पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - ३. द ट्रेन (१९७०)

Submitted by स्वप्ना_राज on 8 January, 2018 - 04:32

काही काही चित्रपटांबद्दल आपण आपल्या आई-वडिलांकडून ऐकलेलं असतं. म्हणजे ते शाळा-कॉलेजात असताना कसे तो चित्रपट पाहायला गेले होते (कधीकधी ते त्यांच्या आईवडीलांचा डोळा चुकवून गेलेले असतात - पण ही गोष्ट ते आपण शिक्षण संपवून नोकरीला लागेपर्यंत आपल्याला सांगत नाहीत!), त्याची गाणी कशी हिट होती, त्यांची कशी पारायणं केली जायची वगैरे वगैरे. मग आपल्यालाही तो चित्रपट पहायची उत्सुकता लागते. १९७० सालचा 'द ट्रेन' हा रहस्यपट माझ्यासाठी अश्याच चित्रपटांपैकी एक. जुन्या चित्रपटांतल्या प्लॉटसचा २१वं शतक उजाडेपर्यंत चावून चोथा झालेला आहे हे मान्य असूनही अनेक वर्षं हा चित्रपट माझ्या 'गेले पाहायचे राहुनी' लिस्टमध्ये होता. त्याने अनेक वेळा माझ्याशी कलुषा कब्जीप्रमाणे दगाबाजीही केली. म्हणजे टीव्ही गाईड मध्ये 'द ट्रेन' नाव वाचून चॅनेल लावावं तर त्यात इमरान हाश्मी दिसायचा. असं डझनभर वेळा झाल्यावर माझा उत्साह आटला. पण मागच्या रविवारी संध्याकाळी मात्र चॅनेल सर्फिंग करताना अचानक राजेश खन्ना आणि नंदा बागेत बागडताना दिसले...आनंदाचे डोही आनंद तरंग. पिक्चर लागून अर्धा तास झालेला होता. पण परत बघायला मिळायची शक्यता नगण्य आणि तसंही टीव्ही चॅनेलवर लागलेल्या हिंदी चित्रपटात पहिल्या अर्ध्या तासात काय होतं म्हणा. मी टीव्हीपुढे ठाण मांडलं.

नावात काय आहे असं शेक्सपिअरबाबा म्हणून गेले असले तरी ह्या पिक्चरच्या नावात बरंच काही आहे. ट्रेनमध्ये खून होणार आणि मग अख्खा चित्रपटभर हिरो, इन्स्पेक्टर (इप्तखार किंवा जगदिश राज कोण असेल तो) आणि आपण तो कोणी केला ह्यावर तर्क लढवणार एव्हढं नक्की. बाकीचा प्लॉट म्हणजे तोंडी लावणं काय आहे ते पाहू. तर राजेश खन्ना म्हणजे इन्स्पेक्टर श्याम. पुलंच्या नान सरंजामेला जबरदस्त कॉप्लेक्स देतील अश्या भडक रंगाचे (तेही खाकी सोडून इंद्रधनूतल्या बाकी सर्व रंगांचे!) कपडे घालून फिरत असला आणि पोलीस स्टेशनवर कधीमधीही दिसत नसला तरी. नीता, म्हणजे नंदा, ही त्याची प्रेयसी. नुकतीच कॉलेजमधून शिकून बाहेर पडली आहे असं ते म्हणतात म्हणून आपण विश्वास ठेवायचा. दोघांचं कुठे जमलं असेल हे मला कल्पनाशक्तीला खूप ताण देऊनही समजेना. दोघं बागेतल्या झाडांना धडका देत गात होते त्यावरून भलतेच प्रेमात आहेत आणि अजून लग्न झालेलं नाही हा निष्कर्ष लगेच काढता आला. शाम तिला लग्नाबाबत विचारतो तेव्हा ती आपल्यावर घराच्या जबाबदार्या आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय लग्न करु शकत नाही असं म्हणते. माझ्या डोळ्यांसमोर लगेच 'पामर' ह्या एकाच शब्दाने वर्णन करता येईल अश्या पिताजींच्या फोटोसमोर डोळे गाळत 'अगर आज तुम्हारे पिताजी जिंदा होते तो बडी धूमधामसे तुम्हारी शादी करते' असं म्हणणारी पांढर्या साडीतली आई (चुकून निरूपा रॉय म्हणणार होते पण तेव्हा ती बहुतेक आईपदाला पोचली नसावी), शाळेत जाणारा भाऊ (मास्तर अलंकार, सचिन,ज्युनियर महमूद वगैरे), बुढी दादी वगैरे तमाम जनता तरळून गेली. पण श्याम तिला 'तुझी प्रत्येक जबाबदारी आजपासून माझी' असं म्हणतो (म्हणजे हा स्वयंपाक करणार? मुलं सांभाळणार? स्वत:च्या आईची सेवा करणार? सकाळी लवकर उठून देवाची पूजा करत भजन म्हणणार? करवा चौथला उपास करणार? आणि मग गुन्ह्यांचा तपास कधी बुवा करणार?) तेव्हा ती पडत्या फळाची आज्ञा घेऊन होकार देते. मी पण दिला असता म्हणा. खन्नांचा राजेश तसल्या भयाण कपड्यातही भलताच क्यूट दिसतो.

