काताळार नाताळ

Submitted by onlynit26 on 24 January, 2018 - 00:28

गजाल सांगाची म्हणजे , एकदा काय झाला
आवाटातल्या पोरानी पार्टी करुची ठरवल्यानी. पार्टी म्हटल्यावर सगळ्यांच्यो जीभल्यो पाघळाक लागल्यो. पिंट्या ईकाळ्याच्या तोंडात तर उंबाळच उंबाळला. पार्टी म्हटली की पिंटो सगळ्यात पुढे . अगदी पार्टी ठरवण्यापासना ते टोपाचा खरडावान (टोपातला पदार्थ संपल्यावर टोपाच्या कडेला लागलेली करपूस चटणी) खरडीपरयात सगळी जबाबदारी शिंगार घ्यायचो. भरडावर पार्टीचा ठरल्याबरोबर हेच्या पायाक थारो लागना. ३१ डीसेंबराक परतेकाचो कायतरी बेत आसता म्हणान या वर्षी नाताळादिवशी रात्री पार्टी करूची ठरली. डीगलो सोडून सगळ्यांची वर्गणी पिंट्याकडे जमा झाली. पिणाऱ्यांची वर्गणीचा गणित येगळा करूचा ठरला. नायतर नाय पिणारो पण तेच्यात उगाचच धगावता. पण पिणाऱ्यांनी पण अट घातल्यानी जे पित नाय तेनी पिणाऱ्यांच्या आजूबाजूक दुकू फीरकायचा नाय, **झये प्लेटीत चाकना ठेवक बघीत नाय.

डीगल्याकडची वर्गणी कशी वसूल करूची ती पिंट्याक चांगली म्हायत हूती. डीगलो पिंट्याच्या घरात दुध घालयाचो , त्याच्याच पैशातना पार्टीचे पैसे वळते करून घेणार हूतो.
जेमतेम बारावी नापास झालेल्या पिंट्याची रिक्षा हूती. पण गोरा गोमटो पिंटो छाप मारून जायचो. सरकळवाडीतल्या सखारामची भाची शिमल्याचा आणि तेचा प्रेम गेल्या २ वर्षापासना चालू हूता. तेचा काय झाला गावच्या धयकाल्यात शिमल्याच्या मामान म्हणजे सकल्यान दुकान घातल्यान हूता. पण जत्रा अर्धी अधिक झाली तरी मालाक उठाव नाय हूतो. मगे सकलो सगळ्यांका गुडदायीत (गर्दीतून पायाने धक्का मारणे ) शिमल्यापरयात पोचलो. तेच्या कानात कायतरी सांगल्यान तसा शिमला देवळाभायर इला आणि सकल्याच्या दुकानात गल्ल्यार बसला. गावात नया प्वार बघून प्वार चेकाळले. शिमला पण दिसाक भारी हूता. गोरा पान आंग, पाणीदार डोळे, गोबरे गाल, लालचुटूक व्हाट, अंगापिंडांन भरलेला शिमला सगळ्यांका दुकानाकडे खेचूक लागला. तेच्याच पिंटो पण. त्या राती पिंट्यान दुकानात जावन जावन ५ किलो खाजा घीतल्यान. निसता खाजाच घेवक निय तर शिमल्याचो व्हाट्सअँपचो नंबर पण कनवटेक लावल्यान. बाकीचे प्वार आवंडे घोटीत ऱ्यवले. कोनीवाडीतलो पकलो तर त्याजत्रेपासना वर्षभर झुर झुर झुरलो शेवटी बापाशीन लगीन करून दिल्यान तेवा खय तेना लॉव लागल्यान. मरो तर सांगाचो मुद्दो असो की पिंट्याचा आणि शिमल्याचा सूत जत्रेत जुळला. जुळलला सुत घेवन दोघांनी दोन वर्षा काढल्यानी. पिंटो चालू वर्षी शिमल्यावांगडा लगीन करूच्या इचारात हूतो.
***************************
पार्टीचा ठरल्यापासना पिंटो लय खुशीत हूतो. ही खबर शिमल्याक लागली. पिंट्यानच बक्षिस दिलेल्या मोबाईलान शिमल्यान पिंट्याक फोन लावल्यान आणि एक ड्रेस घेवन देवक सांगल्यान. ड्रेस मिळालो तरच ३१ डीसेंबराक तुका कातळावर भेटतलय अशी पिंट्याक अट घातल्यान. पिंटो न आयकान सांगतलो कोणाक?
सोमतो शिमल्याक घेवन बाजारात गेलो. कॉकटेल पकडून बाराशेक फोडणी पडली. पण काताळावरची स्वप्ना रंगीत पडलेली फोडणी इसारलो.
***************************
गावापासून लांब माळावर आंब्याच्या झाडाखाली दिवस मावाळलो तसो एक एक जण येवक लागले. पिंटो आणि इलगो कोंबडे इस्ताईत हूते. दोघेजण आग साकटीत हूते. वड्याचा काम भरत्यान घीतला हूता. गावात वडे खावचे तर भरत्याच्या हातचे. मधीच पिंट्याक मटान सोयन साफ करा म्हनान सांगत होते. अस्सल गावठी कोंबड्याचो बेत हूतो.
