पहिल्या भक्त प्रल्हादाचा (बीपी) महिमा!!!

Submitted by स्वप्नील on 8 November, 2017 - 19:21

भक्त प्रल्हादाचा महिमा!!!

"अगं तुझे ते गोल्डन सँडल्स घेतले का? कॅमेऱ्याचा रोल? काल रात्री आणलेली ती औषधांची पिशवी पण घे. अहो, तुम्ही सगळे पैसे एकाच खिशात ठेऊ नका". वडील, सोनू आणि ताईवर सुरु असलेल्या आईच्या प्रश्नाचा आणि सूचनांचा भडीमार नील पलंगाच्या कोपऱ्यावर बसून निमूटपणे बघत होता. घरातले सगळेच त्याच्यावर नाराज होते. "इकडे सगळ्या कुटुंबाने एकत्र बंगलोर- म्हैसूरला जायचं ठरलंय आणि हे महाशय तिकडे कंटाळा येईल म्हणून येत नाही. वयात येतोय तसा शहाणा होतोय हा" असं बोलून वडिलांनी नीलशी आठवडाभर बोलणं टाकलेलं. साहजिकच एका मध्यमवर्गीय कुटुंबात महागड्या 'व्हेकेशन' चा प्लॅन ४-५ वर्षातून एकदाच होतो आणि त्यात जर कोणी जात नसेल तर राग येणं स्वाभाविक आहे. नीलला या सगळ्याची जाणीव होती पण वडिलांनी म्हंटल्याप्रमाणे 'वयात' येणारा नील त्या एका आठवड्याच्या स्वातंत्र्याची चातकाप्रमाणे डोळे लावून वाट बघत होता.

बॅगा पॅक झाल्या आणि दाराबाहेर येऊन उभ्या टाकल्या. आई नीलला जवळ घेऊन म्हणाली "साखरेच्या डब्ब्यात १०० रुपये ठेवले आहेत. गरज लागली तरच वापरायचे. मला आल्यावर हिशेब लागेल. बाकी जेवणाचं वगैरे आजी बघून घेईल". आईच्या पाणावलेल्या डोळ्यात त्या व्हेकेशनच्या आनंदापेक्षा नील कसा एकटा राहील याचीच चिंता होती. हे जाणून नील म्हणाला "अगं, मी काय लहान नाही आता. काळजी घेऊ शकतो स्वतःची". आई "हो माहितीये” म्हणत घराबाहेर आली. रिक्षा उभीच होती. सगळे त्यात बसले. वडिलांनी रागातच चोरक्या नजरेने नील कडे बघत "काळजी घे रे" असं मनात म्हंटलं. आईने नीलला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवून बोटं मोडली. रिक्षा निघाली आणि नील ती धूसर होईपर्यंत बघत राहिला.

नील निमूटपणे घरी आला. दार बंद केले. सुन्न झालेल्या घरात चोहीकडे नजर फिरवून आरशात बघून हसला. अंगात अचानक संचारलेल्या ऊर्जेने त्याला कासावीस केलं. आनंदाची एक जोरदार किंचाळी फोडावीशी वाटली पण त्याने ती इच्छा मारून टाकली. घरातली ती शांतता जणू काही त्याच्या स्वातंत्र्याच्या स्वागतासाठी ढोल-ताशाच वाजवत होती. दुपारभर घरीच पाय पसरून टीव्ही बघण्याचा प्लॅन त्याने केला. एरवी ज्या चॅनेल्सचा नंबर चुकूनही दाबला तर चपराक पडायची अशी चॅनेल्स आज तो बिनधास्त बघणार होता. 'फॅशन टीव्ही' पासून 'स्टार मुव्हीज' पर्यंत आणि 'चॅनेल व्ही' पासून 'एम टीव्हीवर' लागणाऱ्या इंग्लिश गाण्यापर्यंत - नुसता सपाटा लागणार होता. पण वर्ल्ड कप फायनल मध्ये चुरशीचा खेळ चालू असताना तेंडुलकर आऊट होऊन सगळ्यांची जशी निराशा होते तशीच घरची लाईट 'आऊट' झाली आणि नील संतापला. त्याने MSEB ला दोन-चार शिव्या ठोकून सायकल काढली आणि मित्रांना भेटायला निघाला. नेहमीच्या सवयीप्रमाणे घरात आई आहे असं समजून तो दाराला कुलूप लावायचं विसरला….

