कोनवाडा

Submitted by onlynit26 on 25 January, 2018 - 00:55

पक्याचा निरोप ऐकून आबा मटकन खालीच बसले. त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. पुढ्यातली भाकरी तशीच घरात ठेवून चुळ भरली. लक्ष्मी काकी पण घरी नव्हती. दुपारचे ११ वाजले होते. पायात चपला सरकवून कोनवाड्याच्या दिशेने चालू लागले. शर्टाच्या वरच्या खिशातले १० रूपये चाचपत स्वताशीच कायतरी पुटपुटले. त्यांची पावले पटापट पडत होती. विचाराच्या तंद्रीत आबा भुतकाळात जाऊ लागले.
सकाळची वेळ होती. आबानी कोरी चहा पिऊन शमी गायीला कुरणात सोडून आले होते. तो त्यांचा नित्यक्रमच होता. तिच्या जीवावरच त्या दोघांची गुजरान होत होती. त्यांचा एकूलता एक मुलगा शहरात नोकरीला होता. गावी कधीतरी फिरकायचा. पण आई वडीलांना किंमत देत नव्हता. चंगळ म्हणून गावी यायचा. आबानी तर तो सुधरायची आशाच सोडली होती. वडील म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडून देखील त्यांना उतार वयात विचारत नव्हता. आबा बिचारे आपले मन बायकोजवळ आणि त्यांच्या आवडत्या शमी गायीजवळ मोकळे करायचे. त्यांना प्राण्यांशी बोलायची सवय होती. शमीला चारायला घेवून गेले कि शमीशी तासंनतास गप्पा मारायचे. लोक त्यांना वेड्यात काढायचे. पण आबांचे प्राण्यांशी चाललेले हितगुज काही कमी होत नसे.

आज मात्र जे घडू नये ते घडले होते. पण असे कसे झाले याचाच विचार ते करत होते. शमीला कुरणात सोडून आल्यावर आबानी बरीच कामे केली होती. भाकरी खाऊन तिलाच आणायला जाणार होते आणि पक्याने शमी गायीला गोपाळरावांच्या मुलाने कोनवाड्यात टाकले अशी बातमी दिली होती. ती बातमी ऐकूनच आबा विचलित झाले होते. विचाराच्या तंद्रीत कधी कोनवाड्याजवळ पोचले कळलेच नाही. कोनवाड्याच्या बाजूलाच श्रीपतरावांचे घर होते. तेच कोनवाड्याचा कारभार पाहत. ते दारातुनच आबांना पाहत बोलले.
"आबा गुरे राखता येत नसतील तर बिनधास्त सोडून कशे देता? " श्रीपतराव आबांवर ओरडले.
"तुमचो कायतरी गैरसमज झालोहा, आमची गाय कधी कोणाच्या कुडणात गेली नाय की कोणाच्या जित्रापात. (शेतीत) " आबांचा आवाज ऐकून वाड्यातून शमी हंबरली.
"मग त्यांनी हीला काय असचं पकडून आणलय काय?" श्रीपतराव आबांशी उद्धटपणे वागत होते.
आबा मनात असुन पण काही बोलू शकले नाहीत. श्रीपतरावांकडे दुर्लक्ष करून वाड्याकडे धावले. आबा वाड्याच्या टोकाला आले तशी शमी दाव्याला हिसका देऊ लागली. आबा तिच्या जवळ गेले. तिचे तोंड हातात घेऊन कुरवाळले.
तिच्या पाठीवरचे माराचे वळ बघून आबांच्या डोळ्यात पाणी तराळले. शमीच्या शरीरावर सगळीकडे माराचे वळ होते. तिच्या डोळ्यातील अश्रु केव्हाच सुकून गेले होते. आबांचा मायेचा हात फिरताच ते परत ओले होत होते.
"श्रीपतराव बघा ओ कसो कसायासारख्या मारल्यानी हा."
"नुकसान केलयं म्हटल्यावर मार बसणारच ना" श्रीपतरावांचे हे उत्तर ऐकून आबांना त्यांचा राग आला.
"आता हे दहा रूपये ठेवा आणि गायक घेवन जावक देवा" आबा खिशातले दहा रूपये काढत बोलले.
"अहो वेडे झालात का? कोनवाड्याचा दंड, चारा पाण्याचा खर्च कोण देणार? एका दिवसाचे एकुण ५६० रूपये होतील." श्रीपतराव बोलून गेले.
शमीच्या दुधावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. शमीला इथे ठेवने म्हणजे खुपच नुकसान होणार होते. आबा गयावया करू लागले. हातापाया पडू लागले. पण त्याला श्रीपतराव काही धजले नाहीत. आबांना त्याचा मगरूर स्वभाव माहीत होता. त्यांनी ५६० चा हीशोब देखील मागीतला नाही. परत एकदा वाड्यात डोकावत शमीला पाहीले. तिच्या पुढ्यात गवताची काडी देखील नव्हती. तिला इथे आणून दोन तास झाले नसतील पण जुलमी दंड मात्र अवाजवी लावला होता. शमीच्या पाठीवरून हात फिरवत लवकरच तुला इथून घेऊन जातो असं बोलले. त्याबरोबर शमीने मान हलवली.