"आजून बाटल्यो ऱ्यवल्यो खय?" इतको येळ गप ऱ्यवलेले नाना बोलले.
" नानानू गप बसान ऱ्यवा थय, आज तूमका जास्त पिवक गावाची नाय हा, आधीच शेवूळ *कफ) झालो हा तुमका, पिवन जर तो सुकलो तर वांदे होतीत." पिटो कोंबड्याचो गांजो धुता धुता बोललो.
पार्टी मेंबरमधी सगळ्यात वयस्कर नानाच हूते, बाकी सगळे प्वार. प्वार पण नानांका सगळ्या पार्टीक घेवन जायचे. तेनी सांगीतलेल्यो गजाली भारी आसायचे. पण आजकाल नानांची तब्बेत तेंका साथ देत नाय हूती. सारखे खोकत आसायचे. नानी गेल्यापासना एकटे पडलेले नाना ह्या पोरांमुळे सावारले हूते. शिकलेलो झील आवशीचे दिवस करून सोमतो मुंबैक गेलो हूतो. खोकणारो बापूस सोबत नको हूतो तेका. त्यामुळे नाना ह्या पोरांमधीच आसायचे. तेंचोच आधार नानांका वाटायचो.
थोड्यायेळात बंडो खोके घेवन इलो. तशे पिणाऱ्यांचे चेहरे फुलले. शिरगो चाकण्याच्यो पिशयो रापाक लागलो.
"शिरग्या , मेल्यो तुका थार नाय कसो? आजून मटान सुटा होवचा हा, वडे तळूचे हत आणि.तू तकडे बसाची तयारी करतस" बंडो वैतागल़ो तसो शिरगो चुलीखाली लाकडा घालूक लागलो. दोन तासात जेवान तयार झाला. अर्ध्या तासापूर्वीच पिणारे पिवक बसले होते. पिंट्यान टोपावर झाकान ठेवन ,सगळा तयार झाला असल्याचा एकदा बघल्यान आणि शिमल्याक फोन लावल्यान. फोनवर वायच कायतरी बोलला आसताला , पिंट्यान लगेच फोन ठेवल्यान. पार्टीक नाना धरून एकूण १२ जण हूते. तेतूर पिणारे आठ जण. **झये पिले तरी जेवानक ताठ हूते. पिटो आणि बाकी तीघे जण तेंचो कार्यक्रम होयपरयात मोबाईलवर लूडो खेळत बसले. पण पिंट्याच्या मनात ३१ डिसेंबरच्या काताळावरच्या भेटीचो इचार चालू हूतो. इतक्यात नानांका जोरातढास लागली तसो पिंटो तेंच्याकडे गेलो.
" मेल्यानू किती खेपो सांगलय तुमका, नानांका लय पाजू नको, पाजतास ती पण कोल्ड्रींक मधना. तेंका साध्या बावडेतल्या पाणयातसून पाजा." पिंटो नानांची हालत बघून गरम झालो.
" ईसारलय" बंडग्यान दात काढल्यान.
"पांडग्यासारख्या बरा इसारतस, स्वताक चाकण्यासाठी काळीज भाजून घेवक नाय इसारलस."
" तुका कसा कळला, मी काळीज घीतलय ता" बंडग्यान परत दात काढल्यान.
"माका सगळा म्हायत हा. पण मी गप ऱ्यवतय" पिंट्यान नानांका सावध केल्यान आणि एका बाजूक बसवल्यान.
थोड्या येळात सगळे जेवक बसले. मटान एकदम झणझणीत झाला हूता, सगळे अगदी हाय हूय करीत ताव मारीत हूते. पिलेले मेंबर फोडी सोदीत हूते. सगळ्यात जास्त मजा न पिलेल्यांची हूती. अगदी येवस्थित आळा करून मटान चापीत हूते. म्हणता म्हणता मटनाचो टोप खाली झालो. पिंट्यान लवकर आटापल्यान आणि आचवाक उक्शेच्या झाळीत गेलो. आचावता आचावता झाळीत कोणतरी सरसरला. पुढे जावन बघता तर ससो. तेना सांचेकच कातळाकडच्या घळयेत फास लावल्यान हूतो. आणि आता ससो उठलो हूतो, फक्त तेका कातळाजवळच्या घळयेपरयात न्हेवक व्हया हूता. तेवढा करूक काय , म्हणान हातात वली गार लिंगडेची काठी घेवन सश्याच्या मागे लागलो. तसा पण नानानी सश्याच्या मटानाक हाया घातल्यानी हूतीच. पिंट्याक पण सश्याचा मटान खावन बरीच वर्षा झाली हूती.
ससो पुढे आणि पिंटो मागे असो खेळ चल्लो हूतो. ससो पण पिंट्याक खेळी हूतो. पिंट्याक थोडो येळ चाळेगतच वाटली. म्हणान मागे फीराक लागलो पण मन तयार होयना , घळये पासूनचा अंतर आता कमी हूता. थोडा पुढे जावक हरकत नाय हूती.
