अनुभव

Submitted by मोहना on 30 November, 2017 - 21:40

प्रशांतीने आपलं मोजकंच सामान एकत्र केलं. मुलाचा फोटो, त्याने काढलेली एक दोन चित्र, हरीचा आणि तिचा फोटो. फार नव्हतंच. एका तासात तिला सगळं आवरायचं होतं. जेमतेम तीन महिने एकत्र काम केलेल्या सहकार्‍यांचा निरोप घ्यायचा की नाही हे तिला समजत नव्हतं. त्यांना ठाऊक असेल? काय म्हणतील? प्रश्न, सल्ले आणि सहानुभूती... नकोच. काय कळायचं ते इथून गेल्यावरच कळलेलं बरं. पण ती नक्की का सोडून जाते आहे ते कुणाला ठाऊक असण्याची शक्यता तिला वाटत नव्हती. काय करावं? सामान पाहिलं की सर्वांच्या नजरा वळणारच. तिला रडायला यायला लागलं. डोळ्यातले अश्रू कसेबसे आवरत ती सामान भरत राहिली. कुठून या फंदात पडलो असं होऊन गेलं होतं तिला. पण त्याचवेळी सुटल्यासारखंही वाटत होतं. गेले तीन महिने रोजचा मनावर येणारा ताण आता कमी होणार होता. तिला ती या कंपनीत रुजू होण्यापूर्वी नोकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड आठवत राहिली.

"तुझे प्रयत्न कमी पडत असतील. इतक्या भारतीय बायका नोकर्‍या करतात. त्यांना कशा मिळतात?" प्रशांतीच्या चेहर्‍याकडे पाहत हरी म्हणाला.
"मला काय माहीत? मी नसेन हुशार." तो काहीच बोलला नाही.
"हे मला काही जमेल असं वाटत नाही. सहा महिने शिकायचं आणि दोन - तीन वर्षाचा अनुभव दाखवायचा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताच येत नाहीत."
"मग बसा रडत. दुसरं काय सांगणार?"
"हेच तुझं. उडवून लावायचं. काहीतरी आश्वासक बोलशील तर बिघडेल का?" तो काहीच बोलला नाही तशी प्रशांती तणतणली.
"नाहीतरी तुझ्यामुळेच पडलेय या भानगडीत. गुपचुप हातावर हात चोळत बसलेलं बरं." तिच्या फटकळपणावर काही बोलावं असं हरीला वाटलं नाही. पण वाद वाढविण्यात त्याला रस नव्हता. तो तिच्यासमोरुन निघून गेला. प्रशांती चडफडत राहिली. तिला काही नोकरी करायची हौस नव्हती, आत्मविश्वास तर अजिबात नव्हता. पण मुलाला डॉक्टर करायचं हरीच्या मनाने घेतलं आणि तो तिच्या मागेच लागला. मुलाची इच्छा काय आहे, भारतात तो रुळेल का असे प्रश्न त्याला पडले नव्हते त्यामुळे मुद्दाम कार्तिकच्या मनाचा कल पाहण्याची आवश्यकता त्याला वाटली नाहीच.
"कार्तिक भारतात राहणार असेल कॉलेजसाठी तर पैशाची तरतूद करणं आलं. तू पण नोकरीचं मनावर घे. अधूनमधून म्हणत असतेस. आता ते अमलात आणण्याची हीच वेळ आहे. कार्तिक, आहे ना तयारी भारतात चार वर्ष राहायची?" हरीने सर्व काही आधीच ठरवलं होतं. त्याला दोघांचा होकार ऐकून फक्त संमतीचा खुंटा बळकट करायचा होता. कार्तिकने फार कुरकूर केली नव्हती. प्रशांतीची आपण इथे आणि मुलगा भारतात याला फारशी तयारी नव्हती पण खर्च, कार्तिकचं भवितव्य या सार्‍याचा विचार करुन तिनेही हरीच्या बेताला मान्यता दिली. त्याच्या शिक्षणाचा खर्च हरीच्या पगारात शक्य नव्हता आणि तसंही कार्तिक भारतात गेला की करमणं कठीण होतंच. नोकरी हा उत्तम पर्याय होता.