बिर्ला कॉलेजच्या शेजारी असलेल्या प्रदीपच्या फोन बूथवर नीलच्या मित्रांचा अड्डा होता. नील, मंदार, प्रमोद, शशी, किरण, संज्या आणि प्रदीप असा "हम सात-सात है" चा त्यांचा ग्रुप होता. शाळा-कॉलेजातल्या गप्पा, प्रेम प्रकरणं (दुसऱ्याची कारण यांची फक्त विफल), अण्णाच्या गाडीवरचा एकत्र नाश्ता असा नेहमीचा ठरलेला बेत. नील तिकडे पोहचला. हळू हळू सगळेच तिकडे जमा झाले आणि नीलच्या मोकळ्या घरामध्ये 'वयात' आलेल्या या मुलांनी त्यांचा पहिला भक्त प्रल्हाद (BP) बघण्याचा प्लॅन केला. १० रुपये व्हीसीआरचं भाडं, १० रुपये कॅसेटचं भाडं आणि १०० रुपये डिपॉझिट असं १२० रुपयांची तरतूद करायची होती. वेळेचं गांभीर्य बघता नीलने “गरज लागली तरच वापरायचे“ असं सांगून आईने दिलेल्या १०० रुपयांना डिपॉझिट देण्याचा विडा उचलला. उरलेले पैसे मिळून टाकू असं एकमताने ठरलं. दुसऱ्या दिवशी चौकातल्या सगळ्या बायका दुपारची झोप काढत असतानाचा शोटाइम ठरला. "हम सात-सात" ने "साथ-साथ" बनवलेला प्लॅन चांगलाच रंगला.

नील अगदी आनंदात घराजवळ आला पण बघतो तर घराचं दार उघडं! सायकलला अचानक ब्रेक मारून तो दाराबाहेर उभा राहिला. तेवढ्यात शेजारच्या परब काकू बाहेर आल्या आणि म्हणाल्या "काय रे नील, दार लावून जाता येत नाही? चोरी झाली असती तर? जा तुझा मामा बसलाय आत". रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन आलेल्या मामाने नीलची चांगलीच उजळणी घेतली. शिवाय "मी मध्ये मध्ये चक्कर टाकत जाईन. २-३ दिवस माझं काम याच परिसरात आहे" म्हणून बजावणीही केली. उघड्या ठेवलेल्या दाराला न लावलेलं कुलूप नीलच्या तोंडाला चांगलंच बसलं आणि त्याची बोलती बंद झाली.
….
उद्याचा दिवस उजाडला. नील मस्त तयारी करून वरातीत घोडयावर बसण्याची वेळ कधी येतेय अशी आतुरतेने वाट बघणाऱ्या नवरदेवासारखी दुपारच्या २ वाजण्याची वाट बघत होता. बाकी मित्रांनी व्हिसिआर आणण्याची जबाबदारी स्वीकारली होती. घराच्या बाहेरच्या खोलीत येऊन चौकातली सद्यस्थिती नील बघू लागला. पहाटे ५ पासून उठलेल्या बायकांचा दुपारचा "डुलक्या" प्रोग्राम चालू होता. २-४ लहान मुलं सोडली तर मैदान मोकळं होतं. ठरल्या प्रमाणे मित्र त्यांच्या कॉलेज बॅग मध्ये व्हिसिआर आणताना दिसले. सायकलच्या कॅरियरला लावलेल्या त्या व्हिसिआरला काही होऊ नये हे जाणून नुकत्याच जन्मलेल्या बाळाची मान धरतात असे सगळे ती व्हिसिआरची बॅग धरून होते. नीलने हळूच दार उघडून त्यांना आत घेतले. किरण ने टीव्हीला कनेक्शनची जबाबदारी स्वीकारली तर इतर मित्र वडा पाव आणि भजीच्या नाश्त्याचे पाकीट उघडू लागले. नीलने घरातल्या खिडक्या, दारं, पडदे, लाईट बंद करून, घरातल्या फॅमिली फोटोवर रुमाल टाकून त्या पहिल्या अनुभवाची वातावरणनिर्मिती केली आणि "Barely Legal" नावाची कॅसेट "Barelyच Legal" झालेल्या किरण ने व्हिसिआर मध्ये टाकली आणि शो सुरु झाला....

