पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २. कारवां (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 5 January, 2018 - 12:54

६० आणि ७० च्या दशकातल्या बऱ्याच चित्रपटांतली अनेक गाणी माझ्या आवडीची आहेत. आजकाल आपली आवडती गाणी ऐकायला छायागीत किंवा चित्रहार किंवा सुपरहिट मुकाबला अश्या कार्यक्रमांची (गेले ते दिन गेले!) वाट पहावी लागत नाही हे जरी खरं असलं तरी ह्या गाण्यांचं picturization मुद्दामहून प्रयत्न केल्याशिवाय (उदा. युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करून) पहायला मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. मग कधी कुठे तरी रिमोट घेऊन चॅनेल्सच्या जंगलात 'कोणी चांगला कार्यक्रम दाखवता का?’ असं म्हणत हिंडताना अचानक ह्यातलं एखादं गाणं नजरेस पडतं. हिरो आणि हिरोईन नुसतेच बागेतून धावत नसतील तर गाण्यातून कथानक पुढे सरकताना दिसतं आणि वाटून जातं 'काय बरं गोष्ट असेल ह्या पिक्चरची?’. हो, हो, माहित आहे. विकिवर आजकाल तीही कळायची सोय आहे. पण पुढे काय घडणार आहे ह्याचे अंदाज बांधत पिक्चर बघण्यात जी मजा आहे ती विकिवर इस्टोरी वाचण्यात नाही. नाही का?

तर नमनाला घडाभर तेल घालायचं कारण म्हणजे असाच एक चित्रपट ज्याबद्दल मला कित्येक वर्षं अपार कुतूहल होतं तो म्हणजे १९७१ सालचा कारवां. नावच कसलं झकास आहे ना? कारवां म्हटलं की डोळ्यांसमोर दूर क्षितिजापर्यंत पसरलेली बैलगाड्यांची रांग, त्यातले रंगीबेरंगी कपड्यातले गाणी म्हणत जाणारे बंजारा लोक आपोआप दिसायला लागतात. काय असेल ह्या कारव्याची गोष्ट? Hflicks२ चॅनेलच्या कृपेने मला मागच्या आठवड्यात ही गोष्ट पाहण्याची संधी मिळाली. ती आज तुम्हाला सांगणार आहे. सुरु करू का?

तर चित्रपट सुरु होतो तेव्हा आपल्याला एक गाडी दिसते. एक तरुणी ती गाडी चालवतेय खरी पण तिचं गाडीवरचं नियंत्रण सुटलंय कारण कोणीतरी गाडीचे ब्रेक्सच फेल केलेत. धोकादायक वळणं असलेल्या रस्त्यावरून गाडी वेडीवाकडी धावत चाललेय. दुसर्या बाजूला खोल दरी. ती तरुणी खूप घाबरलेय पण तरी गाडी ताब्यात ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतेय. एका क्षणी मात्र तिचा नाईलाज होतो आणि गाडी खोल दरीत कोसळते. उलटीपालटी होत अगदी तळ गाठते. मग दुसर्या शॉटमध्ये दिसतात ते पंचनाम्यासाठी आलेले पोलीस, गर्दी. एक तरुण पोलिसांशी हुज्जत घालतोय. त्या तरुणीची, सुनीताची, डेड बॉडी मिळाली नाही तेव्हा ती जिवंत असणार असं पोलिसांना सांगतोय पण पोलीस ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात की आमच्या माणसांनी सगळीकडे शोधलं पण ती मिळाली नाही, एव्हढ्या वरून गाडी पडल्यावर ती जिवंत कशी राहील, तिची बॉडी दरीत एखाद्या झाडाला अडकली असेल. तो तरुण हताश होऊन तिथल्याच एका झाडाला टेकतो.