आबा कोनवाड्यातुन निघाले तेव्हा बरीच दुपार झाली होती. रणरणत्या उन्हातून आपले पाय ओढत कोणाकडे पैशाची काही सोय होते का पाहायला गावात चालले होते. काहीही करून शमीला सोडवायचे होते. डेअरी मध्ये जाऊन काही फायदा नव्हता. दुधाच्या पैशाची बरीच उचल गावच्या जत्रेच्या वेळेला घेतली होती. ते सर्व पैसे जत्रा आणि बायकोच्या औषधोपचारातच संपले होते. पोराला कळवून पण त्याने पैशाची व्यवस्था केली नव्हती. कधी कधी त्यांना वाटायचं आपण निपुत्रिक असतो तर बरं झालं असते, निदान भाबडी आशा तरी लागली नसती.

ते मोहनच्या दुकानासमोर आले तेव्हा तो दुकान बंद करून निघायच्या बेतात होता. आबांचा अवतार पाहून त्यांना बसायला खुर्ची देऊन थंडगार पाणी दिले. थोडे सावध झाल्याबरोबर आबानी मोहनजवळ पैशाचा विषय काढला. पण त्याच्याकडेही पैसे नव्हते. तिथे निराशा आल्याबरोबर आबा वेळ न दवडता अजून एका माणसाकडे पैसे मिळतील या आशेवर पुढे चालू लागले. काट्याने दुखावलेला पाय खुपच ठुसठुसत होता पण हृदयातील दुख: त्याहून सलत होते. थोडे उभे राहीले कि पाय दुखायचा थांबत होता पण मनातले दुख: त्यांना स्वस्थ उभे राहू देत नव्हते . ते टेमकारांच्या घराजवळ आले तेव्हा टेमकार नुकतेच जेवून हात धुवत होते. आबाना बघून खळ्यात आले. आबांची विचारपुस केली. जेवण्यासाठी आग्रह देखील केला पण त्यांच्याने पैशाचे काम काही होणार नव्हते. त्यांनी एक मार्ग मात्र सांगितला. तिथे जाऊन आबांचे काम होऊ शकते असे सुचवले. पण बंडू खोताचे घर गावापासून थोडे दुर होते. त्यांच्यासाठी आता फक्त तोच एक मार्ग उरला होता. डोक्यावर टॉवेल टाकत आबा उठले आणि चालायला लागले. शमीचा गरीब चेहरा समोर आणत अंतर कापू लागले. उन्हाचे चटके अंगाला बसत होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. रिकामी पोटी पिलेले पाणी पोटात चांगलेच झोंबत होते. बायको अजून जेवली नसेल , आपली काळजी करत असेल याचापण विचार मनात थैमान घालत होता. शमी पण गवताच्या काडीला तोंड लावणार नव्हती. तिची सवय त्यांना चांगलीच माहीत होती एकदा असेच दोन दिवसासाठी आबा आणि लक्ष्मी पाहुण्यांकडे गेले असताना तिने अन्न पाणी सोडले होते. शेवटी शेजाऱ्यांनी आबांना बोलावून घेतले होते. विचाराच्या तंद्रीत आबा एका दगडाला ठेचाळले तशी त्यांना जोराची कळ लागली. पायाचा ठेचाळलेल्या अंगठ्याचे वर उचललेले नख खाली दाबत ते खाली बसले. रक्ताची धार सुटली. दुपारची वेळ असल्यामुळे रक्त थांबता थांबत नव्हते. कुठे पाणी मिळेल असं आजुबाजूला घरे देखील नव्हती. एका हाताने खिशातला चुण्याची डबी काढत , चुणा त्या घावावर भरला. त्याबरोबर थोडेफार रक्त थांबले. थोडावेळ सावलीत बसून परत चालू लागले. आता बंडु खोताचे घर दृष्टीक्षेपात येत होतं. घराचा दरवाजा बंद होता. मांडवात लावलेल्या चाराचाकी गाडीला टेकून आबा बसले तसा बाजूला खेळत असलेला बंडू खोताचा छोटा मुलगा घरात गेला. तो परत बाहेर आला तेव्हा त्यासोबत त्याची आई म्हणजे बंडू खोताची बायको हातात पाण्याचा तांब्या घेऊन आबांकडे येत होती.
