ते पुढे गेले... त्यांची गोष्ट

Submitted by सिम्बुक on 3 January, 2018 - 08:50

ते पुढे गेले... त्यांची गोष्ट

राजगड ते तोरणा

सहयाद्रीच्या अवास्तव पसरलेल्या ओल्याचिंब हिरव्यागार रांगांमधे त्यांचं अस्तित्व हरवलं होत,तीव्र चढ-उताराचे निसरडे रस्ते, सुसाट्याने सुटलेला वारा, सातत्त्याने बरसणारा मुसळधार पाऊस, ओल्या कपड्यांमधली रक्त गोठवणारी थंडी आणि धुक्याच्या स्वाधीन झालेल्या नागमोडी पाऊल वाटा.नियतीची क्रूर चेष्टा म्हणावी कि निसर्गाच रुद्र रूप ?
काटेरी वनस्पतींनीं त्यांना ओरबाडून काढलं, पायातले गोळे पोटात येऊ लागले, भुकेला शमवणारी कोणतीच शिदोरी आता त्यांच्यासोबत उरली न्हवती, त्यांचे सातही
सहकारी त्यांना अर्ध्यावर सोडून माघारी निघून गेले. रान वेढाच पर्व धूसर होऊ लागलं होत, चाकोरीतली बंधन त्यांना पारावर्त करत होती माघारी फिरण्यासाठी. पण तरीही ते डगमगले नाहीत , खचले नाहीत,हरले नाहीत. त्यांच्या उसळणाऱ्या रक्तानं निदान अजून तरी मुर्दाडपनाच्या साखळ्या स्वीकारल्या नव्हत्या. त्यांचा संकल्प दृढ होता, त्यांनी पुढचं पाउल टाकलं, रान वेढाच एक विलक्षण पर्व सुरु झाल, ते पुढे गेले... त्यांचीच हि गोष्ट!

राजगडावरची रात्र तशी भयानकच गेली, ज्या बालेकिल्ल्यावर चारही जातींचे विषारी साप आढळतात त्याच बालेकिल्ल्यावर ऐंन पावसाल्याच्या दिवसात जननी देवीच्या मंदिरात बारा तासांच्या रात्रीचा प्रहर आम्ही जागून काढला. बाहेर मुसळधार पावसाच थैमान सुरु होत आणि मंदिरामधे रक्त गोठवणारी थंडी गोचिडारासारखी चिकटून बसली होती. उब निर्माण करणाऱ्या शेकडो कसोट्या आम्ही त्या बारा तासात निष्पळपणे सोडवल्या. व्यालेल्या कुत्रीची पाच - सहा पिल्ले जशी एकमेकाला चिकटून झोपावी तसे आम्ही बारा मित्र त्या बर्फासमान गार पडलेल्या मंदिराच्या फरशीवर एकमेकांना बिलगून पडलो होतो. बघता बघता चौथी मेणबत्तीही संपली आणि पहाटेची प्रकाशकिरण धुक्याला लपेटून मंदिराच्या खिडकीतून डोकावू लागली.. सुटलो रे बाबा! अशी रात्र पुन्हा नको.

पाऊस तसा आता बऱ्यापैकी ओसरला होता पण वातावरण अजून ढगाळच होत, हवेत मात्र प्रचंड गारवा. अखेर कूड कुडणाऱ्या थंडीसोबत जननी देवीला दंडवत ठोकला आणि मंदिर सोडल. रात्रभर जखडून, अवघडून गेलेले शरीराचे सारे अवयव सुरळीत होऊ लागले. भल्या पहाटेच आम्ही बालेकिल्ला उतरला. सुवेळा माची, पाली दरवाजा, पद्मावती तलाव सार काही अधाश्या सारखं पाहून घेतलं आणि संजीवनी माची उतरून स्वराज्याच्या या अभेद्य पहिल्या राजधानीचा (राजगडाचा) निरोप घेतला.

