चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

Submitted by अभय आर्वीकर on 20 November, 2017 - 18:56

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई
 

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.

या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

या संमेलनात "आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण", "स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?", "शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, "सावध! ऐका पुढल्या हाका", अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.

संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-t...

Group content visibility: 
Use group defaults

ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)

चौथे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई

प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :

१) सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून आपली जागा अग्रिम आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
२) प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
३) एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
४) प्रतिनिधींना २ वेळ भोजन, २ वेळ चहा, अल्पोपहार, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
५) ऑनलाईन अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक ७२ तासाचे आत कळवला जाईल.
६) निवासाची व्यवस्था करणे शक्य न झाल्याने दिलगीर आहोत.
७) पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
८) झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील.
९) नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
१०) कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.

अधिक विस्तारपूर्वक माहितीसाठी आणि प्रतिनिधी सहभाग नोंदणीसाठी http://www.baliraja.com/rep-2018 या लिंकवर क्लिक करा.

ह्यावर्षी सुद्धा झाले असेल ना मराठी शेतकरी साहित्य संमेलन.. वृत्तांत वाचायला आवडेल.
तुमच्या रचना ही दिसल्या नाही बरेचदा दिवसात... वेळ झाल्यास जरूर मायबोलीवर टाका.