सुनिताचं काय झालं असा विचार आपण करतोय एव्हढ्यात तिचा voiceover ऐकु येतो. ती आपल्याला सांगते की तो तरुण म्हणजे तिचं कालच ज्याच्याशी लग्न झालं तो राजन. ती मुंबईच्या एका प्रख्यात मिलमालकाची, मोहनदासची, एकुलती एक मुलगी. राजन तिच्या वडिलांच्या दिवंगत मित्राचा मुलगा. (हे मित्र प्रकरण पूर्वीच्या काळच्या चित्रपटात भारी असायचं नाही? आजकाल हिरो-हिरोईनच्या वडिलांचाच स्टोरीत पत्ता नसतो तर मित्र कुठून असायला?) राजनच्या सांगण्यावरून मोहनदासनी अनेक वर्षं इमानेइतबारे सेवा केलेल्या आपल्या जनरल मॅनेजरला, करमचंदला (जो त्यांचा चांगला मित्रसुध्दा झालेला असतो) काढून टाकून तिथे राजनची नेमणूक केलेली असते कारण राजनने करमचंदने त्यांची फसवणूक केली आहे असं त्यांना पटवून दिलेलं असतं. पण राजन काय चीज आहे हे त्यांना लगेच कळून येतं कारण तिजोरीत ठेवलेल्या १० लाख रुपयांपैकी ३ लाख राजन कोणाला तरी परस्पर देऊन टाकतो. मोहनदासना जेव्हा हे कळतं तेव्हा ते त्याला त्याचा जाब विचारतात. सकाळपर्यंत पैसे आणून दिले नाहीत तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतात आणि हे सगळं करमचंदला लिहिलेलं पत्रही दाखवतात. आतां ह्याचा 'अंजाम तो होना बुराही था' होणार ह्याची आपल्याला कल्पना येते. राजन बाल्कनीतून ढकलून देऊन मोहनदासचा खून करतो आणि ते पत्रही हस्तगत करतो.

सुनीताला वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसतो. जेव्हा करमचंद तिला भेटायला येतो तेव्हा ती त्याला हाकलून लावते. सर्वांची अशी समजूत होते की तिला वेड लागलंय. राजन तिला खोटंच सांगतो कि आपल्या दोघांचं लग्न व्हावं अशी तुझ्या वडिलांची इच्छा होती. सुनिता वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करायचा निर्धार करते. आणि मृत्युपत्रात आपल्याला काय झालं तर सगळी संपत्ती राजनला मिळावी असं लिहून ठेवून जणू आपली कबर स्वत:च खोदते.

लग्न झालेल्या दिवशी राजन तिला खंडाळ्याला घेऊन जातो (इश्श! निदान माथेरान-महाबळेश्वरला तरी जायचं). जेव्हा ते हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करतात तेव्हा तिथे आधीच मोनिका मौजूद असते. ती राजनचे आणि आपले संबंध जाहीर करते. राजनने तुझ्या वडिलांचा खून केलाय असं म्हणून त्यांनी करमचंदला लिहिलेलं पत्र दाखवते (ते तिने राजनकडून लंपास केलेलं असतं). आणि हा एक दिवस तुझाही काटा काढणार अशी भविष्यवाणी वर्तवून 'तुला ह्या पुराव्याची गरज लागली तर माझ्याकडे ये' असं आवतान देऊन अंतर्धान पावते. हबकलेली सुनिता स्वत:ला खोलीत कोंडून घेते आणि रात्री राजन झिंगून पडलाय ह्याची खात्री करून घेऊन गाडी घेऊन पळ काढते. नंतर तिच्या लक्षात येतं की गाडीचे ब्रेक्स राजनने फेल केलेत. तरी प्रसंगावधान राखून गाडी दरीत कोसळायच्या आधी ती गाडीतून बाहेर उडी मारते. अपघाताची चौकशी करायला आलेल्या पोलिसांना पाहूनही तिला खरं सांगायचं धैर्य होत नाही कारण तिच्याकडे पुरावा नसतो. तो आणायला तिला मुंबईला मोनिकाकडे जावं लागणार असतं.

इथेतिथे भटकत असताना तिला कोणीतरी वाळत घातलेले गावातल्या बाईचे कपडे मिळतात. ते तिला फिट्ट बसतात बरं का! इथे आम्ही दुकानात घालून पाहिलेले कपडे घरी आले की तंग. असो. मग तिला एक गाडी-कम-व्हॅन-कम-मिनीबस दिसते. त्या गाडीचा ड्रायव्हर मोहन आणि त्याचा मित्र दोघांना एका बंजार्‍यांच्या कबिल्याच्या मालकाने त्यांचं सामान एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायच्या कामावर ठेवलेलं असतं. सुनीता आपली सोनी अशी ओळख सांगून लोणकढी ठोकून देते की तिचे काका तिचं एका म्हातार्याशी लग्न लावून देताहेत म्हणून ती पळून चाललेय आणि तिला मुंबईला एका नातेवाईकाकडे जायचंय. मोहन तिला मुंबईला पोचवतो पण मोनिकाकडे पोचल्यावर सुनीताच्या लक्षात येतं की खंडाळ्याच्या हॉटेलमध्ये जे घडलं ती मोनिका आणि राजनची मिलीभगत होती आणि ती हयात नाही हे सिद्ध झालं की दोघं लग्न करणार आहेत. ती तिथून पळून जाण्यात यशस्वी होते खरी पण राजन तिला बघतोच.

