वारी - भाग ९

Submitted by टवणे सर on 5 January, 2018 - 18:26

भाग ८ https://www.maayboli.com/node/53193

आम्ही उप्पीट खाऊन बाहेर पडलो तोवर सव्वानऊ झाले. धनंजयच तसे म्हणाला. आम्ही बाहेर पडेस्तोवर ताडपत्री भरुन गेली होती. बापू, त्यांची बायको, शिल्पा, आरती आम्ही निघालो तेव्हा आत आले. काल सकाळी दिसलेले अनेक वारकरी आता इथे जमलेले दिसत होते. ज्ञानू शिम्प्याचा मुलगा आणि नातवंडं एकदमच आले. रम्या मला 'काय बेडूक' म्हणत आत गेला. त्याला मी एकदा शाळेत घेणारच होतो. पण तो माझ्यापेक्षा आकारानं मोठा होता आणि क तुकडीतले सगळे त्याच्या गँगमध्ये होते. ते सगळेच दणदणीत होते. तरी मी काहितरी करणारच होतो. आम्ही रस्त्याला लागलो तेव्हा बायकांचा मोठा घोळका आत शिरला. पानसे डॉक्टरांची बायको त्या घोळक्याच्या मध्यभागी होती. बाकी सगळ्या बायकांपेक्षा त्या बर्‍याच श्रीमंत होत्या त्यामुळेच बहुतेक सगळ्या बायका त्यांच्या आजुबाजुला करत होत्या.

काका पुन्हा पुढे गेले. आता धनंजय पण जरा हळू झाला होता. मी काका आणि धनंजयच्यामध्ये होतो. निघताना मी काकांच्याकडून पिशवीतून माझा बॉल काढून घेतला होता. आता मी पुन्हा क्रिकेट मॅच खेळायला लागलो होतो. तसं मला एकट्यालाच खेळायला आवडायचं. म्हणजे तसे मला मित्र होते. पण तरी मला एकट्यानेच खेळायला जास्त आवडायचं. पाचवीत मला कावीळ झाली. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही विजापूर बघायला गेलो होतो. गोल घुम्मट, उपडी बावडी, मुलुख मैदान तोफ असं सगळं बघितलं. पण बहुतेक मी तिथे कुठेतरी पाणी प्यायलो. शाळा सुरू होणार त्याच्या एक-दोन दिवस आधी नखं-डोळे पिवळे झाले. आम्ही डॉक्टरांकडे गेलो त्यांनी सांगितले कावीळ. आता शाळेला जाऊ नको बरा होइपर्यंत. मला खूप आनंद झाला. मी गावात आजी-भाऊंबरोबर राहायचो पण कावीळ झाली म्हणुन गावाबाहेरच्या आमच्या बंगल्यावर आई-बाबांबरोबर राहायला आलो. तेव्हा आमच्या बंगल्याच्या आजूबाजूला दुसरे कुठले घर नव्हतेच. त्यामुळे खेळायला मुले पण नव्हती. मला पुण्याच्या मामाने स्केट्स दिलेल होते. मिरजेत बहुतेक स्केट्स फक्त माझ्याकडेच होते. मी एकदा पंढरपूर रोडवर स्केट घालून गेलो भाऊंबरोबर सकाळी फिरायला जाताना तर सगळे लोक माझ्याकडे कौतुकाने बघत होते. मी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता पुढे बघत स्केटिंग केले. कावीळ झाल्यामुळे मी घरातच स्केटिंग करायचो. माझ्याकडे एक हॉकीची स्टिक होती. स्केटिंग करत मी रबरी बॉलने हॉकी खेळायचो. ओट्याखालचे भांडी ठेवायचे कप्पे एक गोल होता आणि बागेत जायला केलेले मोठे दार दुसरा गोल. मी एकटाच बॉल हॉकी स्टिकने खेळवत इकडून तिकडे तिकडून इकडे स्केटिंग करत फिरवायचो आणि बरोबर कॉमेन्ट्री पण करायचो. पण मला हॉकीचे खेळाडूच माहिती नव्हते. फक्त परगतसिंग आणि धनराज पिल्ले. मग मी क्रिकेटच्या खेळाडूंना हॉकीत घालायचो.
आणि परगतसिंगने बॉल अझरुद्दीनला दिला. अझरुद्दीन बॉल खेळवत खेळवत रवि शास्त्रीला चुकवून पुढे. पण धनराज पिल्लेने बॉल काढून घेतला आणि सचिनला दिला. बॉल सचिनकडून कपिलकडे आणि कपिल बॉल घेऊन जोरात पुढे जातो आहे. गोलकीपर किरण मोरे बॉल आडवायला सज्ज. किरण मोरे इकडे तिकडे बघतोय. पण कपिल बॉल घेऊन जोरात पुढे जात आहे. कपिलने बॉल जोरात मारला आणि हा गोल!
माझ्या मनात आले तर मी गोल करायचो. कारण तसे आडवायला कोणी नव्हतेच. पण मी फार गोल नाही मारायचो. कधी कधी स्वतःच आडवायचो पण. एकूणात मी सामने २-२, ३-३ असे बरोबरीतच सोडवायचो.
मग आई संध्याकाळी येताना उसाचा रस आणायची. मी पपईच्या पानांच्या देठाचा स्ट्रॉ करून रस प्यायचो. खायला पण मला फक्त भाकरी आणि दही खायची परवानगी होती. पण तसेही मला अमूकतमूकच खायला असं काही आवडायचं नाही. शाळा नाही, खेळायला मी एकटा, भरपूर उसाचा रस आणि खायला फक्त दही-भाकरी! त्यामुळे मी एकदम खुशीत होतो.
पण मग दोन महिन्यात माझी कावीळ बरी झाली. आणि मला शाळेत परत जायला लागले. तसा माझा फारसा अभ्यास बुडला नाही. पण दुसर्‍या चाचणी परिक्षेत मला उणे अंकाची बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार आले नाहीत. आणि इंग्रजीत गिव्ह नाउन्स ऑफ दीज वर्ड हा प्रश्नच कळला नाही. मी पाचवीत आल्यापासून वर्गात पहिला वगैरे येत नव्हतो. पण या चाचणीत गणितातच नेमके कमी मार्क आले. आणि आमच्या वर्गात नवीनच आलेला महाबळेश्वरकर सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवून पहिला आला. तो मिरजेचा नव्हता, त्याच्या वडिलांची मिरजेला बदली झाली म्हणुन तो पुण्याहून आला होता. तो हुशार आहे हे आम्हाला माहितीच नव्हते. तो एकदम पहिल्या चाचणीत पहिलाच आला. तो क्रिकेटमध्ये पण भारी होता. तो भारीच होता एकूण. त्यामुळे मला तो आवडायचा नाही.

