काही चित्रपटीय व्याख्या

Submitted by फारएण्ड on 28 January, 2018 - 23:10

संशोधनातील पुढचा भाग, खास लोकाग्रहास्तव. आधीच्या संशोधनाची लिन्क इथे आहे. गाणी वगैरे ऐकताना तेरी मैफिल मे वगैरे ऐकल्यावर लोकांना म्हणजे नक्की कोठे असे प्रश्न पडतात. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.

तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्‍या शब्दांच्या व्याख्या.

फूटी कौडी:
प्रत्यक्षात जी देणार्‍याकडे नसते. घेणार्‍याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट. लोक एकतर फूटी कौडीही देत नाहीत, नाहीतर सगळी जायदाद देतात. पण जायदाद पैकी फूटी कौडीही न दिल्याने गेली अनेक द्शके पिक्चर्स मधे झालेला झालेला हिंसाचार केवळ एखादी फुटकी का होईना कवडी देऊन थांबवता आला असता का यावर संशोधन व्हावे. म्हणजे जाउ दे त्याच्या/तिच्या बापाने किमान एक फुटी कौडी तरी दिली आहे तेव्हा आपण जायदाद हस्तगत करण्याचे प्रयत्न शांततामय/संवैधानिक मार्गाने करू असे ते चित्रपटातील व्हिलन-मामा वगैरे म्हंटले असते का वगैरे. त्रिशूल मधे संजीवकुमार ने रिसेप्शनिस्ट ला कोणी चिडलेला चेहरा घेउन भेटायला आला तर जरा त्याला आधीच ४-५ फूटी कौडियाँ देउन मगच आत पाठव अशी एक जनरल प्रोसेस सेट करून ठेवली असती, तर तो त्या भारी सीन ला अमिताभची 'आज मै आपसे पाँच लाख का सौदा कर रहा हूँ, और मेरे जेब मे पाँच फूटी कौडियाँ भी नहीं है' वगैरे डॉयलॉगबाजी टोटली नलीफाय करू शकला असता. तेव्हा भावी जायदाद होल्डर लोकांनी हे लक्षात ठेवावे की घरात लॉजिकल कारण नसताना बायकोचा भाऊ, मामा किंवा भाचा उगाच ये-जा करत असेल तर त्यांना अधूनमधून काही फूटी कौडिया देत राहावे.

मौला:
हे लोक प्रेमात पडलेल्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात."ती" ने एकदा हसून बघितल्यावर जर पुढच्या वेळी तिने बघितले नाही तर डायरेक्ट एकदम "मेरे मौला मेरे मौला, देदे कोई जान..." वगैरे विव्हळणारे प्रेमी जीव असतात त्यांच्यासाठी फॅमिली मौला नावाची संस्था आस्तित्वात येणे आवश्यक आहे अशा प्रसंगी कन्सल्ट करायला. प्रत्येक जण "मेरे मौला" म्हणत असल्याने प्रत्येकाचा एक स्वतंत्र मौला असावा. फॅमिली डॉक्टर, टॅक्स कन्सल्टंट, लीगल अॅडव्हायजर असतात तसे. मग लग्नाच्या आदल्या दिवशी याचा मामा तिच्या मामाला भेटून ओळख करून घेतात तशी दोघांकडचे मौला एकमेकांना भेटवत असतील. तसेच सगळे मौला या कामाला लागले तर जागतिक शांतताही होउ शकते हा दुसरा फायदा. मात्र यांनी अनेक शतके धर्माच्या बाबतीत जे केले त्यावरून आता प्रेम ही संस्था धोक्यात आहे हे नक्की

सजदे:
अस्सल मराठी लोक प्रेमात पडले की "ती"ला मिळवण्याकरिता हे करतात. उदा: 'खट्टा मीठा' मधे टिचकुले आडनावाचा मुलगा व गणपुले आडनावाची मुलगी प्रेमात पडतात तेव्हा सजदे करतात, दुवाँ मागतात. मात्र प्रदक्षिणा जशी एखादी घालून चालते तसे याचे नाही. हे एखाद्या किंमत कोसळलेल्या चलनाप्रमाणे एकदम लाखो मधे करावे लागतात.

