ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १८

Submitted by स्वप्ना_राज on 26 December, 2017 - 02:10

We now know that memories are not fixed or frozen, like Proust’s jars of preserves in a larder, but are transformed, disassembled, reassembled, and recategorized with every act of recollection.

( Hallucinations – Oliver Sacks )

आज आठवणींच्या (आठवणीतल्या नव्हे!) गावांना जायचंय. आपल्या बालपणात कोकणातला गाव असो वा नसो पण प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रवासात आठवणींची अशी अनेक गावं, अनेक टप्पे असतात. कुठल्याही प्रवासाप्रमाणेच आपण ह्या प्रवासात जसजसे पुढे जाऊ तसतशी ही मागे राहिलेल्या आठवणींच्या गावांची संख्या वाढत जाते. आणि मग एक दिवस असा येतो की आपण पुढच्या प्रवासाऐवजी ह्या मागे राहिलेल्या, कधी तिथे परत जायची सुतराम शक्यता नसलेल्या आठवणीच्या गावांतच जास्त रमायला लागतो.

पण ह्या आठवणी फक्त आपल्याच असतात का? नाही ना. तीच तर ह्या प्रवासाची आणखी एक गंमत आहे. ही आठवणीची गावं बर्याचदा आपल्या मित्रमैत्रिणीच्या, नातलगांच्या, इतकंच काय पण कुठल्यातरी प्रवासात भेटलेल्या एखादी अनोळखी सहप्रवाश्याच्या आयुष्याच्या प्रवासातलीसुध्दा असतात. आपण तिथे कधीही जाणार नसतो पण आपण त्याबद्दल एव्हढं काही ऐकलेलं असतं की त्या आठवणी आपल्याच बनून जातात. त्या आठवणीतली ठिकाणं, माणसं, घटना आपल्या डोळ्यापुढे उभी रहातात ती आपल्या कल्पनेतलं रुपडं लेऊन. कधीकधी आपण एखादी आठवण आणखी कोणालातरी सांगतो. मग ते गाव त्या ऐकणार्याच्या मनात जाऊन बसतं. त्याच्या/तिच्या आठवणीचा भाग होतं. पण कधीकधी आपण एखादी आठवण कोणाशीच शेअर नाही करत. मग ती फक्त आपल्याच मनात राहते. आणि एक दिवस आपल्याबरोबर जाते संपून. मग ती आठवण नाही रहात. तिचं काय होतं कोणास ठाऊक. आकाशातून निखळलेल्या तार्याचं काय होतं ते तरी आपल्याला कुठे माहित आहे?

आजची काही गावं माझ्या आईच्या आठवणींची.....
---------------

‘मला ना लहानपणी हातात काचेच्या बांगड्या भरायची खूप आवड होती' अंगाभोवती शाल घट्ट लपेटून घेत आई सांगत होती. आम्ही सुट्टी घालवायला एके ठिकाणी आलो होतो आणि बंगल्यासमोरच्या डेकवर खुर्च्या टाकून रात्री आकाशात इतक्या चांदण्या असतात ह्याचं नवल करत बसलो होतो.

‘पण त्या खेळताना फुटायच्या नाहीत?’ लहानपणी आई कशी दिसत असेल ह्याची मनात कल्पना करत मी म्हटलं. आईचे लहानपणाचे काही फोटो आमच्या लहानपणी आजोळी पाहिल्याचं आठवत होतं. पण आजोबा गेल्यावर आजीने बेळगावचं घर हलवलं आणि ते फोटो कुठेतरी गायब झाले. आता ते फक्त आईच्या आठवणीत राहिलेत आणि काही माझ्या.....

