जुनागढ, द्वारका, भूज-कच्छ बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by राहुल बावणकुळे on 16 December, 2017 - 11:03

२३ ते २७ जानेवारी दरम्यान बडोद्याहून जुनागढ, द्वारका व भूज - कच्छ ला जायचे ठरलेले असून मी व आई बाबा अशी ३ व्यक्तींची संपूर्ण प्रवासाची रेल्वे/बस तिकिटे आरक्षित केली आहेत. साधारणपणे २३-२४ जाने जुनागढ/गिरनार, २५ जाने द्वारका/ओखा/बेट द्वारका व २६-२७ जाने भूज/कच्छ असा बेत आखला आहे. पण मला काही पुढील प्रश्न आहेत, ज्यांचे जाणकार मायबोलीकर निरासरण करतील अशी खात्री आहे.

  • कुणी जुनागढ - गिरनार ला गेले आहेत का? जुनागढ ला रहायसाठी चांगली हॉटेल/लाॅज किंवा अन्य ठिकाण सुचवाल का? गिरनार पर्वत चढून परत यायला एकूण किती वेळ लागतो? तिकडे रोपवे किंवा अन्य सुविधा आहे का? माझे आई बाबा दोघेही ६०+ आहेत, ते चढू शकतील का ही शंकाच आहे? सासन गिर ला जाने शक्य नाही, तसेच सोरटी सोमनाथची यात्रा आधी झालेली आहे. त्यामुळे आता जुनागढ गाळावे असेही वाटत आहे.
  • रेल्वेने थेट ओख्याला उतरून बेट द्वारकेला जाणे सोयीस्कर होईल का? कि द्वारका-ओखा-बेट द्वारका असे जावे? दिवसभराच्या निवासासाठी द्वारकेत काही व्यवस्था आहे का? कारण रात्री मुक्काम न करता लगेच भूज/कच्छला जायचे आहे.
  • भूज/कच्छच्या आजूबाजूला कोणकोणती ठिकाणे आहेत. उदा. कच्छचे रण वैगेरे ऐकिवात आहे. तिकडे फिरायला taxi किंवा ईतर वाहनाची सुविधा आहे का? भूज/कच्छमध्ये मुक्कामाला उत्तम ठिकाण सुचवू शकाल का?

उत्तराच्या प्रतीक्षेत, माझ्या ह्या आधीच्या जम्मू व काश्मीर बद्दलच्या धाग्यावर कुणीही उत्तर दिले नव्हते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही आताच तीन आठवड्यापूर्वी जुनागढ ला जाऊन आलो पण द्वारका आणि भुज केल नव्हतं . त्या ऐवजी बडोदा , जुनागढ ,गीरच्या जंगलात असा बेत होता . त्याची माहिती देऊ का . किव्वा मी फेबूकवर टाकलेल प्रवास वर्णन इथे टाकू का ?

@ सुजा: मला केवळ जुनागढ/गिरनार बद्दल माहिती दिली तरी चालेल. बडोद्याला बहिण असते आणि तिकडूनच प्रवासाला सुरुवात करायचा आहे.

पहिल्याच दिवशी बडोदा एअरपोर्ट ला उतरून डायरेकट तीन ठिकाण बघितली. लक्क्षीविलास पॅलेस/ मोढेरा सन टेम्पल त्याच आवारात असलेल "सूर्य कुंड " आणि तिसरी रानीकी वाव म्हणजे " राणीची विहीर " जिची "युनेस्को वर्ड हेरिटेज" मध्ये नोंदणी झाली आहे . राणीची वाव हि १९५८ साली पुरातत्व शास्त्र विभागाच्या टीमने खोदायला सुरवात केली . १९६० साली तीच पूर्ण उत्खनन संपलं आणि आत्ताची राणीची वाव ( विहीर ) आहे त्या स्वरूपात हाती लागली . आपली जुनी सुंदर सुंदर कार्विंग केलेली ठिकाण अशीच कालौघात गाडली गेलेली सापडलेली आहेत ( मध्यप्रदेश मधील खजुराहो )