" बंडू , हा काय घरात?" आबानी तिला विचारले.
"हो आहेत ना. झोपले आहेत, कोण आलयं असं सांगु?" तिने आबांना कधी पाहीले नव्हते. त्यामुळे ओळखले नाही.
बाहेरचा आवाज ऐकून बंडू वैतागतच बाहेर आला. बंडू बापाच्या पैशावर ऐश करणाऱ्यापैकी होता. बाप गेल्यापासून सगळी सुत्रं हाच सांभाळायचा.
"आबा, दुपारचा काय काढलस ?" आबांच्या वयाचा मान न राखता त्यांना सरळ सरळ एकेरी संबोधले हे त्याची बायको हेमाला ते पटले नसावे. एक तिरका कटाक्ष नवऱ्याकडे टाकत नाराजी व्यक्त केली. पण बंड्या तिला जुमानणारा नव्हता.
आबानी तोही अपमान सहन करत आपली करूण कहानी सांगितली. घाबरत घाबरतच पैशाची मागणी केली. बंड्या पैसे द्यायला तयार झाला पण त्याबदल्यात त्या घरसमोरील बागेत दोन दिवस खड्डे खोदायचे काम करायचे असे बोलला. हेमाला हे सर्व अविवेकी, जुलमी वाटत होतं. एखाद्याच्या मजबुरीचा असा फायदा घेणं तिला पटतं नव्हते. पण नवऱ्यापुढे तिचं काही चालत नव्हते.
आबानी मनाशी विचार केला आज काय आपली शमी घरी जाणार नाही. त्या विचारानेच त्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. आबा तिथेच बसलेले पाहून बंड्याला आबा मजुरी करायला तयार आहेत असे त्याला वाटले. त्यांना काम सांगून तो झोपायला निघून गेला. आबा मात्र निशब्ध बसून होते. दुहेरी काळजीने मन अस्वस्थ झाले होते.
"आबा तुम्ही जेवलात का? " हेमाच्या प्रेमळ हाकेने ते भानावर आले. त्याबरोबर त्यांना हुंदका आवरला नाही. एकंदरीत आबांच्या परिस्थितीवरून ते जेवलेले आहेत असे काही वाटत नव्हते. तिने त्यांना पडवीत बसायला सांगीतले आणि जेवन आणायला आत गेली. आबांनी जेवनासाठी नकार देऊन पण ती ऐकली नव्हती. तिच्या मागोमाग 'आजोबाच्या पायातून रक्त येतयं' असं ओरडत तो मुलगा आत गेला.
आबा मात्र पुढ्यात येणाऱ्या अन्नाला नाही कसे बोलायचे या विवंचणेत पडले.
"आबा, हात पाय धुवून घ्या, आणि त्या जखमेला हळद भरून बांधुन ठेवूया" हेमा बाहेर येता येता बोलून गेली.
आबानी यंत्रवत हातपाय धुतले. जेव्हा ते पडवीत आले तेव्हा हेमा सुती कापड घेवून तयार होती. आबा खुर्चीत बसल्याबरोबर तीने जखमेवर हळद भरून उखडलेल्या नखासकट अंगठा बांधला.
" पोरी एक काम करशील, मला माझ्या बायकोशी बोलायचे आहे, हा नंबर लावून देशील, ती अजून जेवली नसेल" खिशातून एक मळकट डायरी काढत आबा बोलले.
हेमाने फोन लावला आणि आबांजवळ दिला. आबानी फोन कानाला लावला आणि बोलू लागले. बायकोला फोनवर बोलवायला सांगणार तोच समोरून लक्ष्मी काकी चक्कर येऊन पडलीय असा निरोप दिला गेला. आबांच्या हातातला फोन गळून पडला. डोळ्यात आलेले पाणी सांभाळत घराकडे धावत सुटले. हेमा बघतच राहीली. जेवनाचे भरलेले ताट तसेच पडले होते. त्यानी दिलेली डायरी तिच्या हातात तशीच होती. तीने परत तो फोन नंबर डायल केला तेव्हा कळले की आबांची बायको आजारी आहे.

