कासवांची कथा

Submitted by सई केसकर on 6 October, 2017 - 01:29

दक्षिण भारतात वेगवेगळ्या दगडांमध्ये जाळीदार कोरीवकाम करून वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रतिकृती बनतात. पॉंडिचेरीमध्ये एकदा असे संगमरवरी, छोटेसे कासव घेतले होते. आणि त्या जाळीदार कासवाच्या पोटात आणखीन एक छोटे गोंडस कासव बसवलेले होते. हे असे, इतके सुंदर, आणि इतके पदर असलेले नक्षीकाम कसे करता येत असेल असे तेव्हा वाटले होते. तसेच पुन्हा काल कासव चित्रपट बघताना वाटून गेले.

ट्रेलर बघून हमखास कासव हा मानवी निराशेबद्दल असलेला चित्रपट आहे असे वाटते. पण बघताना मात्र या चित्रपटाची कथा माणसाला वाटणाऱ्या सहानुभूतीबद्दल आहे असे वाटते. मानव (आलोक राजवाडे) एक अतिशय निराश झालेला तरुण आहे. आयुष्य संपवायचा प्रयत्न करून नको असताना वाचवला गेल्यानंतर तो एका निरुद्देश प्रवासावर निघून जातो. रस्त्यात आजारी पडतो आणि जानकीला (इरावती हर्षे) सापडतो. जानकीसुद्धा तिच्या निराशेशी, आणि अस्वस्थतेशी झुंज देत एका प्रवासाला निघालेली असते. पण तिच्या प्रवासाला मात्र उद्देश असतो. समुद्री कासवांचे संवर्धन करण्यासाठी ती तळकोकणात चाललेली असते. तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या, निराशेच्या गर्तेत अडकलेल्या, या पाहुण्याला ती कशाप्रकारे त्यातून बाहेर काढते याची ही गोष्ट आहे.

या गोष्टीला अनेक पदर आहेत. अगदी आदिम काळापासून यशस्वीपणे समुद्रात आणि जमिनीवर, असे दोन्हीकडे आपले अस्तित्व राखून असलेल्या समुद्री कासवांचे संवर्धन करणारे दत्ताभाऊ (मोहन आगाशे) याविषयावर अगदी कळकळीने बोलतात. समुद्रातली कासवीण अंडी घालायला म्हणून किनाऱ्यावर येते. अंडी घालून तिला पुन्हा समुद्रात जावे लागते कारण किनाऱ्यावर ती जास्त काळ राहू शकत नाही. कुठलेही संरक्षण नसलेल्या त्या अंड्यांतून पिलं बाहेर येतात आणि आपली आपली समुद्राकडे निघून जातात. कासविणींबद्दल एक मिथक आहे. आपल्या अंड्यांना किनाऱ्यावर सोडून आलेल्या कासवीणीच्या डोळ्यात नेहमी पाणी असते. आणि समुद्रात दिसणारे कुठलेही छोटे पिल्लू पाहून तिला, ते आपलेच आहे असे वाटते.
या सगळ्याचा निव्वळ रूपक म्हणून उपयोग न करता, ही संपूर्ण प्रक्रिया कथेत गुंफून टाकली आहे. त्यामुळे या कथेला, प्रेक्षकांचे मन हलके करणारी अशी एक वेगळीच बाजू मिळालेली आहे. असा प्रयोग दुसऱ्या कुठल्या दिग्दर्शकाला जमला असता का हे सांगणे अवघड आहे, पण कासवने हा प्रयोग यशस्वी केला आहे.

कथेतील हे एक प्रत्यक्ष कासव. पण शिक्षण अर्धवट सोडून, आजूबाजूचे मित्र आयुष्याच्या वेगवेगळ्या (अलिखित) स्पर्धांमध्ये पुढे जाताना पाहून हताश झालेला मानव, हे दुसरं कासव. नशिबाने मिळालेल्या असुरक्षित किनाऱ्यावरून, त्याहीपेक्षा भयावह अशा महासागरात उडी घेताना मानवसारखी अनेक कासवं निराश होतात. पण त्यातल्या काही जणांना मात्र जानकीसारख्या कासविणी मिळतात. जानकीची मानवाबद्दल असलेली निरपेक्ष सहानुभूती हा माणसाचा अंगभूत गुण आहे. असे असले, तरी स्वतः निराशेच्या भोवर्यातून बाहेर येऊ पाहणाऱ्या व्यक्तींचा हा स्थायीभाव होतो. आपण निराश आहोत हे नेमक्या शब्दात सगळ्यांनाच व्यक्त करता येत नाही. आणि मग ती निराशा जगाला स्वीकार्य अशा ज्या भावना आहेत, जसे की राग, त्यातून बाहेर येते. जवळची नातीगोती हे समजू शकत नाहीत कारण नात्यांवर नेहमी अपेक्षांचे ओझे असते. अशावेळी या प्रवासातला एखादा हमसफरच आपली जास्त यशस्वीपणे मदत करू शकतो. कासवाची पिलं सुरक्षित समुद्रात पोचावी म्हणून झटणारे जानकी आणि दत्ताभाऊ नकळत मानवलादेखील त्यांच्या या अनुकंपेच्या कुंपणात सहभागी करून घेतात.
छोटेसेच असले तरी या कथेत एक तिसरे कासव आहे. ते म्हणजे अनाथ परशूचे (ओंकार घडी). बस स्टॅन्डवर चहा विकणारा परशू त्याच्या छोट्याश्या आयुष्यातील अनुभव सांगतो तेव्हा टाळ्याही वाजतात आणि गहिवरूनही येते. किनाऱ्यावरून समुद्रात समर्थपणे पोहत जाणारे ते ही एक छोटे कासव आहे.

