माझ्या आठवणीतली दिवाळी

Submitted by nimita on 2 February, 2018 - 02:51

आली माझ्या घरी ही दिवाळी.
सप्तरंगात न्हाऊन आली...
आली माझ्या घरी ही दिवाळी '...
सकाळी सकाळी रेडिओ वर गाणं चालू होतं आणि स्वयंपाकघरात माझ्या मुलीचा शाळेचा डबा तयार करताना नकळत मीही गायिकेबरोबर ते गुणगुणत होते.
काम करताना एकीकडे रेडिओ ऐकायची सवयच आहे मला; आणि मग सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवस भर माझ्या सुरेल (?) आवाजात घरच्यांना ऐकावं लागतं.
त्या दिवशीही तेच झालं. सकाळी रेडिओ मधून माझ्या घरी आलेली 'दिवाळी' मग दिवसभर माझ्या ओठांवर रेंगाळत राहिली आणि मला माझ्या बालपणात घेऊन गेली.
मला आठवली माझ्या लहानपणीची दिवाळी! खरंच - अगदी सप्तरंगात रंगलेली.... तेव्हाची दिवाळी म्हणजे एक मोट्ठा सोहळा असायची. आजकालच्या भाषेत सांगायचं तर एकदम 'happening' event...
आणि गंमत म्हणजे त्या इव्हेंट पेक्षा त्याच्या तयारीतच आम्हाला जास्त मजा यायची.
त्या मजेची सुरुवात व्हायची ती दिवाळीच्या सुट्टीनी ! तेव्हा साधारणपणे सगळ्याच शाळांना दिवाळीसाठी म्हणून तब्बल 'तीन' आठवड्यांची सुट्टी असायची ;आणि देवदयेनी आमच्या शाळेत 'holiday homework' हा कॉन्सेप्ट नसल्यामुळे आम्ही अगदी खर्या अर्थानी ती सुट्टी एन्जॉय करायचो.
सर्वप्रथम आम्हां सगळ्या भावंडांची (सख्खी, चुलत, वगैरे) एक मीटिंग व्हायची. त्यात वेगवेगळ्या कामांची आखणी व्हायची. त्या चर्चेचं स्वरूपही खूप व्यापक होतं, बरं का- म्हणजे अगदी दिवाळीच्या प्रत्येक दिवशी काढायच्या रांगोळी पासून ते कोणत्या दिवशी कोणते फटाके उडवायचे- अशा विविध विषयांवर विचार केला जायचा.
माळ्यावर ठेवलेलं दिवाळीच्या सामानाचं खोकं खाली उतरवलं जायचं; आणि त्यातून जो खजिना निघायचा..... आहाहा! उसके क्या कहने!!! किल्ल्यासाठी लागणारी मातीची खेळणी, रांगोळीची पुस्तकं, मागच्या वर्षी बनवलेला पण आता सामानात दबून मोडलेला आकाशकंदील, फटाक्यांमधल्या टिकल्यांचं पिस्तूल- हे आणि असं बरंच काही.
या सगळ्या सामानाची स्टॉक टेकिंग व्हायची आणि deficiencies ची एक लिस्ट बनवली जायची. हे लिस्ट बनवण्याचं काम मोस्टली सिनिअर भावंडं करायची पण त्यासाठी जे आईचं अँप्रूवल लागायचं (आणि पर्यायानी बजेट सँक्शन चं काम) त्यासाठी मात्र आम्हां छोट्यांना पुढे केलं जायचं.
आम्ही पण तेवढ्याच सिन्सीयरली आईला आमचं म्हणणं पटवून द्यायचो आणि तेही पुराव्यांसह... "बघ ना आई, या वाघाची अर्धी शेपटी तुटली आहे. त्याला किल्ल्यावरच्या गुहेत कसा ठेवणार?" किंवा" ह्या पुस्तकातल्या सगळ्या रांगोळ्या ऑलरेडी काढून झाल्या आहेत. त्यामुळे आता नवीन पुस्तक आणावंच लागेल ना!" अशी स्वतःलाही न पटणारी कारणं सांगायचो. आणि आईदेखील एकीकडे आपलं हसू लपवत आमचं बजेट सँक्शन करायची.
त्यानंतर मग कामांची वाटणी केली जायची- किल्ला टीम, रांगोळी टीम, आकाशकंदील टीम, पणत्या आणि दिवे टीम वगैरे वगैरे.... पण मजा म्हणजे या सगळ्या टीम्स फक्त कागदावरच राहायच्या. ऑन ग्राऊंड, प्रत्येक जण प्रत्येक टीम मधे दिसायचा.