बडोदा मधली सगळी ठिकाणी बघून रात्रीची अहमदाबाद स्टेशन वरून जुनागढ ला जाणारी गाडी पकडली आणि सकाळ सकाळी जुनागढ मध्ये पहिल्यांदाच गेलो केवळ पर्यटनासाठी. आधीच मुंबईवरून च एक टॅक्सी वाला बुक करून ठेवला होता . तो पहाटे साडे चार वाजता आमच्या करता जूनागढ स्टेशन वर उभा होता . त्यानेच काही गेस्ट हाऊस दाखवली त्यातलं एक छानस पसंत करून सकाळची आन्हिक उरकून आम्ही साडे आठ /पावणे नऊ पर्यंत तयार त्या दिवशीची ठिकाण पण खासच होती . सकाळ सकाळी "महाबत मकबरा" नि सुरवात केली आणि चढत्या क्रमाने सोमनाथ मंदिर बघून त्या दिवशीच्या फिरण्याचा शेवट केला . " महाबत मकबरा " बघण्यासारखा आहे . त्या दिवशी नेमकं तिथे एक प्रिवेंडिंग शूटिंग चालू होत त्यातच आम्ही पण फोटो काढले आणि नंतर श्री स्वामीनारायण मंदिर गाठलं . स्वामीनारायण मंदीर इतकं सुरेख आहे कि काही विचारायचंच नाही . नेहमीप्रमाणेच वेल मेन्टेन्ड . आणि उत्कृष्ट सुरेख . तिथलं कँटीन पण चांगलं आहे . सकाळ सकाळी निघालो म्हणून तिथेच नाश्ता केला त्यानंतर "उपेरखोत फोर्ट" वर चढाई. खर तर फोर्ट मध्ये बघण्यासारख काहीच नाहीये आणि फोर्ट हि आपल्या महाराष्ट्रातल्या सारखा नाहीये पण त्या फोर्टच्या आत एक विहीर मात्र आहे. नाव आहे " अडखडी वाव" म्हणजे विहीरच . (गुजराथ मध्ये विहिरी भरपूर असाव्यात आणि अगदि एकाहून एक सुंदर ) पण हि विहीर मात्र खूप वाईट अवस्थेत आहे . वाईट वाटलंच . का नाही स्वच्छ ठेवली ? तरी सुद्धा तिच युनिक सौंदर्य बघण्यासाठी तरी या विहिरीला भेट दिलीच पाहजे . हि विहीर कदाचित भारतातली सगळ्यात खोल विहीर असावी . तिच्या खोलीची भव्यता बघूनच धडकी भरते . आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विहिरीच्या बाजू . ( विहीर चौकोनी आहे ) तिच्या बाजू कार्व्हिंग केलेल्या नाहीयेत पण नैसर्गिक दगडांनी इतकं सुंदर कार्व्हिंग झालेलं आहे कि क्या बात . कितीही वाईट अवस्थेत असली तरी विहिरीला भेट दिलीच पाहिजे अशी हि विहीर

त्याच दिवशी गीता मंदिर मध्ये श्रीकुष्णाच्या समाधी स्थळा ला भेट दिली ( जिथे श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतला ) त्याच संकुलात बलरामाचं मंदिर आहे ते बघितलं आणि त्रिवेणी घाटावर जाऊन त्या दिवसाची सांगता सोमनाथ मंदिराने केली . सोमनाथ मंदिराबद्दल सांगायला हवं का ? हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाहिलं ज्योतिर्लिंग समजल जात . या मंदिरावर कित्येक वेळा हल्ले झाले . त्याची तोडफोड केली गेली पण तितक्याच वेळा त्याची पुनर्निर्मिती पण झालीच . या मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही .( त्यामुळे फोटो अर्थात नेटवरून साभार ) अगदीच काटेकोर सुरक्षा आहे . आतला गाभारा सोन्याने मढवलेला आहे असं म्हणतात . तिथेच आवारात रात्री " लाईट अँड साऊंड " म्युझिक शो पण होतात. असं हे उच्च दर्जाचं मंदिर बघून त्या दिवसाची सांगता केली आणि रात्री सासनगीर च्या " रो हाऊस " मध्ये मुक्काम. दुसऱ्या दिवशी गिरच्या च्या जंगलात सिंहांची भेट घ्यायची असल्याने ताबडतोब निद्रिस्त .

छान वर्णन! बडोद्याला बहीण असल्याने कित्येकदा भेट दिलीये आणि लक्ष्मीविलास पॅलेसही बघीतलेला आहे. मात्र रानीकी वावबद्दल ऐकलेही नव्हते, यावेळी नक्की भेट देणार. पुढे तुम्ही सोरटी सोमनाथबद्दल सविस्तर लिहीलय, आम्हीही 4 वर्षांपूर्वीच भेट दिलेली. त्यामुळे सोमनाथ टाळून गिरनार परीक्रमेचा बेत आहे, तर शक्य असल्यास त्याबद्दल लिहाल का? तुम्ही जुनागढला कोणत्या गेस्टहाऊसला आन्हिक उरकलीत?

आधी आमचा टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला तुम्हाला दोन तासांकरता धर्मशाळा शोधून देतो . आम्ही म्हटलं चालेल पण धर्मशाळा अगदीच बेताच्या होत्या शेवटी त्यानेच "आनंद" नावाचं एक हॉटेल ( गेस्ट हाऊस नव्हे सॉरी) शोधून दिल . काउंटर वर सांगितलं दोनच तास आहोत . फक्त अंघोळी करून तयार होणार इतकाच वेळ पाहिजे . त्यांनी ६०० रुपये घेतले पण रूम छान होती . मूख्य म्हणजे स्वच्छ . जुनागढ स्टेशन पासून जवळच आहे . गिरनार परिक्रमा नाही केली . रात्री सासनगीर ला रिसॉर्ट मध्ये मुक्काम केला आणि सकाळी गिरची जंगल सफारी केली Happy

आम्ही तीन वर्षांपूर्वी पाच दिवस आणि सहा रात्री मध्ये सौराष्ट्र ची ट्रिप केली होती.

