दिवाळी अंक २०१७

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 16 October, 2017 - 05:40

हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.

कुठले दिवाळी अंक आपण वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी समग्र गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.

आवाज वाचला. मिलिंद शिंत्रे यांची काटकसर या कथेने खूप हसवलं . Start to end विनोदी म्हणता येईल अशी एकमेव कथा.
बऱ्याच कथांनी केवळ स्मित आणलं चेहऱ्यावर. कथा म्हणून बघायला गेल्यास बऱ्याचशा चांगल्या आहेत. काही कथांमध्ये विनोद सापडत नाही.

लोकसत्ता दिवाळी अंक : राशीभविष्य १८१ व्या पानाला सुरू होतंय. त्या आधीच्या १८० पानांमध्ये उजव्या बाजूची ५१ पूर्ण पानं जाहिरातीने व्यापलेली आहेत. ४-५ जाहिराती दोन पानं भरून आहेत.
इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावरचे पाच लेख आहेत. त्यातल्या तीन लेखांत त्यांच्याबद्दल वाईट वाईटच लिहिलंय. संजीव केळकर यांनी तर `धैर्यवान ? नव्हे बेदरकार' असं शीर्षक देत, बांग्लादेश मुक्तीसंग्रामातील त्यांच्या निर्णयाचं श्रेय नाकारलंय. आजपर्यंत प्रकाशित न झालेल्या किंवा कधीच माहिती नसलेल्या गोष्टी सांगून इंदिरा गांधीच्या मानसिकतेचा एखाद दुसरा कोपरा उजळण्याचा हेतू; घटनांबबतची वस्तुस्थिती तिच्या खर्‍या पवित्रशा स्वरूपात सांगत असल्याचा दावा.
सुजाता गोडबोले यांच्या 'आगळे मैत्र' या लेखात डोरोथी नॉर्मन यांच्याशी झालेल्या इंदिरा गांधींच्या पत्रमैत्रीबद्दल लिहिलंय. चार पत्रे अनुवादित रूपात आहेत.
चरित्रांतील इंदिराजी या लेखात शशिकांत सावंत यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींवरच भर दिलाय.

अमिताभवर तीन लेख आहेत. त्यातला अमोल पालेकरांचा लेख आवडला. त्यांच्यातला अभिनेता, माणूस, दुसर्‍या अभिनेत्याला दाद देणारा स्टार, त्यांना दिग्दर्शित करतानाचा (पहेली) अनुभव; यावर लिहिलंय.शेवटचा पानभर मजकूर Why did he always choose to be a conformist या मुद्द्यावर आहे.
सतीश जकातदार यांनी अमिताभच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेतलाय. यातलं एक वाक्य : याच(१९८२ - शक्ती आला ते वर्ष) वर्षी `गांधी' सादर करून रिचर्ड अ‍ॅटनबरांनी तुझ्या प्रेक्षकांना डुलकी घेताना पकडले होते.

कलाक्षेत्रातील (नाट्य आणि चित्रपट) स्थित्यंतरांबद्दल चंद्रकांत कुलकर्णी, अमोल उदगीरकर, अभिजीत ताम्हाणे, विजय केंकरे यांनी लिहिलं आहे.

मृदुला बेळे यांनी गुलजार चित्रपटगीते/कविता घेऊन विवेकनिष्ठ विचारसरणी Rational Emotive Behavioural Therapy बद्दल लिहिलंय. तो लेख उगाच वाटला.
अंकात दोनच कथा आहेत. श्याम मनोहर यांच्या कथेत त्यांचे नेहमीचे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित भरलेले आहेत.
रशियन राज्यक्रांतीच्या जन्मशताब्दीनिमित्त सीताराम येचुरी यांचा आणि उत्तर कोरियावर सचिन दिवाण यांचा लेख, अजून वाचायचेत.
साधना दिवाळी अंकात गोविंद तळवलकरांच्या मुलींनी(बहुतेक) त्यांच्या आठवणी, त्यांचं वाचन आणि त्यांचं लेखन याबद्दल तीन वेगवेगळे लेख लिहिलेत.