‘फुटायच्या ना....पण तरी माझी हौस काही फिटायची नाही. आमच्याकडे एक बांगड्या विकणारा यायचा. तेव्हा आम्ही नाशिकला रहात होतो. मला वाटतं तो ओझरवरून यायचा. त्याच्याकडे एक पत्र्याची ट्रंक होती. त्यात तो तळाला कापूस घालायचा, वर बांगड्या, मग पुन्हा कापूस आणि मग वरून जुना बेडशीट. आधी आमच्याकडे यायचा. मला म्हणायच तुला मोरपिशी, आमसुली, केशरी रंगाच्या बांगड्या आवडतात ना? बघ मी आणल्यात. मग मी त्याच्याकडे असलेल्या त्या रंगाच्या सगळ्या बांगड्या घेऊन टाकायची. आई त्याला भाजी-चपाती, भात-आमटी किंवा सकाळी लवकर आला तर काय नाश्ता तयार असेल तो द्यायची. मग तो बाकीच्या घरांत गेला की बायका म्हणायच्या रेग्यांकडे आधी गेला होतास ना? सगळ्या मोरपिशी, आमसुली बांगड्या गायब आहेत. प्रत्येक घरात त्याला आत बोलावून खायला द्यायचे. तेव्हा तो सांगायचा की मी आधीच्या घरांत खाऊन आलोय हो. आणि बायकोने दशम्यापण दिल्यात बांधून. पण तरी प्रत्येक घरात त्याचं खाणं व्हायचंच.’

आई बोलायची थांबली. माझ्या डोळ्यांपुढे कुठल्याश्या एग्झिबिशनमधून आवडीने घेतलेल्या आमसुली रंगाच्या बांगड्या आल्या. घरी गेल्यावर कपाटातून काढून हातात चढवायच्या आधी आईला घालून बघायला सांगायला हवं. आमसुली रंगाची माझी ही आवड आईकडून आली आहे हे मला माहीतच नव्हतं.

आईच्या घरी येणारया त्या बांगडीवाल्याला त्याच्या बायकोने दिलेल्या दशम्या खायला मिळाल्या असतील का कधी? का दिल्या तश्याच परत आणल्या म्हणून त्याने नेहमी घरी गेल्यावर बायकोचा ओरडा खाल्ला असेल? Happy
---------------

आपली आईसुध्दा कधीकाळी दोन वेण्या घालून दप्तर पाठीवर घेऊन जाणारी शाळकरी मुलगी होती ह्याची मला भारी गम्मत वाटते. तिने अभ्यास न केल्याबद्दल शिक्षकांचा धपाटा खाल्ला असेल, आजीशी भांडून ती रुसून बसली असेल, मैत्रिणींबरोबर तिनेही दंगामस्ती केली असेल, कधी भोकाड पसरून जाम रडली असेल अशी चित्रं डोळ्यापुढे आणायला मला खूप प्रयास पडतात. आणि जेव्हा ती डोळ्यापुढे येतात तेव्हा माझ्या ओठांवर आपोआप हसू येतं.

आईच्या लहानपणच्या मैत्रिणीबद्दल मी खूप ऐकलय. इतकं की त्यांची नावंही मला पाठ आहेत. त्यापैकी रत्ना साळवी, प्रमिला पाटील ह्या तर अगदी जिवलग मैत्रिणी. काही महिन्यांपूर्वी वेळ होता म्हणून मी एकदा सगळी नावं गुगल केली. आता ह्यात बर्याच अडचणी. एक तर आईच्या वयाच्या ह्या बायका फेसबुक, ट्विटर वर असतील ह्याची शक्यता फार थोडी. अर्थात नुकतंच माझ्या नववी-दहावीच्या क्लासमधल्या एका शिक्षकांनी व्हॉट्सअप वरून मला व्हिडीओ फॉरवर्ड करून माझा हा भ्रमाचा भोपळा फोडला होता म्हणा. दुसरी अडचण ही की ह्या सगळ्यांची लग्न झाल्यावर नावं बदलली असणार. ती काय होती हे अर्थातच आईला माहित नव्हतं. कारण आजोबांची बदली झाल्यावर त्या गावातल्या मैत्रिणींशी आईचा संपर्क आपोआप कायमचा तुटला होता. आणि तिसरी अडचण अशी की एका नावाची अनेक माणसं असतात.