आबा घरी पोहचे पर्यंत अंगठा पुरता ठेचाळून गेला होता. त्याची तमा न बाळगता धावत सुटले होते. आबा घरी आले. तेव्हा लक्ष्मीला बेफाम ताप भरला होता. शमी आणि आबांची काळजी, शिवाय जेवन न केल्यामुळे तीला चक्कर आली होती. आबानी तीला जेऊ घातले, स्वता मात्र जेवले नाहीत. जेवनावरची त्यांची आसच उडाली होती. काहीच मनासारखे घडत नव्हते. आबांनी आपले मन लक्ष्मीकडे मोकळे केले. तिने पण त्यांना धीर दिला.

आबा परत बंडू खोताच्या घरी आले तेव्हा ४ वाजुन गेले होते. हेमा त्यांची वाटच बघत होती.
बंडू उठला नव्हता . हेमाने दिलेली चहा पिऊन आबानी कामाला सुरूवात केली. काम करताना छोट्या मुलाची चाललेली लुडबुड पाहून त्यांना त्याच्या मुलाची आठवण आली. तोही असाच लुडबुडायचा. आता त्याची लुडबुड पुर्ण थांबली होती. त्याच्या त्या बाललिला , खोड्या त्यानी झेलल्या होत्या आज मात्र त्यांच्या म्हातारपणाचा सहवास पण त्याला नकोसा झाला होता. काहींना म्हातारचळ लागतं, साठी बुद्धी नाठी होते असं बोलतात पण तसं नसतं तर त्या वार्धक्यलीला असतात. हे ज्यांना समजते त्यांचे आई वडील कधीच एकटे पडत नसतात.
"आबा , झालं काय रे काम, उद्या पण येऊन काम करायचे." बंड्या आळस झटकत बोलला.
आबानी मान हलवली.

काळोख पडायला थोडा अवकाश असताना आबा निघाले. जाताना कोनवाड्याच्या रस्त्याने गेले. जेव्हा ते कोनवाड्याजवळ पोचले तेव्हा वाड्यात काहीतरी गोंधळ चाललेला ऐकायला आला. पुढे जाऊन वाड्यात डोकावून पाहतात तर शमीगायीचे मागचे पाय बांधुन श्रीपतरावाचा मुलगा दुध काढायचा प्रयत्न करत होता. पण तीने पान्हा चोरून ठेवल्यामुळे दुधाचा थेंब देखील येत नव्हता. तोच राग मनात ठेऊन तिच्या पाठीवर रपारप मारायला लागला. त्या बरोबर तीने हिसका दिला, गायीला तोंडाकडुन पकडलेल्या श्रीपतरावांना याचा जोरात धक्का लागला. हे पाहून त्यांचा मुलगा अजुनच चिडला. सपुर्ण ताकतीनीशी तिला मारू लागला. मुकं जनावर ओरडू लागले.
"अरे खयसर फेडश्यात ही पापा? " असे बोलत आबा धावत जाऊन मध्ये पडले. आबांना बघुन गायीने हंबरडा फोडला. तिची हालत बघून आबांनाही अश्रु अनावर झाले. तीच्या फुगलेल्या वळावर हात फीरवत आपल्या गरीबीला दोष देऊ लागले.

आबा घरी आले तेव्हा वाड्यात डोकावले. शमीशिवाय घरचा वाडा खुपच सूना वाटत होता. त्या रात्री आबा नीट झोपले नाहीत. त्यांना खुप रडावसं वाटत होतं पण आपल्या बायकोची हालत बघवत नव्हती, सारखी झोपेत बडबडत होती. तीच्यासाठी ते खंबीर राहीले होते.

हेमाला रात्री कधीतरी जाग आली. कोणीतरी दाराची कडी वाजवत होतं. बंडु असावा. अर्धवट झोपेतून उठत दरवाजा उघडला. बंडुच्या तोंडाचा दर्प नाकात घुसला. त्याचे हे रोजचेच झाले होते. त्याने आल्याआल्या तिला बेडवर ढकलले. तिचा थोडा प्रतिकार झाला. त्याबरोबर त्याने तिच्या मुस्कटात मारले. त्याच्या ताकतीपुढे तिचे काही चालले नाही. त्याने कार्यभाग उरकला आणि लगेचच झोपुन गेला. ती मात्र आतल्या आत हंबरत राहीली शमी सारखी.

आबा सकाळीच सगळे आवरून बंडूच्या घरी पोचले होते. आज काम संपवून शमीला घेऊनच जायचे असे ठरवले. दिवस वाढल्यामुळे अजुन एका दिवसाचा दंड वाढणार होता.
हेमा मागच्या दाराला बसली होती. आबांना टिकावाने खड्डे खनताना बघून त्यांची दया येत होती. त्यांच्याने टिकाव उचलत नव्हते. पण कसेतरी खोदत होते. दिवसभरात १५ खड्डे खोदले तर पुरेसे पैसे मिळणार होते.