मग ती बहुतेक तरंगतच घरी पोचत असावी कारण पुढल्या शॉटमध्ये ती लगेच आपल्या घरात त्याच्या स्वागताची तयारी करताना दाखवली आहे. तेव्हढ्यात आईसाहेब बाहेरून येतात. साडी रंगीत त्याअर्थी पिताश्री अजून पृथ्वीतलावर आहेत. एलेमेंटरी माय डियर वॉटसन. तेव्हाच्या आया फक्त देवळात जायला घराबाहेर पडायच्या. त्या मुलीला इतकं आनंदी असायचं कारण विचारतात. म्हटलं झालं, आता 'घरानेकी इज्जत', 'मुंहपे कालिक', 'कहीका नही छोडा' वगैरे नेहमीचे डायलॉग ऐकायला मिळणार. पण श्याम पोलिसात आहे म्हटल्यावर त्या मुलीला तू त्याला सगळं सांगितलं आहेस का असं विचारतात. ग्यानबाची मेख अशी असते की नीताच्या वडिलांच्या मालकाचा खून झालेला असतो आणि तेव्हा मृतदेहाशेजारी चाकू हातात घेऊन ते उभे असतात ('खून झालेल्या माणसाच्या शरीरातून चाकू बाहेर काढून तिथेच थांबायचा मूर्खपणा केल्याने अटक झालेले माठ लोक' ह्या विषयावर अनेक पी. एच. डीज होऊ शकतील!) . ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी' ह्या न्यायाने पोलीस त्यांना धरून नेतात आणि परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्याविरोधात असल्याने त्यांना शिक्षा होते. अर्थात नीताने श्यामला ह्यातलं काहीच सांगितलेले नसतं. एकूणात 'सैय्या भये कोतवाल अब डर काहेका' अश्यातली गत नाही.

त्या दोघी बोलताहेत एव्हढ्यात दार वाजतं. नीताचे वडील दारात उभे असतात. ते तुरुंगातून पळून आलेले असतात. कसे ते त्यांनाच ठाऊक. मला तर 'दार चुकून उघडं राहिलंय, नीट बंद करून घ्या. ' असं ते पोलिसांना सांगतील असं त्यांच्याकडे बघून वाटलं. असो. तर ते नीता आणि तिच्या आईला आपल्यासोबत दुसर्या शहरात पळून यायला सांगतात. हो न करता करता नंदा तयार होते. एव्हढ्यात शाम तिथे येतो. सगळं कळल्यावर तो पोलिसांना फोन करतो आणि रीतसर आमंत्रण मिळाल्यावरच पोलीस येऊन नीताच्या वडिलांना घेऊन जातात. आपल्याला उगाच वाटतं की आरोपी तुरुंगातून पळालाय म्हणजे तो घरीच गेला असेल असं पोलीस अचूक ओळखतील वगैरे. नीता मग श्यामला 'मला तुझं तोंडसुध्दा पाहायचं नाही' असं सुनावते.