पण मी इंटरनेटवर नेट धरला. प्रमिला पाटील नावावर एक हिट मिळाली - त्या साधारण आईच्याच वयाच्या दिसत होत्या, तिच्याच शाळेत शिकल्या होत्या. लग्न पाटील आडनावाच्या माणसाशी झालं असेल तर नाव तेच राहण्याची शक्यताही होती. फक्त एव्हढंच होतं की बाई पुढे खूप शिकलेल्या, अगदी परदेशी जाऊन आलेल्या होत्या. तेव्हाच्या काळात आडगावात राहणाऱ्या, तिथल्याच शाळेत शिकलेल्या मुलीचं लवकर लग्न करून दिलं जाण्याची शक्यताच जास्त होती. पण माणसाच्या आयुष्यात काहीही होऊ शकतं ना. लिहून पाहायला काय हरकत आहे म्हणून मी बाईंच्या पत्त्यावर एक इमेल टाकली. आईचं माहेरचं नाव, शाळा, ती त्या गावात जेव्हा होती ती वर्षं असं सगळं लिहिलं. आणि हेही आवर्जून सांगितलं की तुम्ही आईची मैत्रीण नसण्याची शक्यताच जास्त आहे त्यामुळे तसंच असेल तर उत्तर देण्याची तसदी नाही घेतली तरी मला वाईट वाटणार नाही. मी आईलाही हेच सांगितलं. त्या बाईंचं उत्तर १-२ दिवसांत आलं. त्या आईला थोड्या ज्युनियर होत्या आणि ओळखत नव्हत्या. माझी नाही म्हटलं तरी निराशा झालीच.

तरी कधी कधी राहून वाटतं.......कश्या दिसत असतील रत्ना साळवी आणि प्रमिला पाटील आता? आईला जशी त्यांची आठवण येते तशी त्यांना आईची आठवण येत असेल का? माझ्या आठवणीच्या गावांत एक गाव जसं त्यांचं आहे तसं त्यांच्या मुलांच्या आठवणींच्या गावांत एक गाव माझ्या आईचं पण असेल का?
---------------

अशीच एक मैत्रीण बाफना. मला तिचं फक्त आडनावच माहित आहे कारण तिचं नाव आईलाच आठवत नाहीये. पण ती आईची खासम खास मैत्रीण होती एव्हढं नक्की. आईने केलेल्या वर्णनावरून ती दिसायला छान होती. असेल म्हणा नाहीतर आमच्या आईसाहेब झटकन कोणाला असं प्रशस्तीपत्रक देणार्यातल्या नाहीत Happy

आईच्या बहुतेक सगळ्या मैत्रिणी चांगल्या खात्यापित्या घरातल्या होत्या. पण बाफना बर्यापैकी सधन म्हणता येईल अश्या घरातली होती. मैत्रिणीच्या आवडीची एखादी गोष्ट घरी केली असेल तर मधल्या सुट्टीत तिला जेवायला घरी घेऊन जायची ह्या सगळ्या मैत्रिणींची सवय. अर्थात आई तेव्हा ज्या गावात रहात होती तिथे शाळा चालत जायच्या अंतरावर होती. एके दिवशी बाफनाच्या घरी असंच आईच्या आवडीचं काहीतरी केलं होतं. तिने आईला आदल्या दिवशीच डबा आणू नकोस असं सांगितलं होतं. मग मधल्या सुट्टीत बाफना आणि आई बाफनाच्या घरी निघाल्या. अगदी पहिल्यांदा आईकडून ही आठवण ऐकली तेव्हा तिचा जाम हेवा वाटला होता. आमच्या लहानपणी शाळेत डब्यातलं गार जेवण नशिबात होतं. असो.

जाता जाता बाफना मध्येच रस्त्यात थांबली. एका हॉटेलात रेडीओ लावला होता. त्यावर तिच्या आवडीचं गाणं लागलं होतं - ‘हमारी याद आयेगी' मधलं 'कभी तनहाईयोमें यू हमारी याद आयेगी'. तेव्हाच्या काळात आवडीचं गाणं बटन दाबून ऐकायची सोय नव्हती. त्यामुळे आवडीचं गाणं ऐकायला रेडीओ आणि नशीब दोघांचीही साथ लागायची. आणि हो....आपल्याला ऐकू द्यायची घरातल्या मोठ्यांची परवानगीही. दोघी मुली थांबून गाणं ऐकताहेत हे जेव्हा हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेल्या म्हातार्या मालकाच्या लक्षात आलं तेव्हा त्यानेही कौतुकाने रेडिओचा आवाज थोडा मोठा केला. उशीर होतोय हे माहित असूनही बाफना आणि आई ते गाणं संपेपर्यंत तिथे थांबल्या.