...दोन तासांनंतर शो संपला. नीलने दारं, खिडक्या, पडदे उघडले. अचानक आलेल्या उजेडाने मुलांची तंद्री मोडली. त्याने नजर फिरवली तर कोणी आळस देतंय, कोणी कॅसेटचे कव्हर ‘आ’ वासून बघतंय तर कुणी रुमालाने घाम पुसतंय. शो सुरु होण्याच्या सुरुवातीला एकमेकांना खेटून बसलेली मुलं शो संपल्यावर एक एक कोपरा घेऊन बसलेली नीलला दिसली. कदाचित हीच पौगंडावस्था असावी असं त्याला वाटलं. एक निरव शांतता रूममध्ये पसरली आणि सगळे एकमेकांकडे बघून असे काही हसले कि जणू मोठं मिशन पार केलंय. नवीन नवरी माप ओलांडून जशी एका नवीन आयुष्यात भरपूर स्वप्न घेऊन प्रवेश करते तसंच काही आयुष्यातील एका महत्वाच्या टप्प्यावर त्यांची एन्ट्री झाली. एवढ्या दिवसांची 'पोरं' आता 'तरुण' झाली होती.

बाहेर खेळणाऱ्या लहान मुलांचा गोंधळ वाढत होता. 'डुलकी' प्रोग्राम संपवून चौकातल्या बायकांचे संध्यकाळच्या कामाचे रुटीन सुरु होताना दिसत होते. कुणी झाडांना पाणी मारतंय तर कुणी अंगणात चहा पिताना दिसत होते. नील घाबरून मित्रांना म्हणाला "व्हिसिआर रात्री दिला तर चालेल का?". किरण म्हणाला "का रे? अजून एक शो बघायचा वाटतं". नील म्हणाला "नाही रे, बाहेर बरेच लोकं आहेत. हे सगळं घेऊन बाहेर कसं जायचं?" कुणास ठाऊक पण किरण मध्ये हि वेळ मारून नेण्याचं सामर्थ्य कुठून आलं. तो म्हणाला "काही काळजी करू नका. आपण हळूच कल्टी मारू. या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही". नीलने दार उघडलं. सगळ्यांनी मिळून व्हिसिआरची बॅग अलगद सायकलच्या कॅरियरला लावली आणि बाहेर पडले. पण तितक्यात समोर सेकंड शिफ्ट संपवून आलेले शेजारचे परब काका चहा पिताना दिसले. त्यांनी सगळ्यांना पाहिलं आणि नीलला विचारलं "काय रे निल्या. काय चाललंय? त्या बॅगेत काय आहे?" गोंधळलेल्या नीलला घाम फुटला. पायाखालची जमीन सरकली. सायकलचा टायर पंक्चर होऊन हवा बाहेर पडते तशी मित्रांची हवा बाहेर आली. नील म्हणाला "काही नाही काका. ते कॉलेजचे सायन्सचे प्रात्यक्षिकांचे सामान आहे. ते घेऊन चाललोय". परब "डाल में कुछ काला है" ओळखून बॅगपाशी आले. सगळ्या मित्रांना सायकलच्या कॅरियरवर लावलेली बॅग आपलं करिअर कसं उध्वस्त करेल याची नांदी ऐकू आली. परबांनी ती बॅग काढून घेतली आणि म्हणाले "अरे मूर्खांनो, अशी लावतात का जड बॅग कॅरियरला?" त्यांनी स्वतःने ती बॅग ‘न’ उघडता कॅरियरला घट्ट बांधली आणि "जा" म्हणाले. दाऊद इब्राहिमला पोलिसांनी न ओळखून सोडताना जो काही आनंद होत असेल त्याच्या दुप्पट आनंद नील आणि गॅंगला झाला आणि ढुंगणाला पाय लावून त्यांनी तिकडून पळ काढला.