हरीच्याच मित्राच्या क्लासमध्ये तिने जायला सुरुवात केली. सॉफ्टवेअर टेस्टिंग! सहा महिन्यात तिथे ती जे काही शिकली ते किती कळलं, पुढे त्याचा किती उपयोग होईल याचा तिला अंदाज नव्हता. पण पाण्यात उडी टाकलीच आहे तर पोहणं भाग होतं. ते तितकंसं सोपं नाही हे लक्षात आल्यावर तिचा निश्चय डळमळीत व्हायला लागला. मुलाखतीत कुठे अडत होतं ते कळत नव्हतं. कधी तिला विचारलेले प्रश्न समजत नव्हते तर कधी ती काय बोलतेय ते पलिकडच्या व्यक्तीला कळत नव्हतं. नन्नाचा पाढा चालू होता. पण पैसे टाकले की फोन इंटरव्ह्यू देणारी माणसं मिळतात हे प्रशांतीच्या कानावर आलं होतं. तिनेही तेच करायचं ठरवलं. विजी बरोबरच्या भेटीत यापुढच्या मुलाखती विजीने द्यायच्या आणि काम झालं तर पाचशे डॉलर्स प्रशांती तिला देणार हे ठरुन गेलं. हरी देखील प्रशांतीने टाकलेल्या या पावलावर खूश होता.
"करावं लागतं हे सगळं. माझ्याच माहितीतली बरीचजणं अशी लागली आहेत."
"पण पुढे काय? नंतर कामंही जमायला हवं."
"जमतं. शिकशील हळूहळू." प्रशांती उगाचच फार विचार करतेय असं वाटत होतं हरीला.
"पण आपल्यामुळे सगळेच भारतीय बदनाम होतात." प्रशांती पुटपुटली आणि हरी जोरजोरात हसला.
"इथे काही आपण भारताचं प्रतिनिधित्व करायला आलेलो नाही. पोटापाण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी हातपाय हलवणारच ना." हरीने तिच्या मनातल्या विचारांवर शिक्कामोर्तब केल्यावर प्रशांतीला बरं वाटलं. प्रामाणिकपणा, सत्य अशा मनाच्या ताबा घेणार्‍या विचारांना तिने आनंदाने झटकून टाकलं.

विजीने दिलेल्या मुलाखतीतून लवकरच प्रशांतीचं काम झालं. प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळेस प्रशांतीचा प्रभाव पडला की झालं. पण त्या परीक्षेची वेळ आलीच नाही. कंपनीने तिला पंधरा दिवसात हजर व्हायलाच सांगितलं. प्रशांतीला आनंदाचं भरतं आलं.
"जमेल मला? भिती वाटतेय. म्हणजे मुलाखत विजीने दिली. काम करायला मी जाणार. आवाज ओळखला तर?" हरीने तिची समजूत काढली.
"पंधरा दिवसात तुझा आवाज ते विसरुनही गेले असतील प्रशांती. पुन्हा ज्यांनी मुलाखत घेतली त्यांच्याबरोबरच काम करशील असं थोडंच आहे?"
"हं." प्रशांतीने हुंकार दिला तरी पुढचे पंधरा दिवस ती बेचैन होती. झटून ती अभ्यासाला लागली. टेस्टिंगबद्दल जी काही माहिती मिळेल ती शोधून, यु ट्यूबवर व्ही.डी.ओ. पाहून पाहून आपल्याला आता बरंच काही समजायला लागलंय असं तिला वाटायला लागलं. काही वेळा मन धास्तावून जात होतं. ती स्वत:चीच समजून घालायला शिकली. लगेच काम नाही कुणी सोपवत. प्रशिक्षण मिळेलच. त्या वेळेला कल्पना येईल कामाची. जमेल. जमवू.

चेहर्‍यावर आत्मविश्वासाचा खोटा मुखवटा लावून तिचा पहिला दिवस व्यवस्थित पार पडला. दोन - तीन स्वत:च्या राज्यातलेच सहकारी पाहून तिचा जीव भांड्यात पडला. भारतीय आणि त्यातून आपल्याच भागातले ही दिलासादायक गोष्ट वाटली तरी अस्वस्थपणाही आला. कामात कमी पडलो तर यांच्यासमोर शोभा. पण वेळ पडली तर आपलीच माणसं मदत करतील याचीही तिला खात्री होती. हरीही तेच म्हणाला होता ते तिला आठवलं. पण अमेरिकन सहकार्‍यांबरोबरही चांगले संबंध ठेवायचे हे तिने मनातल्या मनात ठरवून टाकलं. प्रशिक्षणकाळात तिची मुलाखत ज्यांनी घेतली होती त्यांचीही भेट झाली. तिच्या हुशारीचं, हजरजबाबी पणाचं त्यांनी कौतुक केलं. अस्वस्थ मनाने तिने ते स्वीकारलं. आवाज वेगळा वाटतोय असं कुणी म्हणालं तर ही चिंता तिच्या चेहर्‍यावर पसरली होती. पण तसं काही झालं नाही आणि उगाचच भितीचा बागुलबुवा आपल्याभोवती उभा केला याचं तिला हसू येत राहिलं. तिला विजीचंही कौतुक वाटलं, मुलाखती देऊन नोकरी व्यतिरिक्त तिला मिळणार्‍या पैशांचं अप्रूपही.