शाळेसाठी कधीही लवकर न उठणारे काही स्वयंसेवक दिवाळीच्या सुट्टीत सगळ्यात आधी उठून तयार होऊन बसायचे.
सकाळची वेळ ही किल्ल्याच्या कामांसाठी अगदी योग्य. मग आम्ही सगळे मिळून किल्ल्यासाठी लागणारं कन्स्ट्रक्शन मटेरीयल एका ठिकाणी गोळा करायचो - दगड, तुटक्या विटा,बुरूज बनवण्यासाठी प्लास्टिक चे ग्लास, विहीर करायला हिंगाची डबी, गोणपाटाचे तुकडे, खराट्याच्या काड्या- ही यादी न संपणारी असायची.
सगळं सामान एकत्र झाल्यावर मग खर्या बांधकामाला सुरुवात व्हायची. आधी दगड, विटा ठेवून गडाचा सांगाडा तयार केला जायचा. मग हळूहळू त्यात स्पेशल इफेक्ट्स दिले जायचे.
त्या एवढ्याशा जागेत दर्या, पठारं, कडे, शेतं, पायवाटा, नद्या, विहिरी, गुहा, बुरूज, बालेकिल्ला सगळं सगळं असायचंं. हळूहळू किल्ला आणि त्याच्या पायथ्याचं गाव आकार घ्यायचं.
बर्याचदा किल्ल्यातल्या इमारती आणि त्यांच्या सभोवती मांडलेली खेळणी यांची प्रपोर्शन्स प्रश्नावह असायची. उदाहरणार्थ- किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर उभा असलेला मावळा हा कधी बुरूजापेक्षाही उंच असायचा तर कधी शेतापेक्षा विहीर मोठी असायची. आणि बर्याचदा सिंहासनारूढ शिवाजी महाराजांना महालाऐवजी उघड्यावरच राहावं लागायचं. पण हे सगळं ' taken for granted' असायचं आणि त्यामुळे ते कधीच कुणाला खटकायचं नाही.
दुपारी ऊन वाढल्यावर सगळ्यांची रवानगी घरात व्हायची. त्यावेळी मग बाकीच्या तयारीला जोर यायचा. एका मोठ्या वर्तमानपत्राच्या कागदावर एक ग्रीड आखलं जायचं. हे काम खूप वेळ खाणारं होतं आणि तेवढंच किचकटही. त्यामुळे साहजिकच ते काम मोठ्या आणि अनुभवी भावंडांकडे जायचं. मग त्या फावल्या वेळाचा सदुपयोग आम्ही सागरगोटे, बिट्टया किंवा काचापाणी खेळून करायचो.
पण खरा इंटरेस्टींग पार्ट असायचा त्या कागदावर आखलेल्या ग्रीडवर पेटलेल्या उदबत्तीनी भोकं पाडून रांगोळी साठी ठिपक्यांचं स्टेन्सिल बनवणं.या स्टेन्सिलमुळे मोठ्या मोठ्या रांगोळ्या पण अगदी सोप्या वाटायच्या, कारण ठिपके काढायचं क्लिष्ट काम नसायचं.
घराबाहेरच्या अंगणात झाडून सडा घातलेल्या मातीवर तो ठिपक्यांचा कागद ठेवून मग त्यावर रांगोळी पसरवली जायची. प्रत्येक ठिपक्यापर्यंत रांगोळी पोचली आहे याची खात्री झाल्यावर मग हळूच चारही बाजूंनी एकदम तो कागद उचलला जायचा - आणि बघता बघता त्या काळ्याभोर मातीवर पांढऱ्या ठिपक्यांची आरास दिसायची. शिस्तबध्द रांगेतले ते सगळे ठिपके बघितले की नेहमी मला २६ जानेवारीच्या दिल्लीतल्या राजपथवरच्या परेडची आठवण व्हायची. पण कितीही कटाक्षानी, न चुकता रांगोळी काढली तरी शेवटी एक दोन ठिपके रिकामे राहायचे आणि बाकीच्या रेखीव रांगोळीमधे अगदी उठून (?) दिसायचे. मग कुणाचं लक्ष नाही असं बघून हळूच ते बेवारशी ठिपके पुसून टाकताना एक वेगळीच 'किक' मिळायची.