आबांना न्याहरी देवून हेमा शेतातल्या कामगारांना मजुरी द्यायला निघाली. आडवाटेने जात असताना दोन माणसे आपापसात बोलत असल्याचे ऐकायला आले त्यात आबांच्या नावाचा उल्लेख झाला. ती कान देवून ऐकू लागली. ते बोलणे ऐकल्यावर तिच्या सारा प्रकार लक्षात आला. समजलेली हकीकत अशी होती.
आबांच्या कुरणाला लागुन गोपाळरावांचे कुरण होते. दोन बैल झुंजत झुंजत आब़ाच्या कुरणात आले. तिथे शमी गाय चरत होती. ती घाबरून पळू लागली. त्याबरोबर झुंज सोडून एक बैल तिच्या मागे लागला आणि ती जीव वाचवण्यासाठी गोपाळरावांचे कुंपण तोडून आत गेली. इतक्यात झुंजणाऱ्या बैलांचा मालक येऊन त्यांना घेऊन गेला. शमीला आलेल्या वाटेने बाहेर पडायला मिळेना आणि थोड्या वेळाने गोपाळरावांच्या मुलाच्या ताब्यात सापडली. शमी गायची काहीही चुक नसताना तीला बदडत नेणाऱ्या गोपाळरावांच्या मुलाचा राग आला. कारण त्या बैलाच्या मालकाने त्याला ती चुकून आत गेली असे सांगुन सुद्धा निव्वळ श्रीपतरावांच्या मुलाचा दंडाकरवी फायदा व्हावा यासाठी तीला पकडून कोनवाड्यात टाकले होते. हेमाच्या लक्षात आले गायीवर अन्याय झालाय. तीला यातून सोडविले पाहीजे. नवऱ्याला सांगून काहीच फायदा नव्हता. त्याच्याच कोनवाड्यात ती स्वतः होती. गरीब गायीसारखी. तिला देखील मर्जीविरूद्ध आणलं गेलं होतं. तीच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस वेगळेच घेऊन यायचा. कधी मारझोड, बळजबरी ,जबरदस्ती असं काही तरी असायचेच. दारू पिल्यानंतर तर बंडू राक्षस व्हायचा. तिच्या नशीबात प्रेमच नव्हते. या सर्वांना कंटाळलेल्या हेमालाही सोडवणूक हवी होती. लग्नापुर्वी अनाथाश्रमात वाढलेल्या हेमाला माहेरचे असे कोणी नव्हते. तिच्या मनाचा कोंडमारा व्हायचा. छोट्या मुलाकडे बघुन सारं घोटायची. कधी कधी तिलाही या कोनवाड्यातून सुटका करून घ्यावीशी वाटायची. पण धीर व्हायचा नाही. तिला सवय झाली होती. तशी सवय शमीला नको व्हायला हवी होती. श्रीपतरावांचा पठाणी दंड वाढायच्या अगोदर काहीतरी करायला हवं होतं. दुसऱ्या कोणाला सांगुन फायदा नव्हता. आपल्यालाच काहीतरी करायला हवे होते. मनाशी विचार करता करता हेमा घरी आली.

हेमा घरी आली तेव्हा आबांचे काम चालूच होते आणि बंड्या त्यांच्यावर ओरडत होता. हेमाला त्याचा राग आला. आबांकडून अवघे पाच खड्डे खोदून झाले होते. अजून अर्धा दिवस बाकी असला तरी १० खड्डे मारून होणार नव्हते. म्हणुन बंड्या पण त्यांना खड्ड्याच्या हिशेबाने पैसे देणार होता. हे ऐकून आबा खालीच बसले. कारण खोदलेल्या खड्याच्या पैशात त्यांच्या शमीची सुटका होणार नव्हती. त्या विचाराने त्यांना रडूच आलं. त्यांचा चेहरा त्यांनी टॉवेलने झाकला तरी हेमाला ते जाणवले.

हेमाला काहीही करून त्यांना मदत करायची होती. पण कशी? हेच तिला सुचत नव्हते. ती हतबल झाली होती. काही झाले तरी बंडुला ही गोष्ट कळून चालणार नव्हती म्हणून ती त्याच्याकडे जाऊ शकत नव्हती. विचार करून करून ती निराश झाली. दिवस मावळतीला आला तशी तिची घालमेल वाढली. आबांचे थकलेले हात थरथरताना दिसले. त्यांनी तर सपशेल हार मानली होती.

