डिजाइन थिंकिंग - शालेय शिक्षणात (भाग दोन)

Submitted by नानाकळा on 30 October, 2017 - 07:51

डिजाइन थिंकिंग च्या आधीच्या भागात आपण बघितले की डिजाइन म्हणजे काय असते नक्की. आता बघूया की डिजाइन थिंकिंग म्हणजे नेमकं काय आहे. आणि शालेय शिक्षणात त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या एकूण सहभागाची परिणामकारकता कैक पटीने वाढवण्यासाठी कसा होऊ शकतो.

खरे तर हा सर्व प्रकार मस्तपैकी एखाद्या तासाभराच्या क्रॅशकोर्समध्ये पटकन समजू शकतो, कारण डिजाइन थिंकिंग ही कृतीआधारित विचारपद्धत आहे.

डिजाइन थिंकिंग ही एखाद्या समस्येवर उत्तर शोधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे जी साधारणपणे सर्व आर्किटेक्ट, आर्टिस्ट्स, डिजायनर वापरतात. या पद्धतीने विचार केल्यास उपलब्ध समस्येवर आश्चर्यकारक, पुर्वी कधीही पुढे न आलेले उत्तर मिळू शकते. हे असे होते कारण ह्या पद्धतीचा गाभा. तर काय आहे हा गाभा?

डिजाइन थिंकिंग ची प्रक्रिया अशी पाच टप्प्यांमध्ये आखलेली आहे.
१. सहानुभूतीचा उपयोग (Empathize) २. समस्येची उकल (Define) ३. शक्य तितक्या उत्तरांचा शोध (Ideate) ४. आद्यरुप किंवा प्रतिकृती (Prototype) ५. परिक्षण (Test)

मनुष्याला भेडसावणार्‍या बहुतांश समस्यांचे मूळ हे मानवी व्यवहारात, संस्कारांत, जडणघडणीत, विचारपद्धतीत असते. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यामागचे कारण शोधावे लागते. डिजाइन थिंकिंगच्या पहिल्या टप्प्यात सहानूभूतीने जाणून घेणे ही प्रक्रिया होते. समस्येशी निगडित असलेल्या सर्व व्यक्तींच्या जागी स्वतःला ठेवून बघणे, त्यांच्याशी कसलाही पूर्वग्रह न ठेवता बोलणे, त्यांना विविध प्रश्न विचारुन समस्येच्या मुळाशी नक्की काय आहे ह्याचा शोध घेणे, एखाद्या वस्तूकडून, सेवेकडून व्यक्तीच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणे, त्या अपेक्षांचेही मूळ शोधून काढणे हे केल्या जाते.

पुढच्या टप्प्यात समस्येची उकल केली जाते. ह्यातून नेमकी समस्या काय ते समजायला सोपे जाते, त्या समस्येचे मूळही सापडते. नक्की कशाची गरज आहे, कशावर उत्तर हवंय, नेमकं काय करुन हवंय जेणेकरुन समस्या राहणार नाही हे कळतं. इथे गरजांचं स्पष्टीकरण होतं. गरजांना 'वस्तूं'च्या स्वरुपात न बघता 'आवश्यकतां'च्या स्वरुपात बघण्याचा दृष्टीकोन विकसित होतो. त्यामुळे असंख्य शक्यता असू शकतात ह्याचे आकलन होते.

यानंतर येतो तो शक्य तितक्या उत्तरांचा शोध. एकदा नेमकी गरज समजली की ती पूर्ण करण्याच्या असंख्य मार्गांचा शोध घेतला जातो. ह्यात कल्पनेचा वारु चौखुर उधळला जातो. मनमानेल ते उपाय लिहून काढले जातात. ते चांगले आहेत की नाहीत, उपयोग होऊ शकतो की नाही, प्रत्यक्षात येऊ शकतात की नाहीत ह्यापैकी कशाचाही विचार न करता आधीच्या टप्प्यात शोधलेल्या गरजेवर काय काय उपाय देऊ शकतो हा एकमेव विचार करुन असंख्य उत्तरं शोधायची. त्यानंतर त्यातल्या त्यात उत्तम पर्यायाची निवड करायची.