बाफना मला वाटतं मारवाडी समाजातली होती. त्यांच्यातल्या प्रथेला अनुसरून तिचं लवकर लग्न झालं. उशीर होत असतानाही आवडीचं गाणं ऐकत थांबायची चैन तिला संसाराच्या धबडग्यात पुढे परवडली की नाही काय माहित. पण आजही कुठे हे गाणं ऐकलं की कधीही न पाहिलेली, न भेटलेली आईची ही मैत्रीण माझ्या कल्पनेच्या चक्षूंसमोर उभी ठाकते.

आता तुम्ही हे गाणं ऐकाल तेव्हा बाफना तुमच्याही सोबत असेल.
---------------

माझे आजोबा फॉरेस्ट खात्यात होते. खरं तर ते मेडिकल कॉलेजात शिकत होते. पण फॉरेस्ट खात्यात असलेल्या पणजोबांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे घराची जबाबदारी घ्यायला आजोबांना शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. ते खूप चांगले डॉक्टर झाले असते असं मला आजही वाटतं. लहानपणी आजोळी गेलो की आम्हा नातवंडांचा एक आवडीचा कार्यक्रम असायचा तो म्हणजे आजोबांना जंगलात पाहिलेल्या प्राण्यांबद्दल, भुतांबद्दल विचारायचा. त्यांचा भुताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता. ते डिपार्टमेंट आमच्या आजीचं. रात्री आम्ही मुलं खाण्याच्या बाबतीत कुरकुर करायला लागलो की स्वयंपाकघरातल्या उंच खिडकीकडे बोट दाखवून 'ती बघ जखिण आत बघतेय' असं ती दटावायची. घराच्या मागून 'भंगीबोळ' ह्या नावाने ओळखले जाणारे रस्ते जायचे. रात्री तिथे मिट्ट काळोख असायचा. त्यात जखिण दडून बसलेली आहे आणि आपण कोबीची किंवा दोडक्याची भाजी खाल्ली नाही की ती खिडकीतून आत येऊन आपल्याला घेऊन जाणार अशी तेव्हा आमची पक्की खात्री होती. पण आजोबांना हे जखिण प्रकरण साफ नामंजूर होतं. 'उगाच मुलांच्या मनात भीती घालू नकोस' असं ते आजीला (शक्य तितक्या सौम्य शब्दांत!) सांगायचे. त्यामुळे मी सांगणार आहे ती घटना आजोबांनी आम्हाला कधीच सांगितली नाही. ती कळली आईकडून.

आजोबाना त्यांच्या कामाचा भाग म्हणून जंगलात खूप फिरावं लागे. कधी कुठे वणवा लागला किंवा आणखी काही प्रॉब्लेम असेल तर रात्री अपरात्री जावं लागे. त्यांना फॉरेस्ट खात्याने बाईक दिली होती. पण कधीकधी ते पायीच जात येत असत. असेच एकदा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या सुमाराला ते घरी परत येत होते. अचानक त्यांच्या समोर एक बाई आली. भारतीय बायका साधारण असतात त्यापेक्षा ती बरीच उंच होती. त्यामुळे आजोबाना थोडं आश्चर्य वाटलं खरं. पण घरी जायच्या गडबडीत असल्याने त्यांनी तिथे फारसं लक्ष दिलं नाही.

तिने आजोबांना इथे दत्तमंदिर कुठेसं आहे म्हणून विचारलं. आजोबांना तिथे दत्ताचंच काय पण दुसरं कुठलंही मंदिर असल्याचं ऐकून माहित नव्हतं. त्यांनी त्या बाईला तसं सांगितलं आणि ते पुढे निघाले. काही पावलं पुढे गेल्यावर त्यांना एकदम जाणवलं की संध्याकाळची वेळ, त्यातून एकटी बाईमाणूस तेव्हा काही मदत हवी आहे का विचारावं म्हणून ते वळले तर मागे बाई नाहीच. आजूबाजूला दाट जंगल, जायला दुसरी वाट नाही. बाई गेली तरी कुठे ह्याचं नवल करत आजोबा घरी आले. आधी सांगितलं तसं भूतंखेतं वगैरेवर त्यांचा विश्वास नसल्याने तो विचारही त्यांच्या मनात आला नाही. आजीला ही घटना सांगितली तेव्हा मात्र तिने ही शक्यता बोलून दाखवली. आणि आजोबांनी ती (नेहमीप्रमाणेच!) उडवून लावली Happy