वाड्यात सामान ठेवायचा आवाज झाला. तशी ती भानावर आली. तिच्याकडून अजून काहीच झाले नव्हते. याचीच खंत होती. ती वाड्यात आली. आबा टिकाव फावडे वाड्यात ठेऊन बाहेर जात होते.
" आबा" तिचा कंठ दाटून आला.
आबानी वळून मागे पाहीले. हेमा त्यांना हाक मारत होती.
"पोरी काय गो?" कपाळाचा घाम पुसत आबा बोलले.
"आबा, तुम्ही केलेल्या कामाचे पैसे देखील आज मिळणार नाहीत, हे मघाशीच बाहेर निघून गेले." हेमाला हे सांगताना कसेतरीच वाटत होते.
आबा काहीच बोलले नाहीत.
"आबा, तुम्ही या उद्या सकाळी, हे कोल्हापुरला जाणार आहेत , आज रात्री घरी आले की तुमचे पैसे घेवून ठेवेन." हेमा अशी बोलली खरी पण तिला त्यासाठी वेळ पडल्यास मार खावा लागणार होता आणि तरीही पैसे मिळायची खात्री नव्हती.
" हं " असे बोलत आबा निघायला लागले.
" आबा थांबा, चहा ठेवते , तो घेऊन जा."
आबा येऊन पुढच्या पडवीत बसले.
चहा पिऊन झाला. त्यांना काहीतरी बोलायचे होते.
"पोरी, याक बोलाचा हूता गो, पण कसा बोलाव, ताच कळत नाया"
"आबा, मला पोरी म्हणता ना, मग संकोच करू नका ,बोला काय ते" हेमा बोलली.
" पोरी , थोडी भुकी आणि साखर मिळात काय? सकाळपासना आमच्याकडे चाय नाया, गेलय काय लक्षुमेक थोडी चाय करून देयन, तीका फुटी लय आवडता" आबांचे हे शब्द तीचे काळीज चिरून गेले.
" पोरी , आतापरयात कोणाजवळ हात नाय पसरूक , पण तु जवळचा वाटलस म्हणुन बोल्लय. काय चुकला तर माफ कर"
हेमाला काय बोलावे ते कळेना. आईच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी बघून तीचा छोटा मुलगाही कावराबावरा झाला. त्याला आपली आई कधी रडलेली माहीत नव्हते, किंबहूना ती त्याच्या समोर त्या अवस्थेत कधीच आली नव्हती रोज रडत असुन सुद्धा.
"आबा, तुमचे काहीही चुकलेले नाहीये, थांबा येते मी" तीचा हे बोलताना कंठ दाटून आला होता. ती आत गेली. तीच्या मागोमाग छोटा मुलगाही दुडूदुडू धावत गेला.
थोड्यावेळाने ती एक पिशवी घेऊन बाहेर आली. ती आबांच्या हातात देत बोलली.
"आबा, हे काय म्हणुन विचारू नका, तुमच्या मुलीने सासरभेट दिलीय असं समजा"
आबांचा कंठ दाटून आला. त्यांना काही बोलवेना.
" तुम्ही जाताना शमीला भेटायला जाणार आहात का?"
" नाय, तीका भेटाक होवचा नाय माका. तेचे हाल बघवत नाय गो, गेलय काय टकामका बघीत ऱ्यवात, हंबरान जीव अर्धो करीत, ता माझ्याच्यान बघवाचा नाय .." एवढे बोलून आबा निघाले.

आबा घराकडे जात होते पण पावले काही उचलत नव्हती. प्रथमच गरीब असल्याची लाज वाटत होती. मनात खुपच घालमेल होत होती. इतक्यात मागून कोणीतरी हाका मारत असल्याचा आवाज आला. हेमाच होती ती. त्यांनी तीचा आवाज ओळखला.
ती डोक्यावर चारीचा पेंडा घेवून धावत येत होती.
"आबा, तुमची काळजी मिटली, पैशाची व्यवस्था झाली, कशी झाली हे मात्र विचारू नका." हेमा धापा टाकत बोलली. पैशाचे पाकीट आणि चारीचा पेंडा आबांच्या हातात दिला. आपण हे पैसे घेऊ नये असं आबांना वाटले पण हे ऋण आपण फेडू शकतो व मुक्या जनावऱ्याच्या होणाऱ्या हालापुढे हे ऋण काहीच नव्हते.
" पोरी, पैशे घेतय पण , तुझी पैन पै फेडीन" आबांना पुढे बोलवेना. कोण कोणाची मुलगी , जिचं आपल्यासाठी काळीज तुटतयं.
"आबा एक सांगु का? तुमची शमी चोरटी नाहीये तिला त्यात गुंतवले गेले होते, पण कस ते विचारू नका. " आबांना आपली शमी निर्दोष आहे हे माहीत होतेच पण आता शिक्कामोर्तब झाले. हेमाचा निरोप घेऊन आबा कोनवाड्याकडे चालायला लागले आणि हेमा आपल्या कोनवाड्याकडे. जिथून तीची अजिबात सुटका नव्हती.
त्याचवेळी त्यांचे हे बोलणे कोणीतरी ऐकत होते.