पुढची पायरी म्हणजे निवडलेल्या पर्यायापासून जो काही उपाय आहे त्याचे आद्यरुप तयार करणे. ते अगदी परिपूर्ण असलेच पाहिजे असे अजिबात नाही. प्रोटोटाइप च्या टप्प्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे जी काही कल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवणे, भले ती असफल का ठरु देत. 'असे असे करु' असे फक्त सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीद्वारे 'असे असे असू शकते' ह्यावर भर देणे. 'सांगण्यापेक्षा करुन दाखवणे' हे महत्त्वाचे. प्रोटोटाइप हे प्रत्यक्ष उत्तराचे मूर्त रुप असल्याने त्याचे महत्त्व आहेच.

एकदा आद्यरुप तयार झाले की त्याचे परिक्षण करणे हा टप्पा येतो. तयार केलेले प्रोटोटाइप प्रस्तुत समस्येशी झगडत असलेल्या लोकांना देऊन त्यांना ते वापरायला, हाताळायला, त्याचा अनुभव घ्यायला सांगून त्यावर त्यांचे मत विचारणे. फीडबॅक घेणे. परिक्षणाच्या निकालातून अनेक निष्कर्ष निघू शकतात जे परत प्रोटोटायपला अद्ययावत करण्यात वापरले जातात . अशा पद्धतीने समस्येवर शोधलेला उपाय हा प्रत्यक्षात येऊन अधिक अचूक होण्याच्या दिशेने वाटचाल करु लागतो.

(अनेकांना वाटेल, ह्यात काय विशेष? तर असे आहे की हे सर्व वाचून त्याचे महत्त्व, त्यातली गोम कळणे शक्य नाही. ही प्रक्रिया जेव्हा प्रत्यक्ष अंमलात आणली जाते तेव्हाच ती खर्‍या अर्थाने खूप चांगली समजते. व तिचे महत्त्वही समजते. ह्यातल्या प्रत्येक टप्प्यात जे शिकायला मिळत जाते, जी नवी माहिती उपलब्ध होत जाते, दृष्टिकोन बदलत जातो ते केवळ ह्या पद्धतीने एखाद्या समस्येची उकल करतांनाच समजू शकते.)

आता ह्या पद्धतीचा शालेय शिक्षणात नेमका कसा उपयोग करता येईल?

ही पद्धत वापरुन शाळेत जे विषय शिकवले जातात त्यात वैविध्य आणता येते, शिकवण्याच्या पद्धतीतही नाविन्य आणल्या जाऊ शकते. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची, सहभागाची उर्मी वाढते. ह्या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ह्यातल्या नाविन्यपूर्ण, अपारंपरिक उपक्रमांद्वारे (जे गट करुन किंवा वैयक्तिक पद्धतीने पूर्ण केले जाऊ शकतात) मुलांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची, एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याची जी कौशल्ये असतात ती उत्तम प्रकारे विकसित होतात. मुलांचा गट करुन असे उपक्रम राबवल्यास त्यातून संघटीत होऊन काम करणे, सहकार्य करणे, संवादकौशल्ये ह्या गोष्टी विकसित होतात. तसेच अशाच पद्धतीने त्यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, पुढच्या आयुष्यात, नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात अनेक प्रकारे मदत होते. ह्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजू असतात, त्यावर अनेक उत्तरं असू शकतात, सर्वस्वी चूक किंवा सर्वस्वी बरोबर असे काही नसते हेही समजू लागते. त्यामुळे त्यांना त्यांचे मते आत्मविश्वासाने मांडणे शक्य होते व इतरांचीही मते आदरपूर्वक ऐकून घेतली पाहिजेत याची सवय लागते. नवीन कल्पना, विचार यांचे स्वागत केले पाहिजे, स्विकार केला पाहिजे अशी मानसिकता तयार होते.