आज हॉकी स्टिक नसल्याने मी क्रिकेट खेळत पुढे निघालो.
कपिल देव वानखेडे स्टेडियम गावस्कर एन्डकडून येतोय. अ‍ॅलन बोर्डर कपिलला सामोरा जातोय. कपिलने उडी मारून बॉल टाकला. बॉर्डरने बॉल तटवायचा प्रयत्न केला पण त्याच्या बॅटला चकवून बॉल मागे किरण मोरेच्या हातात. बॉल परत कपिलकडे. आणि हे सगळे म्हणताना मी कपिलसारखा बॉल टाकला पण जोरात नाही. थोडाच पुढे. मग बॉर्डरसारखे प्लेड करायची नक्कल केली. आणि दोन पावले पुढे पळत जाऊन, उलटा होऊन किरण मोरेसारखा बॉल पकडला.

असं करत करत मी बराच पुढेपर्यंत चालत गेलो. नाष्टा करून निघाल्यावर सुधीर धनंजय आणि माझ्याबरोबर चालू लागला. पण तो फक्त धनंजयबरोबर बोलत असल्याने मी त्यांना मागे टाकून पुढे वेगात निघालो होतो. क्रिकेट खेळत चालता चालता वेळ कसा गेला मलाच कळले नाही. माझ्या कपाळावरून चांगल्यापैकी घाम वाहत होता. मी टोपी घातलेली तिची डोळ्यावर येणारी आडवी पट्टी घामाने भिजली होती. आणि त्यावर पांढरट क्षार जमा झाला होता. मी बॉलिंग करत जाणार इतक्यात मला काकांची हाक ऐकू आली. काका रस्त्या कडेला झाडाच्या सावलीत एका सिमेंटच्या कट्ट्यावर बसले होते.
'काय हो?'
'चल आंघोळ करून घेउया.'
'कुठे?'
'हे काय मागं शेतात.'
काका बसलेले तिथे मागे एका शेतात विहिरीवर पंप चालू होता आणि पाणी पाटात सोडलेलं. आम्ही त्या बांधावरून सावकाश पिकावर पाय न पडेल असं विहिरीकडे चालत गेलो. काकांनी पिशवीतून टॉवेल काढले. माझ्या चौकडी चौकडीचा टॉवेलमध्ये काकांनी नीट माझी चड्डी/बनियन गुंडाळुन सकाळी घेतले होते ते त्यांनी माझ्या हातात दिले. ते स्वतः पंपाच्या जरा आडोशाला जावून कपडे उतरवून पटकन आंघोळीला लागले. थोड्या अंतरावर विहिरीच्या दुसर्‍या बाजुला सकाळी लवकर निघालेल्या बायकांच्या एका घोळक्याने शेवरीच्या झाडांना पडद्यासारख्या साड्या बांधून आडोसा तयार केला होता. मी पुढे होवून विहिरीत डोकावून बघितले. विहिरीचे पाणी थंडगार हिरवे होते. पंपाचा हिरवा कॉरुगेटेड पाइप एका बाजूने वर आला होता आणि त्यावर पाण्याजवळ शेवाळे चढले होते. आत उतरायला पक्क्या पायर्‍या नसल्या तरी नीट सलग मातीचा उतार होता. विहिरीच्या कडेने शेवरीची उंच झाडे असल्याने सुर्यप्रकाश आत गाळून पडत होता. एक कासव पाण्यावर आले होते.