ती नोकरी मिळवायचा प्रयत्न करते पण प्रत्येक ठिकाणी तिचे वडील काय करतात ह्या प्रश्नावर तिचं उत्तर ऐकून तिला नोकरी नाकारली जाते. जसं काय वडिलांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली आहे म्हणजे ही चाकू घेऊन ऑफिसातल्या सार्यांना भोसकणारच आहे. मग त्यांच्या घरी येतो मदन पुरी. तो म्हणे तिच्या वडिलांचा मित्र असतो. नीताच्या आईच्या विनंतीवरून तो तिला एका हॉटेलात रिसेप्शनिस्टची नोकरी देतो. एक हिर्यांचा व्यापारी तिथे राहायला येतो. विक्रीचा सौदा पूर्ण करून तो रात्रीच्या ट्रेनने कलकत्याला निघतो. त्या कम्पार्टमेंटमध्ये फक्त प्यारेलाल नावाचा आणखी एक जण प्रवास करत असतो. अगदी ट्रेन सुटायच्या वेळेस एक तरुणी त्या डब्यात चढते. ती आपली ओळख गीता अशी करून देते आणि आपण नाशिकला एका नृत्यशाळेत नृत्य शिकवतो असं प्यारेलालला सांगते. इगतपुरीला गाडी थांबते तेव्हा ती त्याला जेवायच्या निमित्ताने उतरवते. ती दोघं जेवत असताना गाडी सुटते. प्यारेलाल इगतपुरीला अडकतो आणि गीता गायब होते. प्यारेलालच्या विनंतीवरून इगतपुरीचा स्टेशनमास्तर पुढल्या स्टेशनच्या स्टेशन मास्तरला त्याचं सामान उतरवून घ्यायला सांगतो तेव्हा त्या व्यापार्याचा खून झाल्याचं निदर्शनास येतं. प्यारेलालला अटक होते. तपास अर्थातच इन्स्पेक्टर श्याम करणार असतो. तो प्यारेलालला घेऊन नाशिकच्या नृत्यशाळेत जातो तेव्हा तिथे गीता नावाची तरुणी नाच शिकवत असते खरी पण प्यारेलालला ट्रेनमध्ये भेटलेली तरुणी ती नसते. त्यानंतरही एकदा गीता प्यारेलालला दिसते पण निसटून जाते. तश्यातच एकदा प्यारेलाल श्यामच्या पाकिटात नीताचा फोटो बघतो आणि त्याला सांगतो की त्याला ट्रेनमध्ये भेटलेली तरुणी दुसरीतिसरी कोणी नसून नीताच होती.

आता प्रश्न हे की व्यापार्याच्या खुनात नीताचा काही हात असतो का? ट्रेनमध्ये चढलेली तरुणी नक्की नीताच असते का तिची जुळी बहिण? का नीताची दोन रुपं असतात? तिचे वडील खरंच निर्दोष असतात का? दोन्ही खुनांचा काही संबंध असतो का? कोण असतो पडद्यामागचा सूत्रधार? जाननेके लिये देखिये 'द ट्रेन'!!