याच(१९८२ - शक्ती आला ते वर्ष) वर्षी `गांधी' सादर करून रिचर्ड अ‍ॅटनबरांनी तुझ्या प्रेक्षकांना डुलकी घेताना पकडले होते. >>> His fans were caught napping याचं थेट भाषांतर. संपादन करतात ना?

मी रेल्वे स्टेशन वरून आवाज शतायुषी, धनुर्धारी, माहेर, किस्त्रिम आणले. किस्त्रिम सॅडली राइट विंग मुखपत्र असल्यासारखे फील येते आहे. माहेर मधला विनोबा भावे ह्यांच्या आश्रमाच्या व्हिजिटचा लेख छान आहे. गोडबोले दव्णे अ‍ॅज युजवल. गनेश मतकरी इज नॉट अ पॅच ऑन हिज फादर. नव्याजनरेशनची फेक कथा लिहीली आहे. पु ना गाडगीळ जाहिरातीतल्या तन्मणीचे डिझाइन मस्त आहे. त्याची चौकशी करनार आहे.
ध आणि शता. नेहमीचा मसाला आहे. नवल मिळाला नाही पोरगा धनंजय देत होता मी नको म्हटले.

लोकसत्तेचा अंक वाचून परत केला. त्यातल्या उरलेल्या लेखनाबद्दल लिहितो.
प्रखर बुद्धिवादी असलेल्या गर्भवतीला चंद्रग्रहणात आलेल्या अनुभवांवर एक कथा आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्स, फॉर्वर्ड्स, त्यातलं ग्यान असे आताचे संदर्भ असल्याने कथा वाचायला मजा येते. शेवटी, म्हटलं तर एक कलाटणी दिलीय.
विजय केंकरे यांनी त्यांना आवडलेल्या भूमिकांतील नटांबद्दल लिहिलंय. पती गेले गं काठेवाडीत दत्ता भट (हे मला ऐकून वाचूनही माहीत नव्हतं. आणि योगायोगाने हे नाटक सुबक होऊन सध्या रंगभूमीवर आहे) नटसम्राट डॉ लागू, काकाजी दाजी भाटवडेकर आणि तोरडमल प्रा बारटक्के. असे लेख वाचले की त्यात वर्णन केलेल्या गोष्टी लगेच पुन्हा पाहायची सोय असती तर , असं वाटत राहतं.
चंद्रकांत कुलकर्णींच्या मराठी रंगभूमीतल्या स्थित्यंतराला समाज, प्रेक्षक, कलावंत यांच्यातल्या सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक, माध्यमिक बदलांमुळे नाट्यसृष्टीत कसे बदल घडलेत ते लिहिलंय.
अमोल उद्गीरकर फेसबुक लेखक म्हणून माहीत होते. त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या स्थित्यंतरावरचा लेख कॉर्पोरेट निर्माते, फायनान्स, स्टुडियो सिस्टम यांच्या समावेशामुळे एक वेगळा अँगलही देतो. पण १९९७ पासून सुरू झालेला लेख बोरिवलीहून सुटलेली जलद लोकल अंधेरीपर्यंत सगऴ्या स्थानकांवर थांबल्यावर मग डायरेक्ट चर्नीरोडलाच (अजून नाव बदललं नसल्यास) थांबावी तसं वाटलं.
सीताराम येचुरींचा लेख वाचताना तो अनुवादित आहे हेच मला ठसठशीतपण जाणवत राहिलं. इंग्रजीपद्धतीची वाक्यरचना, वजनदार शब्द. यामुळे लेख कळायला जड झाला नाही, पण ...

राज ठाकरेंनी अमिताभवर लिहिलेला लेख वरवर वाचला. जाहिरातींतलं अतिदर्शन, पडद्याबाहेरच्या इश्युजबद्दल मग ते अगदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असले तरी , त्यावर कोणतीही भूमिका न घेणं याबद्दल त्यांनी अमिताभची वकिली केलीय. यातल्याच दुसर्‍या मुद्द्याबद्दल पालेकरांनी सविस्तर लिहिलंय. एफ्टीआय आय, सेन्सॉर बोर्ड याप्रकरणीही त्याने तोंड न उघडणं. ...

नमस्कार मंडळी !!
यावर्षी एकूण आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.