मला वरूनच धप्पदिशी विहिरीत गट्ट्या मारायची जाम इच्छा झाली. आजकाल मला जिथे पाणी दिसेल तिथे पोहायची प्रचंड उर्मी येत असे. त्यावरून माझे आणि आईचे मागल्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात गेलो होतो तेव्हा खूप भांडण झाले होते. आम्ही हॉटेलात पोचल्यावर मला लगेच समुद्रात पोहायला जायचे होते. मी कपडे काढून चड्डीवर पोहायला निघालो पण होतो. पण मग आईने सांगितले की वरच्या टेकडीवरच्या आंजर्ल्याच्या गणपतीच्या देवळात आधी जावून येऊ. समुद्रात उद्या सकाळी जा पोहायला. पण मला लगेचच जायचे होते. मी धुसफुसत पुन्हा कपडे घातले. पण मला देवळात अजिबात जायचे नव्हते. मी गाडीत मागे बसून कटकट सुरू केली. बाबा शांतच होते. आई आजकाल बरेचदा चिडचिडी असे तशी थोडी चिडू लागली. गाडी पायथ्याशी लावून आम्ही पायर्‍या चढायला सुरुवात केली. तिथे एक घाणेरडे लूत भरलेले कुत्रे उन्हात हेलपांगडत फिरत होते. पाण्यासारखेच मला कुत्री बघितली की लगेच त्यांना जवळ बोलावून खेळायची हौस यायची. पण हे फारच घाणेरडे होते. तरी मुद्दामून आईला त्रास द्यायला आणि मला पोहू न दिल्याचा बदला घ्यायला मी त्या कुत्र्याला यु यु करून बोलावू लागलो. ते पण लगेच माझ्याकडे यायला लागले. आई दोन-तीनदा नको नको असे काहीतरी मला म्हणत होती. तर मी लक्ष दिले नाही. ते कुत्रे अगदी माझ्या जवळ आले तेव्हा आईने हाड् असे मोठ्याने ओरडून त्याला हाकलले, माझ्याकडे आली आणि मला खाडदिशी थोबाडीत लावली. मी सटपटलोच. गेल्या दोन-तीन वर्षात आईने मला फारसे मारले नव्हते. आणि वर्षभरात तर मुळीचच नाही.
ताई आईला अगं तो मोठा झालाय आता. मारू नकोस. असं म्हणाल्याचं मी डोळ्याच्या कोपर्‍यातून ऐकलं. पण आईने मारल्यामुळे माझा आता मोठाच अपमान झाला होता. मी अजूनच गप्प बसलो.
रात्री जिथे थांबलो होतो त्या हॉटेलाच्या अंगणात जेवायला बसलो होतो तर मी गपागपा जेवून घुम्यासारखा बसून राहिलो. आई हळू हळू हुंदके देत रडत होती.

'काका मी विहिरीत पोहू का?'
'नको. ही काय पोहायची वेळ आहे का.'
काका नाही म्हणाल्यानं माझं पोहायचं काही डेअरिंग झालं नाही. काका चिडले की जमदग्निचा अवतार होत असत. आजी त्यांना जमदग्निच म्हणे. त्यामुळे मी पटकन पाइपच्या पाण्यावरच आंघोळ आटपली. पंच्याने अंग खसाखसा घासून साफ केले, चड्डी-बनियन धुवून टाकले आणि पिळून पंच्यात गुंडाळून पिशवीत भरले.

