : Swissscapes- From Train Tracks…

मुखपृष्ठ : प्रचि ००१:

स्विझर्लंड हा अतिशय सुंदर देश आहे हे वेगळे सांगायची जरूरच नाही. हा अख्खा स्विझर्लंड अनेक रेल्वे कंपन्यांच्या विविध ट्रेन्सच्या देशभर पसरलेल्या अतिशय दाट जाळ्याने जोडला गेला आहे.
या देशाचा जवळ जवळ ६०% भूभाग आल्प्स पर्वतराजीच्या पसाऱ्याने व्याप्त असला तरी जगातील अतिशय जास्त घनतेचे रेल्वेचे जाळे या देशात पसरलेले आहे. ग्लेशियर एक्स्प्रेस, बर्निना एक्स्प्रेस, गोल्डन पास ट्रेन हे इथले काही प्रसिद्ध मार्ग.

अतिशय सुंदर, स्वच्छ ट्रेन्स; त्याला मोठ्या किंवा अधिक मोठ्या काचेच्या भिंती आणि काही ठिकाणी काचेचं छप्परही.

आम्ही या ट्रेनचा ८ दिवसांचा फॅमिली स्विस रेल पास काढला होता. त्यामुळे त्या ८ दिवसात यातल्या कुठल्याही मार्गावरून कितीही वेळा प्रवास करणं शक्य होतं . आणि विशेष म्हणजे हा पास फक्त रेल्वे पुरताच आहे असं नसून प्रवासाशी संबंधित ट्राम,बस इतकंच नव्हे तर कनेक्टिन्ग बोटी यामधूनही प्रवास करण्याची मुभा होती.
अनेक किल्ले, गढ्या, पॅलेसेस आणि म्युझियम्स यामध्ये विनामूल्य प्रवेश हेही यांमध्ये समाविष्ट होतं
सेकंद टू सेकंद वक्तशीर पणा हे ह्या संपूर्ण प्रवास व्यवस्थेचं आणखीन एक उपयुक्त आणि प्रमुख वैशिष्ट्य.
नितांत सुंदर, रमणीय निसर्ग सौंदर्य, उंच सखल भागातून, दऱ्या टेकड्यातुन जाणारे रेल्वे मार्ग आणि हे सगळं सगळं ट्रेन मधून बघायची सोय, त्यामुळे हा स्विस ट्रेन्सचा प्रवासही अतिशय अनोखा, देखणा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा होऊन जातो.

यातील गोल्डन पास रेल्वे मार्ग हा तर अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या वेगवेगळ्या रेल्वे मार्गावरून जाताना टिपलेली हि काही वेचक क्षणचित्रे.

मात्र काचेच्या आतून हि टिपली गेली असल्यामुळे तो एक अडसर आणि त्या काचेमधील प्रतिबिंब (Reflection) तुम्हाला यातल्या काही क्षण चित्रांमध्ये आढळेल.
एखाददुसरं प्रकाशचित्र मात्र रेल्वे स्टेशनला उतरून अथवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनही काढलेलं आहे.

प्रचि ०१ : आमचा मुक्काम स्विझर्लंड मधल्या इंटरलाकेन या टुमदार शहरात होता. तिथून लुसर्न या Heritage शहरात (ह्याची पुढे कधीतरी माहिती बघू) जाताना आम्ही गोल्डन पास लाईन या रेल्वे रुटने प्रवास केला. गोल्डन पास लाईन हा संपूर्ण मार्ग अतिशय सिनिक आहे. आमची गाडी सुरु झाली आणि रिमझिम पाऊस सुरु झाला.
त्या पावसात हे ट्रेनच्या खिडकीतून दिसणारं प्रकाश चित्रं...

प्रचि ०२: आता हा पाऊस ढगांनाही खाली घेऊन आला...

प्रचि ०३. : धुक्यात लपेटलेली आणि अंगाखांद्यावर थोडासा बर्फ मिरवणारी ही आल्प्स पर्वतराजी...

प्रचि ०४: ग्रुएर कॅसल हे स्वित्झर्लंडमधले एक अतिशय छान ठिकाण आहे. पायथ्याशी चीझ फॅक्टरी आणि काही अंतरावर चॉकलेट फॅक्टरी (पण ह्याबद्दल नंतर कधी तरी). तर दुसऱ्या दिवशी ग्रुएर कॅसलला जाताना दिसलेले हे दृश्य...

प्रचि ०५: हलक्या उताराच्या टेकडीवरच्या कुरणांत चरणाऱ्या ह्या स्विस गायी...