काम सुरु झाल्यावर विजीबरोबर आणखी एक सौदा तिने केला. दोघींनीही थोडी घासाघीस करत व्यवहार ठरवला. विजी घरातून काम करायची. प्रशांतीला कामात अडचणी आल्या तर ती विजीला फोन करणार होती आणि महिन्याच्या शेवटी झालेल्या तासांचे प्रशांती विजीला पैसे देणार होती. पहिल्यांदा फोन करताना प्रशांतीच्या अंगाला कापरं भरलं. कुणी ऐकलं, पाहिलं तर? फोनवर अतिशय हळू आवाजात बोलत होती ती. मनातल्या मनात त्याचवेळेला कुणी येऊ नये याची प्रार्थनाही. विजीच्या सूचनांप्रमाणे ती काम करत होती. जमतही होतं ते. हळूहळू दोघीही सरावल्या. त्या दिवशीही ती फोन करत असतानाच अचानक स्कॉट आला आणि झटकन फोन ठेवलाच प्रशांतीने.
"घाईघाईत फोन ठेवलास. मी आलो म्हणून?" त्याने हसत हसत विचारलं. गडबडून तिने अर्धवट मान डोलावली. थोडंफार कामाचं बोलून उठताना स्कॉट म्हणाला,
"निम्मा वेळ फोनवर असतेस प्रशांती तू."
"छे, काहीतरीच काय स्कॉट." तिने त्याला उडवून लावल्यासारखं केलं. तो हसला आणि तिथून निघून गेला. प्रशांती स्कॉटला आपण फोनवर असतो हे कसं समजलं याचा विचार करत राहिली. पण अशा गोष्टींचा विचार करण्याऐवजी मार्ग काढणं उत्तम हे तिला ठाऊक होतं. विजी होतीच पण हळूहळू तिने तिथे असलेल्या दोन - तीन भारतीय सहकार्‍यांची मदत घ्यायला सुरुवात केली आणि अधेमधे अमेरिकन सहकार्‍यांचीही. पण कितीही नाकारलं तरी मनावरचा ताण वाढायला लागला. घरी आली की चिडचिड व्हायला लागली.
"हरी, निम्मा वेळ विजीला फोन करण्यात जातो माझा."
"काम घरी घेऊन येऊ शकत नाहीस का?" हरी असं का विचारतोय ते तिला समजेना.
"त्याने काय होईल?"
"मी मदत करेन."
"नाही. वर्ष झालं लागून की मगच घरुन काम करायची परवानगी मिळेल."
"पण इतकं कसं अडतं तुला?" हरीच्या प्रश्नावर ती वैतागलीच.
"तुझ्याइतकी हुशार नसेन म्हणून अडतं सारखं." तो काहीच बोलला नाही.
"तुला ठाऊक आहे ना, विजीच्या मदतीचे पैसे द्यायचे आहेत. निम्मा पगार त्यातच जाईल बहुतेक." तो काही बोलत नाही पाहून प्रशांतीच बोलत राहिली.
"ठीक आहे. तिच्यामुळेच कामातलं शिकते आहेस ना. एकदा जम बसला की लागणार नाही तुला विजीची मदत." हरीच्या शांतपणाचं तिला नवल वाटलं आणि रागही आला. हा नोकरी सोडून दे का नाही म्हणत हेच तिला समजत नव्हतं. पण भारतात कॉलेजसाठी पाठवलेल्या कार्तिकची फी, तिथले खर्च डोळ्यासमोर उभे राहिले की हरीच्या वागण्याला दोष देण्यात अर्थ नाही हे ही जाणवायचं. जे चालू आहे त्याला पर्याय नाही. आहे त्यातूनच जमेल तसा मार्ग काढायचा हे सत्य अंगावर कोसळायचं