राजन आणि त्याचे चमचे तिच्या मागे लागतात तेव्हा तिला (अर्थातच!) मोहनची गाडी दिसते. ती पुन्हा गाडीत जाऊन लपते. ह्या वेळी मोहनचा भाऊ मोंटूही त्याच्या सोबत असतो. तिला हे माहित असतं की करमचंद बेन्गलोरमध्ये आहे आणि युरोपमधून २ महिन्यांनी परत येणार आहे. मोहनला ती आपल्या गाडीत आहे हे कळतं तेव्हा ती त्याला बन्गलोरला सोडायची विनंती करते. नाहीतरी बंजार्यांचा तो तांडा तिथेच तर निघालेला असतो की. सुनिता करमचंदला भेटू शकते? का राजन आणि कंपनी त्याआधीच तिचा काटा काढते? काय होतं कारवाच्या ह्या प्रवासात?

तसं बघायला गेलं तर स्टोरीत फारसे धक्के नाहीत. राजन वाईट माणूस आहे, त्याने सुनीताच्या वडिलांचा खून केलाय, मोनिका त्याला सामिल आहे हे सगळं आपल्याला आधीच माहित असतं. थोडेफार हिंदी चित्रपट पाहिलेला कोणीही माणूस पुढची स्टोरी आणि शेवटच नाही तर मोहनवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या बंजारी तरुणीचं, निशाचं, काय होणार हेही सांगू शकेल.

मग असला प्रेडीक्टेबल चित्रपट कशासाठी बघायचा बुवा? जाईनात का बापडे बंजारे मुंबई ते बंगलोर. आपुनको क्या? तर मी असं म्हणेन की चित्रपट पाहायचा तो त्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांसाठी . मग तो स्वयंपाक न येणाऱ्या सोनीला मदत करायला गेलेला मोहनचा मित्र दारूच्या नशेत सगळं जेवण करपवून ठेवतो तेव्हा मोंटू ते जेवण आणि कबिल्याच्या मालकाच्या बायकोने बनवलेलं जेवण ह्यांची अदलाबदल करतो तो प्रसंग असो किंवा निशा नाचायला नकार देते म्हणून मोहन आणि सोनी दोघांना तिच्याऐवजी ऐनवेळी स्टेजवर नाचगाणं सादर करावं लागतं तो प्रसंग असो किंवा सोनी मोहनवरच्या प्रेमाची खात्री पटवून द्यायला दारू पिते तो प्रसंग असो. ‘कैच्या कै दाखवताहेत' असं म्हणत म्हणत आपण बघतोच. असे 'कैच्या कै' प्रसंग आजकालच्या भलत्याच वास्तव झालेल्या चित्रपटात असतात का मला माहित नाही. पण पुढे काय होणार ह्याचे अंदाज मोठमोठ्याने वर्तवत हा पिक्चर बघायला मला तरी जाम मजा आली.

आणि हा चित्रपट बघावा त्यातल्या गाण्यांसाठी - मग ती lusty म्हणता येतील अशी 'अब जो मिले है तो', ‘चढती जवानी' आणि 'पिया तू अब तो आ जा' (त्यातला तो पुरुष नर्तक तेव्हढा अगदीच असह्य आहे!) असोत, cheery म्हणता येतील अशी 'दिलबर दिलसे प्यारे', ‘कितना प्यारा वादा है' आणि 'गोरिया कहां तेरा देस रे' असोत किंवा विनोदी 'दैय्या रे मै ये कहां आ फसी' असो.

