धनिया - पुदिना आलू

Submitted by योकु on 16 January, 2018 - 11:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- ३ ते ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
- १ मध्यम मोठा कांदा
- १ मोठा टोमॅटो
- १ हिरवी मिरची
- इंचभर आल्याचा तुकडा
- १ चमचा धणे पावडर
- अर्धा चमचा जिरे पावडर
- अर्धा चमचा कसूरी मेथी
- अर्धा चमचा पुदिना पावडर
- २-३ टेबलस्पून तेल
- पाव चमचा हळद
- पाव चमचा लाल तिखट
- चिमूटभर साखर
- चवीपुरेसं मीठ

क्रमवार पाककृती: 

- बटाट्यांची सालं काढून मध्यम फोडी कराव्यात
- कांदा पातळ उभा चिरावा
- टोमॅटो बारीक चिरावा
- हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्यावेत
- आल्याचा तुकडा किसून घ्यावा
- सगळे कोरडे मसाले एकत्र करून ठेवावे
- लोखंडी कढई सणसणीत तापली की तेल घालावं
- यात आता हिरवी मिरची + आलं + कांदा घालावा आणि कांद्याच्या कडा सोनेरी लालसर होईपर्यंत तळसावं
- सगळे कोरडे मसाले घालून मिनिटभर होऊ द्यावं; मसाले तळल्या जायला हवेत पण जळता कामा नये
- यात टोमॅटो च्या फोडी घालून, तो गळेस्तोवर मोठ्याच आचेवर होऊ द्यावं
- आता बटाट्याच्या फोडी, मीठ साखर घालून बटाटा जरा खरपूस होईल असं पाहावं
-सगळा मसाला माखला की ते सगळं प्रकरण कोरडं पडलेलं असेल कारण आच दणदणीत होती, म्हणून मग त्यात अर्धी/पाऊण वाटी कढत पाणी ओतून अंगाबरोबरची ग्रेवी करावी, मिनिटभर रटरटू द्यावं की भाजी तयार
- गरम फुलके, घडीची पोळी, वरण-भात यांबरोबर फार मस्त लागेल
- तळल्या धनिया-पुदिना पावडरीचा मस्त सुगंध येतो या भाजीला

वाढणी/प्रमाण: 
२ लोकांकरता पुरेल या प्रमाणाची भाजी, बाकी स्वयंपाकासोबत
अधिक टिपा: 

- कोरडे मसाले घातल्यावर तेलात ते व्हायला हवे तरच अपेक्षित चव साधेल, तेल त्याप्रमाणात घ्यायला हवंय आधीच
- गार पाणी घालू नका, चवीत फरक जाणवतो
- टोमॅटो ला आमचूर पावडरीनं रिप्लेस करता येऊ शकेल पण मग ग्रेवीला बल्क काही राहाणार नाही
- पुदिना पावडर बेतानं; जास्त झाली तर ओवर-पावर करेल भाजीला

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त एकदम.
आलू विथ पुदिना ट्विस्ट छान च लागेल. करून बघण्यात येईल.

फोटो पाहिजे.
बटाट्याचा वेगळा प्रकार नक्की करुन बघणार. पुदिना बॅकयार्ड ला मोठ्या प्रमाणात येतो पण अजुन २ महिने वाट बघावी लागेल.

इंटरेस्टिंग !

पुदिना पावडर रेडीमेड मिळते का? इतर मसाल्यांसारखी? (कारण पुदिना घरात वाळवून पावडर करून ठेवलेली इथल्या हवेला टिकत नाही असा अनुभव आहे. म्हणजे पावडर टिकते, पण त्याचा पुदिना-स्पेशल वास-स्वाद सगळा गायब होतो.)

योक्या तु शेफ च व्हायला हवे होतेस मित्रा.
अफलातून रेसिपी आणि ती पण इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने. अधिक टिपा सुद्धा मनोरंजक आहेत.
आवड्याच.

झक्कास रेसिपी! बटाट्याच्या किती ही रेसिपीज असल्या तरी नवीन हव्याच असतात Happy

<< कारण पुदिना घरात वाळवून पावडर करून ठेवलेली इथल्या हवेला टिकत नाही असा अनुभव आहे. म्हणजे पावडर टिकते, पण त्याचा पुदिना-स्पेशल वास-स्वाद सगळा गायब होतो.)

आई मायक्रोवेव्हमध्ये करते. छान राहते.

युपीवाले फोदणी नाही देत. संध्याकाळ्च्या नाश्त्याचा पदार्थ आहे हा त्यांचा. पुदीना,कोथिंबीरीच्या चतणीत छोते उबले आलू मुरवुन खायचे. मस्त लागतात. पाक्रु आवदली.

योकु, तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत. तुमच्या लोखंडी कढई चा फोटो टाकाल का? संपदा, मायक्रोवेव्ह मध्ये पुदिना पावडर कशी करायची ते प्लिज सांगाल का?

धन्यवाद बस्के, आभा! Happy
लोखंडी कढई मी आठवडी बाजारात घेतली होती अशीच. फोटो टाकतो.

धत तेरे की. रेसिपी न वाचताच मला ताजा पुदिना लागेल असं वाटलं नी तो घेऊन आले. पुदिना पावडर काही नाहीये घरी ही भाजी करुन बघायला.

मायक्रोवेव्ह मध्ये पुदिना पावडर कशी करायची ते प्लिज सांगाल का?
<<
पुदिना 'निवडून' त्याची पानं मावे च्या फिरत्या बशीत पसरून ठेवून २ मिन्टं फिरवा. त्यानंतर उलटसुलट करून पुन्हा १-दीड मिनिट. मस्त चुरचुरीत कोरडा होईल. रंगही हिरवाच राहील.

अशीच मेथी केली तर कसुरी मेथी घरचे घरी.

इतरही हवे ते हर्ब्ज असेच वाळवून पावडर करता येतात. उदा. कढिलिंबाची पाने.