पाहता पाहता जवळजवळ तीन महिने झाले होते तिला या कंपनीत रुजू होऊन. खुर्चीवर मान खाली घालून ती बसली होती. तिला विजीला फोन करायचा होता पण बाजूच्या टेबलाजवळून स्कॉटचा आवाज येत होता. तो कधीही इकडे येईल याची तिला खात्री होती. स्कॉट कधीही कुठूनही अचानक यायचा. त्यामुळे सतत सावध राहायला लागायचं. बाजूला बसणारे त्याला आपल्याबद्दल काही सांगत असतील का, आपल्याला काम जमत नाही अशी कुणी तक्रार केली असेल का अशा शंका तिच्या मनात तरळून जात. मिटींगमध्येही ती ऐकत बसायची. कोणत्याही प्रश्नावर तिच्याकडे उत्तर नसायचंच त्यामुळे सहभाग अर्थातच शून्य. महिनाभर तशी तिची कुणी विशेष दखलही घेतली नव्हती. पण आता तिलाही आवर्जून प्रश्न विचारले जायला लागले होते. आधी कुणी काय उत्तरं दिली असतील त्यावरुन ती स्वत:चं उत्तर तयार करायची. त्यात नवीन काही नसलं तरी कुणी तिला नाउमेद करत नव्हतं. पण आपण कुणाच्याच अपेक्षेत बसत नाही, इथे आपला निभाव लागणं कठीण आहे असं तिचं तिलाच वाटत राहायचं. प्रशांती मग स्वत:ला बजावयची. आपल्याला पैशाशी देणंघेणं आहे. बाकी आपल्याबद्दल कुणाला काय वाटतंय याचा विचार करायची आवश्यकताच नाही. आताही ती तोच विचार करत बसली होती. इतक्यात स्कॉट आलाच.
"बोलायचं होतं प्रशांती."
"स्कॉट?" तिने प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याने पाहिलं. इथे काही भारतातल्यासारखं नव्हतं. साहेबांना सर म्हणा, अदबीने वागा. प्रशांती स्कॉट काही बोलेल याची वाट पाहत राहिली. प्रशांतीच्या कामातील चुका, फोनवर असणं, फारसं कुणाबरोबर न मिसळणं या बाबत त्याला तिच्याशी बोलायचं होतं. तो काही बोलत नाही हे पाहून प्रशांती अस्वस्थ होत होती.
"बोल ना." हाताच्या तळव्यांना घाम फुटल्यासारखं वाटलं तिला.
"इथे नाही. माझ्या रुममध्ये."
"ठीक आहे. येते दहा मिनिटात." तो निघून गेला आणि ती तशीच बसून राहिली. काय वाढून ठेवलंय. काय बोलायचं असेल? ती खोलीत पोचल्यावर त्यानेही फारसे आढेवेढे घेतले नाहीत.
"कितीतरी दिवस पाहतोय, ऐकतोय. कामाच्या बाबतीत तू फोनवरुन कुणाची मदत घेतेस?" प्रशांतीला पायाखालची वाळू सरकल्यासारखं वाटलं. कशीबशी ती पुटपुटली.
"कामासाठी मदत? फोनवरुन? छे काहीतरीच काय? "
"ठीक आहे. पण कामात चुकाही भरपूर आहेत. सतत तू कुणाची ना कुणाची मदत घेत असतेस."
"कमॉन स्कॉट. नवीन आहे मी इथे. इतक्या पटकन सगळं समजेल अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही का?"
"नक्कीच. पण तुझ्यावर कामंही साधं सोपंच सोपवतोय आम्ही. ते सहज जमायला हवं तुला." स्कॉटच्या नजरेला नजर देता येईना प्रशांतीला. तिने मान खाली घातली.
"प्रशांती, तुला खरंच तीन वर्ष टेस्टिंग मध्ये अनुभव आहे?" स्कॉटच्या स्वरात जरब होती.
"हो. आहे ना." कसंबसं प्रशांती पुटपुटली.
"हे घे." त्याने कागद पुढे केला. काय आहे हे तिला समजेना. कागद हातात घेतला तसा तिचा चेहरा पांढराफटक पडला.
"जमेल?" स्कॉटने दिलेलं काम तिच्या डोक्यावरून गेलं होतं. धीर करुन तिने विचारलं.
"उद्यापर्यंत करते पूर्ण. चालेल ना?" विजीची मदत लागणार होती. तिला जमलं नाही तर घरी घेऊन जायचं. हरीला विचारायचं. तिने पटकन मनातल्या मनात ठरवून टाकलं.
"इथेच माझ्यासमोर कर."
"पण कॉम्प्युटर..." ती पुटपुटली.
"मला फक्त तू हे काम पूर्ण करण्यासाठी काय काय करशील ते सांग. फार कठीण काम नाही. अर्धातास पुरेल? मी येतोच तेवढ्यात परत." स्कॉट तिथून बाहेर पडला. आणि प्रशांती त्या कागदाकडे टक लावून बघत बसली. तिला त्यातलं अक्षरही कळलं नव्हतं. तिने घेतलेल्या प्राथमिक धड्यातलंही तिला या क्षणी काही आठवेना. जे काही जमेल ते ती खरडत राहिली. स्कॉट परत आला तेव्हा ती निर्विकार नजरेने भिंतीकडे पाहत बसली होती. त्याने तिच्यासमोरचा कागद ओढला.
"प्रशांती...?"
"मला एक संधी दे स्कॉट."
"प्रशांती, हा तोच प्रयत्न होता. गेले कितीतरी दिवस प्रत्येकजण तुझ्याबद्दल कुरकूर करतोय. फोनवरची प्रशांती आणि प्रत्यक्षातली तू. जमीन अस्मानाचा फरक आहे. तू फारशी बोलत नाहीस. बाकीच्यांना तुझे उच्चार कळायला कठीण जातात. त्याचीही होईल सवय. तो महत्त्वाचं मुद्दा नाही. पण जवळजवळ तीन महिने झाली तरी सतत तुला कुणाची ना कुणाची कामात मदत लागते. त्यामुळे फोन इंटरव्ह्यू तूच दिला होतास का ही शंका बळावत चालली होती. तुला खरंच चार वर्षाचा अनुभव आहे का याचीही खात्री वाटत नव्हती. त्यामुळे ही शेवटची संधी मी तुला देऊ पाहत होतो. मला तुझ्याकडून कोणत्याच प्रकारचा कबुलीजबाब नकोय. पण तुला मी या कामातून मुक्त करतोय."
"म्हणजे?" कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत प्रशांतीने विचारलं.
"यापुढे कंपनीला तुझ्या सेवेची आवश्यकता नाही." प्रशांती डोळ्यातलं पाणी मागे फिरवीत ताडकन उठून स्कॉटच्या खोलीतून बाहेर पडली.