आशा पारेखने शहरी सुनिता आणि ग्रामीण सोनी दोन्ही भूमिका छान वठवल्या आहेत. ‘दैय्या रे मै ये कहां आ फसी' मध्ये तर ती अशी नाचली आहे की यंव रे यंव! बिचारा Dancing Jack सुध्दा तिच्यापुढे फिका पडलाय. जितेंद्र वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे शिक्षण अर्धवट सोडून ड्रायव्हरची नोकरी पत्करावी लागणाऱ्या सद्गुणी मोहनच्या भूमिकेत फिट्ट बसलाय. ज्युनियर महमूद निरागस मोंटूच्या भूमिकेत शोभलाय. फटाकडी निशा अरुणा इराणीशिवाय कोण साकारू शकणार? हेलनने dancing vamp ची भूमिका नेहमीच्याच झोकात केली आहे. मदन पुरीनेसुध्दा कबिल्याच्या सरदाराची भूमिका मस्त केली आहे. फक्त तो राजन तेव्हढा झेपला नाही आपल्याला.

अर्थात मेंदू बाजूला काढून ठेवूनही काही गोष्टी पटत नाहीत. निशाचे वडील मोहनदास ह्यांच्या टेबलावर त्या जनरल मॅनेजर करमचंदचा फोटो का असतो हे गूढ मला काही केल्या उकलत नाहीये. फक्त मित्राचा एक फोटो, तेही तो हयात असताना, आपल्या टेबलावर ठेवणारे किती लोक तुम्हाला माहित आहेत? माझ्या माहितीत एकही नाही. असंच वर्षानुवर्ष न उकललेलं आणखी एक गूढ म्हणजे गाडीचे ब्रेक्स फेल झालेत हे कळल्यावर लोक स्टिअरिंग व्हील गरागरा का फिरवतात? सुनीताची गाडी ब्रेक्स फेल झालेत म्हणून नाही तर स्टिअरिंग व्हील तिच्या हातात तुटून आल्यामुळे दरीत पडणार असंच मला वाटत होतं. बाकी मोहनदास आणि करमचंद ही नावं ऐकून आता नक्की गांधी नावाचा कोणीतरी माणूस येणार अशी खात्री पटली होती. शिकली-सवरलेली सुनिता आपली तमाम जायदाद राजनच्या नावे करायचा मूर्खपणा कशी करू शकते? अगदी गळ्याशी येईतो ती मोहनला सगळं का सांगत नाही? आणि शेवटी जी जागा अगदी एकाकी आहे असं राजन मोठ्या तोर्यात सांगतो तिथे पोलीस नेमके कसे येऊन पोचतात? हे प्रश्न हिंदी चित्रपटांच्या बाबतीत सनातन आहेत हेच खरं. नदीचं मूळ, ऋषीचं कूळ आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधू नयेत Happy

२०१७ संपताना मला तरी ह्या बंजार्यांच्या कबिल्यासोबत प्रवास करायला खूप मजा आली. तुम्ही कधी निघताय?
----

वि.सू. ह्या लेखात २ क्रमांक टाकला आहे कारण 'नीलकमल' वर आधी लिहिलंय. त्याचं टायटल आता बदलता येत नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.. चित्रपट पाहिलेला नाहिये पण यातील गाणी आवडतात.. 'दिलबर दिलसे प्यारे', ‘कितना प्यारा वादा है' हि गाणी तर आवडत्या गाण्यांपैकी आहेत..

भारीच Lol

अजून पाहिलेला नाही पण नक्कीच पहायला हवा आता Happy

स्वप्ना, पहिल्यांदाच असं झालं की मला तुझं लेखन तितकंसं आवडलं नाही. {"पण पुढे काय होणार ह्याचे अंदाज मोठमोठ्याने वर्तवत हा पिक्चर बघायला मला तरी जाम मजा आली.} वाचताबा ती मजा आली नाही. याचं कारण मला कारवाँ खूप आवडतो हे असेल. धमाल चित्रपट आहे. घाटातल्या अ‍ॅक्सिडंटच्या नंतरचा फ्लॅशबॅक खूप पसरट लिहिलाय. प्रत्यक्षात तो खूप वेगवान आहे. सगळाच चित्रपट. जरा जास्तच गंभीरपणे लिहिलंय का? असो.

आता चित्रपटाबद्दल : संगीत हा या चित्रपटाचा जणू प्राण. पिया तू बद्दल नेहमीच बोललं जातं, पण अब जो मिले हैं तो हे मला जरा जास्त आवडतं. दैया गाण्याबद्दल आशा (भोसले) ने सांगितल्यापासून ते गाणं अधिक लक्षपूर्वक ऐकलं जातं आणि प्रत्येक ऐकण्यात आणखी आवडतं.
मोहनचं मोडकंतोडकं इंग्लिश, सुनीताने बसच्या खाली लपून त्यांचं खाणं चोरणं , शेवटी सुनीता शिकलेली आहे हे कळल्यावरची त्याची रिअ‍ॅक्शन लक्षात आहेत. जेवणावरून मनोरमाची नाहक फजिती झाल्याबद्दल मला तिच्याबद्दल जरा वाईटच वाटलेलं.
हा चित्रपट पुन्हा पाहायची आठवण करून दिल्याबद्द्ल धन्यवाद.