दुनियावाले:
सरकारच्या 'वजने व मापे' विभागाकरता प्रेम मोजण्याचे काम हे लोक करतात. कसे कोणास ठाउक पण जगात सर्वात जास्त प्रेम कोणी केले हे यांना कळते. एरव्ही हे प्रेमी लोकांना विरोध करणे, त्यांच्यावर जळणे, त्यांची अनावश्यक खाजगी चौकशी करणे ई. कामे करतात. गजलयुक्त गाण्यांमधे 'वो'/'उनको' वगैरे उल्लेख आले आणि ते लीड पेअर पैकी कोणाला चपखल बसले नाहीत, तर नक्कीच यांच्याबद्दल असतात.

बाजा:
राजा लोकांचे अत्यंत नावडते वाद्य.

प्रेमाच्या तीन लेव्हल्सः
या लेव्हलच्या नावात जितके "जा" व "ने/ना" येतील तितक्या जास्त असतात. जा चा उच्चार ज्या सारखा.
उदा: १. जा २. जानेजा ३. जानेजाना
अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी.

पुस्तकः
बापाने 'जी ले अपनी जिंदगी' म्हंटल्यावर ट्रेन ने फिरायला निघाल्यावर गाडी पकडल्या पकडल्या जराही खिडकीबाहेर सुद्धा न पाहता पहिल्यांदा उघडतात ती वस्तू. किंवा कोणाला आपले शहर दाखवायला नेताना सुद्धा बाजूला वाचत बसतात - लहान मुलाला पार्क मधे घसरगुंडी वर सोडून आपण बाकड्यावर वाचत बसावे तसे. जज किंवा प्रोफेसर चे घर असेल तर जितकी पुस्तके असतील तितकी सर्वांना सारखे कव्हर घालून मागच्या शेल्फ मधे बरोब्बर बसली पाहिजेत. पुस्तके कशाचीही असू शकतात. हीरो इंजिनिअरिंग करत असेल तर 'इंजिनिअरिंग' चे पुस्तक असते. तो शेर मारत असेल तर त्याच्या शायरीचे असते. जरा आणखी गहन काहीतरी असेल तर उपन्यास असतो. हीरो चा "कारोबार" असेल तर एकाच शेल्फ वर Principles of Physiology, Thesaurus आणि Advertising Management शेजारी शेजारी असावीत.

पियानो:
कीबोर्ड वरच्या साधारण मधल्या १०-१५ कीज वर बोटे फिरवून कोणत्याही ताला-सुरातील गाणे वाजवता येणारे वाद्य

मैफिल:
मैफिल हे साधेसुधे काम नव्हे. सर्वसाधारण मराठी स्त्रियांचे मंगळागौर, हळदीकुंकू जशा रिच्युअल असतात तशा बडे खानदान की लडकीयोंकी अशी एक रिच्युअल असते. उसकी मैफिल. "तेरी मैफिल मे..." असे स्पष्ट उल्लेख असलेली अनेक गाणी अभ्यासून हेच लक्षात येते.

लोकेशनः एक मोठा हॉल. मागे दोन्ही बाजूने वरती जाणारे जिने असतील तर उत्तम, नाहीतर किमान मधे एक मोठा जिना असावा. हॉल च्या मध्यभागी एक पियानो.

पात्रयोजना अशी हवी:

हीरॉइनः कालानुसार मेकअप, किंवा विसंगतही चालेल. गाणार्‍या व्यक्तीच्या समोर गाणे कळत असल्याची अॅक्टिंग करावी लागते. तसे दिग्गज गीतलेखक कधीकधी फेल-सेफ ओळी लिहीतात, म्हणजे "न जाहिर हो, तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" यात अभिनय करू शकणारी हीरॉइन ते बरोबर दाखवेल, तर न करू शकणार्‍या हीरॉइनला या ओळीला वेगळे काही करावेच लागणार नाही. त्यामुळे एक साधारण रडका चेहरा इतपत तयारी पुरते. दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे आधी कसमे वगैरे खाउन मग लाथाडलेल्या गरीब हीरोला स्वतःच्या मंगनीच्या मैफिलीत बोलावून त्यालाच गायला सांगणे इतकी "आ बैल" गिरी करता यायला हवी.