सामान एकत्र करताना तिला हे सगळं आठवत राहिलं. कुणी काही विचारायच्या आत तिला इथून निघायचं होतं. स्कॉटने पुढे केलेल्या कागदांवर तिने सही केली आणि निमूटपणे त्याच्या खोलीत जाऊन तिने ते कागद त्याला दिले. येता येताच तिने कुणाचं कितपत लक्ष आहे याचा अंदाज घेतला. तसं सारं शांत होतं. ती बाहेर पडली. स्वत:च्या गाडीपाशी आली. गाडीत सामानाचा खोका ठेवला आणि दार बंद करत ऑफिसच्या दिशेने तिने नजर टाकली. तीन महिने काम केलेलं ते ठिकाण या क्षणी तिला परकं वाटायला लागलं होतं. आता पुढे काय? क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि तिच्या चेहर्‍यावर पुसटसं हसू पसरलं. मन शांत झालं. ऑफिस ते घर, सोळा मैलाचा तो प्रवास तिला फार लांबल्यासारखा वाटत होता. कधी एकदा घरी पोचतोय आणि चांगली डुलकी काढतोय असं झालं होतं.

संध्याकाळी हरी घरी आला तेव्हा ती उत्सुक होती. तिला इतकं प्रसन्न पाहून त्याला आश्चर्य वाटलं.
"उद्या कामावर जायचं नाही मला. काढून टाकलं." तिने शांतपणे सांगितलं.
"काढून टाकलं? आणि इतक्या आनंदाने सांगतेयस?" हरी चांगलाच बुचकळ्यात पडला.
"तू यायच्या आत रेझ्युमी अपटेड केला. या कंपनीत तीन महिन्याचा अनुभव मिळाला त्याचा फायदा होईल आता. तीन वर्ष अनुभव लिहिलंय. ठीक वाटतंय ना? दुसरी चांगली नोकरी मिळेल. पगारही वाढलेला असेल. बघ, गेल्या तासाभरात दोन फोनही आले. इंटरव्ह्यूची वेळ ठरवायला." तिने उत्साहाने म्हटलं आणि हरी आपल्याला पाहिजे तशी बायको मिळाल्याच्या आनंदात प्रशांतीकडे अभिमानाने पाहत राहिला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Chan lihilas Mohana....
He bar ki Scote ne tila shantpane apaman n karata kama varun kadhal

कथा छान आहे मोहना.
पण असे डमी फोन इंटर्व्यु देतात का खरंच लोक बाहेरच्या देशात? आणि मदत घेउ घेउ ऑफिसचं काम करायचं? ग्रेटच आहेत.

जीला नोकरीच करायला आवडत नाही, तिने दुसरे काही काम करुन पैसे मिळवावेत. अशाने इमानदार लोकांची पण गोची होते.

अ‍ॅकदा एक तेलगू कलिग मला म्हणालेला.
मेरी एक फ्रे.न्ड है. ऊसका इन्टर्व्यू है. आअप मदत करोगे क्या.
मी उत्साहात हो म्हणाले.
ऊसका इन्टर्व्यू देना है - ऐकल्यावर उडालेच.
तो मला खूप वेळ पटवण्याचा प्रयत्न कर त होता - अरे उसकी भी हेल्प हो जायेगी, आपको भी पैसे मिले न्गे.
तुच दे इन्टर्व्यू - मी रागाने.
आरे वो लडकी है, वरना तो मै ही दे देता.
मी गार!

चांगल लिहिलं आहे !
हो असे होते , माझ्या ओळखीत आहेत काही जण अमेरिकेत त्यांना हि असे काम करायला विचारणा आली होती.
पण, मला पण हे नाही कळलेलं कि प्रत्यक्ष काम करताना तोंडावर पडायची वेळ कशी काय नाही येत अश्या लोकांवर ?

छान आहे कथा.
असे खरंच होतं का असे प्रश्न वाचूनच उलट आश्चर्य वाटले. देसी लोकांनी ही फार कॉमन प्रॅक्टिस केलेली आहे इकडे. आणि भारतीयांचे नाव खराब करून ठेवले आहे. अत्यन्त डिसगस्टिंग देसी जुगाड. लहानश्या कुठल्यातरी देसी
कंपनीत्तर्फे एच १ करुन इथे यायचं, खोटा ' ५-७ वर्षे अनुभव असलेला 'रेस्युमे वापरायचा, इंटरव्ह्ञू दुसर्‍याने द्यायचा, कामावर जॉईन केले तरी दुसर्‍याने "सपोर्ट" करायचा. सपोर्ट म्हणजे खरं तर दुसर्‍याने तुमचे काम पैसे घेऊन करणे असा सरळ सरळ अर्थ. फायर व्हायला पण नाही म्हटले तरी २-३ महिने लागतात. तोवर तो 'अनुभव' लावून नवा जॉब मिळवायचा. बरं , एखाद्या ठिकाणी प्रोफेशनल रेफरन्सेस मागितले तरी ते पण असेच खोटे, पैसे घेतलेले. असे स्वतः चे गाडे सेटल झाले की मग मस्तपैकी जबर हुंडा वगैरे घेऊन भारतात लग्न वगैरे. मग पुढे जाऊन डिपेन्डन्ट विसावर आलेल्या, बर्‍याचदा आंध्रातल्या किंवा तत्सम खेड्यातून डायरेक्ट अमेरिकेत आलेल्या, कुठल्याच प्रोफेशनल कंपनीचे आयुष्यात तोंडही न पाहिलेल्या, तोवर हाउसवाइफ असलेल्या बायको ला पण याच फॅक्टरीत "सॉफ्टवेअर टेस्टर" बनवायचे!! या सगळ्याला गेंड्याची कातडी हवी फक्त, जी त्या लोकांना अवघड नसते. अशी कितीक रॅकेट्स होती/ आहेत.
अर्थात सुरुवातीला ते जमायचं, नंतर नंतर एम्प्लॉयर्स च्या लक्षात येऊ लागले. बर्‍याच कंपन्यांवर धाडी पडल्या, ओवरनाइट बंद केल्या गेल्या. आता ते तितके सोपे राहिलेले नसावे (होपफुली).