१. आवाज - 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' ही हलकीफुलकी कथा
२. जत्रा - 'मिसळ खाणारी मुलगी' ही खुसखुशीत प्रेमकथा
३. धनंजय - 'पॉईंग' ही मनोरंजक विज्ञान कथा
४. मेहता मराठी ग्रंथजगत(रहस्यकथा विशेषांक) - 'सूड नावाची डिश' ही रहस्यकथा
५. सा. वार्तासूत्र (मराठी साहित्य परिषदेच्या कथास्पर्धेतील पारितोषिक विजेती कथा) - 'देखी जमाने की यारी' ही प्रेमकथा
६. वर्ल्ड सामना - 'नियतीचा संकेत' ही हलकीफुलकी प्रेमकथा
७. साहित्य सहयोग (कथास्पर्धेतील द्वितीय पारितोषिक विजेती कथा) - 'प्रत्येकाचे अरमान' ही सामाजिक कथा
८. प्रतिलिपी ऑनलाईन दिवाळी अंक - 'शेवटची चोरी' ही थरारक कथा (अनुक्रमणिकेत Chapter ४४ ला आहे)
(https://www.pratilipi.com/read?id=5306679468490752&ret=/team-marathi-pra...)

कृपया वाचा आणि आपला अमूल्य अभिप्राय कळवा. Happy Happy
धन्यवाद !!

आपल्या मायबोलीवर बरेच चांगले लेखक आहेत. त्यांचं साहित्य कुठल्याकुठल्या अंकांमध्ये आलंय, तेदेखील कळवा म्हणजे ते मिळवून वाचता येईल. Happy

माझा तनिष्का वाचून झाला. त्यात गाव ही थीम आहे. ठिक आहे अंक.

मी झी चा उत्सव नात्यांचा आणि किशोर बुकगंगावरून घेतले. पण अजून वाचायचे आहेत.

सध्या लोकमत चा दिवाळी अंक घेतला आहे. रामदेवबाबा आणि बल्लवाचार्य यांच्या पतांजलीवर माहीती आहे. चांगली आहे. आतले विषय पहाता हा अंक चांगला वाटत आहे.

अभिनंदन बोबडे बोल. पण तुमच्या कथा काय नावाने प्रकाशित झाल्या आहेत हेही सांगा Happy बोबडे बोल नावाने नसतील ना?
मेहता ग्रंथजगतचा अंक चांगला आहे. चैतन्य रासकरची कथाही आहे त्यात. ती इथे आधी वाचली होती.

मुशाफिरी आणि कॉमेडी कट्टा वाचले. मुशाफिरीतले काही लेख एकदम मस्त आहेत, हटके, वेगळ्या जागांबद्दल लिहिलं आहे.
कॉमेडी कट्टामधल्या काही कथा मजेदार आहेत, काही मात्र उगाच ओढून ताणून आहेत.
माहेर वाचते आहे. गणेश मतकरीची कथा आवडली. कथांपेक्षाही लेखांची यादी इम्प्रेसिव्ह आहे. ते आधी वाचणार आहे.

<<<तुमच्या कथा काय नावाने प्रकाशित झाल्या आहेत हेही सांगा Happy बोबडे बोल नावाने नसतील ना?>>>
धन्यवाद पूनम. महत्वाची बाब राहूनच गेली होती.
कथा निलेश मालवणकर या माझ्या ड्यु आयडीच्या नावाने प्रसिद्ध झाल्यात. Proud Proud
चैतन्यच्या कथा वाचल्यात. सुरेख असतात.
मुशाफिरी जिप्सीकडून आणि कॉमेडी कट्टा astronaut कडून मिळवुन वाचेन. Happy
धन्यवाद.

मी आणि माझ्या कार्यकारिणी नी संपादित केलेला Marathi Culture and Festivals Diwali Magazine 2017 हा अंतर्जालावर मोफत आहे आणि विना इंटरनेट वाचायचा असल्यास बुकगंगा वर उपलब्ध आहे : दोन्ही लिंक देत आहे
मोफत लिंक : https://issuu.com/marathicultureandfestivals/docs/diwali_ank_semi_final_...
बुक गंगा लिंक : http://www.bookganga.com/R/7NSEO
वाचून तुमचा प्रतिसाद हि कळवा
ऐश्वर्या कोकाटे