व्हिसिआर देऊन डिपॉझिटचे १०० रुपये घेऊन नील आणि गॅंग परत येत होते. आपली चांगलीच गोची झाली असती जर परबांनी पकडलं असतं तर असं सगळ्यांना वाटत होतं. त्यात प्रदीपला आपण काहीतरी मोठं पाप वगैरे केल्यासारखं झालं. एका झाडापाशी थांबून तो सगळ्यांना म्हणाला "यार, काहीतरी चूक झाली आपल्याकडून. आपण हे असं काही पाहायला नको हवं होतं. चला मंदिरात जाऊन येऊ”. तारुण्यात नुकतीच शिरलेली मुलं मंदिराच्या नादात मस्त गेलेल्या त्या दोन तासांची मजा घालवतील आणि 'पोरकट' वयात चटकन उडी मारतील हे ओळखून किरणने सगळ्यांना "यार हे काय पाप-बीप नसतं. कधी ना कधी तर बघणारच होतो ना. मग?" असं बोलून समजूत काढली. पण संपूर्ण घटनेच्या संमिश्र भावनेने सतत उनाडक्या करणाऱ्या त्या 'सात-सात' मित्रांचा ग्रुप निःशब्द होऊन रस्त्यावर उभा होता. फिल्म मधले 'ते' सिन आठवावे कि आपल्याकडून काही 'Sin' झालं याचा विचार करावा हेच त्यांना कळेना.

घरी परत आल्यावर पलंगावर पाय पसरून घराच्या छताकडे बघत भक्त प्रल्हादासारखंच आम्हा मुलांना परब काकांनी नरसिंहाचे रूप घेऊन काहीतरी शिकवण दिल्यासारखं नीलला वाटलं आणि पुढे फक्त नेहमीची ‘सभ्य’ चॅनेल्स बघून त्याने उरलेले दिवस आई-वडील आणि भावा-बहिणींच्या आठवणीत काढले.

हा भक्त प्रल्हादाचा महिमाच म्हणावा आणखी दुसरं काय???...!!!

- स्वप्निल पगारे

Group content visibility: 
Use group defaults

Lol मस्त लिहिलंय. टायटलवरून काही क्लिक झालं नव्हतं आधी Happy

maitreyee - तुमच्या कॉमेंटची नोंद घेऊन टायटल बदललं. धन्यवाद!

सिंथेटिक जिनिअस, साधना, वावे, देवकी धन्यवाद!

च्रप्स - हा तो barely legal नाही जो तुम्ही समजलात. हा adult कॅटेगरीमधलाच होता. धन्यवाद! Happy

वा: मस्तं लिहिलंय!!

त्या वयातल्या मुलांची मनस्थिती छान उतरलीय. >>> +७८६.

कॅमेऱ्याचा रोल, M V F tv, खर्चायला ₹१००, टेलिफोन बूथ, सायकल, व्हीसीआर, ₹१० भाडं........अगदी आमच्या जमान्यात फिरवून आणलंत.