छान लिहिलेय.
---
आशा पारेखच्या गाडीला अपघात खंडाळा घाटात होतो.
पंचनामा करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला राजन विचारतो की 'गाडी निचे गिरने से पहले, वो गाडीसे कुद गई होगी, अभी तक लाश भी नही मिली'
त्यावर तो पोलीस अधिकारी राजनला म्हणतो 'आप समजने की कोशीश क्यू नही करते, गाडी हजार फुट निचे 'दरिया' मे गिरी है, लाश बहके भी जा सकती है या किसी पथ्थर के निचे भी दब सकती है'.

----

आता प्रश्न असा पडतो की खंडाळा घाटात 'दरिया' कुठून आला ? त्याला बहुतेक अपघात झालेली गाडी खाली उल्हास नदीत पडलीय असे म्हणायचे असावे बहुतेक.

Lol स्वप्ना, मस्त लिहीलस. मी कारवां पाहीलेला नाही, पण गाणी अर्थात पाहीली होती. पण कुठल्या नटाने राजनचे काम केलयं?

छान लिहिलंय पण बऱ्यापैकी पसरट . आटोपशीर नाही झालं. पूर्वीच्या सिनेमातली गाणी कायमच एकापेक्षा एक असायची . स्टोरी काही खूप बरी नसेल पण गाणी मात्र अगदी ए वन असायची Happy

अनिरुध्द...हो पिक्चर बघताना मलाही हा प्रश्न पडला होता.
भरत, सुजा....तुमचा फीडबॅक लक्षात ठेवेन पुढल्या वेळी.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचे आभार Happy

स्वप्ना.. हा चित्रपट बघणं होईल असं काही वाटत नाही. त्यामुळे ते बंगलोरला निघाल्यावर पुढे काय होते याची स्टोरी लिहून टाक ना. १९७१ च्या चित्रपटाला आता कुठे स्पॉयलर?

>>स्वप्ना.. हा चित्रपट बघणं होईल असं काही वाटत नाही. त्यामुळे ते बंगलोरला निघाल्यावर पुढे काय होते याची स्टोरी लिहून टाक ना. १९७१ च्या चित्रपटाला आता कुठे स्पॉयलर

पियू, थोडक्यात सांगायचं तर जितेन्द्रसाठी मारलेली गोळी खाऊन अरुणा ईराणी मरते. राजनला पोलिस गोळी घालतात. आणि शेवटी आशा पारेख पुन्हा बंजार्‍यांच्या टोळीसोबत निघते. तिच्या वडिलांच्या मिलचं आणि त्यातल्या कामगारांचं काय होतं देवाला ठाऊक!

आबासाहेब, rmd धन्यवाद!

इथे वाचल्यानंतर मी पण यु ट्यूब वर बघितला . सगळ्यात शेवटी तिच्या वडिलांची मिल आणि एवढ्या सगळ्या कामगारांना वाऱ्यावर सोडून ती त्या बंजाऱ्यांबरोबर जाऊच कशी शकते ?. काहीही दाखवतात. तसच पूर्वी नायक-नायिकांमध्ये तिसरा किव्वा तिसरी असली कि तो /ती हमखास मरणार गोळी बिळी लागून हा पण प्रसंग असायचाच Happy

खूपच भारी
मला त्या काळातले(हा काळ म्हणजे माझ्या डोक्यात ३०-४० वर्षाचा बँड आहे) कत्ल, एक पहेली, बुढ्ढा मिल गया हे पिक्चर पहायला खूप आवडतात
केबल टिव्ही नवा नवा आलेला असताना आणि शाळा सुटल्यावर घरी ४ तास एकटी असताना यातले बरेच पिक्चर खूप चवीने पाहिलेत.