आबांसोबत घरी जाताना चालणारी शमी खूपच आनंदात होती. सारखी सारखी आबांना चाटून आपले प्रेम व्यक्त करत होती. आबा त्याहून खुश होते. तीचे तोंड हातात घेऊन तीला कुरवाळत होते. हेमाने दिलेल्या चाऱ्यातुन थोडा चारा भरवताना आबा खुश होत होते. आबा घरी येईपर्यंत काळोख पडला होता. घराजवळ आल्याबरोबर शमी हंबरली. ती तिच्या घरात आली होती. आपल्या जागेवर जाऊन हूंगू लागली. लक्ष्मी उठून बाहेर आली. आबानी शमीला आणलेले पाहून भर आजारपणात पण तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. आबांच्या हातातली पिशवी घेऊन ती शमीला ओवाळायची तयारी करू लागली. आपल्या बायकोचा उत्साह बघुन आबा काही बोलले नाहीत. पण हेमाला दुवा द्यायला मात्र विसरले नाहीत.

हेमा जागीच होती. इतक्यात दरवाजा वाजला. तीने घड्याळात पाहीले १० वाजले असावेत. आपला नवरा एवढ्या लवकर? तीने दरवाजा उघडला. समोर मान खाली घालून बंडू उभा होता. तो न लटपटता आत आला. हेमाला आश्चर्य वाटले. आज स्वारी दारू न पिता, आरडाओरड न करता आली होती. तो पलंगावर बसला.
तीने त्याला शुद्धीत पाहून जेवनाबद्दल विचारले. तो खुणेनच नको बोलला.
तीला जवळ बोलविले. ती घाबरतच समोर आली.
त्याने तिला काही न बोलता मिठीत घेतले. हेमाला प्रथमच त्या मिठीत वेगळेपण जाणवले. ज्या क्षणाची ती वाट बघत होती तो क्षण होता तो. त्या मिठीत तिला त्याच्या साऱ्या कृत्याची क्षमा जाणवत होती, त्या मिठीत एक आश्वासक घट्टपणा होता. तीला कुठेतरी जाणवत की आपली कोनवाड्यातून सुटका होतेय. थोडा वेळ ती दोघं तशीच बिलगून राहीली.
"हेमा.. " त्याला पुढे बोलवेला.
" हेमा आज संध्याकाळी मी जर परत घरी आलो नसतो आणि तुम्हा मायलेकाची चाललेली ती धडपड पाहीली नसती ना तर कदाचित माझ्याकडून तुझ्यावर असाच जुलूम होत राहीला असता. आपल्या मुलाला तु किती चांगले संस्कार दिलेस. सुरूवातीला मला कळेनाच तुला कशासाठी पैसे हवेत. ज्या हाताने आपल्या स्नेहने आपल्या मिनी बँकचा डबा तुझ्यासमोर धरला ते कोवळे हात बघून माझी मला लाज वाटली. किती समज ती. सारं कसं समजले असेल त्याला? आबा काम करत असताना तो त्यांच्या आजुबाजूलाच असायचा. आबानी तर सांगीतले नसेल? नाही. आबा असं कधीच करणार नाहीत. तुलाही क्षणभर त्याने दिलेला डबा फोडावासा वाटला नव्हता पण त्याच्या त्या बालहट्टापुढे तुला ते करावे लागले. पण त्यातही तुला दुहेरी आनंद झाला होता. मुलाविषयी कौतुक आणि आबांना मदत होतेय याचा आनंद.
त्यानंतर तु ते पैसे घेऊन कातरवेळी बाहेर पडलीस म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो. धावताना तुझी ओढ मला दिसत होती. त्याचवेळी क्षणोक्षणी माझा राग, अहंकार , मगरूरी तुटत होती. माझी मलाच घृणा वाटू लागली होती.. स्नेहचा समजुतदार पणा पाहून तर मी अवाक झालो होतो. हे सगळे तुझ्या संस्कारामुळेच घडून आलेय गं. आता मला समजतयं तु आपल्या स्नेहला माझ्यापासून दूर का ठेवायचीस ते. पण त्याची आता गरज लागणार नाहीये. असं बोलून त्याने तिला परत मिठीत घेतली. दुसऱ्यांदा मिठीत जाताना हेमाला आपण कोनवाड्यातून पुर्णपणे सुटल्याची ग्वाही मिळाली.
समाप्त.
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
----------------------------------------------
शब्दांकन
नितीन राणे
सातरल - कणकवली.
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

सुरेख! किती छान लिहिताय तुम्ही! प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे तरीही तितक्याच परिणामकारकपणे तुम्ही मांडला आहे. ग्रामीण कोकणातली माणसं अगदी अस्सल उतरवली आहेत सर्व कथांमध्ये.