छान लिहिलंय.
आधी शीर्षक भक्त प्रल्हाद वाचून बीपीच डोक्यात आलेले. पण वाटले ही खरोखरच्या भक्त प्रल्हादवरचा लेख असेल म्हणून फिरकलो नाही. पण शीर्षकात चेंज करताच आलो वाचायला Happy

सगळ्यांचे बघणे असेच होत असावे.
अश्यावेळी एकापेक्षा जास्त सिनेमे आणून त्यात साधे सिनेमेही आणावेत. कोणी आले तर कॅसेट बदलावी.
अर्थात आता जमानाच बदललाय. व्हॉटसपवर मुले नको नको त्या क्लिप्स नाही नाही त्या वयात सहज बघत असतील.

मस्त लिहिलय.
आमच्या नशिबी तर हे ही नव्हतं कधी. प्रॅक्टीकल झाल्या नंतर असं काही असतं ते समजलं. Lol

Mast!

आमच्या मित्राने त्याच्या लॉन्ड्रीवाल्या मित्राला बीपीची सीडी मागितली,नंतर देतो म्हणाला,त्या यड#₹ ने मित्राच्या आईच्या ड्रायक्लीनींगला दिलेल्या साड्यांमधून बीपी पाठवली .ती नेमकी मित्राच्या आईच्या आणि बहीणीच्या हाती लागली.
बहीणीने सीडी लावल्यावर मित्राच्या आईची दातखीळीच बसली.मित्राला इतक्या कानाखाली मारल्या त्याच्या आईने की मोजताच आल्या नाहीत त्याला.
बाकी आम्ही RHTDM ची सीडी घेऊन ठेवली होती,कुणी आलेच तर उल्लू बनवायला.

प्रॅक्टिकल झाल्यानंतर समजलं तरी चांगले आहे .. फक्त लग्नाआधी समजले म्हणजे बास..
>> अहो लग्नानंतर!! Sad
असले काही शुटींग करत असतील नी कोणी करू देत असेल हा विचारही कधी केला नव्हता! बीपी म्हणजे निळ्या प्रकाशात पप्पी वगैरे वाटले होते. जाऊदे!

दहावीत असतांना ज्या मुलांना पॉकेटमनी वगैरे मिळे, त्या मित्रांचे हे किस्से ऐकले होते. नंतर मुली-स्त्रियांकडे बघण्याच्या त्यांच्या नजरेतला बदलही बघितला, नजर बदलली आहे असे कबुली जबाबही ऐकले.

तर मुली-स्त्रियांकडे बघण्याच्या त्यांच्या नजरेतला बदलही बघितला, नजर बदलली आहे असे कबुली जबाबही ऐकले.
>>>

नेमका काय बदल?

हे यासाठी विचारत आहे की माझ्या स्वत:च्या शालेय जीवनातच बीप्या बघून झालेल्या. गोव्याला मात्र डिप्लोमाला असताना गेलो. एका मित्राचे आजोळ गोव्याला असल्याने तो जाणकार होता. त्याच्या ज्ञानाचा फायदा उचलत नेमक्या अश्या बीचजवळ मुक्काम केला जिथे गोरेचिट्टे फॉरेनर सनबाथ घ्यायला येतात. जे आजवर पडद्यावरच पाहिले होते ते प्रत्यक्षात बघण्याचा योग आला आणि पहिले दोन दिवस आमचे सर्वांचेच ईथे बघावे की तिथे बघावे असे झालेले. रात्री स्वप्नेही सर्वांना सेमच. सागरमधल्या डिंपल कपाडियाज समुद्रातून न्हाऊन माखून येत आहेत आणि सुर्यप्रकाश अंगावर झेलत वाळूशय्येवर झोपत आहेत... असं वाटले की ईंजिनिअरींग अर्धवटच सोडावी आणि ईथेच तेलमालिशची बाटली घेऊन बसावे..