आईकडून ही गोष्ट ऐकल्यावर मी तिच्यावर बरयाच प्रश्नांचा मारा केला - ती बाई कशी दिसत होती? आदिवासी होती का? परदेशी होती का? ती उंच होती म्हणजे किती उंच? ती आजोबांशी कुठल्या भाषेत बोलली? तिच्या हातात पूजेचं सामान होतं का? आजोबांनी ते चालून आले होते त्या वाटेवरून मागे जाऊन पाहिलं का? भूत असेल तर ती मंदिराचा पत्ता का विचारेल? अर्थात आईने ही गोष्ट तिच्या लहानपणी ऐकली होती. तेव्हा काही प्रश्न विचारले असतील तर तिला आठवत नव्हतं. आजीलाही ही घटना फारशी आठवत नव्हती. आजोबा आधीच गेले होते त्यामुळे त्यांना काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता.

आज मला ही गोष्ट आठवते तेव्हा मी तिची माझ्या परीने संगती लावायचा प्रयत्न करते. सरत्या संध्याकाळी दाट जंगलात आजोबांना दत्तमन्दिराचा पत्ता विचारणारी ती बाई कोण होती? माणूस होती? का भूत?

आठवणींच्या गावातल्या रस्त्यांत कधीच सुटू न शकणार्या प्रश्नांची वळणं असतात ती अशी...
---------------

आजची शेवटची आठवण धूसर आहे. कदाचित आईला ती स्पष्ट आठवत असेलही. पण तिने ती जेव्हा पहिल्यांदा सांगितली तेव्हा ऐकून मला इतकं कसंतरी झालं की मी तिला फार खोलात जाऊन विचारलं नाही तेव्हा. आणि पुढे कधीच तो विषय नाही काढला तिच्याकडे. काढणारही नाही कधी.

निमित्त होतं मेथीच्या भाजीचं.

‘मेथीच्या भाजीवरून आठवलं.....आम्ही --- मध्ये रहात होतो ना तेव्हा तिथे एक बाई होती.’ आईने गावाचं नाव सांगितलं होतं पण आता ते मला आठवत नाही.

'नवर्याने सोडून दिली होती म्हणे तिला. तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. एक छोटी मुलगी होती तिला. घर वगैरे काही नाही. कुठूनतरी मेथीची भाजी मिळवायची आणि उकडून खायची. दररोज तेच. आजूबाजूच्या बायकाच मग तिला, त्या छोट्या मुलीला काही ना काही खायला आणून द्यायच्या. सगळ्यांना सांगायची की माझा नवरा judge आहे. खरं खोटं राम जाणे'

त्या दिवशी आई एव्हढंच बोलली. त्यानंतर कित्येक दिवस तिने मेथीची भाजी केली की ती हा विषय परत काढते की काय अशी मला धास्ती वाटायची. कधीही न बघितलेली ती बाई, तिची मुलगी दिसायला लागायचे. त्या बाईचा नवरा खरंच judge असेल का? असेलही. काय झालं असेल तिचं आणि त्या मुलीचं पुढे? नको वाटतो तो विचार आजही.

मेथीची भाजी कडवट असो वा नसो.....ह्या आठवणीने माझ्यासाठी ती कायमची कडवट करून ठेवलीय.
----------------

अफाट गर्दीने ओसंडून वाहात असलेल्या मुंबईच्या रस्त्यांकडे पाहते तेव्हा कधीकधी वाटतं की किती आठवणी असतील ह्या सगळ्या माणसांकडे - लहानपणीच्या, शाळेतल्या, कॉलेजातल्या, पहिल्या नोकरीच्या, पहिल्या प्रेमाच्या, अपेक्षाभंगाच्या, अपमानाच्या, एखाद्या अचानक पूर्ण झालेल्या इच्छेच्या, खूप खूप आनंदाच्या एखाद्या घटनेच्या, प्रवासाच्या, आजारपणाच्या.....त्यातल्या किती त्यांनी कोणाला सांगितल्या असतील.....किती कोणाला कधीच कळणार नाहीत......

