स्पिती - मंतरलेले दिवस !

Submitted by सव्यसाची on 2 November, 2017 - 02:20

कोणे एके काळी...

दोन वर्षांपूर्वी लडाखला दुचाकी वरून गेलो होतो तेव्हाच त्या वारीला लागूनच स्पिती खोरे पण करणार होतो. लडाख आणि स्पिती असा दुहेरी वसा घेतला होता. पण काही कारणास्तव तो का पूर्ण झाला नाही, ते तुम्ही माझ्या लडाखच्या प्रवासवर्णनात वाचलेच असेल.
https://www.maayboli.com/node/55605

त्यामुळे लवकरात लवकर स्पिती खोरे करायचेच होते. पण तरी एक वर्ष मधे गेले. मग यावर्षी योग जुळून आला. यावर्षी जमेल असे जेव्हा एप्रिलच्या दरम्यान वाटले तेव्हा लगेच फेसबुकवर जाहीर केले... स्पिती कॉलिंग...! अगदी मागच्या वेळसारखेच अक्षयने लगोलग विचारले कधी जातो आहेस? म्हटलं साधारणपणे जुलैचा शेवट. तो म्हणाला मी पण येणार आहे. चला एक सवंगडी लगेच तयार झाला. मागच्या वेळेस अजयने असाच ताबडतोब प्रतिसाद दिला होता. अतुलला पण यावसं वाटत होतं पण ऐन धंद्याच्या मोसमात जात असल्यामुळे त्याला जमणार नाही हेही माहीत होते. आता तयारीला लागायला पाहिजे होतं. लगेच गुगलबाबाला विचारायला सुरुवात केली. मी नेहमीप्रमाणे मनाली ते मनाली असं वर्तुळ करणाऱ्या मंडळाचा शोध घेत होतो. पण जी कुठली मिळाली, त्यांच्या तारखा नक्की नव्हत्या कारण त्यांच्याकडे पुरेसे लोक नव्हते. त्यामुळे चंदीगड ते चंदीगड असाच प्रवास करावा लागेल असे दिसत होते. यामध्ये अजून एक लक्षात आले की लडाखच्या मानाने स्पितीला नेणारी मंडळे अजूनही खूपच कमी आहेत. म्हणजे या वेळेस मात्र मनाली ते चंदीगड हा प्रवास दुचाकीवरूनच करावा लागणार असे दिसत होते. मागच्या वेळेस ज्या मंडळाबरोबर स्पिती करणार होतो त्यांना विचारले, त्यांनी सांगितले ८ ते १८ जुलै अशी त्यांची स्पिती वारी आहे. मी आधी जुलै शेवट किंवा ऑगस्ट सुरुवात अशा तारखा बघत होतो. पण तसं एकही मंडळ मिळालं नाही आणि नंतर असेही कळले की ऑगस्टमध्ये खूप पाऊस पडू शकतो. मग म्हटले जुलै ठीक आहे. अक्षयची पण तयारी होती या तारखांची. यावेळेस आम्ही तिकडेच दुचाकी भाड्याने घेणार होतो. त्यामुळे दुचाकी इथून पाठवण्याचा प्रश्न नव्हता. हे मंडळ चंदीगड ते चंदीगड करणार होते. यावेळेस माझी तयारी होती मनाली ते चंदीगड दुचाकी चालवायची. अक्षय म्हणाला की त्याला याच भागाचा मागच्या वेळेस चालवून खूप कंटाळा आला होता आणि उन्हाने अगदी हैराण व्हायला झाले होते. तेव्हा आपण शक्यतो मनाली ते मनाली करूया. मग परत मागच्या वेळेसारखे नियोजन सुरू केले. मागच्या वेळेस मी आणि अजय मनालीहून या मंडळाला लाहूरी या गावी भेटणार होतो. यावेळेसही तोच मार्ग घ्यायचा असे ठरवले. मी परत गुगलचे नकाशे पाहून अभ्यास करायला सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नांनी जाण्याच्या पहिल्या दिवसाचे व शेवटच्या दिवसाचे काटेकोर नियोजन झाले. मग इतर दिवसांचे देखील थोडेफार नियोजन करून ठेवले. इतर दिवशी जरी सगळेजण आपल्या बरोबर असले तरी चुकामुक होऊ शकते. तेंव्हा पूर्णपणे अनभिज्ञ राहणे फारच धोक्याचे ठरू शकते.