पण तिसरया की चौथ्या दिवसांपासून सर्वांचीच नजर मेली. जसे दादर चौपाटीवर फिरावे तसेच गोव्याच्या बीचवर फिरू लागलो. मान वळून वळून बघणे तर दूर, नजर तिरपी सुद्धा कधी झाली नाही. वयात आल्यापासूनचे जे सुप्त आकर्षण मनात बसले होते ते संपले आणि मुली स्त्रियांकडे बघायची नजर अचानक निर्मळ अन पवित्र झाली Happy

{{{ पण तिसरया की चौथ्या दिवसांपासून सर्वांचीच नजर मेली. जसे दादर चौपाटीवर फिरावे तसेच गोव्याच्या बीचवर फिरू लागलो. मान वळून वळून बघणे तर दूर, नजर तिरपी सुद्धा कधी झाली नाही. वयात आल्यापासूनचे जे सुप्त आकर्षण मनात बसले होते ते संपले आणि मुली स्त्रियांकडे बघायची नजर अचानक निर्मळ अन पवित्र झाली }}}

दिल्ली, पंजाब, हरियाणा, उप्र, बिहार आणि उर्वरित भारतातल्याही सर्व इव्ह टीझर्सना सरकारी खर्चाने गोव्याची सैर घडवायला हवी. गोव्यात इव्ह टीझर्स नसतीलच म्हणा...

धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल!

त्या त्या वयातली ती ती आकर्षणं असतात आणि त्यातलाच माझा हा एक अनुभव होता. काही इतर गोष्टींचा इथे उल्लेख झाला म्हणून वाटलं आपलं मत व्यक्त करावं. ऋन्मेऽऽष ने त्यांचा अनुभव सांगितला. त्याची दुसरी बाजू बिपीन चन्द्र हर यांनी. माझ्या मते फिल्म बघून 'चांगल्या' पेक्षा 'वाईट' गोष्टींच्या आहारी जाणं आपल्या समाजात सहज शक्य आहे. फिल्म (चांगली, वाईट, धार्मिक किंवा अडल्ट) बघून प्रत्येकाने आपली मेंटल sanity वापरून विचार करावा हेच अपेक्षित असतं. उदाहरणार्थ, फिल्म मध्ये दान, धर्म दाखवल्यावर लोकं दान धर्म करू लागतात का? नाही ना!!...मग फक्त अडल्ट फिल्म बघून नजरा बदलणं वगैरे का होतं? हे विकृत प्रवृत्तीचे लक्षण असेल. पण फिल्म मुळे या असल्या गोष्टी प्रभावित होतात या मताशी मी सहमत नाही.

दिल्ली, पंजाब, हरियाणा, उप्र, बिहार ..... तुम्ही ज्या राज्यांची नावे घेतली तिथेच मी काय म्हणतोय आणि तुम्हाला काय म्हणायचेय यातील फरक स्पष्ट होतो. मी म्हणत आहे ते या वयातील भिन्नलिंगीय आकर्षणाबद्दल. जे नैसर्गिक असते. तुम्ही ज्या लोकांबद्दल म्हणत आहात ते पुरुषी अहंकार मिरवत स्त्रीला दुय्यम आणि उपभोगाची वस्तू समजणारयांबद्दल..

उदाहरणार्थ, फिल्म मध्ये दान, धर्म दाखवल्यावर लोकं दान धर्म करू लागतात का? नाही ना!!...मग फक्त अडल्ट फिल्म बघून नजरा बदलणं वगैरे का होतं?
>>> चुकीचं उदाहरण... दान धर्म करून मजा येते का? टीनेजर हार्मोन्स असतात..अडल्ट फिल्म ने नजरा नक्कीच बदलतात.. मुले त्या व्यसनात अडकतात.. हे कटू सत्य आहे.. मग नेहमी बी पी बघणे, जेंव्हा बी पी नसेल तेंव्हा त्याच गोष्टी आणि सीन्स आठवून आनंद घेणे हे प्रकार चालतात.. टीनेजर चा मुद्दा आहे म्हणून सांगतो ..
डी पी एस ची जी क्लिप फेमस झाली होती.. त्याचे मूळ बी पी बघणे हेच आहे.. की आपण पण मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून बघू वगैरे..