एक मात्र नक्की. ह्या चित्रपटात राजेश खन्ना पोलीस इन्स्पेक्टर सोडून बाकी सर्व काही दिसतो. त्याचा वॉर्डरोब ज्या कोणी डिझाईन केला त्या बाबा किंवा बाबीला माझा साष्टांग नमस्कार आहे. इतके भडक कपडे नाक्यावरचा मवालीही घालत नसेल. बरं ज्या रंगाचा शर्ट त्याच रंगाची पँट हा शिरस्ता कटाक्षाने पाळलाय. एव्हढं म्हणून कापड वाया घालवायचं नाही. नशीब उरलेल्या कापडाचा नंदाला ब्लाउज शिवला नाही. हा इन्स्पेक्टर त्या प्यारेलालला जेव्हा तेव्हा टॅक्सी, टांगा करायला पैसे काढून देत असतो. झोकात जीप-बीप चालवतो. एकूणात बडे बाप का बेटा बापाच्या वशिल्याने हौस म्हणून पोलिसात दाखल झालाय असंच वाटतं. नंदा त्याच्यामानाने जरा थोराड दिसते. पण नाकासमोर चालणारी नीता आणि प्यारेलालला झुलवणारी गीता ह्या दोन्ही भूमिका तिने चांगल्या केल्या आहेत. प्यारेलालचं काम राजेंद्रनाथने केलंय एव्हढं सांगितलं तरी भूमिकेची कल्पना येईल. बाकी नेहमीचे लोक म्हणजे हेलन (नीता ज्या हॉटेलात काम करत असते तिथली डान्सर लिली), शम्मी (डान्स स्कूलची मुख्य) आणि इफ्तखार (श्यामचा बॉस – हा बिचारा मात्र नेहमी युनिफोर्ममध्ये असतो) ह्यांनी आपापल्या वाटणीची भूमिका चोख वठवली आहे. चित्रपटात गुलाबी आंखे, किस लिये मैने प्यार किया, नी सोनिये आणि सैया रे सैया ही श्रवणीय गाणी आहेत.

अर्थात चित्रपट संपला तरी मेंदूला झिणझिण्या आणणारे काही प्रश्न नेहमीप्रमाणे उरतातच उदा. लिली आणि श्यामचा नक्की काय संबंध असतो? श्याम पोलीस असूनही नीताच्या वडिलांना खूनाच्या गुन्ह्यात फ्रेम केलेलं असू शकतं ही गोष्ट ती सांगेपर्यंत त्याच्या लक्षात का येत नाही? प्यारेलाल जेवत असताना व्यापार्याचं जेवण घेऊन एक वेटर डब्यात गेलेला असतो तेव्हा तो जिवंत असतो मग प्यारेलालने खून केलाय असं पोलिसांना कसं वाटतं? व्यापार्याला ट्रेनच्या डब्यात मारण्याऐवजी हॉटेलात मारलं असतं तर संशयितांची यादी मोठी होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल ही गोष्ट बॉसला का कळत नाही? हिरे व्यापार्याला बेशुध्द करून पैसे पळवता आले नसते का?

बाकी काहीही म्हणा पण अश्या काही गोष्टींसाठी - ज्या आजकालच्या चित्रपटांत दुर्मिळ झाल्या आहेत - मात्र हा चित्रपट पाहायलाच हवा उदा. अंधारात बसलेल्या ‘बॉस' ला 'बॉस' म्हणून हाक मारणारे चमचे, लाल रुमाल गळ्याभोवती गुंडाळूनसुध्दा आपण 'मवाली' आहोत ह्याबद्दल प्रेक्षकला जराही किंतु राहू नये म्हणून कॅमेर्यात रोखून पाहणारे बटबटीत डोळ्यांचे ढोले गुंड, अस्ताव्यस्त पडलेल्या पेट्यांनी भरलेला गँगचा अड्डा, नाईट क्लबमध्ये कॅब्रे करणारी लिली/मोनिका/मोना अश्या नावाची व्हँम्प, टोपी आणि चेहेर्यावरचा मस एव्हढ्याच सरंजामानिशी आपली ओळख बेमालूमपणे लपवणारे लोक, लाल-हिरव्या-पिवळ्या कपड्यांचा कसलाही संकोच न बाळगता घेतल्या पैश्यांना जागून पिक्चरभर बागडणारे हिरोज, जुन्या मुंबईतले रिकामे रस्ते, ‘मेरे लिये रातकी कलकत्ता जानेवाली ट्रेनकी टिकटका इंतजाम करो' म्हणताच वेटिंग लिस्ट वर न राहता मिळणारं कन्फर्म्ड ट्रेन तिकीट आणि.....दोन लोक मारामारी करत असताना फक्त हिंदी चित्रपटातच बॅकग्राउन्डला ऐकू येणारा तो फेमस आवाज - ढिशुम!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय भारी!
तूनळीवर दिसतोय. लाभ घ्यावा.