प्रत्यक्ष ही पद्धत शाळेत शिकवत असतांना ह्यात अभ्यासक्रमातल्या सर्व विषयांचा समावेश होईल असे उपक्रम राबवता येतात. ज्यात गणित, भूगोल, इतिहास, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भाषा इत्यादी विषयांचा एकमेकांशी रंजक मेळ घालून अभ्यासक्रमाधारित उपक्रम तयार करता येतात. ह्या उपक्रमांमधून सहभागी होतांना मुलांना संबंधित विषय अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजतात, त्या विषयांचे महत्त्वही समजते, त्याचा प्रत्यक्ष आयुष्यातला उपयोगही समजतो. ह्या उपक्रमांतून शिकलेले ज्ञान त्यांनी स्वतः मिळवले असल्याने ते कायमस्वरुपी त्यांच्यासोबत राहते. घोकंपट्टी, किंवा लादलेला अभ्यास ह्याने होणारे दुष्परिणाम, कंटाळा असे काही होत नाही. मुले स्वतःहून जबाबदारीने, आपल्या टीमच्या इतर सहकार्‍यांसोबत मिळून मिसळून शिकतात, टिममध्ये सर्वजण समान पातळीवर असल्याने भेदभाव, हुशार-ढ अशी वर्गवारी होत नाही. त्यातून सन्मान, एकमेकांची काळजी घेणे ही मूल्ये रुजतात.

उदाहरणार्थ, एक उपक्रम आहे ज्यात मुलांना रसायनशास्त्र व इतिहास ह्या दोन विषयांशी निगडित काम दिलेले असते. ज्यात त्यांना आवर्तसारणीतल्या मूलद्रव्यांचा शोध ज्या-ज्या क्रमाने, ज्या-ज्या साली लागला तशी टाइमलाइन करायची असते. ह्यात त्यांना दोन्ही विषयातल्या दोन मूलभूत संकल्पनांचे चांगले ज्ञान मिळते. अशाच पद्धतीने दोन किंवा तीन विषय एकत्र येतील असे उपक्रम तयार करुन राबवतात येतात.

आणखी एक उपक्रम होऊ शकतो तो स्कूलबॅगचा. काही मुलांचा गट बनवून स्कूलबॅग संबंधी काम करायला सांगायचे. ह्यात पहिला भाग जो आहे सहानुभूतीचा, त्यात मुले स्कूलबॅग च्या गरजेवर अतिशय सखोल अभ्यास करतील, एकमेकांना प्रश्न विचारतील, त्यांचे विचार, गरज, अडचणी, सुविधा ह्या सर्वांबद्दल खूप चर्चा होइल. पुढच्या टप्प्यांमध्ये कदाचित स्कूलबॅग शाळेत आणायची गरजच नाही असेही संशोधन बाहेर पडेन किंवा मुलांच्या खर्‍याखुर्‍या गरजा भागवणारी एखादी स्कूलबॅग तयार होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत मुलांना अनेक बाबतीत शिकायला मिळते, त्याचे सकारात्मक परिणाम ताबडतोब दिसून येतात.

ह्या सर्व पद्धतीने अनेक शाळांत मुलांचे शिक्षण होत आहे व त्याचे खूप चांगले परिणाम मिळत आहेत. विज्ञान-गणित ह्यात मुलांची रुची वाढते कारण त्यांना नेहमीच्या रुक्ष पद्धतीपेक्षा अधिक रंजक व त्यांचा समावेश करुन घेणारी पद्धत आवडते. बेरिज वजाबाकी पासून क्लिष्ट गणिते करणे का गरजेचे आहे ह्याचा प्रत्यक्ष जीवंत अनुभव मिळत असल्याने त्यांची रुची वाढते. आपण जे काही शाळेत शिकतोय ते आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे हे जेव्हा मुलांना समजते तेव्हा ते अधिक जबाबदारीने शिकायला लागतात.

डिजाइन थिंकिंग ही काळाची गरज आहे. त्यातला वेग व परिणाम थक्क करणारे आहेत. सर्व आघाडीच्या कंपन्या, शाळा, कॉलेजेस व विद्यापीठं ह्या पद्धतीचा अवलंब आपल्या कार्यशैलीत करत आहेत. आपण भारतीयांनी ह्याचा पुरेपूर उपयोग घ्यावा अशी अपेक्षा आहे.

प्रतिसादांतून या विषयावर अधिक चर्चा-विनिमय करता येईल.