बापरे!!! अवघड आहे सर्वच. असे काही होत असेल हे खरेच वाटत नाही. नुसत्या फोन इंटरव्ह्यू वर नोकर्‍या कशा काय मिळतात?? फोन इंटरव्ह्यू पास झाल्यावर फेस टू फेस इंटरव्ह्यू होतच असेल की.

इथे काही आपण भारताचं प्रतिनिधित्व करायला आलेलो नाही. पोटापाण्यासाठी आलो आहोत. >>> हाच विचार चूक आहे. पोटापाण्यासाठी आलो असलो तरीही आपण भारताचं प्रतिनिधित्व करतच असतो हे कसे लक्षात येत नाही.

भारतीयांचे नाव खराब करून ठेवले आहे.>> आणि जर कारवाई झालीच तर रेसिझम म्हणून आरडाओरड करायला सर्वात पुढे.

अगं एके काळी ( २००० च्या आस पास ) नोकर्‍या भरपूर, लोकांची कमतरता होती. तेव्हा नुस्त्या फोन इंटरव्ह्यू वर जॉब मिळायचे. आता बदललं आहे ते. फेस टु फेस इंटरव्ह्यू, एम्प्लॉयमेन्ट व्हेरिफिकेशन इ. होते. तरी त्यावर पण असेल च या लोकांचे काहीतरी सोल्यूशन.

आता बदललं आहे ते. फेस टु फेस इंटरव्ह्यू, एम्प्लॉयमेन्ट व्हेरिफिकेशन इ. होते. >> चांगले आहे.

तरी त्यावर पण असेल च या लोकांचे काहीतरी सोल्यूशन.>>> हम्म. खरेच अवघड आहे. यु.के. बरे आहे कदाचित त्यामानाने. इथे असे काही बघितलेले नाही. अर्थात बघितलेले नाही म्हण्जे असणार नाही असे नाही.

नवीन Submitted by maitreyee on 1 December, 2017 - 13:15 >> आईशप्पथ !!
या सगळ्याला गेंड्याची कातडी हवी फक्त>> exactly ! तर आणि तरच जमू शकते .
आता बदललं आहे ते. फेस टु फेस इंटरव्ह्यू, एम्प्लॉयमेन्ट व्हेरिफिकेशन इ. होते.>>नशीब ! अर्थात ही तशी बऱ्यापैकी जुनी उदा. आहेत.

इथे (जर्मनीत )पण जॉब मिळण्याची प्रोसेस लांबलचक आहे . दिला रेझ्युमे आणि मिळाला जॉब अस कधीच होत नाही.

असे प्रकार ’तेलगू’ लोकांमुळे वाढले आहेत आणि अजूनही सर्रास घडतात. फोनवर मुलाखत झाल्यावर प्रत्यक्ष घेतली जाते पण बर्‍याच वेळा गोर्‍या लोकांना सर्व भारतीय सारखेच वाटतात (दिसतात). त्यात कितीतरी वेळा प्रत्यक्ष मुलाखत घेणारे ’तेलगू’ च असतात त्यामुळे सारं चालतं. दोन्ही पक्ष यावर उपाय/पर्याय शोधतील आणि प्रमाण कमी झालं तरी हे चालूच राहिल असं वाटतं इतके किस्से ऐकले आहेत अशा प्रकारांचे.

ही कथा चार - पाच वर्षापूर्वी माझ्यासमोर घडलेली आहे. धक्काच बसला होता मला त्यावेळेस. म्हणजे इथे आम्हाला जे काम करता येतं तेही जमलं नाही तर अशी धाकधूक असते आणि काही न येता....कोण काय करेल सांगता येत नाही.

काही वर्षापूर्वी माझ्या कार्यालयात एक श्रीदेवी म्हणून लागली. आमचे दोन विभाग एकत्र बसायचे. ती दुसर्‍या विभागात लागली होती पण सारखी माझ्याबरोबर काम करणार्‍याला शंका, प्रश्न विचारत होती. दुसर्‍या दिवशी आले तर तिचा पत्ता नाही आणि काय झालं ते मी भारतीय म्हणून मला सांगायला कुणी तयार नाही. शेवटी कळलं की माझ्या सहकार्‍याने तक्रार केली आणि तिचं पितळ उघडं पडलं. लगेच काढूनही टाकलं तिला.