( एक अंदरकी बात : या गायींचं दृष्य ट्रेन मधून खूप आल्हाददायक दिसतं. ट्रेन A.C. असल्यामुळे, काचांनी छान बंद असल्यामुळे त्या कुरणातल्या गायींचं कर्तृत्व तिथे कळत नाही. अगदी दुरुन डोंगर साजरे आणि दुरुनंच गायी साजर्या....

पण जेंव्हा केंव्हा त्या कुरणांच्या शेजारून जायची वेळ यायची तेव्हा मात्र नाक मुठीत धरायची वेळ यायची..
स्विस गायींचं बाकी काहीही आणि कितीही वेगळेपण असलं तरी शेणामुताच्या वासाबाबत त्या आणि आपल्या भारतीय गायी सारख्याच. त्यात त्या मुळातच धष्टपुष्ट, जास्त चारा तब्येतीत खाणार आणि तब्येतीत...

उगाच नाही माझा मुलगा तिथे म्हणायचा . . . . . "अख्खा ग्रामीण स्विझर्लंड हा एक मोठा गोठा आहे.”)

प्रचि ०६: तिसऱ्या दिवशी माउंट टिटलिसला जाताना.... प्रवासाची सुरुवात (ट्रेनमधून उतरल्यावर वेगवेगळे रोप वे, केबल वे यामधून माऊंट टिटलिसच्या शिखरावर जाण हा एक रोमांचकारक (माझ्या पत्नीसाठी भीतीदायक) अनुभव होता. . . .त्याबद्दल पुढे कधीतरी. . . . )

प्रचि ०७: डोंगराच्या पार्श्वभूमीवरचे टिपिकल स्विस स्ट्रक्चर.

प्रचि ०८: बर्फाच्छादित आल्प्स

प्रचि ०९: गोल्डन पास ट्रेन वळणदार रुळांवर

प्रचि १०: स्विस स्केप. . . आणि तो रस्ताही किती सुंदर. . . वाटतं ना या रस्त्यावरून जाऊन त्या घरापाशी बसावं ?

प्रचि ११: सार्नेन तलाव (Lake Sarnen) आणि काठावरचे गाव. हा रस्ताही किती वळणदार आणि छान. . . . . आणि गर्दीत वसलेलं चर्च...

प्रचि १२: तलावाच्या पलीकडच्या काठावरची डोंगर उतारावरची घरे आणि छोटंसं चर्च . . . . . . चॅपेल

प्रचि १३: तलाव संपता संपता . . . . स्विस कुरण आणि गायी...

प्रचि १४: त्याआधी इंटरलाकेन सोडल्यावर लागणारा ब्रिन्झ तलाव(Lake Brienz) आणि त्याच्या काठावरचे ब्रिन्झ स्टेशन -०१

प्रचि १५: ब्रिन्झ स्टेशन -०२

प्रचि १६: गोल्डन पास पॅनोरमिक ट्रेन

प्रचि १७: एंजेल बर्ग (Engel Berg) स्टेशनच्या बाहेरील दृश्य..

प्रचि १८: माउंट टिटलिस पाहिल्यावर ट्रेनने परतीचा प्रवास सुरु..

प्रचि १९: इंटरलाकेन वरून थुन कॅसल ला जाताना. . . . .
हा संपूर्ण कॅसल हे आता एक छान म्युझियम आहे.

प्रचि २०: इंटरलाकेन वरून Chateau-De-Chillon ला जाताना, वाटेत थुन तलाव (Lake Thun) लागतो...

प्रचि २१: त्यात फेरीबोटी आणि लेक सफारीच्या बोटीही ये-जा करत असतात......

प्रचि २२: थुन लेक : उंचावरून......

प्रचि २३: एक वळणदार रस्ता, उंचावरून....

प्रचि २४: ढगाळ वातावरण, कुरण... आणि घर......

प्रचि २५: पर्वत पायथ्याच्या उतारावरचे कुरण......

प्रचि २६: छोटेसे चर्च......

प्रचि २७: इथे मात्र घरांची दाटी....

प्रचि २८: आणि थोड्या अंतरावरची घरांची विरळता....

प्रचि २९: डोंगरमाथ्यावरची ताजी हिमवृष्टी....

प्रचि ३०: हिमकणांनी माखलेले पाईन वृक्ष....

प्रचि ३१: क्लोज अप....

प्रचि ३२: तेच दृश्य थोडं पुढे गेल्यावर....

प्रचि ३३: आल्प्सच्या पार्श्वभूमीवरची अजून एक वस्ती....

प्रचि ३४: कलती संध्याकाळ....

प्रचि ३५: हिमाच्छादित शिखर....