दिन जो पखेरु होते पिंजडेमे मै रख लेता
पालता उनको जतनसे मोतीके दाने देता
सीनेसे रहता लगाये......

याद न जाये दिलसे बिते दिनोकी
जाकर ना आये जो दिन
दिल क्यो बुलाये उन्हे....
दिल क्यो बुलाये

आज आईच्या आयुष्यातल्या आठवणींची काही पाखरं माझ्या मनाच्या पिंजर्यातून मोकळी करून मी तुमच्या अंगणात सोडली आहेत.....काही दिवस तिथे बागडून ती उडूनही जातील कदाचित.....

.....पण त्यांची किलबिल त्या अंगणाला कुठेतरी लक्षात राहील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच सुंदर......

लेख वाचून लहानपणी आई वडिलांनी आणि आजी आजोबांनी सांगितलेल्या, आता विस्मृतीत गेलेल्या त्यांच्या गावाच्या शाळा कॉलेजच्या आठवणी परत वर आल्या Happy

वाह सुरेख....खुप दिवसांनी लिहीलेस स्वप्ना...पण नेहमीच्याच फॉर्मात....

लहानपणची आई जेव्हा आज्जीकडून ऐकायला मिळायची तेव्हा धमाल यायची. मला आठवतं मी अगदी लहान होतो तेव्हा हे पहिल्यांदा ऐकल्यावर सॉलीड धक्का बसला होता, म्हणलं आई इतकी लहान होती..

म्हणजे काय, सगळेच लहान असतात मग मोठे होतात...

मला तोपर्यंत वाटत होतं, आई बाबा डायरेक्ट आईबाबाच होतात, ते सुद्धा कधी रांगत असतील, किरकीर करत रडत असतील ही कन्सेप्टच कधी डोक्यात आली नव्हती.

फार मस्त लिहीले आहेस

खूप गोड लिहिलं आहेस गं.. वाचता वाचता मीही अशाच आठवणींच्या जंगलात फिरून आले.

तुझ्या आईच्या मैत्रिणींबद्दल वाचताना अचानक आठवले की वाडीला माझ्या शेजारी माणिक नावाची मुलगी होती, जी माझी आजच्या भाषेत खूपच फास्ट फ्रेंड होती. पण गम्मत म्हणजे हे सगळे आठवताना मला तिचे नाव आठवेना, तिचा भाऊ भरत आधी आठवला, तो ट्रक ड्राइव्हर होता व मोठी बहीण इंदू आठवली. पण माणिक मात्र अजिबात आठवेना Happy

आता लिहिता लिहिता अजून बरेच काही आठवायला लागले.

करोगे याद तो हर बात याद आयेगी
गुजरते वक्त की हर मौज ठहर जायेगी

हल्ली उगीचच खूप जुन्या आठवणी दाटून येतात आणि डोळे आपसूक वाहायला लागतात....

धन्यवाद अतरंगी, आशुचँप....एक विनंती....एखादी आठवण शेअर करू शकत असाल तर इथे शेअर कराल का? साधना Happy

खरं तर इथे प्रतिसाद देणार्या सगळ्यांना ही विनंती. तुमच्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी सांगितलेली एखादी आठवण इथे लिहिलीत तर मस्त वाटेल.

आमचे पूर्वज ( Lol ) कधी तरी कोणे एके काळी धंद्यात खोट खाऊन महाराष्ट्रात आले. त्याआधी व्यवसाय ऐन भरात असताना गावात असलेला मान, श्रीमंती, गावची/उत्सवांची, एकरांनी असलेल्या शेतीची वर्णने आजीकडून अगणित वेळा ऐकली आहेत.... Happy

बाबांकडून त्यांच्या लहानपणीचे कोल्हापूर, सांगली बाजूचे अनेक किस्से, गरिबीत पूर्ण केलेले शिक्षण, त्यावेळेस मित्रांनी दिलेली पुस्तके, त्यांच्या पालकांनी भरलेली शाळेची फीज, पार्ट टाइम काम, अभाविप आणि राजकारण, हे सगळं करून पुण्यातलं शिक्षण......