या कथेत प्रशांतीला नोकरी करायची नाही गरजेकरता ती करते असं दाखवलं आहे. पण ज्यांना करायची असते तेही हे प्रकार करतात. आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्‍यांना त्याचे भोग भोगायला लागतात विनाकारण.

बाबो
फारच डेंजर रिस्क आहे.फोन वर बोलण्याची स्टाईल, वापरण्याचे शब्द सगलंच वेगवेगळं कळतं.
आमच्या इथे अशी केस झाली आहे.प्रत्यक्ष भेटीत टेक्निकल माणसाने हा वेगळा पंटर आहे हे ओळखलं.काही केलं नाही.फक्त सिलेक्ट केलं नाही इतकंच.

mi_anu - मुलाखतीला जाऊन तोंडघशी पडलेले पण भरपूर आहेत. पण यांचा साधा हिशोब असतो की लागली नोकरी आणि जरी एका दिवसात काढलं तरी तिथे जे एक दिवस काम केलेलं असतं तो ’अनुभव’ वाढवून बायोडेटात टाकता येतो.

नानाकळा <<<अरे उसकी भी हेल्प हो जायेगी, आपको भी पैसे मिले न्गे.>>> - कधी कधी वाटतं मुलाखती देणं हा ’जोडधंदा’ चांगला होईल :-). ही कथा लिहिली तशी याच प्रसंगावर विनोदी लेखही लिहिला होता मी.

बापरे हे फारच रिलेट झालं..... गेले आहे अशा चक्रातून... कोर्स संपवला पण पुढचे हे खोटे एक्स्पिरिअन्स दाखवणं, ईंटरव्यु मधे खोटं बोलणं हे काही जमणार नाही कळल्यावर बाहेरच पडले त्यातून लगेच ... आणी ७ वर्षांच्या गॅपनंतर जो काही भारतातला अनुभव होता त्या बळावरच नोकरी मिळाली... भले पगार कमी आहे... पण मनाची शांती आहे.....

आधीच असलं काही करायला मन धजावत नव्हतंच... पण अमेरिकेत म्हणजे आयटी हेच सर्वस्व मानणार्याच्या विचारसरणीमुळे गेले त्या कोर्सला.... पण बरं आहे प्रशांती सारखं काही व्हायच्या आधीच बाहेर पडले...

असं म्हणणं नाही की हे करुन ज्यांनी जॉब मिळवलेत ते सगळे अपयशी झालेत... पण तो मार्गच चुकीचा आहे... आधीच भारतीय रुल्स न पाळण्याबददल फेमस आहेतच... निदान दुसर्‍या देशात तरी आपली थोडी आब राखून राहावं....

ओह ! असेही लोकं असतात तर . मैत्रेयीचा प्रतिसाद वाचून अवाक झाले .काय डेरिंगबाज लोकं आहेत ! कसं काय जमतं हे सर्व ?

सही आहे !
कथा सुद्धा आवडली. शेवट विशेष!

एक मित्र होता. सिविलचा होता. डिप्लोमाचे पहिलेच वर्ष तीन वर्षे प्रयत्न करूनही सोडवू शकला नाही. चौथ्या वर्षी प्रयत्नच नाही केला. आमचा डिप्लोमा झाला आणि आम्ही डिग्रीला लागलो. त्याने डिप्लोमाची थेट नकली मार्कशीट मिळवून एका बिल्डींगसाईटवर सिविल ईंजिनीअर म्हणून कामाला लागला. साईटवर काम करायला खरे तर कसले फारसे शिक्षण लागतेय, तिथल्याच अनुभवातून शिकला. काही गरज पडलीच तर ईतर मित्रांकडून शिकला थोडेबहुत. आज मात्र प्रामाणिकपणे काम करतोय, कष्टाचा पैसा कमावतोय, जो कमावतोय तो डिजर्व्ह करतोय. हिंमते मर्दा तो मदत ए मित्रा !

पटलेच.
>>>बर्‍याचदा आंध्रातल्या किंवा तत्सम खेड्यातून डायरेक्ट अमेरिकेत आलेल्या, कुठल्याच प्रोफेशनल कंपनीचे आयुष्यात तोंडही न पाहिलेल्या, तोवर हाउसवाइफ असलेल्या बायको ला पण याच फॅक्टरीत "सॉफ्टवेअर टेस्टर" बनवायचे- भरपुर आहेत आमच्या ऑफिसात. त्यांना धड हसता बोलता ही येत नाही. त्यांच्या त्यांच्या घोळ्क्यात बसुन कामं करतात. कोण कुणाचे काम करतो देव जाणे!

वाचून धक्का बसला. ईथे भारतात बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन (मराठीत काय म्हणतात) म्हणजे आधीच्या कंपनीत फोन करून चौकशी करतात. काढून टाकल्यावर एक्पिरीअन्स लेटर कसं मिळेल आणि खोटं बनवलं तरी ओरिजनल डाॅक्युमेंट्स पण तपासतात ना. मुळात हिंमतच कशी होते हे सगळं करायची. कमाल आहे.

