स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ६

Submitted by सव्यसाची on 7 November, 2017 - 04:50

आषाढ कृष्ण तृतीया (१२ जुलै) - टाबो

माझ्या गाडीच्या पुढील भागातून काहीतरी कच कच आवाज येत होता. आम्ही वर जाऊन नाश्ता करून येईपर्यंत तज्ञाने दुरुस्त करून ठेवली होती. इतर पण एक दोन गाड्यांची दुरुस्ती त्याने करून ठेवली होती. एकंदरीत आमच्या मंडळाचं नियोजन चांगलं होतं. आज लवकर उठून निघणार होतो कारण आज आम्हाला महत्त्वाचा मलिंग नाला पार करायचा होता. यात कधी कधी खूपच पाणी असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही. इकडे हिमालयात जेवढा उशीर कराल तेवढं ओढ्यानाल्यांना पाणी वाढण्याची शक्यता जास्त असते. कारण उन्हाने बर्फ वितळून पाणी झटपट वाढत जातं. आज मात्र सर्व काही आलबेल होते. आरामात पार करून गेलो. तरीपण उगाचच चलतचित्रण वगैरे केले. जणूकाही फारच कष्टप्रद नाला होता :). आता परत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. म्हणजे गेल्या दोन रात्री राहिलो थंड ठिकाणी आणि दिवसा प्रवास उष्ण वातावरणात. माझ्या शिरस्त्राणाला काच नीट नसल्यामुळे चेहरा रापून निघाला होता. शिवाय गॉगल घालावा लागत होता. त्यामुळे फोटो काढायचा तर गॉगल काढा मग शिरस्त्राण काढा. आणि हा क्रम चुकला की अगदीच मनस्ताप व्हायचा. मला त्या धुरकट दिसणाऱ्या काचेबद्दल काहीतरी करायलाच पाहिजे होते.

आजचा प्रवास जास्तच खडतर होता. खूपच धुरळा उडत होता. ऊन पण मी म्हणत होते. आता आम्ही मुख्य रस्ता सोडून गेयू गुहेच्या दिशेने निघालो. इथे पाचशे वर्ष जुनी, काहीही रासायनिक प्रक्रिया न करता उत्तम राहिलेली नैसर्गिक ममी होती. या रस्त्याला लागलो आणि आभाळ भरून आले. थोडी थंड हवा सुरू झाली. ह्या रस्त्याच्या आजूबाजूचं दृश्य खूपच सुंदर होतं. फारच सुंदर हिरवळ व त्यावर सोनकीची फुले फुलली होती. मन एकदम उल्हसित झाले.

ममीच्या डोक्यावर चक्क थोडे केस आहेत. इथे एक छान सगळ्या गाड्यांचा व माणसांचा असा फोटो झाला. आता आम्ही पुढील निवासस्थानाकडे कूच केले. वाटेत दरड कोसळल्याने ती काढण्याचे काम चालू होते. त्यामुळे जवळपास पाऊण तास थांबून राहावे लागले. मी लगेच रस्त्यालगतच्या खांबाला टेकून एक झोप काढून घेतली. नंतर पुढेही एका ठिकाणी दरड कोसळत होती. दरडीने हळू हळू पूर्ण रस्ता व्यापून आम्ही अडकून पडायची भिती होती. तेंव्हा बारीक बारीक दगड होते म्हणून जा पण पटकन पार करा असा तिथल्या लोकांनी इशारा केल्याबरोबर आम्ही गाड्या सुसाट सोडल्या. जवळपास दोन-अडीच वाजताच निवासस्थानी पोचलो. मग लगेच जेवायला बाहेर पडलो.

टाबो हे गाव तस छोटंसंच आहे. एका चांगल्याश्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. ते बनेपर्यंत आम्ही इथल्या गुहेपर्यंत फेरफटका मारून आलो. आता सपाटून भूक लागली होती. सगळेच जेवणावर तुटून पडले. मग बाहेर आलो तर चक्क पाऊस पडत होता. आणि आमचे मारवाडी मित्र त्या पावसात उघड्याने नाचत होते. हे लोक मजा करण्याच्या बाबतीत कहर होते. त्यांना आम्ही सगळ्यांनीच हसून दाद दिली. आम्ही परत गुहेकडे जाऊन गुहा आतून पाहिली. गुहेच्या जवळच एक प्रार्थना कक्ष नव्याने बांधला आहे. तो फारच मोठा आहे आणि बाजूचे आवारदेखील एकदमच प्रशस्त आहे. कक्षाबाहेर बरेच छोटे लामा मोठ्या लामांकडून संथा घेत होते. बघायला मजा आली. त्यांचा बालसुलभ गोंधळ पण चालू होता. आता खोलीवर परतलो व थोडी झोप काढली. मग असेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्हरांड्यात बसून गप्पा मारत होतो. संध्याकाळ झाली होती. खाली रस्त्यावर गावकरी गाड्यांमध्ये बसून कुठेतरी समारंभाला चालले होते. मी बोलता बोलता माझ्या शिरस्त्राणाच्या काचेबद्दल विषय काढला. अक्षयचे म्हणणे होते की इंधनाने पुसल्यास काच स्वच्छ होईल. बाजूच्याच वरांड्यात आमचे मित्र मदिरापान करत बसले होते. मी म्हटलं मग दारू देखील चालू शकेल. मग मित्रांकडून थोडी दारू टीपकागदावर घेऊन काच पुसली. आणि काय आश्चर्य ! काच खूपच स्वच्छ झाली. आता उद्या कळेल कितपत फायदा झाला ते.

एवढ्यात सुंदर मुलींनी भरलेली एक गाडी आमच्या समोर थांबली. आता सगळ्यांचे लक्ष तिकडे लागले. पण व्यर्थ ! त्या काही आमच्याइथे रहायला आल्या नाहीत. आता अंधार पडला. आम्ही जेवायला म्हणून खाली गेलो. आधी पाऊण तास बाहेर मस्त थंडीत बसून गप्पाटप्पा केल्या. मग दाबून जेवलो. परत गप्पा मारल्या व मग येऊन झोपलो.

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users