आईची परिस्थिती सुद्धा गरिबीचीच, तिच्या सगळ्या आठवणी हिंगण्यातल्या कर्वे शिक्षण संस्थेतल्या, तिथली शिस्त तिथले संस्कार, मन लावून काम करणारे शिक्षक, त्यांनी स्त्रिया स्वावलंबी व्हाव्या म्हणून केलेले प्रयत्न, तिथलं शिकवणं, खेळ, कामं, त्या बेकरी प्रोडक्टसची चव....

किती लिहणार..... शिवाय तुमच्या सारख्या सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिणे तर अजूनच अशक्य...

स्वप्ना खूप दिवसांनी, पण नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण. प्लीज नेहमी लिहित रहा. तुम्ही, दाद, बेफिंसारख्या लेखकांमुळे तर इथे सारखे यावसे वाटते.

स्वप्ना, आवड्लं खुप.
अनेक आठवणी दाटल्या.
पन्ना नियमित लिहायचं मनावर घे.

>>तिच्या सगळ्या आठवणी हिंगण्यातल्या कर्वे शिक्षण संस्थेतल्या

मग तर ह्या आठवणी लिहायलाच हव्यात. बघा आईंशी बोलून.....नवीन वर्षात लिहा

निल्सन, हर्पेन सस्मित, स्वप्ना_तुषार, svalekar धन्यवाद...पण तुमच्या आठवणी कुठे आहेत? Happy

अहाहा...सुंदरच आहे आठवणींचा गाव..
सर्व वाचकांना आपापल्या आठवणींच्या गावांच्या स्टेशनांवर एकतरी चक्कर मारून यावीशी वाटेल हा पन्ना वाचून
जिओ सपना...

माझ्या आईला हि सवय आहे आणि आजीला सुद्धा होती.
सांगताना दोघी अश्या रीतीने सांगतील की, प्रसंग डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा राहिल.
आजी सगळ्या नातवंडाना गोळा करून एकदा असेच सांगत होती, तिच्या सासूने तिला एकदा खूप मारले होते चुल नीट न सारवली म्हणून फुंकणीने. आजीने ती कशी नवीन नवरी म्हणून न्हाहून, अंगावर पातळ नवीनच नेसून चुल सारवून घाबरलेली चुलीजवळ बसून होते, तितक्याने कसे सासून आत येवून मारले.

मी गावी गेले की,कधीही ती चुलीजवळची ती जड लोखंडाची फुंकणी पाहिली भिती वाटे हातात घेवून आणि हिच गोष्ट आठवे आणि वाईट वाटे की कशा काय ह्या पुर्वीच्या बायका सहन करत..बोलायला कोणी नाहे, माहेर लांब आणि कजाग सासू. Happy

खरवसाची अशीच एक गोष्ट , आजीने तिच्या बाबांची सांगितलेली. तिचे बाबा खरवस घेवून निघालेले आणि नदीच्या पाण्यात अडकले आणि बरेच दिवस बेपत्ता होते( महिनाभर की काय) आणि मग कळले की पुरात गेले. आजीने कधी खरवस त्यानंतर खाल्ला नाही पण आमच्यासाठी करायची. देताना तिच्या डोळ्यात पाणी असायचे बहुधा आनंद आणि दु:ख दोन्ही. आम्हाला हि समज नंतर आली , आजी का करतेस तु मग खरवस? तुला तुझे बाबा आठव्तात ना?
माझा बाप नदी पोहून आलेला मग मी इथे बसून तुम्हाला नको करून घालू? त्याचा नाही त्रास मला. इती आजी.

बर्‍याच गोष्टी आहेत.. आजकाल वय होत आलय म्हणून माहित नाही पण ह्या अश्याच गोष्टी उगाच आठव्तात.

खूप सुंदर लिहिलंय.
मला लेखातल्या स्मायलीजशी अडकायला झालं. तिथे कय वाचायचं असा प्रश्न पडला.

@स्वप्ना_राज
>दुसरी अडचण ही की ह्या सगळ्यांची लग्न झाल्यावर नावं बदलली असणार.