व्हेरिफिकेशन (मराठीत काय म्हणतात) म्हणजे आधीच्या कंपनीत फोन करून चौकशी करतात. >>>> ही गंमतच आहे सगळी. एम्प्लॉयमेन्ट व्हेरिफिकेशन कसं करतात ही प्रोसेस काही काळ जवळून बघितली आहे. त्यावरून सांगते - त्यात तुमच्या मॅनेजर ला विचारत नाहीत तर नियमाप्रमाणे व्हेरिफिकेशन कॉल जातो एम्प्लोयर ला - ज्या कंपनीकडून तुमचा पगार येतो त्या कंपनीच्या एच आर ला - की बाबा याला अमु़क इतका अनुभव खरच आहे का? म्हणजे अमूक इतके ड्युरेशन खरंच काम केलेय का? तर मजा अशी असते की हे असले लोक त्यांच्या त्या एच १ प्रोसेस करणार्‍अ‍ॅया कंपनी तर्फे कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रोजेक्ट वर आलेले असतात. सो व्हेरिफिकेशन चा कॉल जातो कुणाला तर त्यांच्या एम्प्लॉयर ला. म्हणजे त्याच एच१ करणार्‍या कंपनीच्या एच आर ला!! त्यांच्याकडे असतोच या लोकांचा फेक रेझुमे. ते लोक आरामात व्हेरिफाय करतात तो "अनुभव"! त्यांना पण त्या माणसाला प्रोजेक्ट मिळालं तरच पैसा मिळतो ना! विचार केला तर डोकं गरगरतं आपलं , पण या लोकांना ते रुटीन असतं.

पण तसही ३ महिन्यात जर ही शिकली नाही तर कठिणच आहे. बर्याचदा इतर टेक्नॉलॉजीस मधे अनुभव असला तरी काही नवीन टुल्स नेहमीच येत असतात तेव्हा त्यासाठी आधी ट्रेनिंग घेउन (जे हीने घेत्ले होते) ऑन दि जॉब शिकता येते. प्रमाणामधे ईतरांची मदतही घेता येते. त्यासाठी ३ महिने पुरे आहेत - अगदी एक्सपर्ट नाही तरी येतय हे दाखवण्यासाठी.

विचार केला तर डोकं गरगरतं आपलं , पण या लोकांना ते रुटीन असतं.>>>>>>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी... हे असे कॉल्स घेताना मी पण रोज पाहते माझ्या एच आर मॅनेजर ला

<<<आधीच भारतीय रुल्स न पाळण्याबददल फेमस आहेतच...>>>

असे नका म्हणू हो!
भारतीय लोकांना फार राग येतो, काही काही लोक तर अद्वातद्वा लिहितात इथे. ते सगळे मुसलमानांसारखे झाले आहे, खरे असले तरी बोललो तर रागावतात.
सुधरत तर नाहीतच.

माझी या देशातली केस उलटी आहे. तसा मी १२ वर्षे आयबीएम प्लॅटफॉर्मवर कोबॉल, फोर्ट्रान लिहीत होतो. पण युनिक्सचा गंध नाही. पीसि तर अगदीच नवीन नि मी तर कधीच वापरलेला नाही. त्या वेळी नवीन कॉलेज ग्रॅज्यूएट अत्यंत तुच्छतेने आमच्या कडे बघत - युनिक्स येत नाही? पीसी पण नाही?
दुसरी नोकरी शोधली. तिथे माझ्या कॉबॉल, आय बी एम च्या अनुभवासाठी घेतले होते.
पण पहिलेच प्रॉजेक्ट युनिक्स, पीसी, कम्युनिकेशन, डिस्ट्रिब्युटेड काँप्युटिंग वगैरे वगैरे चे.
स्पष्ट शब्दात सांगितले की मला युनिक्स, सी मधले काहिहि कळत नाही, माहित नाही. मी पिसी पण वापरला नाही! मला हे नको. तेंव्हा तर इंटरनेटहि नव्हते, तरी जबरदस्ती मला युनिक्स प्रोजेक्ट वर घातले. काही महिन्यांनी काम उत्तम केले म्हणून बोनस व नंतर पगारवाढ पण मिळाली.

पुढे कळले - बरीचशी कामे चांगली करायला खूप जास्त खोलात शिरून शिकायची गरज नाही अंगची हुषारी वापरावी लागते. लोक खूप काही काही बोलतात, बरेचसे खरे नसते.
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या!
पैसे मिळवायला खोटे बोलावे लागत नाही. उलट खोटे बोलले नि कुणाला कळले तर, या भीतीने जगायचे?!

मायबोलीवर खरे बोलण्याबद्दल अनेक शिव्या खाल्ल्या. खरे आहे हे मान्य केले तरी लोक रागावतात, त्यांच्या भावना दुखावतात म्हणून एक आय डी रद्द करून आता दुसरा घेतला आहे.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्स, न ब्रूयात् सत्यमप्रियम्!
सगळे खरे आहे आपल्या संस्कृतीत सांगितलेले.

Pages