गरीब हीरो: हा गरीब असल्याने हीरॉइन त्याला पूर्वी दिलेल्या शपथा वगैरे विसरून दुसर्‍याबरोबर लग्न करणार आहे, असा त्याचा समज असतो. हा रोल करायचा असेल तर तीन गुण अत्यावश्यकः १. गरीब असणे २. पियानो फिल्मी स्टाईलने वाजवता येणे (वरती पियानोची व्याख्या पाहा) व ३. एक रडके गाणे अचानक म्हणता येणे. मैफिलीत अचानक गाण्याची ऑर्डर मिळून सुद्धा एक विरहगीत एकदम तयार असायला हवे. पेपरवाले जसे कोणी आजारी पडले की एक श्रद्धांजलीपर लेख तयार ठेवतात तसे मैफिल चे आमंत्रण आले की विरहगीत खिशात ठेवूनच निघावे. दुसरे म्हणजे "Dude, this occasion is not about you" याची अजिबात फिकीर न करता हिरॉइन चा वाढदिवस असेल किंवा मंगनी किंवा लग्न, तेथे आपली रडकथा सादर करता यायला हवी. ती कधी अगम्य भाषेत, कधी सभ्य पण थेट, तर कधी थेट आणि अपमानास्पद अशा कोणत्याही भाषेत करता यायला हवी.

हीरॉइनचा बापः या मैफिलीचा निर्माता. कारण ही अवस्था त्याच्यामुळेच निर्माण झालेली असते. चिरूट ओढत इकडेइकडे गर्वाने बघत फिरणे हे मुख्य काम

श्रीमंत बकरा: तो श्रीमंत आहे हे दाखवायला सूट घातला की झाले. अधूनमधून हीरॉइन वर हक्क दाखवणार्‍या हालचाली करणे. चालू असलेले गाणे कोणाबद्दल आहे कोणास ठाऊक असे एक्स्प्रेशन्स पाहिजेत. हीरॉइनच्या व याच्या अगदी in your face येउन बेवफाई, मेरे आँसू, गरिबी, चाँदी सोना विरूद्ध प्यार भरा दिल वगैरे गाणारा हा हिचा नक्की कोण आहे. इतक्या चांगल्या प्रसंगात हा हे काय गातोय वगैरे प्रश्न डोक्यात जराही आलेले दिसलेले चालणार नाहीत.

मैफिलीतील हुशार स्त्री: हे गाणे कोणाला उद्देशून आहे हे (फक्त) हिला समजले आहे, हे सतत चेहर्‍यावर दिसले पाहिजे. त्यामुळे गूढ हास्य करत एकदा हीरो कडे व एकदा हीरॉइन कडे आलटून पालटून पाहणे आवश्यक.

बाकी उपस्थित जनता: पूर्वीच्या डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस सारखे जागा मिळेल तेथे बसलेले किंवा उभे. दोन बोटांत वाईन किंवा इतर दारूचे ग्लास धरलेले, मठ्ठपणा हा मुख्य गुण. म्हणजे गरीब हीरो ने "तेरी बेवफाई का शिकवा करू तो..." हे हॉल च्या मध्यावर रडका चेहरा करून उभ्या असलेल्या हीरॉइनकडे बघत म्हण्टले तरी त्याला "कोण बरे ती इतक्या यशस्वी असलेल्या तुला दुखावणारी?" असे विचारण्याइतके अज्ञान पाहिजे. येथे हा ही लॉजिकल प्रश्न पडू नये की जर ते या हीरॉइन बद्दल असेल तर थेट बोल की. आणि या हीरॉइन बद्दल नसेल, तर तिच्या मैफिलीमधे मधेच तुझी कहाणी कशाला?

तसेच आपल्या मागच्या तीन पिढ्यांमधले टोटल उर्दू नॉलेज हे पुलं म्हणतात तसे "हमारे बगीचे मे पैदा हुआ फुलदणाणा" च्या पुढे गेलेले नसेल तरी "खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया", किंवा " एक यही मेरा इलाज-ए-गम-ए-तनहाई है" सारखी डबल-ए बॅटरी पॉवर्ड उर्दू वाक्ये आपल्याला समजली आहेत अशा थाटात माना डोलावता आल्या पाहिजेत.

यातली कोणतीही गोष्ट जमणार नसेल तर मैफिलीच्या नादी लागू नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेहफिलची आणखी एक मज्जा म्हणजे.. गाण पुर्ण होई पर्यंत इतर सगळ्यानी भावना दाबुन ठेवणे..
म्हणजे गाण संपायची वाट बघतात सगळेजण आणि मग व्यक्त होतात..
मोस्ट्ली व्हिलनने पकडलेल्या हिरोची सुटका करणार्या हिरोईन .. आणिबाणी ची परिस्थिती असली तर व्हिलन मजा घेत पुर्ण गाणे ऐकतो आणि मग पुढची मारामारी अ‍ॅन्ड ऑल...