यावर एक उपाय म्हणून मायबोलीवर सुरुवातीपासूनच तुमच्या प्रोफाईलमधे लग्नाअगोदरचं किंवा लहानपणी ज्या नावाने ओळखले जायचा ते लिहायची सोय केली आहे. त्यावरून अनेकांना त्यांचे जुने मित्र / मैत्रिणी सापडल्या आहेत. पण त्यासाठी त्यांना आपआपल्या व्यक्तिरेखेत ते लिहिणं योग्य वाटलं पाहिजे. Happy

अतिशय अप्रतिम अन जिव्हाळ्याचे लिखाण. गतकाल् विव्हलता अशी सुखद अन दु:खद मिश्रित असते. उगीचच आपण दिवसभर आपल्याच भावनांच्या दुलईत लपेटून वावरतो. अगदी मेलॅन्कोली होवून.
जियो~~

नेहमी प्रमाणेच अफाट . प्रचंड गोड लिहितेस
<<रात्री आम्ही मुलं खाण्याच्या बाबतीत कुरकुर करायला लागलो की स्वयंपाकघरातल्या उंच खिडकीकडे बोट दाखवून 'ती बघ जखिण आत बघतेय' असं ती दटावायची >>> हा हा हा हा

लहान होतो तेव्हा. पाचवी सहावीत असेन. आई, बाबा आणि मोठ्या बहिणीबरोबर लोकल ट्रेन मधून व्हिटी ला चाललो होतो आम्ही. डब्यात कोणी फेरीवाला काहीतरी विकायला आला. बाबांनी त्याच्याकडून पेन किंवा असंच काहीतरी घेतलं. "बाबा तुम्ही अशी बकवास पेन नका घेऊ, गेल्यावेळी लगेच मोडलं" मी म्हणालो. आईला संधी मिळाली, तिने "असंच करतात नेहमी, काही समजत नाही" वगैरे तोंडाचा पट्टा चालू केला. "जगायचा प्रामाणिक प्रयत्न करतात बिचारे" बाबा पुटपुटले.
ते "जगायचा प्रामाणिक प्रयत्न" आज जवळपास ३० वर्षानीही मला लख्ख आठवतं. बटन दाबल्यावर प्रकाश पडावा तसं काहीसं झालेलं मला.

बाबा ट्रेन मध्ये येणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला एखादं नाणं द्यायचेच.

चार पाच वर्षांपूर्वी माझी कार सिग्नल ला थांबली होती. समोरून मनगटापासून दोन्ही हात तुटलेला एक भिकारी त्या थिटक्या हाताला डबडं अडकवून येत होता. मी दुर्लक्ष केल्यावर तो मागच्या खिडकीत गेला. माझा मुलगा तिथे बसलेला. रिअर व्ह्यू मिरर मध्ये तो एकदम कावराबावरा झालेला दिसला. त्याने तोपर्यंत कोणी असा अपंग भिकारी बघितलेला नसावा. मी गाडी १-२ फूट पुढे घेऊन जवळजवळ पुढच्या गाडीला टेकवली. भिकारी निघून गेला.
आजपर्यंत कित्येक भिकारी आले, काहींना पैसे दिले, बरेचसे इग्नोर केले. पण हा प्रसंग विसरलाच जात नाही. मी मुलाशी काहीतरी बोलायला हवं होतं का? की त्या भिकाऱ्याला पैसे द्यायला हवे होते? मुलाला तो प्रसंग आठवत असेल का? मी काय संस्कार करतोय मुलांवर? आपल्या सुरक्षित बुडबुड्याच्या पलीकडे असलेलं नागडं वास्तव बघून न बघितल्या सारखं करावं हा मेसेज दिला का मी त्याला? की मी उगाच काथ्याकूट करतोय?

काही आठवणी का मेमरी अडवून बसतात कोण जाणे

छान लिहिलंय.
हा लेख वाचून अचानकच आजी नि पप्पांनी त्यांच्या लहानपणीच्या सांगितलेल्या आठवणी जाग्या झाल्या. Happy
वेळ मिळाला की लिहेन.

व्यत्यय.. तुमची दुसरी आठवण चटका लावणारी आहे.
मी कधीही हातीपायी धड असणाऱ्यांना भीक घालत नाही. पण असे अपंग वगैरे दिसले की आपसूकच पैसे दिले जातात.

Pages