हि बहुतेक सर्व प्रकाशचित्रे चालत्या गाडीतून (ट्रेन स्टेशनमध्ये थांबली असतानाचे काही किरकोळ अपवाद वगळले तर. . . . . आणि तेही लगेच कळून येईल) काढली आहेत.
त्यामुळे एरवी असतो तसा स्थिर कॅमेरा , Sharp फोकस इथे नाही आणि म्हणून Crisp Images ही नाहीत. हलत्या ट्रेनमुळे आणि तिच्या वेगामुळे काही चित्रं ब्लर आली आहेत, पण जे सौंदर्य मी डोळ्यांनी पाहिलं ते तुम्हीही पहावं (ब्लर तर ब्लर) यासाठी ती इथे दिली आहेत. ती चालवून घ्यावीत.

या प्रवासात स्विझर्लंडची खासियत असलेली ती कुरणं आणि गायीही दिसल्या. पण त्या ट्रेनमधून आल्या त्या मात्र हलत्या आणि अस्पष्ट (Un-Focused). त्यामुळे एखादा अपवाद वगळता ते प्रचि मात्र इथे दिले नाहीत.

हा ट्रेनच्या प्रवासातून दिसणारा रमणीय, नितांत सुंदर स्विझर्लंडचा फक्त एक भाग झाला. ट्रेनमधून उतरून तिथली विविध ठिकाणं, गढ्या, किल्ले, पर्वतराजी आणि जवळून पाहिलेली, ज्यांच्या अंगाखांद्यांवर चढलो ती बर्फाच्छादित शिखरे आणि पुन्हा त्यावरून दिसणारं आणखीन तसंच आणि वेगळंही निसर्ग सौंदर्य; हि या देशाची खासियत आहे. . . . . आणि स्विस आर्किटेक्चरही....

या प्रवासात कुठलंही छान कुरण, त्यातलं घर,त्याच्याकडे येणार रस्ता दिसला कि मन त्या रस्त्यावरून बास्केट लावलेली सायकल चालवून प्रवास करायचं. मग झाडाखाली विसावा घ्यायचं, कुरणामध्ये लोळायचं आणि मग त्या बाहेरून सुबक,सुंदर आणि अस्सल ग्रामीण वाटणाऱ्या घरामध्ये प्रवेश करायचं, आरामासाठी.
एखाद्या घराच्या धुरांड्यामधून पांढरा स्वच्छ धूर येत असला तर जीभही चाळवली जायची त्या चुलीवर खुरपूस भाजल्या जात असलेल्या पदार्थाच्या कल्पनेने.
अशा ठिकाणी कायमचं रहाणं, इथून कामावर जाणं किंवा किंबहुना इथेचं आजूबाजूला काम असणं आणि ह्या वातावरणात जगणं हे एकंदरीत किती आल्हाददायक , स्फूर्तिदायक असेल.
The Grass is Always Greener on Other Side ही म्हण मला माहित आहे पण या ठिकाणी मात्र ते खरंच खरं आहे याबद्दल दुमत नसावं.
आजही हे फोटो मी कधी बघतो किंवा अशीच सिनरी असलेलं एखादं कॅलेंडर, वॉलपेपर, स्क्रीन सेव्हर समोर येतो तेव्हा ह्या प्रवासाची परत आठवण येते (अगदी बजरंगी भाईजान मध्ये ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये स्विझर्लंडचं चित्र म्हणजे तिच्या घराचं ठिकाण सांगते ते चित्र पाहिल्यावरही)
आणि हा सगळाच प्रवास मनात उलगडत जातो आणि तोही आगगाडीच्या चाकांच्या तालावर. . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>एकही फोटो दिसत नाही:( <<<
@ जयु, तुम्ही कोणता ब्राऊजर वापरताय...
मला Firefox Google आणि Chrome दोघांवरही दिसतंय..

मलाही फोटो दिसत नाहीयेत Sad .इतरांचे प्रतिसाद बघून उत्सुकता वाटते आहे. मी पण दोन्हीही browser try केले . iPad वरुन try करते.

निरूदा, हे फोटो मी पुर्वी पाहीले आहेत. आता दिसत नाहीत. काहीतरी प्रोब्लेम आहे. तुम्ही खाजगी जागेतून फोटो काढून टाकले आहेत का?

नाही. मी खरं तर गुगल फोटोज वरुन लिंक दिल्या होत्या.
सेटींग्ज तपासून पाहतो पण खरं तर मला दिसतायत..
घरच्या इतरांना लिंक पाठवून तपासतो... (त्यांच्यापैकी कोणीही सभासद नाहीये त्यामूळे Non Members ना काय दिसतंय हे कळेल..)

Pages