आता आमचा प्रवास सुरु झाला तोरण्याच्या दिशेने. संजीवनी माची वरून तोरण्याकडे निघालेली हि वाट तशी जास्तच उताराची आणि निसरडी होती, त्यात आता पुन्हा पाऊस सुरु झाला होता. अतिशय सावध पने आम्ही खाली उतरलो आणि बघता बघता डोक्याइतक्या उंच वाढलेल्या तरवाडाच्या जंगलात अदृश्य झालॊ. ओळखीच्या पाऊलवाट शोधत शोधत एका पाठोपाठ एक असे बारा जणांचे पायदळ तोरण्याकडे निघाले. आमच्या बारा जणांच्या चोवीस पायांखाली कितीतरी निष्पाप कोरडे श्वास चिरडले जात असतील याची कोणालाच कल्पना नव्हती.

मजल दरमजल करत आता बरेच अंतर आम्ही कापले, पाहटेचा जोश मात्र आता हळूहळू मंदावत चालला होता. वाढत्या पावसासोबत पाउल वाटाही धुक्यांच्या स्वाधीन होऊ लागल्या होत्या. राजगड - तोरण्याला जायची हि पहिलीच वेळ, त्यात आमच्यात सगळेच नवीन. पाउल वाटा शोधन थोडं खडतर होऊ लागलं, रिकाम्या पोटात कावळे ओरडू लागले, सोबत आणलेली जेवणाची शिदोरी सुद्धा कालच संपली होती. मग कोणाकडे तरी शिल्लक राहिलेली बिस्किटे, खारका , लेमन च्या गोळ्या बाहेर येऊ लागल्या. पावसाच्या पाण्यासोबत बिस्किटे आणि खारका खायचा हा पहिलाच अनुभव! पाणी पील कि जरा तरतरी यायची, मन फ्रेश व्हायचं मग सारं वातावरण कस आनंदान भरून जायचं. कधीकधी तर जरा जास्तच जोश वाढायचा आणि मस्तीमधे दोन चार वेढ्या वाकड्या उड्या सहज व्हायच्या मग घसरून आदळतो तरी हसत हसत उठायचो. चातकाच्या शिळे पेक्षा पाच पट जास्त मोठी शीळ घालण्यात जास्त आनंद वाटायचा. कुठेतरी दगडाच्या बेचकीत उगवलेली नेच्याची पाने तलवारीसारखी वाटायची. तरडाच्या खरबुडीत पानांवर विराजमान झालेले दवबिंदू कसे मोत्यासारखे चमकत होते. एखाद्या नव वधू सारखे हिरवा शालू नेसून सह्याद्रीला सुद्धा उधाण आले होते.

आता बराच वेळ निघून गेला , बघता बघता आम्ही पालखिंड गाठली तेंव्हा दुपार झाली होती. भुकेची तीव्रता आता जरा जास्त भासू लागली होती. बिस्किटे ,खारका संपूनहि बराच वेळ लोटला होता. अजूनही तोरणा किती लांब असेल याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यातही तोरणा उतरल्याशिवाय अन्नाचा एक कन मिळणे देखील शक्य नव्हते. अशा बिकट परिस्थितीची जाणीव झाल्याने आमच्यातले दोन मावळे डगमगले, तोरण्यापुढे ते शरण आले आणि मग त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला . खड्डा पडलेलं पोट आणि लाल मातीने बरबटलेले कपडे घेऊन ते पाली गावा मार्गे माघारी गेले.

