दिवाळी अंक २०१७

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 16 October, 2017 - 05:40

हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.

कुठले दिवाळी अंक आपण वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी समग्र गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो तो विनय खंडागळे मीच .... अभिनंदन!

मौजमधील नंदू मुलमुले,सई परांजपे, रश्मी कशेळकर, विनया जंगले ,प्रतिभा रानडे यांचे ललित लेख खूप सुरेख आहेत.एकूणच अंक वाचनीय आहे.

लोकमतचा दिवाळी अंक मी गेले २-३ वर्षं घेतेय......छान लेख असतात. मनोरंजक आणि माहितीपूर्ण. किल्ला म्हणून एक अंक असतो. तो तर इतका सुरेख असतो की मागच्या दोन वर्षीचे अंक जपून ठेवलेत. Happy

विनय, अभिनंदन. हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे नवल मिळाला तर पाहीन. दीपावली आणि माहेर हे अंक दिसलेच नाहीत वाचनालयात (म्हणजे सतत गेलेले असत)
अंतर्नाद वाचला. अनुभवबद्दल लिहिताना अंतर्नादचे जुने अंक डोक्यात होते, त्यामुळे तिथल्या प्रतिसादांतली काहे वाक्य बाद.
बहुतेक लेख वाचले. गांधीजी आणि विन्स्टन चर्चिल (सुरेश द्वादशीवार) , रिचर्ड डॉकिन्सवर (शंतनू अभ्यंकर), अंनि चळवळ (हमीद दाभोलकर) हे आवडले. राजीव गांधींचे तांत्रिक सल्लागार प्रभाकर देवधर यांचा लेख वाचून उदारीकरणाची सुरुवात ८०च्या दशकातच झाली होती, त्याबद्दल फार क्वचित बोलले जाते असे लक्षात आले.
आनंद यादवांवरच्या रवींद्र शोभणेंच्या लेखात घटन घडल्या ते ते वर्ष नोंदवायला हवे होते.
मिळून केलेला लेखनप्रवास हा माधुरी तळवलकरांचा लेख नवलेखकांनी वाचायला हवा.
गणेश मनोहर कुलकर्णींचे या आधीचे दोन्ही लेख खूप आवडले होते. हा तितका ग्रेट नाही वाटला. आता त्यांना आपण लेखक झाल्याचा फीलही आलाय.
ना.सी फडकेंच्या मुलीने लिहिलेल्या त्यांच्या आठवणी वाचल्या. आम्हाला दहावीला असताना पिडणारा एक उतारा ज्यातून घेतला त्या प्रतिभासाधन पुस्तकाबद्दल लिहिलेलं वाचून गंमत वाटली. लेखक मंडळींना ते पुस्तक अजूनही मार्गदर्शक ठरत असेल्/ठरेल का?
नरेन्द्र चपळगावकरांच्या आगामी आत्मकथनाचा जो भाग - संपादित प्रकरण म्हटलंय - निवडलाय तो मिनी जीवनप्रवासच आहे. लहानपणीच्या आठवणींतच वर्तमानाबद्दल चिंतनही आहे.
हे कैसे बोलणे आणि ही अवदसा हे दोन्ही लेख एकेक परिच्छेद वाचून सोडले.
अरविंद संगमनेरकरांची कथा ही सत्यघटनाच वाटावी.
श्रीरंग विष्णू जोशींची स्पर्श ही कथा काहीच्या काही आहे. कथाबीज चांगलं आहे. पण दहावीत शिकणार्‍या त्या मुलीचं पात्र अजिबात पटलेलं नाही. तिचं नेमकं काय वय अपेक्षित असावं लेखकाला?
बाकीच्या कथा वाचल्या नाहीत.

छात्रप्रबोधनच्या अंकात विकास म्हणजे काय रे भाऊ ही कथा आहे. आरक्षण इ.इ. अनेक गोष्टी रूपकाच्या स्वरूपात मांडल्यात. शाळकरी मुलांना त्या कळतील का याबद्दल शंका आहे. की त्यांच्यासाठी हे बाळकडू?

'हंस' वाचतेय. इथलं वाचून आधी हृषिकेश गुप्तेची कथा वाचायला घेतली. भाषा, प्लॉट, मांडणी एकदम ग्रिपिंग आहे. पण गार्गीचा सगळा फ्लॅशबॅक सांगण्याकरता तिची वर्तमानातली अपघाताची सिचुएशन योग्य होती का?- असं वाटलं. नंतर कथा प्रेडिक्टेबल झाली. त्यामुळे सुरूवातीला कथेने जितकी पकड घेतली होती, ती नंतर सुटली.
वांग्याचं भरीतही मस्तय. पण ते वातावरण थोडं तरी अनुभवलेलं असायला हवं. पण त्यातला भाबडेपणा एकदम गोड आहे Happy
बाकी कथा, ललितं वाचतेय.