नुकतीच कॉलेजमधून शिकून बाहेर पडली आहे असं ते म्हणतात म्हणून आपण विश्वास ठेवायचा. >> अगदी अगदी पूर्वी असेच सगळे मोठे मोठे दिसणारे नायक -नायिका कॉलेज स्टुडंट असायचे . आणि कॉलेज मध्ये जाणारे म्हणजे हाताच्या बोटावर एक वही फिरवत फिरवत फिरायचं म्हणजे तो/ती कॉलेज मध्ये शिकतो असं आपण म्हणायचं . "आपकी कसम " मध्ये तो राजेश खन्ना आणि मुमु कॉलेज स्टुडंट दाखवलेत ते तर गळ्याखाली उतरायला खूप त्रास होतो. ती मुमताज कसली धष्टपुष्ट आणि धिप्पाड होती त्या वेळी आणि त्यात ती मोठी मोठी केसांची घरटी घालायच्या हिरवीणी त्याकाळात अगदी कॉलेज कन्यका दाखवली तरी Happy

अती भयंकर परिक्षण आहे!! मजा आली.

('खून झालेल्या माणसाच्या शरीरातून चाकू बाहेर काढून तिथेच थांबायचा मूर्खपणा केल्याने अटक झालेले माठ लोक' ह्या विषयावर अनेक पी. एच. डीज होऊ शकतील!)
- हे एकदम खरं!! यात एकमेकांबरोबर भरपूर वेळ काढत असताना 'मुझे तुम से कुछ कहना है..कैसे कहू' म्हणून फुटेज खाणार्‍या आणि सिक्रेट सांगण्याच्या लेव्हल पर्यंत आल्यावर अर्धा शब्द बोलून गोळी खाऊन मरणार्‍या माठानाही अ‍ॅड करावं.

मस्त लिहिले आहे. शेवटचा पॅरा मस्तच

'खून झालेल्या माणसाच्या शरीरातून चाकू बाहेर काढून तिथेच थांबायचा मूर्खपणा केल्याने अटक झालेले माठ लोक' ह्या विषयावर अनेक पी. एच. डीज होऊ शकतील! >>> अगदी अगदी

ते गाणं मात्र मला आवडतं, किसलिये मैने प्यार किया..?
हि एवढीच ओळ एक्ली तर वाटेल की , पस्श्च्तापाच गाणं आहे राजेच खन्नाचे कप्॑डे पाहून हिरवीणीने म्हटलेले. Wink

मेरे लिये रातकी कलकत्ता जानेवाली ट्रेनकी टिकटका इंतजाम करो' म्हणताच वेटिंग लिस्ट वर न राहता मिळणारं कन्फर्म्ड ट्रेन तिकीट ... ही एक स्वप्नातलीच गोष्ट! आणि ते कलकत्ता नाही "कलकत्ते" असायचं! का कोण जाणे!
अनू च्या माठांच्या यादीत इतर ही अनेक अ‍ॅडीशन्स करता येतील...
मस्त परीक्षण! Happy

मस्त लिहिलंयस स्वप्ना.
'खून झालेल्या माणसाच्या शरीरातून चाकू बाहेर काढून तिथेच थांबायचा मूर्खपणा केल्याने अटक झालेले माठ लोक' ह्या विषयावर अनेक पी. एच. डीज होऊ शकतील!> >>>> अगदी. ह्यावर लिहि काहीतरी.
शेवटचा पॅरा आवडला.

हा पिक्चर पाहिलेला नाही.
पण यातलं ते "गुलाबी आंखे जो तेरी" माझं आवडतं गाण आहे.
जरी ते हिरव्यागार आणी रंगीबेरंगी फुलाच्या बगीच्यात एक एडका नी एक एडकी एकमेकांना धडका आणी ढुश्या देत आणी एकमेकांना इकडे तिकडे भिरकावुन दिल्या सारखे डान्स करत असले तरी.

ऑफिसात एकटाच खदा खदा हसतोय. गुलाबी आंखे वर आम्ही तेव्हाही खुप हसलेलो. आमच्या एका सरांचे तारवटलेले डोळे आठवले होते.
कुठलासा मराठी चित्रपट पहायला गेलो होतो तेव्हा पुढील चित्रपट म्हणून बोगद्यातून धावणार्‍या नंदाच पोस्टर पाहीलं होतं आणि लगेचच दुरदर्शन क्रुपेने पहायला मिळाला होता.

