वृद्धाश्रम...

Submitted by प्रकाश सरवणकर on 27 January, 2018 - 04:48

रविवार ची वेळ.. आमच्या फेसबुक ग्रुप चा सामाजिक कार्यक्रम विरार जवळच्या एका खेड्यातल्या वृद्धाश्रमाला भेट.. एक सामाजिक जाणिव म्हणून वृद्ध मंडळींसोबत एक दिवस घालवावा, त्यांना काही गरजेच्या वस्तू देऊन मदत करावी एवढाच हेतू... ग्रुप च्या इतर सामाजिक कार्यातील हा एक खास महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम...

सगळेजण सकाळीच ९ वाजता विरार स्टेशन ला पोचले... प्रत्येकाने सामानाचा बोजा वाटून घेतला.. आणि ऑटो पकडल्या..
मी काही अगोदर ह्या आश्रमास भेट द्यायला आलो नव्हतो.. पूर्व भेट, परवानगी वगैरे आमच्याच एका स्थानिक मित्राने घेतलेली...

९.३०च्या सुमारास आम्ही अनाथाश्रमात पोचलो...
सुरुवातीची तयारी करून आम्ही आधी महिला विभागात गेलो, तिथे महिला जास्त असल्याने आणि आमच्यासोबतही महिला जास्त असल्याने वृद्ध, निराधार महिलांना आधी भेटलो.. त्यांना भेटवस्तू, फळे यांचं वाटप केले. महिला मंडळाने सगळ्या वृद्ध महिलांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर आम्ही पुरुष विभागाकडे वळलो.. आधीच कळले होते की, पुरुष तिथे जास्त नाहीत.. ८/१० च आहेत.. पुरुष विभागात गेलो आत शिरलो... समोरच कॉट वर बसलेल्या माणसाकडे माझं लक्ष गेलं... आणि..
मी पहातच राहिलो.... भामरे... इथे?
मी पुढे झालो... त्यांचा हात हातात घेतला,
" भामरे..., ओळखलंत का मला? "
भामरेंच्या डोळ्यात क्षणभर एक क्षीण चमक दिसली खरी... पण पुन्हा ते थकलेले डोळे निस्तेज झाले...
मी मूक झालो... त्यांच्या खांद्यावर हलकेच थोपटून भरल्या आभाळाने मी बाहेर मोकळ्या आकाशात आलो... कंठात दाटलेला आवंढा मी गिळला आणि आधारासाठी बागेतल्या बाकड्यावर टेकलो....
माझ्या मागोमाग आलेला नितीन म्हणाला... " काय झालं दादा.. बरं वाटत नाहीय का? कुणाला बोलावू का? " त्याला मी खुणेनेच थांबवलं आणि कसाबसा आत पाठवला..
माझ्या नजरेसमोर उलगडू लागला.. भामरेंचा जीवनपट.. ३० वर्षांची आमची मैत्री .. सगळं काही..

जवळपास २५/३० वर्षांपूर्वी मी नुकताच नोकरीला लागलो होतो…. कंपनीचं एक ऑफिस फोर्ट विभगात होतं.. तिथेच हे भामरे बदली होऊन आले... आमचा बॅचलर १५ लोकांचा एक ग्रुपच होता तेव्हा ऑफिस मध्ये.. लग्न झालेले एक दोनच.. भामरे आले, त्यांचं लग्न झालेले होत १० वर्षापूर्वीच.. मूल बाळ नव्हतं.. पण भामरे आमच्यापेक्षा बरेच मोठे असूनही आमच्यातलेच होऊन गेले... आम्ही तेव्हा एकत्रित सिनेमे, नाटकं बघायला जात असू... हॉटेलिंग करत असू... पिकनिक ला जात असू... ते त्या सगळ्यात सामील होत असत.. पिणा-यांसोबत एखादी बियर सुद्धा घेत असत..
भामरेंची बायको सुद्धा आमच्याच कंपनीत कामाला होती पण वेगळ्या ब्रँच मध्ये.. त्यामुळे दोघांना तशी आर्थिक विवंचना काहीच नव्हती... तरीही मूल नसल्याचं दुःख जाणवायचच..
आम्ही थेट बोलणं टाळायचो, कारण ते त्रासदायक होतं.. पण विषय आला की त्यांना एखादं अनाथ मूल दत्तक घ्यायला सुचवायचो... त्यांना ते पटायच नाही... जसे इतर लोकं नेहमी विचार करतात.. दुसऱ्याचं मूल वगैरे..
आम्ही त्यांना त्यावर भावा बहिनीचं मूल दत्तक घ्यायला सुचवलं, ते तर तुमच्या आपल्या माणसांचं असेल.. त्यावर त्यांचं वेगळंच उत्तर असायचं.. ते पुतणे वगैरे पैशासाठी जवळ येतील नंतर पैशे संपले की आम्हाला दूर करतील.. या सगळ्यांमुळे भामरे पती पत्नी कायम एकाकीच राहिले.. दोघेही सेवानिवृत्त झाले... नंतर केसरी तर्फे जगभर फिरून झालं.. दरवर्षी पिकनिक ला मात्र येत.. इकडे गेलो, तिकडे फिरलो.. सगळं सांगत... वय होत चाललं होतं.. त्यामुळे बियर टाळत.. नंतर नंतर पिकनिक ला येणं ही टाळू लागले..
ग्रुप मध्ये कुणाचं काही झालं की मी सर्वांप्रमाणेच त्यांनाही कॉल करून सांगत असे.. मग ते सांगत की आता नाही जमत...
पण एवढया परिस्थितीतही त्या जोडप्याने कुणाला नातेवाईकांना फार जवळ नाही केलं..
कारण एकच... लोकं फक्त आमचा पैसा बघून जवळ येतील... पैश्याव्यतिरिक्त ही नाती असू शकतात हे त्यांनी ठामपणे नाकारलेलं..