<<मी आणि माझ्या कार्यकारिणी नी संपादित केलेला Marathi Culture and Festivals Diwali Magazine 2017 हा अंतर्जालावर मोफत आहे>> अभिनंदन ऐश्वर्या मॅडम. अंकाची निर्मीतीमूल्ये चांगली दिसत आहेत. मायबोलीवरच्या मोहना यांचा 'बत्तीशी' हा लेख अंकात पाहून सुखद धक्का बसला. छान विनोदी लेख आहे. बाकीचा अंकदेखील हळूहळू वाचतो Happy

साधना दिवाळी अंकातली हुसेन दलवाईंची झोंबी कथा, संपादकीयात म्हटल्यासारखी मार्मिक बिर्मिक वाटली नाही.
'प्रिय नेत्याच्या रक्षणासाठी' हा रामचंद्र गुहांचा स्वच्छता अभियानावरचा लेख वरवरचा आणि इकडचं तिकडचं घेऊन लिहिलेला वाटला.
दुर्गा भागवतांवर माहितीपट करताना जमवलेल्या माहितीवर तसंच त्या अनुभवावर अंजली कीर्तने कितीक वर्षं लिहिताहेत.
चिमामांडा एन्गोझी यांचा 'एकेरी कथनातील धोके' हा टेड टॉक वाचण्याजोगा आहे.
'टिळक , गीत आणि 'रहस्य' ' हे विनय हर्डीकर यांचे भाषण नेटाने वाचावं लागलं. टिळकांच्या कार्याबद्दल, विचाराबद्दल आणि आयुष्याबद्दल ऐकताना प्रेक्षकांना डुलकी आली, तर त्यांची झोप उडावी अशी काही वाक्ये भाषणात आहेत. उदा : टिळक आणि गांधी एका वेळी असते, तर काय झालं असतं?
जर टिळक मंडालेला नसते तर सावरकर काही दोन जन्मठेप आत अडकत नव्हते.
गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ कधीही केलेली नाही. इ.
गीता , गीतारहस्य आणि दोहोंवरच्या हर्डीकरांच्या कमेंट्स(उदा : आधुनिक लोकशाही समजाला उपयुक्त असं गीतेत काहीही नाही) याबद्दल वाचन केलेल्या लोकांसाठी इंटरेस्टिंग असतील.

सुरेश द्वादशीवार यांच्या गांधीजी आणि हिंदुत्ववादी या लेखातून काही नवी माहिती मिळाली.
गोविंद तळवलकरांवरचे त्यांच्या मुलींनी लिहिलेले लेख वेळेअभावी पूर्ण वाचता आले नाहीत. अंक पुन्हा हाती आला, तर वाचेन.
पर्यावरण, शेतकरी, आदिवासी इं संबंधी मिलिंद बोकील आणि अतुल देऊळगावकर यांचे लेखही या अंकात आहेत.

विनय हर्डीकरांच्या लेखातले काही संदर्भ सपशेल चूक आहेत. उदाहरणार्थ, आगरकरांच्या 'बोलणे फोल झाले' या लेखाला ग्रामण्यप्रकरण आणि टिळकांचं प्रायश्चित्त ही पार्श्वभूमी आहे; संमतिवयाबद्दलच्या वादाशी या लेखाचा आणि नंतर टिळकांनी दिलेल्या उत्तराचा संबंध नाही.

अंजली कीर्तने दुर्गाबाईंचं चरित्र लिहिणार होत्या. गेली काही वर्षं दिवाळी अंकांमधले लेख हे या चरित्रातले असावेत. यंदा 'इत्यादी'तही त्यांचा लेख आहे. गेल्या वर्षीही होता.

'साधना - युवा'मधली गिरीश कुबेरांची मुलाखत उत्तम आहे. अंकात ५००० शब्दांची आहे. मूळ मुलाखत त्यापेक्षा दुप्पट आहे. संकल्प गुर्जरला पूण मुलाखत मायबोलीवर टाकायला सांगायला हवं.

अभिनदंन बोबडे बोल आणि ऐश्वर्या कोकाटे..

आठ पैकी जत्रा माझ्याकडे आहे , आजुन वाचायला नाही घेतला, तो आणी ऑनलाईन लेख विकेंड ला वाचयला घेईन.