नासिर हुसेनला संगीताचे उत्तम ज्ञान होते. त्याच्या तुमसा नही देखा पासून सगळ्या सिनेमातली गाणी तुफान हिट होती. कारवाही त्याच मालिकेतला. त्याचे समाधान होईपर्यंत तो संगीत दिग्दर्शकाकडून गाणी मागत रहायचा. तो नवागत असताना एस डी बर्मनसारख्या प्रस्थापित, यशस्वी दिग्दर्शकाची गाणी नाकारण्याचे धाडस त्याने केले होते असे म्हणतात. असेही म्हणतात की त्याने नाकारलेली गाणी अन्य निर्माते
संगीत दिग्दर्शकाकडून आपणहून मागायचे कारण नासिर हुसेनला दाखवण्याइतकी चांगली गाणी ही बर्‍यापैकी चांगली असणारच हा विश्वास.

ह्या सिनेमातले भोला नामक पात्र मेहमूदच्या भावाने रंगवले आहे. त्याला बघून मेहमूद आठवत रहातो.

ह्यातले किशोर कुमारचे एक गाणे अगदी सपक आहे. पण लता मंगेशकर आणि आशा भोसले ह्यांची एकाहून एक गाणी आहेत. कुणाचे गाणे
जास्त चांगले हे ठरवणे कठिण (मला तरी). महंमद रफी आणि लताबाईंची युगुलगीतेही जबरदस्त आहेत.

नासिर हुसेन असे म्हणाला होता की सिनेमाची स्टोरी ही त्याच्या दृष्टीने गौण आहे. तिचे सादरीकरण आणि संगीत हे जास्त महत्त्वाचे घटक आहेत. (कदचित म्हणूनच त्याने एकच स्टोरी अनेक सिनेमात वापरली आहे. फिर वही दिल लाया हूं ह्यावर फिर वही कहानी लाया हू असले विनोद केले गेले आहेत!)

नासिर हुसेनच्या सिनेमातील एक आवश्यक घटक म्हणजे सुबोध मुखर्जी नावाचे एक पात्र! ते कारवामधेही आहेच. अत्यंत आचरट पात्र हे नाव घेऊन वावरते. तो काही कारणाने एक टेनिसची रॅकेट घेऊन वावरतो. इथे राजेंद्रनाथ नामक आचरटोत्तम शोभला असता! (नासिर हुसेन आणि सुबोध मुखर्जी हे पूर्वी सहकारी होते त्याची आठवण म्हणून ना हु असे करायचा म्हणे)

छान लिहीले आहे.

सुनीताची गाडी ब्रेक्स फेल झालेत म्हणून नाही तर स्टिअरिंग व्हील तिच्या हातात तुटून आल्यामुळे दरीत पडणार असंच मला वाटत होतं. >>>:हाहा:

फार पूर्वी हा पिक्चर पाहिला होता आणि तेव्हा खूप आवडला होता. एकतर सगळीच गाणी मस्त आहेत आणि पिक्चरही वेगवान होता असे लक्षात आहे. माझी सर्वात फेवरिट म्हणजे 'चढती जवानी मेरी..." आणि "गोरिया कहाँ तेरा देस रे...". त्यातही गोरिया मधे आशाने केलेल्या करामती जबरी ("घूम घूम के गली गली जाना पिया के द्वार" मधे "जाना" जे म्हणते ते, वगैरे)

बाय द वे, चढती जवानी गाण्यात जीतू ला मधे मिशा कोठून आल्या? की तो त्या एकूण वेषाचा भाग आहे? लक्षात नाही. हिंदी पिक्चर मधे असे रॅण्डमली मिशा असणे व नंतर नसणे अलाउड नसते. डबल रोल असेल तर किंवा लोकांना ओळखू येउ द्यायचे नसेल तरच करता येते.

हिंदी पिक्चर मधे असे रॅण्डमली मिशा असणे व नंतर नसणे अलाउड नसते. डबल रोल असेल तर किंवा लोकांना ओळखू येउ द्यायचे नसेल तरच करता येते.>> फारएण्ड.. Biggrin

स्वप्ना एकदम मस्त लिहिलंस, मजा आ गया।।।

मी हा चित्रपट पुरातनकाळी दुदवर पाहिला होता. हिरविण कुणापासून लपून असते हे तेव्हा डोक्यावरून गेले होते. लक्षात राहिली गाणी, अरुणा इराणी व गर्रर्रम मस्ससाला.... साला गर्रर्रम मस्ससाला हे विशेषण मी खूप वेळा वापरलेय Happy Happy अरुणा इराणीला इतके फुटेज व गाणी आहेत की मला तीच मेन हिरोईन व आशा पारेख साईड हिरोईन वाटलेली.

