पिशाच्च

Submitted by चांदवा on 19 November, 2017 - 02:47

रात्री नऊचा सुमार होता.दत्तुआबाने डब्यातले उरलेले अन्न पोटात ढकलले आणि तो पुन्हा कामाला लागला.आज त्याच्यावर कामाचा जास्तच बोजा होता.तो एकेक काम उरकीत होता.त्याची लाकडी वस्तू बनवण्याची वखार होती.त्याची वखार पाच सहा हजार लोकसंख्या असलेल्या एका मोठ्या गावात होती.पण त्याचे ते मूळ गाव नव्हते.त्याचे गाव शेरवाडी होते.व ते वखारीपासून सात आठ मैल दूर होते.दत्तुआबा मिळेल त्या वाहनाने आपल्या वखारीत येत होता आणि मिळेल त्या वाहनाने घरी जात होता.आता तो आपल्या कामात गर्क होता.त्याला वेळेचा विसर पडला होता.त्याची घरी जायची वेळ टळून गेली होती.ती त्याच्यासाठी थांबायला तयार नव्हती.बऱ्याच वेळानंतर तो आपले काम उरकून उठला.त्याने समोरच्या भिंतीवर नजर टाकली,तेंव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते.त्याने आपली डब्याची पिशवी घेतली आणि वखारीतले दिवे मालवून वखार बंद करून तो निघाला
काळोखाच्या भिंतीत सारा परीसर गडप झाला होता.आकाशातल्या ढगांच्या उरात चांदण विझलं होतं.वाराही गप्प झाला होता.समोरच्या चिंचेवर अंधार थबकला होता.चिंचेच्या अंगावरून तो खाली गळत होता.दत्तुआबा नेहमीच्या वाटेवरून चालला होता.काळोखाच्या पदराने त्याला झाकला होता.काही वेळातच तो त्याच्या स्टाँप जवळ आला व घरी जाण्यासाठी वाहनांची वाट पाहू लागला.रस्त्यावरुन एक वाहन धडधडत येत होते.वाहन जवळ येताच दत्तुआबाने ते थांबण्यासाठी त्याला हात केला पण ते वाहन आले तसेच निघून गेले.तो थोडासा निराश झाला पण पुन्हा डोळ्यात आशेचे दिवे पेटवून मुकाटपणे वाहनाची वाट पाहू लागला.थोड्या वेळातच दोन दिवे त्याच्या दिशेने सरकत असल्याचे त्याला दिसले.ते आपल्या टप्प्यात येण्याची तो वाट पाहू लागला.लवकरच ते त्याच्या टप्पयात आले व त्याने त्या वाहनाला हात केला.तो ट्रक समोर थांबताच त्यातल्या एका दहा बारा वर्षाच्या मुलाने दत्तुआबाला विचारले,"कुठं जायचंय?""शेरवाडीला" दत्तुआबा उत्तरला."बसा" आतून ड्राव्हरचा आवाज आला तसा दत्तुआबा पटकन वरती चढून आत बसला.ट्रक शेरवाडीच्या दिशेने धावू लागला.
ट्रक ड्रायव्हरने सोबत असलेल्या त्या दहा बारा वर्षाच्या मुलाला विचारले,"कुठं व्हतो रं मघाशी चंद्या आपुण?" तसा चंद्या उत्साहाने म्हणाला,"तुमचा आज्जा त्याच्या बहीणीला सोडवाया तिच्या सासुरवाडीला गेला व्हता." "हा आलं बघ आता डोस्क्यात." म्हणून ड्रायव्हर चंद्याला पुढची गोष्ट सांगू लागला.तसा दत्तुआबाही कान देऊन ती गोष्ट ऐकू लागला.तेंव्हा ड्राव्हरने आपली गोष्ट सुरु केली होती.
"माझा आज्जा आन् त्याची बहीण तिच्या सासुरवाडीला पोहोचली तवा दुपार झाली व्हती.पाहुणचार व्हता व्हता आज्ज्याला तिथंच सांज झाली.तरीही त्यो घरला यायला निघाला.पाहुण्यांनी त्याला ऱ्हायची इनंती केली पर आज्ज्यानं त्यांचं काय बी ऐकलं न्हाय.त्यो तिथून चालत चालत एस् टी थांब्यावर आला आन् त्याला नेमकी शेवटची गाडी मिळाली.त्यो गाडीत बसला आन् गाडी सुरु झाली. बऱ्याच येळानं ती गाडी एका गावाजवळच्या थांब्यावर थांबली.त्यातून माझा आज्जा उतरला आन् गाडी निघून गेली.रात लयं वाढली व्हती.सगळीकडं सामसूम झाली व्हती.त्या अंधारात चालत आज्जा एका बाभळीच्या झाडाखाली आला आन् बाभळीच्या ख्वाडाला लावलेली सायकल घेऊन त्यो निघाला.अंधारामुळं त्यो सायकलीव न बसता हातातच सायकल घेऊन चालू लागला.गाव आजून बराच लांब व्हता.त्यो त्या वाटनी एकलाच चालत व्हता.चालत चालत त्यो एका ओढ्यापाशी आला आन् ओढा वलंडून पुढं झाला आन् त्याला त्याच्याकडं कसलंतरी वावटळ येताना दिसलं.त्याला काय समजायाच्या आतच त्या वावटळानं त्याला घेरलं.तोही त्या वावटळीत भरकटला आन् कसल्याशा धुंदीत चालू लागला.हळू हळू ती वावटळ गावाच्या वेशीपाशी आली आन् काय कळायच्या आतच आज्जा आन् सायकल हिरीत फेकली गेली.दुसऱ्या दिशी गावातला सखानाना तिथून चालला होता.त्यो पुढं जात असतानीच त्याला हिरीतून कुणाचा तरी आवाज ऐकू आला.तसा त्यो हिरीकडं आला.त्यानं हिरीत डोकावून पाहिलं.आन् त्याला हिरीत माझा आज्जा आन् सायकल पडलेली दिसली.तसा त्यो बावरुन आज्ज्याला म्हणाला,"आरं काय रं काय करतूया हिरीत?" तसा त्याला आज्जा म्हणाला,"आरं मला आधी बाहेर तर काढ.""थांब मी गावातली माणसं तुला काढायाला बोलावतो.तू काळजी नगं करु."आसं म्हणून नाना गावाकडं पळाला आणि गावातली माणसं घेऊन आला.मग आज्ज्याला आन् सायकलीला गावकऱ्यांनी दोरखंडानी बाहेर काढला.त्या कोरड्या हिरीत पडला तरी आज्ज्याला थोडीसुद्धा जखम झाली नव्हती.आन् सायकल पण हाय तशीच व्हती.पाव्हणं वो पाव्हणं आली बघा तुमची शेरवाडी." ड्रायव्हर ट्रक थांबवित म्हणाला.तसा दत्तुआबा भानावर आला.ड्राव्हरला पैसे देऊन तो खाली उतरला आणि आपल्या घराची वाट चालू लागला.
रात्र अधिकच घट्ट झाली होती.रातकिड्यांची किरकिर त्या शांत वातावरणाची उग्रता आणखीणच वाढवीत होती.घरट्यातील पाखरं मुकी झाली होती.समोरचा डोंगर त्या अंधारात भयाण दिसत होता.गडद काळोख त्याच्या उरात शिरला होता.ट्रक ड्रायव्हरची गोष्ट अजूनही दत्तुआबाच्या कानात घुमत होती.त्या वाटेवरून तो दबकत चालत होता.त्याच्या पुढे अंधार घुटमळत होता.मध्येच एखादा धोंडा पायांना धडक मारीत होता.त्यामुळे तो ठेचकाळत होता व पुन्हा स्वत:ला सावरीत पुढे जात होता.एक मोठे वळण वळून तो पुढे आला आणि त्याच्या मागे हलकी कुजबूज झाली.त्याने मागे पाहीले मागे कुणीच नव्हते.तो पुन्हा चालू लागला.थोडे पुढे गेल्यावर त्याला पुन्हा आपल्या मागे कसलीतरी चाहूल लागली.त्याने परत मागे पाहीले आणि त्याच्या काळजात भयाची लाट उसळली.सरसरुन भितीचा काटा अंगभर उठला.कंठ सुकला.जीव गोठल्यासारखा झाला.त्याच्या पासून काही अंतरावर एक सावली उभी होती.त्याला काय करावे हेच सुचेना.काही क्षण त्या अवस्थेत गेल्यानंतर उरला सुरला धीर एकवटून दत्तुआबा म्हणाला,"कं...कोण हाय?" "तू कोण हाय?"त्या सावलीने उलट विचारले.दत्तुआबा म्हणाला'"मी...मी आबा.""मी पण आबा" असे ती सावली त्याला म्हणाली आणि दत्तुआबा जागीच सुन्न झाला.आता आपलं काय खरं न्हाय.हे भूत आपला नक्कीच घात करणार असे समजून त्याने गावाच्या दिशेने जोरात दौड मारली.तेंव्हा त्याला पळता भुई थोडी झाली होती.
सकाळ झाली. सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र उधळली.हिरव्या झाडांवर पाखरं नाचू लागली.विहीरीवर,पाणवठ्यावर पाण्यासाठी झुंबड उडाली.वसंतराव आपल्या घरातून बाहेर पडले.ते गावात आले.मारुतीचे दर्शन करुन त्यांनी समोरच्या दुकानातून वर्तमान पत्र घेतले व चावडीतल्या पाराजवळ आले व त्या पारावरती बसून वर्तमान पत्र वाचू लागले.हळू हळू पारावरती लोकं जमू लागली.पाच सहा लोकं जमली तेंव्हा तिथे दत्तुआबा आला आणि त्याने पारावरती बैठक मारली आणि आपल्या बाबतीत काल रात्री घडलेला भयंकर प्रकार त्या मंडळींना सांगू लागला.तेंव्हा वसंतरावही तो प्रकार ऐकू लागले.बऱ्याच वेळानंतर दत्तुआबा बोलायचा थांबला.सगळी मंडळी गप्प झाली.काही मनातून भ्याली.वसंतराव शांतपणे हातातील वर्तमान पत्राची घडी करीत उठले.ते दत्तुआबाजवळ आले व त्याला म्हणाले,"तुला बघायचयं का त्ये तुला राती दिसल्यालं भूत?"दत्तुआबाने कशीबशी मान हलवीत होकार दिला.मग वसंतराव त्याला म्हणाले'"मीच त्ये भूत."क्षणभर तिथे शांतता पसरली.पुन्हा वसंतराव म्हणाले."राती मी तुझ्यामागनी चालत येत व्हतो.बघावं म्हणलं पुढं कोण चाललयं त्ये. तेवढीच सोबत व्हईल पण तू तर भिऊन पळतच सुटला की रं."हे ऐकून दत्तुआबाने चेहरा कसनुसा केला.त्याची झालेली फजिती ऐकून व दत्तुआबाचा पडलेला चेहरा पाहून ती मंडळी पारावरती आडवी तिडवी पडून पोट धरुन हसू लागली.दत्तुआबाने हळूच वरती पाहिले तेंव्हा त्याला पारावरच्या पिंपळाची पाने सळसळून हसल्याचा भास झाला.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त !!
भाऊ कदम ची एक शॉर्ट फिल्म आहे तूनळी वर " भुताचा जन्म" बघा !!