लोकमत वाचायला घेतला आहे. १० पैकी ६ लेख वाचले. चांगले कव्हर केले आहे.
हुबळी- धारवाड मधील आशियातिल सगल्यात मोठे स्वयपांक घर जिथे रोज ९०००-१२००० किलो तांदुळ लागतात, पतांजली चा उगम आणि विस्तार , रजनीकांत, तीन शंभरीत असलेल्या पण आजुनही आपल्या कामात व्यस्त असलेल्या दक्षिण भारतिय बायकाची मुलाखत , ईस्रो , गुजरात मधुन सोलर पॉवर सहकार क्षेत्रात वीज generate करुन ग्रीड ला जोडणारे पहिले गाव आणि ह्या प्रकल्पाचे अर्थकरण आणि राजकरण हे लेख वाचुन झाले आणी ते आवडले.
यात लेखकानी गुजरात मध्ये त्या गावात तसेच दक्षिणेतल्या तीन गावात जाउन मुलाखती घेतल्याने त्यात खुप डिलेस आहेत. सौर उर्जेचा प्रकल्प महाराष्ट्रातल्या शेतात उभे करायचे असल्यास काय करावे लागेल ह्या बद्दल पण छान माहिती दिली आहे. कोपीराईट मटेरियल असल्याने आजुन जास्त लिहित नाही.

आजुन चार लेख बाकी आहेत. बाकीच्या लेखात एक आलिया भट वर आणि एक अमिर खान ची समाजसेवा वर आहे.
किंमत २०० रुपये थोडी जास्त वाटत होती पण पेपर खुप चांगल्या quality चा वापरला आहे. लेख लिहण्यासाठी पण मेहेनत घेतली आहे.

पोलिस टाईम्स नाही आवडला. यात दैवी शक्तीवर दोन लेख होते ते वाचल्यावर पुढे नाही वाचला. कदाचित बाकीचे लेख चांगले असु शकतात.

मी दिवाळी अंकाची लायब्ररी लावलीय.

अजून हंस व श्री तशी सौ हे 2 अंक वाचले. हंस नीट न वाचताच परत करावा लागला. परत आणून नीट वाचेन. त्यात नदी किनारी हा किरण पुरंदरेंचा लेख व सोबत रेखाचित्रे दोन्ही उत्तम होती. इतर लेख व कथा चांगल्या आहेत/असाव्यात.

श्री तशी सौ मधले लेख चांगले आहेत. मायबोलीकर पूनमची कथा 'लवकर या' सुंदर आहे. जुन्या व नव्या पिढीची सांगड चांगली जमलीय.

स्वामी निश्चलानंदांचा कशासाठी-पोटासाठी हा लेख मला विशेष वाचनीय वाटला. काटकसर, वेळेची बचत व पाश्चात्य खाण्याचे आकर्षण या सगळ्यामुळे मराठी पाककृतीत व खाण्याच्या सवयी/पदार्थ इत्यादीत झालेले फरक आणि त्याचे वैद्यकीय दृष्टिकोनातून शरीरावर होणारे परिणाम यांचे अतिशय चांगले व डोळे उघडणारे विवेचन लेखात आहे.

त्याचबरोबर डॉ तुकाराम जमालेंचा 'खाण्याचं व्यसन' लेखही उत्तम आहे. या व्यसनामुळे झालेले दुष्परिणाम त्यांनी मांडलेत. यावर उतारा म्हणून निर्तुप, निर्मिठ, निर्साखर, निरतेल आहाराचा सल्ला त्यांनी दिलाय. ते स्वतः हा सल्ला पाळताहेत.

दोन्ही लेख जवळपास सारखेच आहेत. स्वामी आपण अन्नाच्या मूळ चवींना मागे सारत आजच्या चमचमीत जेवणापर्यंत कसे पोचलो ते सांगतात आणि डॉक्टर त्या जेवणापासून निग्रहाने मागे हटून बाह्य चववर्धकांचा त्याग करून परत मूळ चवीपर्यंत पोचणे आरोग्याच्या दृष्टीने कसे उत्तम हे सांगतात.

राजन खान यांचा 'काळाला विसंगत दोन विचार' थोडा शब्द बंबाळ वाटतोय. नेट लावून वाचायला हवा.

बाकी साहित्यही ठीकठाक आहे. एकंदर अंक वाचनीय आहे.

Pages