प्रवास

Submitted by मोहना on 29 November, 2017 - 20:38

आरशासमोर मी उभी निरखीत भाव चेहर्‍यावरचा
माझा आणि माझ्या मनातल्या अनेकांचा!
सारा प्रवासच रंजक होता
बालपणातच प्रारंभ दडला होता!

लहानपणीच लागलं जमायला
शब्दफुलांचा वापर करायला!
स्वार्थ कुणाला चुकलाय
त्यातच परमार्थ दडलाय!

मग मला छंदच लागला,
चेहर्‍यांच्या आतलं धुंडाळायचा!
स्वत:च्या मनातलं लपवत
दुसर्‍याच्या मनातलं ढोंग ओळखायचा!

काळ आता थकला, आरशापुढे नग्न झाला
चेहर्‍यावरचं ओझं बाजूला करत अंतरंगात डोकावला!
कधीतरी बरसलेलं निरागसत्व
शोधत शोधत शांत झाला!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.