तुझे परीक्षण वाचून गेल्या आठवड्यात यु ट्यूबवरून डालो केला व गावी जाताना ट्रेन प्रवासात पाहिला. पहिल्याच दृश्यात टेबलावर नेमप्लेट असावी तसा मॅनेजरचा फोटो दिसल्यावर सुरवात मस्त झाली म्हणत पूर्ण चित्रपट एन्जॉय केला.

जुन्या चित्रपटातील गमती जमती तेव्हा लक्षात येत नसत, आता त्या खटकतात.

लग्न झाल्याच्या दिवशी आशा पारेख बाबाच्या फोटोसमोर डोळे गाळत म्हणते की मला राजनमध्ये किंवा लग्नात अजिबात इंटरेस्ट नाही पण तुमची इच्छा म्हणून लग्न केले. इच्छा ठार मेलेली असतानाही लग्न लागताना तिने लाल वधुवेश ल्यायलाय; फोटोसमोर अश्रूपात करताना वधुवेश त्यागून अबोली रंगाची साडी व तिला मॅचिंग अबोली रंगाचे 2 जाडजूड वळेसार केसांच्या टोपलीवर माळलेत. एवढे मॅचिंग करून, फुल मेकअप करून ही उभी, तर तिचा नवरा तिला बघून 'आपल्याला खंडाळ्याला जायचेय, चल तयार हो चटकन' म्हणतो. दुसरी एखादी बायको असती तर तिथेच असल्या डोळे फुटक्या नवऱ्याचे डोके फोडले असते. पण ही निमूट आत जाऊन अबोली साडीच्या जागी अबोली ड्रेस व डोक्यावरच्या केसांच्या टोपल्यावर कुठेतरी एक रिबीनसदृश्य पांढरे काहीतरी टांगून येते. तो चांगला हातभर लांबरुंद रुमाल असतो हे आपल्याला नंतर त्याचा योग्य तो वापर झाल्यावर कळतो.

हिला फक्त हिंदी चित्रपटातील भारतात राहणाऱ्या बायका घालतात तो जगप्रसिद्ध ड्रेस सापडल्यावर बरेच दिवस ती तो उतरवत नाही. जितेंद्रचेही तेच. अर्धा चित्रपट तो खाकी शर्टपॅन्टवर. कपड्यांवर खूप पैसे वाचलेत असा विचार डोक्यात येत होता तेवढ्यात त्याने कपडे बदलले पण बिचारी आशा पारेख मात्र त्याच कपड्यात.... कपड्यांचे बजेट खरोखरच कमी होते. एक अरुणा इराणी सोडली तर बाकीच्या बंजारणींनी व त्यांच्या मुखींयाने कपडे शेवटपर्यंत अज्जबत बदलले नाहीत. फक्त मनोरमाने एकदा बदललेत. आशाचे 2 च ड्रेस आहेत.

ज्यांनी कपडे बदलले तेही कपडे दिव्य आहेत. शेवटच्या हाणामारीत राजन गुलाबी शर्ट व डार्क गुलाबी पॅन्ट, तर जितेंद्र निळा शर्ट व जांभळी पॅन्ट. राजन खड्डा खणत होता तेव्हाच हा याच्यासाठीच वापरला जाणार हे कळले होते, दिग्दर्शकाने अजिबात निराश केले नाही. पण अरुणा इराणी भोलाला स्वीकारते असे काहीतरी जुने डोक्यात फिट झालेले. शेवटी राजनच्या हातात पिस्तुल बघितल्यावर अरुणाला मरावे लागणार हे कळले. डोक्यात उगीच चुकीचे फिट झाले बहुतेक.

भोला मेहमूद आहे असे सतत वाटत होते, पण अजिबातच फुटेज नाही हे कसे हा प्रश्न पडलेला. वरचे वाचून उलगडा झाला.

तो लाल केसवाला माणूस जरी सभ्य दिसला नाही तरी सुरवातीला सभ्य वाटलेला. एकूण जनमत कुठल्या दिशेने जातेय याचा आम्हा पामरांना अंदाज येण्यासाठी त्याची योजना झालीय असे वाटले होते. म्हणजे तो शेजाऱ्याकडे झुकून 'बेचारी पागल हो गयी' म्हणाला की आपण समजायचे तिचे काय झाले ते. पण नंतर तो विलनचा हस्तक निघाला. म्हणजे त्याची योजना आपल्याला जनमत कळावे यासाठी नव्हती तर तो स्वतःच जनमत तयार करत होता.