"तीन तास कसा सहन केलास हा शिणुमा." हा खरच तीन तास सहन करण्यासारखा आहे.

गेल्या आठवड्यात तुम्हा चित्रपट परीक्षांची जाम आठवण आली.
भुवनेश्वर एअरपोर्टवर मेरा बॉस बजरंगबली किंवा बजरंगबली मेरा बॉस असल्या नावाचा साऊदिंडीयन डबपट पाहीला. मध्ये झोप लागूनही फारसा फरक पडला नाही. भयंकर हसलो .

हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाहीय. जेव्हा दुदवर लागलेला तेव्हा मला नेमके कुठेतरी जावे लागले होते. राजेश खन्ना प्रचंड आवडता असल्याने भारी दुःख झाले होते हे अजूनही लक्षात आहे. दुसऱ्या दिवशी सगकीकडे इगतपुरी स्टेशन व तिथे होणारे खून यांचीच चर्चा होती. हो नाही करता मैत्रिणींनी शेवटी नीता गीता भांडेही फोडून टाकले.

आता पाहायला हवा चित्रपट परत. गुलाबी अँखे व किसलीये माझी फेव गाणी आहेत. गुलाबी आंखे इतके प्रचंड गोड आहे की त्यापुढे त्या दोघांनी गाण्यात केलेली धावपळ, मारलेल्या उड्या व घेतलेल्या गिरक्या लक्षात येत नाहीत.

ट्रेन आवडता पिक्चर आहे. गुलाबी आंखे आणि त्यातला राजेश खन्नाचा उड्या मारत केलेला डान्स तर ऑटाफे आहेत Lol

ओ आणि राजेश खन्नाचे कपडे खुप आवडले ना तुम्हाला ते कोणी केले होते ते सापडले -

theTrain.JPG

लिली आणि श्यामचा नक्की काय संबंध असतो? ">>>

दोघे एकाच कॉलेजात शिकलेले असतात.

श्याम पोलीस असूनही नीताच्या वडिलांना खूनाच्या गुन्ह्यात फ्रेम केलेलं असू शकतं ही गोष्ट ती सांगेपर्यंत त्याच्या लक्षात का येत नाही? >>>>>> तो नुसता निकाल वाचतो, जो पोलिसांच्या बाजूने लिहिलेला असतो. नीता त्याला सांगते तेव्हा तो मान्य करतो की हाही अँगल असु शकतो.

प्यारेलाल जेवत असताना व्यापार्याचं जेवण घेऊन एक वेटर डब्यात गेलेला असतो तेव्हा तो जिवंत असतो मग प्यारेलालने खून केलाय असं पोलिसांना कसं वाटतं? >>>> प्यारे स्वतःच म्हणतो की तो निघाला तेव्हा शेटजी जेवत होता. मग पोलीस वेटरला गाठत नसावेत.

व्यापार्याला ट्रेनच्या डब्यात मारण्याऐवजी हॉटेलात मारलं असतं तर संशयितांची यादी मोठी होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल ही गोष्ट बॉसला का कळत नाही? हिरे व्यापार्याला बेशुध्द करून पैसे पळवता आले नसते का?>>>> मग हॉटेल पोलीस रडारवर आले असते. शेट्टी ला मारायची हौस, त्याला काय करायचे.

प्यारेने मजा आणली. आचरट होता तरी निखळ विनोदी होता तो.

राजेश खन्नाचे सोंग भयंकर सजवलेय. तरी तो चांगला दिसलाय.

मेरे लिये रातकी कलकत्ता जानेवाली ट्रेनकी टिकटका इंतजाम करो' म्हणताच वेटिंग लिस्ट वर न राहता मिळणारं कन्फर्म्ड ट्रेन तिकीट ... ही एक स्वप्नातलीच गोष्ट!
>>> 1970 मध्ये शक्य असेल. फर्स्ट क्लास मध्ये सीट्स रिकाम्या असणार..