कासवाची कथा जशी रोचक आहे, तितकेच त्याचे लेखनसुद्धा आहे. कित्येक ठिकाणी अगदी नेमक्या शब्दात प्रेक्षकांची वाहवाह मिळवणारे संवाद आहेत. आणि या सगळ्या जमेच्या बाजूंना खुलवणारे पार्श्वसंगीत आहे. त्याला पार्श्वसंगीत म्हणण्यापेक्षा पार्श्वध्वनी म्हणणे जास्त योग्य होईल. कारण प्रत्येक फ्रेममध्ये साथ देणारा समुद्राचा आवाज, हा संपूर्ण अनुभवच अतिशय सुखदायक आणि हळुवार करतो. आलोक राजवाडे कुठेही अभिनय करतो आहे असे वाटत नाही इतक्या ताकदीने त्याने मानव साकारलेला आहे. इरावती हर्षे, किशोर कदम, ओंकार घडी, या सगळ्यांचेच अभिनय सुंदर आहेत. पण आलोकचा मानव, त्याच्या अभिनयामुळे, या चित्रपटाचा निर्विवाद नायक ठरतो.

हा चित्रपट निराशेबद्दल आहे म्हणून तो निराश करणार असा पूर्वग्रह असेल तर तो काढून टाकावा. कारण कासव नुसताच आशावादी नाही, तर तो कित्येक ठिकाणी अल्हाददायी आहे. याचे सगळे श्रेय सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकरांच्या हाताळणीला जाते. कुठल्याही भावनेचे भडक रूप न दाखवता, कथेतील संदेश मात्र प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचेल असे दिग्दर्शन आहे. त्यामुळे केवळ ट्रेलर पाहून विषय जड/नकारात्मक असेल असे गृहीत धरून हा चित्रपट वगळणे अन्यायकारक ठरेल. या आठवड्यात बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण या सगळ्या गर्दीतून न चुकवता बघावी अशी ही कासवांची कथा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई, छान लिहितेस,
मला आवडलेल्या काही गोष्टी,
1)श्रीमंत निर्मिती मूल्य, कथेतील नायिका उच्च वर्गीय आहे, आणि ते तिच्या कपडेपट, फर्निचर, भांडी यातून दिसत राहते,
2) चित्रीकरण ,काही ठिकाणी वापरलेले ड्रोन शॉट्स ने तर त्या गावाच्या प्रेमात पडायला होते, समुद्राच्या लाटांचे ड्रोन शॉट्स पण भारी
3) गाणी, 2नच गाणी आहेत पण ती अगदी नेमक्या वेळेला आणि अतिशय समर्पक शब्द. सायली खरे चा आवाजात ती गाणी अगदी पछाडून टाकतात, हळू हळू चढत जातात ती गाणी.
4) कलाकार, एका प्रसंगात impossible is nothing चा साक्षात्कार झाल्यावर आलोकच्या निस्तेज डोळ्यात येणारी चमक पाहून शहारा येतो अंगावर.

@ सिम्बा

माझ्या हातून सुटलेले मुद्दे लिहिल्याबद्दल धन्यवाद!
>>>>कलाकार, एका प्रसंगात impossible is nothing चा साक्षात्कार झाल्यावर आलोकच्या निस्तेज डोळ्यात येणारी चमक पाहून शहारा येतो अंगावर.+१

सुरेख लिहिलंय सई

सिम्बा, तूही चांगलं निरीक्षण पूर्वक लिहिलंयस,
वेगळा धागा हवा तुझ्याकडून

>>>सिम्बा, तूही चांगलं निरीक्षण पूर्वक लिहिलंयस,
वेगळा धागा हवा तुझ्याकडून +१

खरंच. टेक्निकल निरीक्षण आहे. हवाच वेगळा धागा.
थँक्यू हर्पेन, सुमुक्ता आणि अंकु Happy

किती सुंदर लिहिलंयस सई !! तुझा आणि दुसर्‍या सईचा रिव्ह्यू वाचून वेगळे पॉईंट ऑफ व्ह्यूज मिळाले Happy
मला चित्रपट निराशाजनक, उदास वाटला नाही पण आल्हाददायकही वाटला नाही. एखाद्या गोष्टीचा समजूतदार आणि समंजस स्वीकार करुन coming to terms केल्यावर जसे शांत वाटते तसे वाटले.
अनुकंपेचा मुद्दा मात्र अगदी पटला.