'धनंजय' मी जवळपास पूर्ण वाचला आणि मला आवडला. काही गूढकथा, विज्ञानकथा एकदम मस्त आहेत. काही ओकेओके आहेत. दॅट्स ओके Happy

विनय खंडागळे यांनी या खेपेस षटकार मारले आहेत Happy कॉमेडी कट्टा, धनंजय, हंस सगळ्यात कथा आहेत. धनंजयमधली चंद्रमाधवी... कथा सर्वात जास्त आवडली. कॉक मधल्या मात्र खूप नाही आवडल्या. आणखी कोणत्या अंकांत लिहिलं आहे विनय? तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा.
बोबडे बोल, म्हणजेच नीलेश मालवणकर यांच्याही काही कथा वाचल्या. मेनकामधली मस्त आहे. मेहता ग्रंथविश्वमधलीही छान होती.

गेल्या आठवड्यात शब्ददीप आणला. अर्धा अंक काश्मीरवरील परिसंवादाने भरलेला आहे. श्री. शेषराव मोरे, डॉ. अरुणा ढेरे, संजय नहार, सुरेश बाफना वगैरे 6 जणांनी वेगवेगळ्या बाजूंनी काश्मीरवर त्यांची मते मांडली. आधी वाचायचा कंटाळा केलेला पण बघू तरी काय आहे म्हणून नेटाने सगळे वाचून काढले. शेषराव मोऱ्यांचा लेख माहितीप्रद आहे. तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी संस्थाने विलीनीकरणाबाबत काय स्टँड घेतलेला व प्रत्येक संस्थान त्या निर्णयानुसार भारत किंवा पाकिस्तानात कसे विलीन केले गेले याचे चांगले विवेचन केलेय. काश्मीरबाबत नेहरू कसे चुकले हे हल्ली खूप वाचायला मिळते, त्या पार्श्वभूमीवर लेखातली माहिती कुठलीही बाजू न घेता जे आहे ते मांडणारी वाटली.

डॉ ढेर्यांनी राजतरंगिणि ह्या इतिहासग्रंथाबद्दल माहिती दिलीय. आपले विस्मृतीत गेलेले ग्रंथ शोधून त्यांना जगापुढे आणण्यात ब्रिटिशांचा फार मोठा वाटा आहे. राजतरंगिणीत फक्त काश्मीरचाच नाही तर उत्तर भारताचा खरा इतिहास लिहिलेला आहे, या दस्तऐवजाचे त्या दृष्टीने खूप महत्व आहे.

अजून एक 4 लेखांचा परिसंवाद आहे - कुणाकुणाला म्हणायचे चले जाव.. दत्तप्रसाद दाभोळकर, राजीव साने वगैरे नावे आहेत. अजून वाचायचाय.

अमर राणे यांचा खाद्यसंस्कृतीचा बदलता इतिहास लेख पण अजून वाचला नाहीय पण वाचणारे. मला कुठल्याही प्रकारच्या इतिहासात खूप रस आहे.

बाकी इतर साहित्य आहे, बदल म्हणून श्रीराम भट यांचे राशिभविष्यही आहे. 15 20 वर्षांपूर्वी सगळे अंक राशिभविष्य आवर्जून छापायचे, अंक हातात पडला की मी सगळ्यात आधी तेच वाचायचे. हल्ली बरेच अंक भविष्य छापत नाहीत.

<<बोबडे बोल, म्हणजेच नीलेश मालवणकर यांच्याही काही कथा वाचल्या. मेनकामधली मस्त आहे. मेहता ग्रंथविश्वमधलीही छान होती.>>
नमस्कार पूनम - मेनकात नाही माझी कथा. तुम्ही बहुतेक जत्रात आलेल्या कथेविषयी बोलताय. ती व मेहता ग्रंथविश्व यातल्या कथा आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल आभार Happy

धन्यवाद पूनम.
धनंजय, हंस, कॉमेडी कट्टा याबरोबरच खालील अंकामध्येही मी लुडबुड केलीये

पासवर्डमधे लहान मुलांसाठी काही शतशब्दकथा आहेत

सामनात एक प्रेमकथा

रविवारची जत्रामधे विनोदी कथा ( लगीनसराई, जी संपादकांना विचारून इतक्यात माबोवर टाकली )

हसवंती नवलकथा मधे भयगुढ कथा ( वाईट्ट हसू )