जोडणी:
१. स्टॅनफर्ड युनिवर्सिटीतल्या डि.स्कूल चे प्राध्यापक जस्टीन फेरेल ह्यांनी अतिशय सुंदर रित्या डिजाइन थिंकिंग हे क्रॅश कोर्सच्या माध्यमातून समजवले आहे. (३५ मिनिटे)
https://www.youtube.com/watch?v=Z4gAugRGpeY

२. किरण बीर सेठी या मूळच्या व्यावसायिक ग्राफिक डिजायनर असलेल्या शिक्षिकेने डिजाइन थिंकिंग चा वापर करणारी एक अख्खी शाळाच अगदी शून्यातून उभी केली आहे. त्यांच्या शाळेत ही पद्धत कशी वापरली जाते व त्याचे परिणाम विषद करणारा हा त्यांचा टेड टॉक. (१८ मिनिटे)
https://www.youtube.com/watch?v=ytckhFRpAe4&t=716s

३. पहिल्या वर्गातल्या मुलांसाठी एक प्रोजेक्ट. एका छोट्याशा प्रोजेक्टमधून मुलांना किती काय काय शिकायला मिळतं याचं हा प्रोजेक्ट उदाहरण आहे. (५ मिनिटे)
https://www.youtube.com/watch?v=hvqST2ggvA0

-----------------------------------------------------

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेखमालिका नाना.
प्रॉडक्ट डिझाईन करताना लेखातील अनेक मुद्दयांशी प्रत्यक्ष संबंध येत असल्याने जिव्हाळ्याचा विषय आहे.
पुभाप्र.

छान लेख. व्हिडिओ बघतो.
आवर्तसारणी + इतिहास मस्त आयडिआ आहे.
विज्ञान आणि गणित एकत्र सांगड घालून रंजक (इंटरेस्टिंग) होईल यात शंका नाही. पण ते डिझाईन थिंकिंग कसे त्यावर विचार करतोय.
मुलाच्या शाळेत (इयत्त पहिली) वाचनाला सगळ्यात जास्त महत्त्व देतात. गणित नाही केलं तरी चालेल, पण वाचता आलं नाही तर काहीच करता येणार नाही, ते टोटली पटलं मला.

विज्ञान आणि गणित एकत्र सांगड घालून >> माझ्या मुलांच्या शाळेत असे बरेच उपक्रम असतात. एक इतिहास आणि भाषा यांचे कंबाइन्ड प्रोजेक्ट होते. रेनासान्स काळाबद्दल शिकताना 'तुम्ही टाइम मशीन ने त्या काळात गेलात असे समजून वर्तमानातल्या कुणातरी मित्राला ७ पोस्ट कार्डे लिहा ' अशी असाइनमेन्ट होती. ७ मधे काय काय इव्हेन्त्स कव्हर झाले पाहिजेत त्याचा साधारण रुब्रिक दिला होता . मजा येते मुलांना आणि समजतेही जास्त चांगले, असा अनुभव आहे. अजून आठवते आहे.

लेखमाला छान चालू आहे नाना!

ज्याला टिपिकल इंडियन जुगाड म्हणतात तो डिझाईन थिंकिंगचाच भाग म्हणायचा की polar opposite?

माझ्या लेकीच्या शाळेत प्रत्येक प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंट साठी इ-हारमनी प्रोफाइल बनवायची असाइनमेंट दिली होती एकदा.
एकदा प्रत्येक राज्यासाठी ऑलिम्पिक्स त्या राज्यातच व्हायला पाहिजे अशा धर्तीचं कॅम्पेन बनवायचं होतं .

फार मजा आली होती दोन्ही प्रॉजेक्ट्स करताना तिला.

विज्ञान आणि गणित एकत्र सांगड घालून रंजक (इंटरेस्टिंग) होईल यात शंका नाही. पण ते डिझाईन थिंकिंग कसे त्यावर विचार करतोय.
>> सांगड घालणे ही पडद्यामागची योजना आहे. प्रत्यक्ष टास्क हे प्रथमदर्शी वेगळे असेल. वर जो टेड टॉक दिला आहे त्यात त्यांनी पहिले उदाहरण दिलंय, त्यात दागिने तयार करण्याचा एक प्रोजेक्ट आहे. त्यात त्यांना वेगवेगळ्या अडचणींच्या निमित्ताने कितीतरी विषयांचे ज्ञान होत जाते हे सुंदर दाखवले आहे. ज्यात गणित हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे हे दिसत आहे.