व्वा !!!
काय सुरेख कथानक आहे... आणि प्रचंड आश्वासक !
राणे... मान गये यार तुम को Happy

चांगली आहे, (राग मानु नका) पण शेवटचे दोन पॅरा वरच्या कथेतिल वातावरणाला विसंगत वाटले. स्नेह हे नाव ग्रमिण भागात असणं थोडं पटत नाही, तसचं मिनी बँक, आणि ह्या पॅरामधली भाषा वेगळी वाटली.

खूप आवडली. आबांची परवड बघुन कसेतरीच झाले. खूप वाईट वाटले. खरच प्रत्यक्षात पण कोणाच्याही वाट्याला असले जीवन यायला नकोय ही देवाजवळ प्रार्थना.

खूपच छान... डोळ्यात पाणी आले आबांची शमीची अवस्था वाचून....सगळे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले..

आबांची परवड बघुन कसेतरीच झाले. खूप वाईट वाटले. खरच प्रत्यक्षात पण कोणाच्याही वाट्याला असले जीवन यायला नकोय ही देवाजवळ प्रार्थना.>>>>>>>>>>>>>>>>> +११ अगदी..

गरीबीचे वर्णन वाचवतही नाही माझ्याच्याने.. जी लोकं जगतात त्यांना मनापासून सलाम....

शेवटच्या पॅराबद्दल अनुमोदन... माणूस लगेच एवढा बदलेल का? असो पण गोष्टीची पकड एवढी छान आहे कि त्याचा विसर पडतो.

खूप सुंदर कथा!
बंडू अचानक बदलतो हे थोडे विसंगत वाटले तरी कथेची पकड एवढी जबरदस्त आहे की ते अजिबात खटकत नाही..उलट 'ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड' या उक्तीप्रमाणे एक feel-good भावना सगळ्या कथेला देतो.

सुंदर आहे. आवडली!

टीव्हीवाल्यांना द्या ही. २५-३० मिनीटांचा सुंदर भाग होईल त्या भंकस सिरीयल्स पेक्षा.

खूप आवडली. आबांची परवड बघुन कसेतरीच झाले. खूप वाईट वाटले. खरच प्रत्यक्षात पण कोणाच्याही वाट्याला असले जीवन यायला नकोय ही देवाजवळ प्रार्थना.>> +१

चांगली आहे, (राग मानु नका) पण शेवटचे दोन पॅरा वरच्या कथेतिल वातावरणाला विसंगत वाटले. स्नेह हे नाव ग्रमिण भागात असणं थोडं पटत नाही, तसचं मिनी बँक, आणि ह्या पॅरामधली भाषा वेगळी वाटली.>> +१

पण खरेच खूप खूप आवडली. पुलेशु. Happy

धन्यवाद तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबाबात.. बंडू हा श्रीमंत माणुस आहे , शिक्षित आहे. फक्त बापाच्या पश्चात त्याला पैशाची मगरूरी आली आहे. त्याच्याजवळ गाडी बंगला सर्व काही आहे. फक्त त्याचे कान उघडणी करणारे कोणी नाहीये किंबहूना तो कोणाच्या ऐकण्यातला नाही. पण मुलगा आणि बायकोच्या एका प्रसंगाततून त्याला पश्चाताप होतो आणि तो सुधारतो.
हेमा ही अनाथ पण शिकलेँली मुलगी. शहरातून लग्न होऊन गावी स्थायीक झालेली. ती आपल्या मुलाचे नाव स्नेह ठेऊ शकते. शिवाय मिनी बँक या संकल्पनेतून मुलाला छोट्या बचतीचे धडे देऊ शकते.

छान आहे कथा .
फारएन्ड म्हणतायेत तस शॉर्ट फिल्म होऊ शकेल यावर

खूप छान आहे कथा. छान लिहिता तुम्ही.

प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे तरीही तितक्याच परिणामकारकपणे तुम्ही मांडला आहे. ग्रामीण कोकणातली माणसं अगदी अस्सल उतरवली आहेत सर्व कथांमध्ये. > +१

Pages