निमाची बाहुली

Submitted by अविनाश जोशी on 27 September, 2017 - 01:56

निमाची बाहुली
निमा एक छोटी मुलगी होती. म्हणजे दहा बारा वर्षाची असेल .
आई वडील दोघेही व्यवसायानिमित्त घराबाहेर. त्यामुळे शाळा सुटल्यावर त्यांच्या दहाव्या मजल्यावरच्या प्लॅट वर ती एकटीच असायची. तशी काम करणारी संध्या पण असायची, पण तिच्या बरोबरीचं कोणीच नसायचं.निमाला बाहुल्या फारच आवडायच्या.
तिची खोली वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्यांची भरून गेली होती. तरी सुद्धा नवीन बाहुली बघितली तर तिला ती हवी असायची.
वडीलही कुठे परदेशी गेले कि तिच्या करिता येताना बाहुली घेऊन यायचे.
निमा बाहुल्यांशी तास न तास खेळत असायची. त्यांच्याशी गप्पा मारायची, भातुकली खेळायची आणि आनंदात वेळ घालवायची.
तिच्या सोसायटीच्या बाहेर एक नवीन मॉल सुरु झाला होता. येता-जाता मॉलच्या काचेतून नवीन बाहुल्या पाहण्याचा तिचा छंद होता. त्यातली एक सुंदर बाहुली तिला फारच आवडली होती. जाताना-येताना ती काचेतून टक लावून ती बाहुली पाहत असायची. पण आत जाऊन ती बाहुली बघण्याची तिला हिम्मत होत नव्हती.
खरं म्हणजे तिने स्वतःहून एकटीने कुठलीच बाहुली विकत घेतली नव्हती. मॉल मधील बाईच्या लक्षात ही गोष्ट आली. एके दिवशी काचेला नाक लावून बघत असताना बाईने निमाला आत बोलावलं.
' बाळ तुला काय हवंय?
निमाने काही न बोलता त्या बाहुलीकडे बोट दाखविले .
' तुझं नाव काय बाळ? आणि त्या बाहुलीकडे का बघतीयेस?
' माझं नाव निमा, मॅम ती बाहुली मला फार आवडली आहे. ती बाहुली मला हवी आहे. किती किमंत आहे?
' निमा ती बाहुली विकायला नाही. तू दुसरी कुठलीतरी बघ.
' नाही. मला तीच हवी आहे. किंमत तर सांगा.?
' निमा उगीच हट्ट करू नको. ती बाहुली विकण्यासाठी नाही.
' विकण्यासाठी नाही तर कशाला ठेवली आहे ?
निमा काही केल्या ऐकायला तयारच नव्हती.
' बरं निमा. तू एवढा हट्टच करत आहेस तर मी तुला ती बाहुली देते. पण मी म्हंटल ते खरं आहे. ती बाहुली विकण्यासाठी नाही. मी ती तुला तशीच देते.
बाहुली फुकट मिळते म्हंटल्यावर तर निमा हरकूनच गेली.
' पण मॅम तुम्ही मला ही बाहुली फुकट का देताय? मी पैसे आणून देईन ना.
' ती बाहुली खास आहे. लोकं म्हणतात ती झपाटलेली आहे. त्यामुळे ती तू घेऊन गेल्यावर जर काही घडलं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.
निमाचा अशा गोष्टीवर विश्वासच नव्हता. व त्यातून बाहुलीचा मोह तिला सोडवतच नव्हता.
' मॅम द्या ती बाहुली. मला काही होणार नाही.
' निमा हे बघ. ती बाहुली आम्ही परत पण घेणार नाही. एकदा का तुला दिली तर ती कायमची तुझीच झाली.
' हो मॅम. मी जपीन तिला आणि ती मला काहीसुद्धा करणार नाही.
त्या मॉल मधल्या बाईने ती बाहुली उचलून पॅकिंग करायला सुरवात करणार इतक्यात निमाने तिला अडवले.
' नका करू पॅकिंग. मला तशीच द्या.
शेवटी ती बाहुली निमाला मिळाली.
बाहुली हातात घेऊन निमा धावतच सोसायटीच्या गेट मधून आत आली. लिफ़्ट खालीच येत होती. . तिच्या समोरच लिफ़्टच दार उघडलं. आतून दोन तीन लोकं बाहेर गेले.
लिफ़्ट रिकामीच होती. निमाला एका बाजूने आनंद होत होता पण मनावर दडपण होतच.
लिफ़्टमध्ये आत जाताच लिफ़्टच दार बंद झालं. निमा लिफ़्ट मध्ये एकटीच होती.
आता मात्र तिची धडधड वाढली. आपण नको ते उद्योग तर केले नाहीत ना? असे तिला वाटू लागले.
त्यातून लिफ़्ट पण चालू होईना. निमाची भीती अजूनच वाढली.
त्यातच हातातल्या बाहुलीची हालचाल होत आहे असं तिला जाणवू लागलं.
आता काय होणार तिला कळत नव्हतं.
हातातल्या हातात बाहुली पूर्ण वळली. निमाकडे रोखून पाहू लागली.
निमाची तर भीतीने गाळणच उडाली . काय करावे तिला कळतच नव्हते.
बाहुलीने परत निमावर डोळे रोखले आणि म्हणाली..

अग गधडे वर जायचं बटन तरी दाब की...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol

भारीच आहे
याच नावाची बहुतेक सुशिं ची पण एक कथा आहे न?त्यात नीमाचा छळ तिची आजी की आत्या कोणतरी करत असतात आणि नीमा बाहुलीसोबत पण तसाच छळ करते असे काहीतरी होते

विनोदी भयकथा. Happy

याच नावाची बहुतेक सुशिं ची पण एक कथा आहे न?>>> मतकरींची आहे.

फेसबुक आणि व्हाट्सऍप या ठिकाणी येत असलेल्या कथांचं कलेक्शन नादभय मध्ये करणार आहात का?