आणि व्हिलन च्या अड्ड्यावर जाऊन अगदी अतरंगी पोशाखात आणि सूचक शब्दात गाणी चालू असतात.मध्येच बांधलेल्या पंटर्/पंटरीण ला जवळ जाऊन बुरखा अर्धा सरकवून/मिश्या काढून आपला चेहरा दाखवून निश्चिंत करणे वगैरे प्रकार अगदी सर्वांसमोर चालतो.कोणीही संशय घेत नाही की हे "पहचान मै कौन हूं" वगैरे गाणी गाऊन सारखे आपल्या किंमती बांधलेल्या कैद्याकडे का जातायत.
मुळात 'आम्ही फ्री नाचतो' अशी ऑफर दिली आणि बांधलेला पंटर एका खोलीत ठेवून हे लोक्स आपला खास ग्रुप घेऊन दुसर्‍याच लोकेशन ला "चला, दाखवा नाच" म्हणून ठिय्या देऊन बसले तर अजूनच पोपट. Happy

त्यातून नूतनचा व्याकूळ अभिनय सोडला तर ती नाचणारी बाई, देव जाणे बाई काय गाणे म्हणतोय ते, मला नाचायचे पैसे मिळालेत तर मी नाचणारच अशा आविर्भावात नाचतीये. गाण्याच्या कडव्याचा, अर्थाचा, त्यातल्या दर्दचा तिच्याशी लांबलांबपर्यंत काही सबंध नाही >> :-D. खरं आहे.

पिक्चरायझेशनमधे गाण्याची माती करणं हे खूपच कॉमन आहे. फूलोंके रंग से हे नितांतसुंदर गाणं किती बेकार चित्रित केलं आहे!

फारएण्डा, तुझ्या ह्या लेखावर आणखीन काही स्मार्ट-अ‍ॅलेक प्रतिक्रिया देण्याचा करंटेपणा न करता, तुला फक्त दाद देण्यात येतेय. काय हा व्यासंग, केव्हढं निरीक्षण आणी कसली जबरदस्त शैली!!! व्वाह!!! मझा आ गया!!

भन्नाट रिसर्च आणि लेख. नेहेमीप्रमाणे खुसखुशीत Happy

बाकी सर्व रिस्पॉन्सेस अजून वाचायचे आहेत.

मस्त मस्त. ह्यात ओ मेरे शाहे खुबा गाण्या त छुप के रहते हो तुम रहेजामें हे अगदी हिरो रहेजा टावर्स ए विंग मध्ये सोळाव्या मजल्या वर लपून बसला आहे. व हिरवीण सोसाय टी च्या सेक्रेट री सारखी नोटीस द्यायला येते आहे असे वाट्टॅ.

Submitted by अमा on 29 January, 2018 - 04:57 >>>>>>>>>>>>>>>>> download.jpg

आरजू चित्रपटात साधना भर मैफिलीत राजेंद्र कुमारला उद्देशून गाणं म्हणते. त्यात दोघे एकमेकांना डोळ्यातूनच नाही तर अगदी हावभाव करून उघड उघड इशारे करतात. पण साधनाच्या तोंडी आलेले 'अजि रूठकर अब कहाँ जाइयेगा' हे शब्द जणू काही तिच्या आज्जीला उद्देशून असल्याच्या निर्विकारपणे बाकी मंडळी ऐकत असतात.

ह्या गाण्यात वाद्य-ब्लुपर्सही आहेतच (नेहमीप्रमाणे). पूर्ण मैफिलीत आपल्याला पियानो हे एकच वाद्य दिसतं. गाण्यात मात्र तेवढं एक सोडून बाकी सगळी वाद्यं वाजली आहेत. तबला म्हणू नका, बासरी म्हणू नका, अगदी स्ट्रिंग्स आणि सतार पण! कमाल म्हणजे दुसऱ्या कडव्याच्या आधी जे मधलं म्युझिक आहे, त्यात ती पियानो वाजवणारी बाई पियानोची बटणं बडवून त्यातून सतारीचा आवाज काढून दाखवते.

Lol

Pages