अधिष्ठान मधे एक दीर्घलेख आहे ( मु. पो. 0K
Zero kelvin 0K.हे विश्वातील सर्वात कमी तापमान गाठण्यासाठी जे महाभारत घडलं त्यावर आधारित वैज्ञानिक लेख )

मुंमग्रंसंची आमची शाखा याही महिन्यात दिवाळी अंक वाचायला लावतेय.
लोकमत दीपोत्सवचा वजनाला जड, भारीपैकी पानांचा आणि (राजकारण्यांच्या ) जाहिरातींनी भरलेला दिवाळी अंक वाचला.
सध्या गाजत असलेल्या काही व्यक्तींना भेटून, त्यांच्या कार्यक्षेत्री जाऊन लिहिलेले गुडि गुडि वृत्तान्त आहेत.
बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्यावर एक लेख आहे. त्यात रामदेव पाचवीपर्यंत शाळेत पहिले यायचे असं म्हटलंय. पुढे त्याच परिच्छेदात ते पाच वर्षांचे असताना त्यांना पॅरालिसिस झाला आणि शाळा सुटली असं म्हटलंय. (त्यांचं विकीपेज म्हणतंय अडीच वर्षांचे असताना). तर हाच प्रकार पुढेही चालू राहिलाय.
अरुणाचलम मुरुगनंतम यांच्यावरचा लेखाचं कारण अक्षयकुमारचा सिनेमा आहे असं मानायला वाव आहे. कारण दोनदा त्याचा उल्लेख आलाय.
१००च्या मागेपुढे असलेल्या तीन स्त्रियांबद्दलचे रिपोर्ताज - यु ट्यूबवर कंट्री फूडवाल्या मस्तानम्मा , योगासने करणार्‍या ननम्मल आणि शेकड्याने वडाची झाडं लावणार्‍या थिमक्का. यातल्या मस्तानम्मांबद्दल (रादर त्यांच्या यू ट्यूब चॅनेलबद्दल) आणखीही एका दिवाळी अंकात वाचलं होतं.

सध्या अक्षरगंध वाचतोय . सई परांजपे आणि विजया मेहता यांच्यावरच्या लेखांतून फार काही नवं मिळालं नाही. मुळात त्त्यातले मोठे लेख हे त्यांच्या आत्मकथनांचा आधार घेऊन लिहिलेत. म्हणजे ज्यांनी ती वाचली नसतील त्यांच्यासाठी थोडक्यात काम व्हावं.
भक्ति बर्वेंबद्दलचे लेख आवडले.
हृदयनाथ मंगेशकरांबद्दलच्या लेखात वाचून त्यांच्या संगीतावर किती वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली होती, ते नव्याने कळलं. हृदयेशच्या प्रभावळकरांच्या लेखात संत तुकारामांचे अभंग संगीतबद्ध करायला हृदयनाथांनी श्रीनिवास खळ्यांना सांगितलं, असं दोनदा आलंय. ते खटकलं (दोनदा आलंय इतकंच नव्हे) तर त्यामागचा भाव. की हे मला करता आलं असतं, पण मी तुम्हाला संधी देतोय. (हा टोन प्रभावळकरांचा, हृदयनाथांचा नाही) ज्ञानेश्वर केल्यावर लगेच तुकाराम करणं शक्य नाही असं कारण दिलंय. श्रीनिवास खळेंनी दिलेल्या मुलाखतींत किंवा त्यांच्याबद्दलच्या लेखनात हे आतापर्यंत ऐकलं नव्हतं. उलट अभंगांची निवड करण्यातच किती दिवस गेले, इत्यादी आठवणी त्यांनी सांगितलेल्या.
शिवाय हृदयेश आर्ट्सतर्फे हृदयनाथांच्या नावाने पुरस्कार आणि पहिलाच पुरस्कार लता मंगेशकरांना. याचं रसभरित वर्णनही आहे.
श्री पु भागवतांचा मराठी भाषेबद्दलचा लेख (एका साहित्य संमेलनातलं भाषण) आवडला. खूप काही नवीन लिहिलंय असं नाही. पण त्यातली मांडणी आणि विचारांची बैठक, स्पष्टता आवडली.

हा अंक वाचतोय अजून. बहुतेक लेख आरती ओवाळा टाइपचे आहेत!

हंस मीही आणला होता, पूर्ण अंक वाचनीय आहे. इथे लिहायचे राहून गेले. >> बर झालं सातवा अंक कुठला म्हणत हंस घेतलाय.

<<@सत्यप्रिय
'रेषेवरची अक्षरे'चा बालसाहित्य अंक इथे मिळेल (http://www.reshakshare.com/2017/09/801/).
पीडीएफवर काम चालू. >>

धन्यवाद

Pages