या.सगळ्या गदारोळात एक दिवस आई बाबा फटाके घेऊन यायचे. मग त्या फटाक्यांची रीतसर वाटणी व्हायची आणि प्रत्येकजण आपल्या वाटणीचे फटाके इतरांपासून लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात असायचा. पण आमचे बंधुराज स्वतःचे सगळे फटाके आधीच संपवून मग आम्हां बहिणींना इमोशनल ब्लॅकमेल करून प्रत्येकीकडून थोडे थोडे फटाके मिळवण्यात यशस्वी व्हायचे.
नर्कचतुर्दशीला पहाटे प्रत्येकाच्या अभ्यंगस्नानाच्या वेळी इतरांनी फटाके वाजवणं हे तर अध्यार्हुतच होतं पण 'कॉलनीत सगळ्यात पहिला फटाका आपल्या घराबाहेर वाजला पाहिजे' हा अट्टाहासही असायचा. आई खास दिवाळी साठी म्हणून आणलेल्या 'मोती' साबणाचा फेस्टिव्हल पँक बाथरुम मधे ठेवायची. तीन साबण असायचे त्यात.. गुलाब, चंदन आणि खस.... माझा फेव्हरेट होता 'खस' ...अजूनही आठवलं की त्याचा सुगंध दरवळतो माझ्या मनात.
आम्ही जेव्हा किल्ला, रांगोळी, फटाके यांमधे बिझी असायचो तेव्हा आमची आई दिवाळीच्या फराळाची आघाडी सांभाळायची. रोज एक नवीन पदार्थ बनायचा. कधी चकलीचा सोर्या स्वतःभोवतीच फिरत गोल गोल काटेरी चकल्या घालायचा तर कधी रवा-बेसनाचे लाडू काजू बेदाण्याचा टिळा लावून नटून थटून बसायचे. एखाद्या दिवशी आई अनारशाच्या पीठाच्या डब्यात हळूच एक केळं ठेवायची आणि मग त्या पीठाचा वास घेऊन म्हणायची," उद्या परवा पर्यंत होईल तयार पीठ." करंज्यांमधे सारण अगदी गच्च भरल्यानंतर त्यांच्या कडांना झालर लावताना त्या 'कातण्याच्या चमच्याची' होणारी धावपळ बघताना मला खूप मजा यायची. मला ना ते करंजीचं 'कातण' बघितलं की नेहमी सर्कसमधल्या एकचाकी सायकलस्वाराची आठवण यायची. आई करंज्या करत असताना हमखास आजी तिथे येऊन म्हणायची," करंज्यांबरोबर मोदक पण करतीयेस ना गं? बहिणीला भाऊ हवा."
भाऊबीजेच्या दिवशी आमच्या सगळ्या भावांचा 'भाव' खूपच वाढायचा. 'भाऊबीजेचं गाजर' दाखवून आमच्या कडून सगळी कामं करवून घ्यायचे. आणि ओवाळणीचा कार्यक्रम नेहमी संध्याकाळीच असायचा, त्यामुळे दिवस भर आम्हाला त्यांची जी-हुजूरी करावी लागायची. सकाळी आंघोळीच्या आधी आम्हा बहिणींकडून सुवासिक तेलाची मालीश करून घेताना त्यांचा तोरा काही औरच असायचा. अगदी नखशिखान्त तेलमालिश केल्यानंतरही म्हणायचे-"अगं, माझ्या पायाच्या करंगळीच्या नखाच्या टोकाला तेल नाही लागलं नीट- आता तेवढी भाऊबीज कमी."
यात भर म्हणून की काय पण शेजारी बसलेली आजी म्हणायची," चेहर्याला पण लावा गं नीट तेल. नाहीतर पुढचा जन्म माकडाचा येतो म्हणे !" त्यावर आमचंही उत्तर तयार असायचं - "म्हणजे! या जन्मी पण माकड आणि पुढच्या जन्मी पण माकडच ?" - करंगळीच्या नखाचा बदला आम्ही अशा रीतीने घ्यायचो.
हे सगळं आठवलं की अजूनही चेहऱ्यावर नकळत हसू विलसतं.कधीतरी वाटतं, परत एकदा सगळ्यांनी एकत्र जमावं आणि पुन्हा ती लहानपणची दिवाळीची सुट्टी एन्जॉय करावी; ती सप्तरंगी दिवाळी पुन्हा एकदा तशीच साजरी करावी. पण यावेळच्या दिवाळीत फटाके मात्र नकोत हं.. प्रदूषण विरहित, इको-फ्रेंडली दिवाळी साजरी व्हावी.
अहो - आजच्या काळाची गरजच आहे ती!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults