नुकतीच पाहिलेली काही लग्ने

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2017 - 11:32

नुकतीच चार लग्ने पाहिली. चारही लग्नांमध्ये जुन्या काळापासून चालत आलेल्या बहुतेक रुढी (वरमातेचे पाय धुणे वगैरे) एखाद्या उत्सवाप्रमाणे पाळल्या गेल्या. उत्सवाप्रमाणे म्हणजे असे की ज्या गोष्टीवरून पूर्वी रुसवे फुगवे होत असत (पायच धुतले नाहीत ह्यावरून मुलाकडच्यांनी रुसणे किंवा माझ्या आईला पाय धुवायला लावले ह्यावरून मुलीने रुसणे वगैरे) ती गोष्ट आता एक मजेशीर प्रथा म्हणून मोठ्या उत्साहाने पाळली जाते की काय असे वाटावे इतक्या थाटात साजरी करण्यात आली. ह्याशिवाय कार्यालयात येताना मुलाला फुलांच्या गालिच्यावरून चालत आणणे, त्याचे पहिले पाऊल पडताच मुलीकडच्यांनी टाळ्यांचा कडकडाट करणे, तुतार्‍या वाजणे, मुलीला डोलीत बसवून आणणे, मुहुर्ताची छापील वेळ अजिबात न पाळता केव्हाही लग्न लागणे वगैरे गोष्टीही पाहिल्या. मुहुर्ताच्या वेळेचे माझ्यामते महत्व इतकेच की निव्वळ अक्षता टाकायला म्हणून आलेल्यांचा जो खोळंबा होतो त्याची काही चिंताच नसणे हे घातक आहे. गुरुजींशिवाय उत्साही महिलांनी मंगलाष्टके म्हणणे हे खूप जुने झाले आहे पण तरीही तितकेच वैतागवाणे आहे. एक महत्वाचा भाग म्हणजे पैशाची अभूतपूर्व उधळपट्टी ह्या सर्व विवाह समारंभात प्रकर्षाने जाणवली.

अ‍ॅड सुप्रिया कोठारी म्हणून एक परिचित वकील आहेत त्यांनी एकदा सांगितले होते की आजच्या पिढीतील 'नवजात'पती-पत्नी हे विवाह टिकवण्याबाबत पूर्वीच्या पिढ्यांइतके गंभीर नसतात व त्याचे परिणाम सहजपणे दिसूनही येतात. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये 'विवाहसंस्थेबाबत'असलेले एक भय म्हणा किंवा तीवरील अवलंबित्व म्हणा किंवा विश्वास म्हणा, कशानेतरी लग्न टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले तरी केले जात असत. पण ह्या वकील बाईम्च्या मते आजकालच्या मुलामुलींचे प्री-मॅरेज काऊन्सेलिंग झालेले असूनही व घरातील वातावरण आणि संस्कार 'नॉर्मल'असूनही ह्यांची लग्ने टिकतील असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. अगदी लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी, इथपासून ते वर्ष दोन वर्षात विवाहबंधन झुगारून दिल्याची अनेक उदाहरणे त्यांनी पाहिलेली आहेत. (तो त्यांच्या व्यवसायाचा एक भागही आहेच).

आता सुमारे वीस ते पंचवीस लाख खर्च, जुन्या प्रथांना अधिक उत्साहाने व कौतुकाने कवटाळणे, नवनव्या प्रथा आणणे आणि वधुवरांना वैवाहिक आयुष्य सुरू केल्यानंतर राहणीमान उंचावायला विशेष काही संघर्षच करावा लागणार नाही इतक्या भेटी वगैरे देणे हे सगळे झाल्यानंतर जर ते लग्न मोडले तर काय हशील?

लग्न व्यवस्थित राहिले तरी ह्या खर्चाबाबत वाढती बेफिकीरी येत आहेच.

एवढे करून आधीच्या पिढीच्या तुलनेत ह्या आत्ताच्या वधूवरांना वैवाहिक आयुष्य आरंभ केल्यानंतर खूप वेगळे कौटुंबिक वातावरण देऊ केले जाते असेही नव्हे! फार तर राहणीमानात फरक असेल, पण सासू, सासरे, दीर, नणंद वगैरे घटक जे पारंपारीकरीत्या (बहुतेक वेळा) शत्रूपक्षात मोडतात ते सगळे तसेच्या तसे आजही आहेतच. त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या नुसत्या असण्यामुळे वाढणारा ताणतणाव, मानसिक समस्या, घुसमट, कुटुंबे विभक्त होत जाणे हे सगळे तसेच होत आहे. अवाढव्य खर्च करून एकच दिवस नाचण्याऐवजी तो पैसा घालून वधूवरांना स्वतंत्र राहण्यासाठी एखादे निवासस्थान बूक करून दिले तर बिचारे आनंदात तरी सोबतीचे आयुष्य सुरू करतील. शिवाय, मुलगी आपल्या क्षेत्रात भले डॉक्टर किंवा कोणीही मोठी पदस्थ असो, लग्नात ती शोभेची वस्तू आणि नजरा झेलत बसणारी बाहुलीच ठरते.

ह्याशिवाय एक वेगळेपण जाणवले ते असे! पूर्वीच्या लग्नांमध्ये फोटोग्राफर हा बर्‍यापैकी लक्झरीत मोडणारा आणि त्यामुळे थोडा अदब राखून वागणारा मनुष्य असे! आजकाल फोटोग्राफर्स हे गुरुजींच्या वरताण आवाजात बोलत सूचना देत असतात. प्रसंगी त्यांच्याकडून काही उपस्थितांचा नकळत अपमानही होतो. पण अत्युत्कृष्ट अल्बम असण्याला जे महत्व प्राप्त झालेले दिसते त्याच्यापुढे उपस्थितांची किंमतही घटत चालली आहे. बिदाई (!) सारख्या हळव्या प्रसंगीही फोटोग्राफर्स अत्यंत रुक्ष पद्धतीत सूचना देऊन त्या प्रसंगातील हवा काढून घेतात. आईच्या गळ्यात पडावे असे वाटणारी मुलगी तेव्हाही कसेबसे हसत असते.

फुलांच्या सजावटीवर झालेला खर्च असाच अमाप असतो. बुफे पद्धतीने अन्न ठेवण्यामुळे ते वाया जात नाही असे काहीच नाही. परत कोण रांगेत येणार किंवा 'काय माहीत आपण कदाचित तीन वडे खाऊही'असे वाटल्यामुळे अनेकदा जास्तच वाढून घेतले जाते. वाया गेलेले अन्न आणि पाच-पाचशेच्या घरात असलेली एक प्लेट ही भव्य उधळण पाहून डोळे दिपतात.

पूर्वीपेक्षा स्वच्छता वाढलेली आहे, सोयी वाढल्या आहेत आणि एवढ्या-तेवढ्यावरून कांगावा करणे घटले आहे हे सोडले तर आजकालचे विवाह सोहळे म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन, निव्वळ नावासाठी केलेला अनाठायी खर्च आणि कोणत्याही मूर्ख प्रथेपासून सुटका न झालेला असा सोहळा ठरतो.

हे सगळे खूप चुकीचे चाललेले आहे असे फार वाटत राहते. पै पै साठवून आणि कर्ज काढून घेतलेल्या टीव्ही, फ्रीज सारख्या वस्तू आठवू लागतात. आपल्यापेक्षा नवीन पिढीला सगळे आधीच किंवा त्वरीत मिळते ह्याचा हा मत्सर नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील छोटे छोटे आनंदच काढून घेण्याचा हा प्रकार वाटतो. त्यातल्यात्यात एक बाब जरा बरी वाटते की झालेल्या बर्‍यापैकी जागृतीमुळे म्हणा किंवा कशाहीमुळे असेल पण मुलाकडचे लोक अगदी पूर्वीच्यांइतका आडमुठेपणा करताना आढळत नाहीत. बर्‍यापैकी समजदार आहेत असे दिसते. तसेच, हल्ली खर्च अर्धा अर्धा विभागण्याचे प्रमाणही बर्‍यापैकी आहे / असावे.

पण तरीही केली जाणारी उधळपट्टी, वधूवरांच्या आयुष्यातील लहान लहान आनंद हिरावून घेऊन त्यांना एकदम उत्तम राहणीमान देऊ करणे, जुनाट निरर्थक प्रथा उत्सवासारख्या पाळणे आणि एवढे करूनही वैवाहिक नाते भक्कम होईल ह्यासाठी वेगळे काहीच न केले जाणे हे सगळे अचाट आहे.

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याशिवाय कार्यालयात येताना मुलाला फुलांच्या गालिच्यावरून चालत आणणे, त्याचे पहिले पाऊल पडताच मुलीकडच्यांनी टाळ्यांचा कडकडाट करणे, तुतार्‍या वाजणे, मुलीला डोलीत बसवून आणणे, मुहुर्ताची छापील वेळ अजिबात न पाळता केव्हाही लग्न लागणे वगैरे गोष्टीही पाहिल्या.>> अगदी अगदी Lol

लग्नाचा सोहळा होण्यास हरकत नाही पण आपण किती खर्च करतो आहोत याचे भान नक्कीच असायला हवे. आणि मुहूर्त पाहून लग्न करणार असाल तर तो पाळावा, अर्थात जर मुहूर्त फक्त एक रीत म्हणून लिहीला असेल तर मात्र पाहुण्यांची चिंता करून सगळे लवकर लवकर आवरावे Wink

चांगले लिहिले आहे.

अवाढव्य खर्च करून एकच दिवस नाचण्याऐवजी तो पैसा घालून वधूवरांना स्वतंत्र राहण्यासाठी एखादे निवासस्थान बूक करून दिले तर बिचारे आनंदात तरी सोबतीचे आयुष्य सुरू करतील. शिवाय, मुलगी आपल्या क्षेत्रात भले डॉक्टर किंवा कोणीही मोठी पदस्थ असो, लग्नात ती शोभेची वस्तू आणि नजरा झेलत बसणारी बाहुलीच ठरते. >>> काही बिचारे नसतात....काही जोडप्यांचे स्वतंत्र रहायचे कि एकत्र कुटुंबात, कुठे -कसे ते आधिच ठरलेले असते/असू शकते.
तसेच मुलींना आवडते लग्नात छान नटायला, लग्नाच्या कितीतरी दिवस आधिपासून त्यासाठी तयारी सुरु होते. त्या जर हे सगळे आनंदाने करत असतिल तर बाकिच्या लोकांनी त्यांना शोभेची वस्तू म्हणून बघू नये. तसेही त्यावेळी कोण आपल्याकडे कसे बघते आहे याकडे त्यांचे लक्ष्य नसतेच Happy

बेफि छान निरीक्षण,

आमच्या पुण्यात आता मुंजीपण याच वाटेवर चालल्या आहेत,
खाऊवाले पाटणकरांची तर इव्हेंट मॅनेजमेंटवाला आर्म पण सुरू झालाय,
गुरुकुल मुंज, वेदशाला मुंज , पेशवाई मुंज वगैरे पॅकेजेस असतात,
तुमच्या बजेट प्रमाणे चाणक्यापासून कोणीही स्टेज वर बटूला उपदेश द्यायला येतो.
आणि आता काही लोकांना मुलींची मुंज करणे पटायला लागल्यापासून याचा बिझनेस डबल झाला आहे Happy
करायचीच असेल तर ,थोडक्यात मुंज आटपून उरलेले पैसे बटू च्या शिक्षणासाठी ठेवा म्हणावं, ती खरी मुंज होईल.

बेफिकीर, तुमचे निरीक्षण विचार करण्याजोगे असले तरी किमान मला तरी त्यात आताच्या पिढीकडे असणारी संपन्नता, पैसे खर्च करण्याची वाढलेली कुवत ह्याबद्दल "आमच्यावेळी असं नव्हतं बुवा" असा सूर जाणवला.
लग्न म्हणजे एक परफेक्ट "शो" असला पाहिजे ह्या विचारसरणीची मीही नाही पण वर सोनाली ने म्हंटल्याप्रमाणे तशी हौस असेल वर वधूंना, त्यांच्या फॅमिली ला तर आपण का बरं आक्षेप घ्यावा. हां आता ह्या शो बिझीनेस पायी कदाचित बेशिस्त कारभार होत असेलही पण मला असं वाटतंय की तुमचा समारंभ किती "showy" आहे ह्याचा त्या बेशिस्तीशी काही संबंध नाही. जी माणसं शिस्तप्रिय असतात ती कुठेही तशीच असतात.

लग्न हा एक मोठा कार्यक्रम असतो ज्यात अनेक व्हेन्डर्स, अनेक एन्टिटीज् (उदा. भटजी) किंवा इव्हेन्ट मॅनेजमेन्ट वाल्यांनीं आणलेला भाडोत्री चाणक्य इत्यादी, ह्या सगळ्यांचं को-ऑर्डिनेशन जुळून येणं कठिण असेल. मी हे म्हणत नाही की ते शक्यच नाही पण ह्यात ह्या सगळ्या लोकांनीं अत्यंत व्यावसायिक असणं गरजेचं आहे जे कितपत शक्य असेल (जनरली च आपल्याकडची एकूण व्यावसायिकता बघता) ह्याबद्दल मला शंका आहे. मला असं वाटतं कदाचित ह्या करणानेच पाश्चिमात्य देशांतली (तुम्हाला हे उदाहरण कदाचित आवडायचं नाही Happy ) लग्न ही अतिशय मोजून मापून असतात. तुम्ही किती लोकं घेऊन येणार, काय खाणार , काय वेळेला तुम्ही उपस्थित असलंच पाहिजे आणि तुम्हाला ज्या प्रकारचं आमंत्रण आहे त्या आणि केवळ त्या समारंभातच तुम्ही सहभागी होऊ शकता अशी अपेक्षा असते. ह्या सगळ्या कन्ट्रोल्ड एव्हेन्ट मॅनेजमेन्ट मुळे तुम्ही हे वर जे वेळ न पाळणे, अन्न वाया जाणे इत्यादी लिहीले आहे त्यावर निर्बन्ध येतात. पण त्याचबरोबर आपल्या स्वभावाला हे झेपत नाही. त्यात आपलेपणा वाटत नाही. खरंतर विचार करता पाचशे-हजार लोकांचं लग्नसमारंभात हजर असणं किती गरजेचं आहे. पण आपल्याकडची लग्नं ह्याच स्केलची असतात आणि अशा समारंभात सगळंच्या सगळं कडक शिस्तीत पाळलं जाणं कितपत शक्य आहे? Happy

बाकी राहता राहिला लग्न टिकण्याचा प्रश्न तर परत एकदा लग्नाचा सोहोळा किती मोठा होता किंवा त्यात हौसेने सगळे विधी पार पाडले किंवा नाहीत ह्यांचा संबंध आहे का खरंच?

हे फेसबुक ला टाकलेत तर

तुम्हाला बरोबर आमच्या हिंदू प्रथा दिसतात, दम असेल तर मुस्लिम किंवा खिरचन लग्नाबद्दल बोलून दाखवा

पासून सुरुवात होईल.

चांगली निरीक्षणे, पण अजून एक निरीक्षण माझे की रजिस्टर लग्न करून नंतर पॉश हॉटेलात सगळ्यांना पार्टी देणे. यात विधींना फाटा दिला जातो,बाकी सगळे तेच सुरू असते जे वर बेफिनी लिहिले आहे

Just on a lighter note... आता कार्य आहे घरच..तर मग होउ द्या खर्च....!!! Lol

ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करुन ऐश केली तर ठीक, पण हे सर्व करायला, खानदानची इज्जत राखायला लोन काढून हे सगळे प्रकार करणे योग्य आहे का?
बरेच तरुण आधीच होमलोनच्या ओझ्याखाली दबलेले असतात, त्यात निव्वळ समाजातील स्टेटस जपण्यासाठी अजुन टॉप अप लोन काढून असा अमाप खर्च केला जातो.

फोटोग्राफी म्हणाल तर नुसती लग्नाची नाही, तर प्रि वेडींग शुट, एन्गेजमेंट शुट, हल्दी शुट, हळदीचा विडीओ वगैरे प्रकार पण आलेत, त्यात विडीओ युट्युबवर अपलोड करणे, रोज व्हाट्साप वर प्रीवेडिंगचा DP ठेवणे, त्यावर कविता, शेर असे photoshop ने उमटवणे असे चिक्कार प्रकार असतात.
त्याच लोनच्या पैशातुन मग फोरेनला हनिमुन, हनिमुनचे फोटो (म्हणजे साईटसिईंगचे Happy ) facebook वर अपलोड करतात. हे नुसते sightseeing चे फोटोपण professional photographer करुन काढल्यासारखे असतात. (खरंच तिथे असे professional photographer असतात की इथुनच घेऊन जातात Uhoh )

पूर्वी चाळीच्या छोट्या घरात आठ आठ दहा दहा माणस कशीतरी राहत असत. चांगले चार कपडे, पायात चपला ह्या चैनीच्या गोष्टी होत्या . मुलं म्युन्सिपालटी च्या शाळेत शिकत, म्युन्सिपालटी च्या हॉस्पिटल मध्ये माणसं ऍडमिट होत, आज होतात का ? सगळंच बदललं आहे आणि मला ते गैर ही वाटत नाही . आपलं राहणीमान पन्नास वर्षपूर्वी होत तसं आहे का, नाही ना , मग आज लग्न पन्नास वर्षांपूर्वी होत असे तसं असाव अशी का अपेक्षा ? ऐपत आणि मुख्य म्हणजे इच्छा असेल तर चार पैसे खर्च करून चांगल्या आठवणी जमवायला काय हरकत आहे ?

वरची सिंबांची मुंज पोस्ट वाचून पोट फुटेस्तो हसलो. सगळ्यात भारी पेशवाई, गुरुकूल, वेदशाळा पॅकेजेस Happy

लोकं लग्नावर खर्च करतात कारण ते जन्मात एकदाच होते.

जर कुटुंबसंस्था मोडीत निघाली, लग्न केले तर केले, नाय तर नाही. हवे तेव्हा सोडले, नव्या जोडीदाराला पकडले. वगैरे प्रकार समाजाच्या अंगवळणी पडले आणि लग्न म्हणजे आयुष्यातील काहीतरी स्पेशल गोष्ट अशी फिलींग निघून गेली तर नाही करणार लोकं खर्च.

म्हटलं तर एवढे सिंपल आहे हे.

सध्या आपल्या समाजाला तिथवर पोहोचायचे आहे, म्हणून मी तर बाबा करणार माझ्या लग्नाला मजबूत खर्चा.

बाकी प्रथा परंपरा म्हणाल तर ते श्रद्धा अंधश्रद्धेसारखेच आहे. लोकं स्वत: जे पाळतात ते त्यांना बरोबर वाटते ईतरांच्या हास्यास्पद.

मी तर हल्ली या विषयावर वादच घालणे सोडून दिले आहे. माझे विचार जरा जास्तच आधुनिक असल्याने फार कमी लोक तिथवर पोहोचले आहेत. त्यांना नाही झेपत माझे विचार. उगाच लोकं दुखावली जातात Sad

पैसा असेल तर करेल ती हौस. फक्त हे सर्व करण्यासाठी कर्ज काढू नये किंवा मुलीच्या घरच्यांना कर्ज काढायला लागू नये हीच इच्छा. झेप्त असेल तर करोडो रुपये खर्च करुन लग्न केले तरी काय हरकत आहे. बाकी लोक फक्त एका दिव्साच्या मजेसाठीच तिथे असतात हे लक्षात ठेवले पाहीजे.

कर्ज काढण्याचे बरेच जणांनी लिहिले आहे. पण त्यात फार गैर नाही. म्हणजे तुम्ही कार लोन घेऊ शकता मग लग्नाला वा हनीमूनला लोन घेतले तर काय फरक पडतो. साधे ओवन एसी टीव्ही फ्रिज या चैनीच्या वस्तूही लोकं ईन्स्टॊलमेंटवर घेतातच ना. मग इथे मौज फक्त हनीमूनच्या काही दिवसांचीच आहे म्हणून कर्जाला विरोध का?

हे फक्त तुलनेसाठी लिहिले आहे. पर्सनली मला हनीमून हेच एक फॅड वाटते हे मी मागेच एक धागा काढून लिहिले आहे.

लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?
https://www.maayboli.com/node/62579

ऋन्मेऽऽष :: लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?
>>>>>>>>>>>>>
अजीबात नाही.. मधुचंद्र वर होणारा खर्च याला वायफळ म्हणु नका. मधुचंद्र साठी म्हणुन बाहेर फिरायला जाणे यात काही वावग नाही.
उलत ते फिरायला गेलेल्या छान मेमरीज पुढे खुप आठवतात. या मध्ये दोन्ही जोडप्याना त्यांचा स्वः ताचा वेळ मिळतो. जो काही ४ ते ५ दिवस का असेना. आणि लग्ना नंतर मधुचंद्र खेरीज आपण खुप वेळा फिरायला जावु (as vacation ) पण त्याला मधुचंद्र ची जोड नाही.

आणि हो. माझ्य एका खुप जवळच्या मित्राने बायकोला मधुचंद्र साठी म्हणुन तेव्हा कुठेच घेउन गेला नाही... त्या वरुन वहीनी आजुन ही त्याला टोमणा मारते.. (८ वर्ष व २ मुल झाल्यवर पण). त्या नंतर मित्र बर्‍याच ठिकाणी सह परीवार गेला ( युरोप, इ. एशीया वगैरे ) पण त्याचा काही तेवढा उपयोग नाही. बायको मारायचे ते टोमणे मारतेच... मित्र म्हणतो तेव्हा साध पाचगणी किंवा महाबळेश्वर ला गेलो असतो तरी चालल असत.

मोरपंखी तो धागा तिथे जाऊन वाचा, मुद्दा नुसता शीर्षकात दिलाय तितकाच नव्हता. फिरायला जाणे आणि आठवणी जपणे तसेच पोटाला खाणे यावरचा खर्च कधीच वायफळ नसतो हे माझेही मत आहे.

मुद्दा नुसता शीर्षकात दिलाय तितकाच नव्हता. फिरायला जाणे आणि आठवणी जपणे तसेच पोटाला खाणे यावरचा खर्च कधीच वायफळ नसतो हे माझेही मत आहे. >>>

Got it.. Happy ...

माझं लग्न फक्त १७५ रुपयात कोर्टात झालं.हे असलं फालतु धार्मिक विधी आम्ही केले नाहीत.

आमच्या काळात(वय 40च्या आसपास) 6 आकडी पगार असलेल्या मुलीलापण स्वैपाक करता येतो का, आमच्या घरातले कुलाचार यंव त्यांव करत गळ्यात पडणार्या सासू असायच्या. दीर-जाऊ सोबत नाही पण सासू-सासरे सोबत राहावं लागायचं.

मला वाटतं की माझ्या मुलांच्या पिढीत ( सध्या वय <१५ ) तसं होणार नाही. माझ्या वयाच्या बायका मुलांच्या लग्नात, संसारात नाक खुपसणार नाहीत.

इथे बरेचजण त्या वयाचे आहेत. त्यांचं मत काय?

मला वाटतं की बेफिंना खटकलेला मुद्दा हा आहे की ' लग्न' या घटनेला/समारंभाला जेवढं महत्त्वाचं मानलं जात आहे, तेवढं. ' लग्न' या बंधनाला मानलं जात नाहीये . ( वाढलेले घटस्फोट इ. ).

मुंज हा विधी माझ्या ( आणि माझ्या नवर्याच्याही) मते कालबाह्य झालेला असल्याने आम्ही आमच्या दोन्ही मुलांची मुंज करणार नाही.

तुम्ही लग्नानंतर च्या youtube video बद्दल नाही लिहिलेत. मी आत्तापर्यंत एकच बघितलाय. पूर्ण लग्न झाल्यावर बहुतेक नवपरिणितांनी चल, आता आपण लग्न-लग्न खेळू! टाईप होता तो video! मला तो कृत्रिम video बोर झाला.
एकीने मस्त before marriage video केला होता, तो छान होता. एकदम stylish, sentimental, cute वैगेरे. मी नवऱ्याला म्हणाले पण आपण एकमेकांना ओळखत नव्हतो म्हणून आपली अशी काही हौस झाली नाही.

परडवत आणि हौस असेल तर काय हरकत आहे Happy

छान निरीक्षण.. लेख पटला..
पूर्वीपेक्षा स्वच्छता वाढलेली आहे, सोयी वाढल्या आहेत आणि एवढ्या-तेवढ्यावरून कांगावा करणे घटले आहे हे सोडले तर आजकालचे विवाह सोहळे म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन, निव्वळ नावासाठी केलेला अनाठायी खर्च आणि कोणत्याही मूर्ख प्रथेपासून सुटका न झालेला असा सोहळा ठरतो.
त्यातल्यात्यात एक बाब जरा बरी वाटते की झालेल्या बर्‍यापैकी जागृतीमुळे म्हणा किंवा कशाहीमुळे असेल पण मुलाकडचे लोक अगदी पूर्वीच्यांइतका आडमुठेपणा करताना आढळत नाहीत. बर्‍यापैकी समजदार आहेत असे दिसते. तसेच, हल्ली खर्च अर्धा अर्धा विभागण्याचे प्रमाणही बर्‍यापैकी आहे / असावे.
जुनाट निरर्थक प्रथा उत्सवासारख्या पाळणे आणि एवढे करूनही वैवाहिक नाते भक्कम होईल ह्यासाठी वेगळे काहीच न केले जाणे हे सगळे अचाट आहे.
हे मुद्दे विशेष पटले.

एकीने मस्त before marriage video केला होता, तो छान होता. एकदम stylish, sentimental cute वैगेरे. >>
हल्ली खूप जणांचे असतात. छान वाटतात बघायला, पण त्यातही आता त्याच त्याच पोझेस असतात. ( वराने वधूच्या कपाळाचा किस घेणे वगैरे Lol ) कुठून आणणार नावीन्य!!

नावीन्य??? यु ट्यूब बघा,
सैराट फेमस झाला तेव्हा त्याच्या गाण्यावर केलेले pre wedding शूट चे किमान 3 विडिओ पाहिलेत मी,
एक अगदी त्या त्या लोकेशन वर जाऊन केलेला,
दुसरे व्हिडीओ म्हणजे ऍक्शन त्याच पण लोकेशन वेगळे,

नावीन्य की कमी नही दुनिया मै गालिब, हौस होनी चाहिये Happy

सैराट फेमस झाला तेव्हा त्याच्या गाण्यावर केलेले pre wedding शूट चे किमान 3 विडिओ पाहिलेत>> हे नावीन्य आहे?

सैराट फेमस झाला तेव्हा त्याच्या गाण्यावर केलेले pre wedding शूट चे किमान 3 विडिओ पाहिलेत मी,
एक अगदी त्या त्या लोकेशन वर जाऊन केलेला,
दुसरे व्हिडीओ म्हणजे ऍक्शन त्याच पण लोकेशन वेगळे, >> लॉल Lol

बायकांचं जाऊदेत एकवेळ पण पुरुषपण हे करायला तयार होतात?? Proud

मुंज आत्ता नाही केली तरी लग्नाच्या आधी करावी लागेल. मग यथायोग्य वय असताना केली तर मुलांच्या मुंजीबरोबर आपली पण हौस होते Happy

Pages