1 ला दिवस .. सकाळी जामनगर इथे आगमन. संध्याकाळी कीचड वन आणि इतर स्थलदर्शन मुक्काम . जामनगरला आराम हॉटेल मध्ये मुक्काम . नंतर त्यांचीच गाडी घेतली फिरण्यासाठी.
2 रा दिवस .. स्पेशल टॅक्सी ने द्वारका, भेट द्वारका ,संध्याकाळी द्वारकेच्या देवळात आरती. ही फार सुंदर असते आणि इथेच मुक्काम .
3 रा दिवस .. मूळ द्वारका, पोरबंदर करून संध्याकाळी सोमनाथ आगमन. नंतर सोमनाथ दर्शन आणि लाईट म्युझिक शो . सकाळी सोमनाथ अभिषेक करून गिर सासन ला ताज हॉटेल मध्ये मुक्काम . पहाटे ताज च्या जीपने सिंह बघायला गेलो. नशिबाने मस्त पाहायला मिळाले .
4 था दिवस .. दुपारी निघून जुनागढ बघितले आणि संध्याकाळी मुक्कामाला राजकोट ला आलो.
5 वा दिवस .. राजकोट हून पालिताना बघितले आणि मुक्कामाला राजकोट ला आलो.
6 दिवस.. सकाळी राजकोट ला खरेदी वैगेरे केली. दुपारी आराम केला आणि संध्याकाळी मुंबईच्या गाडीत बसलो.

आम्हाला गिरनार आणि भुज मध्ये इंटरेस्ट नव्हता .

ही सगळी ट्रिप मीच आखली होती . गिर ला ताज मध्ये राहून आणि बाकी ठिकाणी ही उत्तम हॉटेल, भरपूर खायला प्यायला, पाच जणांना इनोव्हा एसी गाडी वैगेरे सगळं करून ही खूप म्हणजे खूपच स्वस्त आणि मस्त झाली. गाडी हातात असल्याने जरा ही दगदग झाली नाही.

जुनागढला हॉटेल हार्मनी चांगले आहे - स्वच्छ आणि कंफर्टेबल. अगदी समोर त्यांचेच रेस्तराँ पण आहे आणि तेही चांगले आहे.

गीरनारला साधारण ९०००+ पायर्‍या आहेत. चढायला ४ ते ५ तास लागतात. आई-वडिलांना जायची मनापासून इच्छा असेल तर नक्कीच चढून जातील. अगदीच चढवणार नसेल तर डोली पण मिळते. पण ती त्रासदायकच असते.

चढायला पहाटे २:३० - ३ ला सुरुवात करा. संपूर्ण रस्ताभर दिवे आहेत आणि कसलीही भिती नाही. सूर्य वर आल्यावर खूप दमछाक होईल. म्हणून उशीर करू नका. बरोबर माणशी २ लि. ग्लुकोजचे पाणी बाळगा (किमान). बाकी सामान शक्यतो नको. थंडी पहिल्या ३००-४०० पायर्‍यांपर्यंतच वाजते (आम्ही २६ जानेवारीला गेलो होतो). नंतर जराही थंडी वाजत नाही त्यामुळे गरम कपडे पण बेतानेच बाळगा - एक स्वेटर पुरे. वरती दत्त-धुनीच्या येथे प्रसाद मिळतो तो अगदी पोटभर असतो. नाही तर १-२ हॉटेल आहेत - देवीच्या शिखरावर.

बरोबर knee-cap नक्की बाळगा - गुढगेदुखी नसली तरी. आणि जोड्यांना चांगले कुशन असू द्या. सगळा रस्ताभर दगडी पायर्‍या आहेत.

आणि हो - नक्की जा. अगदी अविस्मरणीय अनुभव असतो.

@ Madhav: Thanks for your needful information. How much time does it take for completing Girnar visit? I am also thinking to have a stay at Hotel Harmony, Junagadh. The hotel has received good reviews at MMT and TripAdvisor and a deal includes Breakfast and Lunch/Dinner. Have you ever visited Dwaraka and Bhuj (Kutch)?
(Sorry, I am facing a problem in Marathi typing)

गीरनारला साधारण ९०००+ पायर्‍या आहेत. चढायला ४ ते ५ तास लागतात. >>> +१ आम्ही जवळ जवळ १५ वर्षा पुर्वी गेलो होतो. पहाटे चढायला सुरवात केली होती. रस्ताभर दिवे नव्हते. सलग चढण नाहीये. एक डोंगर चढायचा , उतरायचा , पुढचा चढायचा असे पाच डोंगर आहेत. पाचवा डोंगर म्हणजे दत्त शिखर. पण नक्की जा. माधव म्हणाले तस अगदी अविस्मरणीय अनुभव असतो. Happy