असाच एकदा सकाळी मी ऑफिस ला जात होतो, मोबाईल वाजला.. भामरेंचा फोन.. " बायको वारली आताच... तुमच्यापैकी कोणाला यायचं असेल तर आजच भेटा... उद्यापासून मी गायब होणार आहे..मला हे सहन होणार नाही.. मी कुठेतरी निघून जाणार आहे काही दिवस.."

मी आमच्या जुन्या मित्रांच्या व्हाटसऍप ग्रुप वर सगळ्यांना मेसेज दिला... वेस्टर्न च्या लोकांना कॉल करून सांगितलं की तुम्ही तरी जा...
मला नाही जमलं जायला पण एक मित्र गेला...तो नंतर मला म्हणाला , " अरे काय विचित्र माणूस आहे यार.. सांत्वनासाठी गेलो.. मलाच विचारलं काय कसं आहे, आणि दोन मिनिटांनी म्हणाला तू निघ आता, मला इतर लोकांशी बोलायचं आहे"
मी काहीच बोलू शकलो नाही...
पण त्यानंतर मलाही जाता आलं नाही आणि संपर्क तुटला तो तुटलाच... मोबाइल च्या या जगात नंतर त्यांचा नंबर कधी फिरवून बघायचं राहूनच गेलं होतं... आता तर भामरे समोर दिसत असूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता..

मन अस्वस्थ झालं.. काय चुकलं... कोणाचं चुकलं..
जर भामरेनी अट्टाहास न करता एखादं अनाथ मूल दत्तक घेतलं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली असती का? एक अनाथ मूल सनाथ झालं असतं, त्याचं जीवन सुधारलं असतं.. आणि ह्या आपल्या पालक आई वडिलांनी आपल्याला हे चांगलं जीवन मिळवून दिलं ह्या भावनेने त्याने/तिने त्याला आयुष्यभर पुजलं असतं.. भामरेना वाटत होतं तसं झालं असतं तरीही पैशापोटी का होईना त्यांनी ह्या जोडप्याला बघितलं असतं... आता ज्या पैशाची चिंता भामरेनी केली त्या पैशाचा, भामरेंच्या मोठ्या फ्लॅट चा उपभोग घेण्याच्या पलीकडे भामरे निघून गेले होते..
माझ्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात दिसणाऱ्या भामरेंच्या अंधूक प्रतिमे सारखेच...

©प्रकाश सरवणकर 9869280660

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कशावरून दत्तक मुलाने त्याना सांभाळले असते?
कशावरून तुम्ही निष्कर्ष काढला की ते त्या वृद्धाश्रमात आनंदात नाहीत?

भामरेंना वृध्दाश्रमात पाठवणारे पण कुणी असतील ना? जे असतील ते त्यांच्या नात्यातीलच ना? आयुष्यभर खपायच अन शेवट हा असा.. खुप वाईट!

भामरेंना वृध्दाश्रमात पाठवणारे पण कुणी असतील ना? जे असतील ते त्यांच्या नात्यातीलच ना? >>> वृध्दाश्रमात कोणी पाठवावच लागतं का? स्वतः उठुन जाता येत नाही का?