पिंटो जसा कातळावर इलो तसो शिमल्याची आठवण झाली, ३१ डिसेंबराक हयच भेटणार हूते. कातळावरना समोरचा दृश्य लय भारी हा, समोर खोल दरी आणि खालच्या बाजूक वळान मारणारी नदी, तेतूर टिपूर चांदना, सगळाच भारी आसणार हूता. काताळाच्या टोकाक एक कोचाच्या आकाराचो दगड, ही पिंट्याची आणि शिमल्याची आवडती जागा.
ससो घळयेच्या तोंडार गेलो, थोडो पुढे गेलो काय फासात फसणार हूतो, म्हणजे खाल्लला मटान जिराच्या आधी सश्याचा मटान पोटात जाणार हूता.
इतक्यात कातळाच्या टोकाक कोणतरी सुळसुळला. पिंटो अजिबात भियाक नाय, दब्या पावलान हळूहळू पुढे जावक लागलो. कायतरी तसला बघूक गावतला म्हणान खुश झालो. कारण ती जागा आता प्रेमवीरांसाठी सोयीची झाली हूती. ह्या जागेचो शोध पिंट्यानच लावल्यान हूतो.
पिंट्याचो अंदाज खरो ठरलो, तेका याक पाठमोरा जुळा दिसला. अगदी मानेत मान घालून , गुलू गुलू बोलना चालू हूता. पिंटो उभ्यानी गेलो तर चांदण्यात तेची सावली त्या जुळ्याक दिसणार हूती म्हणान पिंटो जमनीक लिपान (चिकटून) सरपटत जावक लागलो. माका सांगा एवढा झूम करून बघूची काय गरज? जुळ्यातल्या एकाचो आवाज आयकान तेचा त्वांड उघडाच ऱ्यवला. तो शिमल्याचोच आवाज हूतो. पिंट्याक भर थंडीत घाम फुटलो. शिमल्यान तेका पार फसवल्यान हूता आणि मुंबैसून इलेल्या दाजी कालवेच्या पोरावांगडा गोंडो घोळीत बसला हूता. शिमला पिंट्याचा प्रेम इस्कटून तेनाच घेवन दिलेलो ड्रेस घालून कातळावर नाताळ करीत हूता.
पिंट्याची तळपायाची आग मस्तकात गेली. बाजूक करंदीची आणि बोरीच्या शिऱ्याची ओझी बांधलेली हूती. पटकन काही कळाच्या आत एका बाजूक दोन शिऱ्याची ओझी लावन वाट बंद केल्यान आणि हातातल्या लिंगडेच्या काटयेन दोघांकाव शिरटावूक सुरूवात केल्यान. दोघाव बेसावध असल्यामुळे , अचानक झालेल्या हल्ल्यामुळा चांगलीच तावडीत सापाडली. दोघाव जणा एका बाजूक खडाक, समोर दरी आणि एका बाजूक शिरी असल्यामुळा कचाट्यात सापाडली. लिंगडीची काठी पिंटो सपासप पायावर मारीत सुटलो हूतो.
"दोन वर्षा माझी स्वताची हौस बाजूक ठेवन , तुझी हौस पुरवलय, तुका मोबायल व्हयो तो घेवन दिलय., तुका कपडे व्हये असायचे ते देत इलय, तुझ्या मामाची वय ( कुंपन) पण करूक इल्लय, एकदा तर तुझ्या मामीन श्यान मळूक पण बोलवल्यान हूता आणि शेणातले सोडे बघून भियान माका भर कोपऱ्यात चिकाटललस.. खय गेला सगळा? काय कमी पडाक दिलय तुका? आतो ह्यो मुंबैयसून इलो तो ताजो वाटलो काय? मघाशी फोन केलय तेवा परवान ( कण्हने ) दाखवलस आणि हयसर तुका घोपान बरा इला काताळावर नाताळ करूक"
पिंटो बोलता बोलता शिरटाईत हूतो.
इतक्यात मागसून त्याचे पार्टी मेंबर येत असल्याचो माग लागलो. त्या बरोबर तो मारूचो थांबलो. दोघांच्या पायान तेंका चलाक जमत नाय हूता पण पिंटो मारूचो थांबल्याबरोबर त्यानी पळ काढल्यानी. शिमल्याचो चेकमेट आपल्या दोस्तांका समजात म्हणान पिंटो घळयेत जावक लागलो. थयसर ससो फासात अडाकलो हूतो. एरव्ही शिकार मिळालेली बघून तेका आनंद झालो असतो पण सश्याच्या ठीकाणी स्वताचो चेहरो दिसाक लागलो. ध्यानी मनी नसान सुद्धा स्वता शिकार झालो हूतो.

शब्दांकन - नितीन राणे
(सातरल - कणकवली)
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिली आहे कथा. मालवणी असुन समजली आणि वाचायला मजा आली. काही शब्द कळाले नाहीत, पण पुर्ण वाक्य वाचलं कि संदर्भाने अर्थ समजुन जातो. नाहीच समजला तरी वाक्याचा आशय कळला तरी कथा वाचनात बाधा येत नाही.