ऊन हुं म्हणून रणरणत होतं. मी परत खिशातून बॉल काढला अन भारतीय क्रिकेट संघाची नक्क्कल करू लागलो. पण त्यात काय मजा येईना. मी बॉल पुढे फेकायचो अन पळत जाऊन पकडायचो. लेग स्पिन, ऑफ स्पिन सगळे झाले. फास्ट बोलिंग काय केली नाही. कारण मनोज प्रभाकरसारखा बॉल टाकला तर बॉल लांब जायचा. एक दोनदा बॉल रस्त्याखाली गेला. रस्त्याबाजूला सगळी बाभळीची झाडं होती. बॉल काढायचा म्हटलं तरी बाभळीच्या झाडात घुसायला लागत होतं. बाभळीचे काटे जहांबाज. पांढरे साले स्लीपरमधून आत घुसतात. आम्ही क्रिकेट खेळायचो माळावर तर हमखास बॉल बाभळीत जायचा. ज्याने मारला त्याने बॉल आणायचा असा नियम होता. बाभळीच्या झाडातून बॉल काढताना वाट लागायची. कधीकधी धामण नाहीतर साप सळसळत बाहेर निघायचा. धामणी सहसा खणीलगतच्या झाडात असायच्या. कधी कधी अगदी आमच्या घरापर्यंत पण यायच्या. साप मात्र हमखास. इथे पंढरपूर सस्त्यावर मात्र बॉल बाभळीत गेल्यावर मी आधी बिचकलो. त्यानंतर मात्र दोन चार वेळा मी बाभळीत घुसून बॉल काढला. बोंबलायला पाणी नव्हते इथे, खण कुठून असणार अण धामण कुठून असणार. तरी प्रत्येक वेळी बॉल काढताना धडधडायचे.

म्हणून मग मी सरळ बॉल खिशात टाकून झपझप चालायला सुरुवात केली. इकडे तिकडे न बघता मी सरळ पुढे बघून एका पुढे एक पाऊल टाकत निघालो. आजूबाजूला वारीला निघालेले मिरजेतले ओळखीतले लोक अधून मधून दिसत होते. मी मात्र ओळख फारशी न देता मुंडी खाली घालून पुढे रेमटत निघालो. काका घोरपडी वाडीला दुपारच्या जेवणाची वाट बघत असतील एव्हडेच मला दिसत होते. घोरपडी नाला म्हणजे एक ओढा असेल अन मस्त झुळुझु़ळु पाणी वाहत असेल मला वाटत होते. भोश्याच्या ओढ्याला काल पाणी तरी होता. मात्र आता आजूबाजूल बोकडा माळच दिसत होता. रस्त्याकडेला वडाची झाडे होती. मात्र मिरज सोडल्यावर जशी गरगरीत झाडे होती तशी आता दिसत नव्हती. बाबा म्हणायचे तसे मिरजेच्या पुर्वेला माळ अन दुष्काळ होता. मी तसाच रेट पुढे निघालो. दूरवर काळूबाळूची डोंगर रांग दिसत होती. चित्रात काढतात तसे दोन त्रिकोणी डोंगर दिसत होते मात्र सूर्य त्यामध्ये नसून डोक्यावर तळपत होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे
पण आता यात खंड पाडू नकोस
सलग लिहून पूर्ण कर

मी कायी प्रतिक्रिया देणार नाही..
पुढचे भाग अजून अनेक वर्षांनी वाचले की खूप छान, आवडले.. असेच अजून लिहीत रहा.. इथे लिहील्याबद्दल धन्यवाद इ.इ. लिहीन..

मस्त, इतक्या वर्षानी नवा भाग लिहिल्याबद्दल धन्यवाद. मध्ये इतका वेळ जाऊनही शैली बदलली नाहीये त्यामुळे जास्त छान वाटलं Happy

मस्त, इतक्या वर्षानी नवा भाग लिहिल्याबद्दल धन्यवाद. मध्ये इतका वेळ जाऊनही शैली बदलली नाहीये त्यामुळे जास्त छान वाटलं. >>> +१

आता पुर्ण केल्याशिवाय थांबू नका

वाह! एवढी गॅप पडली तरी फटक्यात गुंतुन जायला झालं सुरुवातीपासून.

टण्या, एक पुस्तक व्हायला हवं ह्या मालिकेचं.

आणि परगतसिंगने बॉल अझरुद्दीनला दिला. अझरुद्दीन बॉल खेळवत खेळवत रवि शास्त्रीला चुकवून पुढे.

मुलाचे भावविश्व सुंदर रेखाटलेत .