चित्रपटात सगळ्यात वाईट दिसलीय स्वतः हिरोईन आशा पारेख. ती क्वचित अधून मधून बरी दिसलीय, बाकी खप्पड चेहऱ्यावर पांढरा चुना फासल्यासारखी दिसलीय. आणि तिचे केस.... अरारा... चांगले विग इतके दुर्मिळ होते का तेव्हा? ते टोपले बघवत नाही. सुरवातीला तर अगदीच फालतू विग वापरलाय. कितना प्यारा वादा मध्ये एकदम चांगले केस चिकटवले आणि त्यानंतर परत तेच टोपले, फक्त थोडी सुधारित आवृत्ती. अरुणा इराणीचा मेकअप डोळ्यांना बोचत राहतो. त्यामानाने हल्ली मेकअप खूप म्हणजे खूप सुधारलाय.

ते मिशिवाले गाणे, मुखीया जितेंद्रला विनंती करतो की आज तुडुंब गर्दी झालीय तमाशाला, तर तुही थोडा नाच कर, बिचाऱ्या अरुणा इराणी एकटीवर सगळा भार नको. तेव्हा गेटअपचा भाग म्हणून ती मिशी.

सगळीच गाणी मस्त आणि जितेंद्रला नाचताना बघणे त्याहूनही मस्त. त्याची एक झकास स्टाईल होती नाचायची. तेव्हा प्रत्येकाची व प्रत्येकीची स्वतःची स्टाईल असायची नाचायची. प्रत्येकजण वेगळ्या प्रकारे नाचायचा. आता प्रत्येकजण सारख्याच कवायती करतो. कंटाळा येतो बघायला. कुणाचीही काहीही सिग्नेचर स्टेप नाहीय....

सगळ्यांचे मनापासून आभार........shendenaxatra माहिती मस्त, साधना Happy एका गाण्ञात जितेन्द्रचे sweaty underarms पाहून आशा पारेखच्या नाकाची कीव येते Happy

खरय या चित्रपटात अरूणा ईराणीला जरा जास्तच फुटेज आहे. त्यावरून हा किस्सा आठवला.
Showtime or Star & Style मध्ये खुप वर्षांपुर्वी वाचलेला .
कारवांच्या वेळेस अरुणा ईराणी आणि सहाय्यक दिग्दर्शकाचे मधुर संबध होते.
नृत्यदिग्दर्शकाने त्याला सांगितलं, तिला सांग ना घागरा थोडा वर करायला. त्याने सांगितलं तिने ऐकलं.
एक टेक आणि अरे अजून थोडा
मग हे अरे अजून थोडा,
अरे अजून थोडा
सुरू झालं .
अरुणा ईराणी वैतागली.
तिने सगळा घागरा वर घेतला " आता किती खाली घेऊ ते सांग"

दिलबर किंवा गोरीया गाण्यात बघा हे exploitation लक्षात येईल .

"एका गाण्ञात जितेन्द्रचे sweaty underarms...."
फर्ज मधल्या मस्त बहारों का मै आशिक मध्ये त्याची फाटलेली पँट दिसत होती. नंतर तो सिन एडीट केला.

दिलबर किंवा गोरीया गाण्यात बघा हे exploitation लक्षात येईल .>>>>>>

त्या काळच्या जवळ जवळ सर्व चित्रपटात ह्या प्रकारचे एक्सप्लोईटेंशन झालेले लक्षात येते. नीट लक्ष देऊन बघितले तर हिरॉइन्सना मुद्दाम दिलेल्या ओकवर्ड पोझेस व त्यांनी त्यातही अंगप्रदर्शन टाळण्याची केलेली धडपड लक्षात येते. वरवर पाहता सामान्य दिसणाऱ्या प्रसंगाच्या मागे काय लपले असावे हे लक्षात आले की अस्वस्थ वाटायला लागते. आजही हे होत असेल पण अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणे, वागण्यात मोकळाढाकळापणा असणे हे आता नित्याचे बनले असल्याने लक्षात येत नाही.

हल्लीच या विषयावर एक बातमी सुद्धा वाचलेली.

https://www.thebetterindia.com/126724/times-up-hollywood-campaign-agains...

https://www.theguardian.com/film/2017/dec/13/bollywood-sexual-harassment...

Pages