पहिला आणि शेवटचा दिवस हे आमचे आम्हाला पार पाडायचे होते. मंडळाबरोबर आम्ही असणार नव्हतो त्यामुळे त्याप्रमाणे नियोजन केले. मग त्याप्रमाणे मंडळाचा मुख्य नितीन याच्याबरोबर परत बोलणे केले. मागच्यावेळेसारखच परत त्याला समजावून सांगितलं. GPS स्थान पण दिले आणि अशा रीतीने आम्ही त्यांना कुठे भेटायचे ते ठरले. आता बुकिंग करण्यासाठी परत गुगलबाबाला विचारायला सुरुवात केली. त्याचबरोबर मनालीमध्ये दुचाकी भाड्याने देणारा विश्वासू असा कोणी माणूस मिळतोय का ते बघायलापण सुरुवात केली. अतुलच्या ओळखीमधून एक मनालीमधील ओळख मिळाली. मग त्याला, म्हणजे निशितला फोन करून सर्व काही माहिती मिळवली. मी आधी होंडा युनिकॉर्न मिळतेका याबद्दल बरीच शोधाशोध केली होती. पण ती मिळत नाही. पल्सर, अव्हेंजर मिळते आणि सगळ्यात जास्त बुलेट. बरोबरच्या सगळ्या लोकांची बुलेटच असणार होती. त्यामुळे दुरुस्तीला लागणारे सुटे भाग हे त्यांच्याकडेही असण्याची शक्यता जास्त होती. तसेच वाहनतज्ञ देखील बुलेटमध्येच तज्ञ असण्याची शक्यता होती. खरतर मला बुलेट आवडत नाही पण बुलेटच घेणे सोयीस्कर होते. म्हणून निशितबरोबर बोलून बुलेट क्लासिक ३५० ठरवली. तो म्हणाला आम्ही त्याच्याबरोबर लडाख कॅरिअरपण देतो. ते बसवलेलेच असते. मग ते हवे की नको यावर बरीच चर्चा झाली. कारण आम्ही आमच्याबरोबर मागच्या वेळेस घेतलेले खोगीर घेणार होतो. पण ते त्यावर बसेल की नाही ते कळत नव्हते. शेवटी ठरवले की असू देत तिथे गेल्यानंतर बघू. मग सराव म्हणून मी अतुलची बुलेट तासभर चालवून आलो.

आता विमान प्रवासाची तिकिटे, दिल्ली ते मनाली जाण्याची तिकिटे तसंच परतीची तिकिटे याबद्दल शोधाशोध सुरू झाली. मेकमायट्रीप, गोबीबो, विस्तारा असे बरेच पर्याय बघत राहिलो. शेवटी जे स्वस्त आणि मस्त पर्याय दिसले ते खरेदी केले. यातून नेहमीचच एक लक्षात आलं की विमानाची तिकिटे ही नेहमी त्या त्या विमान कंपनीच्या साईटवरच स्वस्त मिळतात. बाकीच्या साईटस ह्या तुलना करायला आणि एकूण किती विमाने उपलब्ध आहेत हे बघायला उपयोगी पडतात. मेकमाय ने दोन हजार रुपये दिले असल्यामुळे बस प्रवासाच्या बाबतीत मात्र आम्हाला खरी सूट मिळाली. म्हणजे मनालीला जाण्यायेण्याच्या बस प्रवासात दरवेळेस माणशी जवळपास शंभर-दोनशे रुपयांची बचत झाली.

मागच्या वेळेस आम्ही प्रचंड सामान घेऊन गेलो होतो. पंधरा किलोचे चेक इन आणि सात किलोचे केबिन सामान खचाखच भरून नेले होते. काय नेले होते कोणास ठाऊक ! यावेळेस मात्र आम्ही फक्त खोगीर न्यायचे असे ठरवले होते. म्हणजे सात किलो मध्ये सगळे बसवणार होतो. त्याप्रमाणे बसवलेही. मी फक्त एक रिकामी सॅक खोगीरावर बांधून ठेवली होती. एकदा दुरुस्तीवाहन बरोबर असले की खोगीर खचाखच भरलेल्या स्थितीत वागवणे गरजेचे नव्हते आणि चांगलेही नव्हते. खोगीर फाटले तर ? त्यामुळे तिकडे गेल्यावर काही गोष्टी सॅकमध्ये भरून वाहनात टाकणार होतो. दोघांसाठी एक सॅक पुरे होती. लडाखच्या अनुभवाप्रमाणे आम्ही गरम कपडे घेऊन ठेवले होते. मी अतुलचे खोगीर घेणार होतो. कारण माझे खोगीर युनिकॉर्नचे असल्यामुळे छोटे होते आणि तिकडे आम्ही बुलेट वापरणार होतो. यावेळेस मी हातापायाची चिलखते अजिबातच नेणार नव्हतो. पण अतुलने पायाचे तरी घेऊन जा असा आग्रह केला त्यामुळे ते पण त्याचेच घेतले होते. पुढे ते सगळा प्रवासभर माझ्या पायावरती कुठेतरी लटकलेले असायचे. त्याचा खरा उपयोग होईल अशा ठिकाणी ते नसायचेच. पावसाळी पोशाख देखील घेतला होता आणि हे सगळे एका खोगीरात बसवले होते. त्यामुळे आम्ही आमच्यावरच बेहद्द खूष होतो. अनुभवाचा फायदा होतो तो असा !

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास लिहिले आहेस सव्यसाची !! प्रवास आणि शैली दोन्ही आवडले. तुझा 'एक अविस्मरणीय प्रवास' मनाला चुटपुट लावून गेला होता. अजूनही लक्षात आहे. मी मागे एकदा पुन्हा वाचण्यासाठी शोधला, पण सापडला नाही. तुला शक्य असेल तर नव्या मायबोलीवर पुन्हा प्रकाशित कर.
असे मी तुझ्या लडाखच्या लेखावर लिहिले होते Happy

धन्यवाद मित्रांनो !
अजूनही मला त्या फ्लिकर वरून फोटो इथे का येत नाही ते कळले नाहीये. बहुतेक फ्लिकरवरही तो फोटो २ एमबी पेक्षा कमी वजनाचा असायला पाहिजे का?
जीएस, हो मी तुझा प्रतिसाद वाचला होता पण खूप शोधूनही मला तो सापडत नव्हता म्हणून मी स्वतःवरच चिडलो होतो. पण मला तो महिन्याभरापूर्वीच सापडलाय एकदाचा Happy तेंव्हा ही लेखमाला झाल्यावर मी ती लवकरच इथे टाकेन.