कोणतीही खंत न बाळगता आम्ही पुन्हा जोमाने आगेकूच केली. लवकर तोरणा गाठू आणि तोरणा उतरला कि वेल्हे गावात मनसोक्त जेवण करू अस एकमेकाला आश्वासन देत आम्ही एकमेकांचीच समजूत काढली. पाल खिंडीमधे तोरण्याकडे बाण दाखवलेला फलक पाहिला आणि त्या दिशेने चालायला सुरुवात केली. जस जसे आम्ही पुढे सरकत होतो तसे जंगल अजूनच घनदाट होत होते , आता तर गवात पण डोक्याच्या वर जाऊ लागले आणि पाऊल वाटा पण दिसेनाश्या झाल्या. अंदाज घेत घेत आम्ही तसेच चालत राहिलो, साधारणतः एका तासाभरात आम्ही एका खोल दरीसमोर येऊन थबकलो. "अरे बापरे ! कुठे आलो आपण, रस्ता चुकलो कि काय" मी एकदम ओरडलो. सगळे जण चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह घेऊन माझ्याकडे पाहत राहिले. थोडा वेळ आजू बाजूला पाऊल वाटा शोधायचा प्रयत्न केला पण काहीच मार्ग निघत नव्हता. शेवटी सुदैवाने शंभर दोनशे मीटर लांब दोन माणसे चालत जाताना दिसली, जळन किंवा जंगली मावा गोळा करायला निघाली असावीत कदाचित. आम्ही सगळे जण जोर जोराने त्यांना हाका मारू लागलो, त्यांनी आम्हाला हातानेच खुणावून माघारी जायला सांगितले. रस्ता चुकल्याचे आता स्पष्ट झाले होते. पुन्हा माघारी पाल खिंडीत जाण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. पुन्हा एक तास वाया गेला, आम्ही परत पाल खिंडीत पोहचलो तेंव्हा काही गुराखी भेटले, तोरण्याला जाणारा बरोबर मार्ग कोणता हे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाचा तो तोरण्याकडे दाखवलेला बाण चुकीचा होता हे कळळ्यावर तळपायाची आग मस्तकात गेली.

आता मात्र बऱ्याच जणांची निराशा झाली होती , चेहऱ्यावरच्या सुरकुत्या याची स्पष्ट जाणीव करून देत होत्या. पोटातही भुकेचा कल्लोळ झाला होता. रस्ता चुकल्याने डोक्याएवढ्या गवतातून चालताना अंगावर ओरखडे उठले होते, सततच्या पावसाने नखापासून डोक्याच्या केसापर्यंत कपडे आणि शरीर ओलेचिंब झाले होते. दोन दिवसापासून शूज मधे असलेले पाय देखील आता कीरवाजायला लागले होते. आणि वेळ देखील बराच गेला होता. खिंडीतली दुसरी एकी पाऊल वाट तोरण्याकडे जाणारी होती पण तिकडेही पुढे जाऊन चुकण्याची भीती होती. काही वेळा पूर्वी जे दोन सहकारी माघारी निघून गेले त्यांचा निर्णय बरोबर होता की काय असे बऱ्याच जणांना वाटायला लागले आणि पुन्हा आमच्यातल्या पाच मावळ्यांनी शरणागती पत्करली. पाली गावाच्या मार्गे त्यांनी देखील परतीच प्रवास सुरु केला.

आता मात्र आम्ही फक्त पाच जणच उरलो होतो. ओलेचिंब झालेले कपडे, खड्डा पडलेल पोट आणि काटेरी वनस्पतींनीं ओरखडलेल शरीर याशिवाय दुसरे काहीच आमच्या सोबत नव्हते. पाल खिंडीमधे काही क्षण आम्ही स्तब्ध उभे राहिलो. पावसाचा मारा नेहमीसारखाच सुरु होता. असंख्य प्रश्न मनामध्ये घिरट्या घालत होते. पुढचे पाऊल टाकावे कि नको अशी द्वंद्वव परिस्थिती समोर उभी राहिली होती. मला निर्णय घेयचा होता, वेळही फार नव्हता. काही क्षणासाठी डोळे मिटले आणि मला शिवबाचा तोरणा आठवला, स्वराज्याचे तोरण बांधले तो तोरणा. प्रताप राव गुजरांचा इतिहास आठवला, वेडात मराठे वीर दौडले सात हे गीत आठवले आणि अंगातून शहारे उमटले. मग काय , कोणताही जास्त विचार न करता हर हर महादेव म्हणत आम्ही तोरण्याकडे आगेकुच केली.