ज्याला टिपिकल इंडियन जुगाड म्हणतात तो डिझाईन थिंकिंगचाच भाग म्हणायचा की polar opposite?
>> हो, जुगाड म्हणता येईल. कारण जुगाडचा प्रथम उद्देश समस्येचे नेमके मूळ व उपायाची नेमकी गरज शोधणे हाच आहे. तोच डिजाइन थिंकिंग चाही आत्मा आहे. फक्त थोडा फरक पडतो काही बाबतीत. जसे डिजाइन थिंकिंग मध्ये सर्वबाजुने मूलभूत विचार केल्या जातो तर जुगाड मध्ये वरवरचा, तात्पुरता विचार केला जातो.

मला लगेच ही बातमी आठवली:
http://swachhindia.ndtv.com/tamil-nadu-students-turn-innovators-to-const...
यात युरीनल चे डिझाइन आधीच आहे खरं तर. पण स्वस्तात मस्त कसं बनवता येईल ते पाहीलं गेलय.

उत्तम लेखमालिका.
पुढचे भाग वाचण्यास उत्सुक.
टिम ब्राऊनचे चेंज बाय डिझाईन हे पुस्तक कुणी वाचलेय का? भारी पुस्तक आहे.

नानाकळा दोन्ही लेख खुपच छान. अगदी सोप्या भाषेत तुम्ही डिझाईन ची प्रक्रीया समजाउन सांगितली.
डिजाइन थिंकिंग ही एखाद्या समस्येवर उत्तर शोधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे> याचे उत्तम उदाहरण म्हणजे गाडीचे emission. दर दोन-चार वर्षानी कॅलिफोरिन्या स्टेट गाड्याच्या emission साठी नवीन कडक कायदा घेउन येते आणि emission कसे कमी करायचे या सम्स्येवर अमेरिकन, युरोपियन , जॅपनीज आणी कोरियन engineer उपाय शोधायला चालु करतात. कारण जे नोर्म्स कॅलिफोरिन्या स्टेट नी आणलेत ते कालंतराने पुर्ण अमेरिकेत, मग युरोप, चायना करत बाकीच्या सर्व देशात पण लागु होतात. त्यामुळे ह्या समस्येवर हजारो engineer काम करत असतात. गेल्या ३० वर्षात engineer लोकाना काहीतरी नवीन समस्या मिळत असते त्यामुळे त्याचा जॉब पण सिक्युअर राहतो.

जुगाड आणि डिझाईन मध्ये बराच फरक आहे. जुगाड हा फक्त एका समस्येवर उपाय म्हणुन केला जातो. त्याला मराठीत थुकपट्टी म्हणु शकतो. तिच गोष्ट पुन्हा हुबेहुब बनेल याची गॅरिंटी नाही. एकाच डिझाईन वर लाखो गाड्या बनतात, कऱोडो मोबाईल बनतात. जुगाड मध्ये ते शक्य होणार नाही. जरी मंगळयाना सारखी गोष्ट एकदाच बनत असली तरी ती जुगाड करुन बनवली जात नाही.

ओके नाना आणि साहिल! धन्यवाद जुगाड बद्दल लिहिल्याबद्दल.

हा मुद्दा इथे आणण्याचे कारण म्हणजे भारतीय मानसिकतेमधली जुगाड mentality बदलून तिथे डिझाईन थिंकिंग आणावे लागेल.

हा मुद्दा इथे आणण्याचे कारण म्हणजे भारतीय मानसिकतेमधली जुगाड mentality बदलून तिथे डिझाईन थिंकिंग आणावे लागेल.>>> सनव, फार फार महत्वाचे विधान! प्रत्येक ठिकाणी कोरून ठेवावे इतके महत्वाचे आहे! ह्या जुगाडू वृत्तीने आपले नुकसानच झाले आहे. कारण आपण समस्येवर तात्पुरते मलम लावतो, दीर्घकालीन शाश्वत उपाय शोधत नाही.