हळूहळू दिवस पश्चिमेला सरकत होता. पायामधे बारा हत्तीचे बळ यावे तशी आमची रपेट सुरु झाली. डोक्या पेक्षा जास्त उंच गवतातून लाल चिखल तुडवत आम्ही पुढे जात राहिलो. कोसळणाऱ्या पावसाच्या कोणत्याच संवेदना आता आम्हाला जाणवत नव्हत्या. अंगावर ओरखडलेल्या काटेरी वेदना सुद्धा बधिर झाल्या होत्या. बेभान होऊन मस्तावलेल्या रान गव्यासारखी आमची वाटचाल सुरु होती. ना तहान ना भूक, डोळ्यासमोर फक्त तोरणा. एक टेकडी उतरली कि दुसरी कि लगेच तिसरी असे करत करत सह्याद्रीच्या बऱ्याच रांगा आम्ही पार केल्या. बराच वेळ उलटल्यानंतर थोड्याश्या विश्रांतीसाठी आम्ही एका दगडावर विसावलो. रिकाम्या पोटात ये-जा करायला श्वासाला कोणताच अडथळा येत नव्हता. बघता बघता धुकं बाजूला सरकल आणि एक प्रचन्ड मोठी, काळीशार दगडी शिळा आमच्या समोर उभी ठाकली. रोम रोम शहारून उठले, होत न्हवत ते सार बळ एकटवून ओरडलो , "अरे हाच तो तोरणा, हीच ती बुधला माची " क्षितील झालेले स्नायू पुन्हा टवटवले, धमन्या ताठरल्या आणि रक्त उसळी मारू लागलं.सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान पाहायला मिळाल, तो क्षण अफलातून होता. नीरज चे डोळे पाण्याने भरले होते, ते आनंद अश्रू होते. काहीतरी अतुलनीय गवसल्याची भावना होती किंवा खूप जवळच असं काहीतरी हरवाव आणि बऱ्याच वर्षाने अचानक ते सापडावे असे काहीतरी वाटत होते.

मग क्षणाचाही विलंब न करता आम्ही बुधला माचीवर स्वार झालो. सरळसोट उंच आभाळ चिरनारा तो बुरुंज, आम्ही खूप सावधपणे चढलो. आणि अखेर आम्ही तोरण्यावर पोहचलो. एक विलक्षण समाधान चेहऱ्यावर झळकत होत. दिवस आता पूर्णपणे पश्चिमेला झुकला होता, बुधला माचीवर भगवा फडफडत होता, आम्ही आदराने झुकून मनाचा मुजरा केला. तोरण्याची ती ओली माती कपाळाला लावली. छाती गर्वाने भरून गेली होती. एक मेकांना मिठ्या मारल्या, जिंकलो रे भावांनो.. लयच भारी वाटतं होते. बुधला माचीच्या बुरुंजावर घर करून राहिलेलं माकडांचा एक टोळकं हे सार मिश्किलपने पाहत होत.

आता अंधार पडायच्या आत तोरणा उतरायला पाहिजे, आम्ही पुढे आगेकूच केली. बुधला माची नेच्या च्या पानांनी भरून गेली होती, पांढऱ्या शुभ्र कापसाची उधळण व्हावी तसे धुक्याचे ढग माचीवर उतरले होते. डोक्या पेक्षा उंच वाढलेल्या गवतामुळे कोणत्याच वाटा नीट दिसत नव्हत्या. बुधला माचीवरून तोरण्याच्या बाले किल्यावर जायला कोणतीच पाऊल वाट दिसत नव्हती. आणि आता अंधार पण पडू लागला होता. आम्ही पुन्हा चल बीचल झालो. आता पावसाने पण रौद्र रूप धारण केले होते, वीजा कडाडत होत्या. इथे राहणे पण अशक्य. अरे बापरे आता काय करायचे. तिथेच शेजारी एक उंच टेकडी होती , मी खूप धाडस करून त्यावर चढलो, टोकावर गेल्यावर समोर सरळसोट वाट दिसली. "वाट सापडली रे " मी मोठयाने ओरडलो. अधाशासारखे आम्ही तिकडे धावलो. परतीची वाट सापडली होती.

तोरणा उतरताना सर्व जण शांत होते. अनपेक्षित पने अनुभवाला आलेला हा अविस्मरणीय ट्रेक आयुष्यातले पहिले आनंदाश्रू देऊन गेला. आम्ही जिंकलो होतो.

सोबतीला असलेल्या त्या चार मावळ्यानमुळेच हे शक्य झाले.
नीरज जगताप , प्रसाद तेली , वैभव अंधारे आणि आदित्य भुरगुटे तुमच्या जिद्दिला सलाम..

DSCN5554.JPGDSCN5411.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users