विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-३

Submitted by अतरंगी on 27 September, 2017 - 07:18

भाग २:- https://www.maayboli.com/node/64003

"चल रे पटकन जेऊन घे."

"आई, मला त्या राउंड राउंड मध्ये भाजी दे."

"अरे, ती वाटी आहे ना राउंड, ताट पण राउंडच आहे, त्यातच जेवायचं असतं."

"अगं, ती नाही, ते मोठं राउंड राउंड!"

बायकोने घाई घाईत त्याला भांड्यांच्या ट्रे मधून एक बाउल काढून त्यात भाजी दिली

"अगं, हे नाही ते मोठ्ठं राउंड, सुपुत्र परत भांड्यांच्या ट्रे कडे बोट दाखवत"

"कशाssssत?"

"अगं, हे मोठं राउंड." मुलाने शेवटी ट्रे कडे स्वतः जाऊन बोट दाखवलं.

"ह्याच्यात ? कढईत ?"

"हो !"

"काही काय अरे, कढईत कोणी भाजी घेऊन जेवतं का?"

"होssss, बाबा आणि मी दुपारीच जेवलो !!!!"

कढईत भाजी घेऊन, दोन हाताने पोळी तोडत जेवणाऱ्या मुलाकडे बघत, मुलाला आजोळी नेऊन ठेवावे की बोर्डिंग स्कुल मध्ये टाकावे या विवंचनेत बायको !!!!!

१. जेवताना ज्यात भाजी बनविली त्याच भांड्यात हातात पोळी घेऊन जेवू नये. एक ताट किंवा प्लेट घ्यावी त्यात एका वाटीत भाजी घेऊन उरलेल्या जागेत पोळी ठेऊन आईने लहानपणी शिकवले तसे एकाच हाताने पोळी तोडून भाजी सोबत खावी. हे सगळे धुवायला केमिकल, पाणी, वेळ, श्रम वाया घालवलेले चालते, पण कढईतून डायरेक्ट खाल्लेले चालत नाही.

२. तुमचे लग्न अजून झाले नसेल तर रूम मध्ये एक बॉक्स आणून ठेवा आणि बाहेरून आल्यावर चप्पल, बूट त्यात ठेवायची सवय लावून घ्या. घरात शू रॅक नावाचे चप्पल आणि बूट ठेवायचे एक कपाट असते. त्यात चप्पल, बूट वगैरे ठेवायची सवय लागते.

३. गॅसचा लायटर आणि आपला लायटर वेगळा असतो. कुठे गेल्यावर उगाच गॅसचा लायटर सापडत नाही म्हणून लगेच तत्परतेने खिशातला लायटर काढून देऊ नका, विशेषतः सासरी. लोक उदबत्ती वगैरे पेटवायला काडीपेटी शोधत असताना लगेच तुमचा लायटर पुढे करू नका.

४. मुलाला पार्क, छंदवर्ग, स्विमिंग इत्यादी ठिकाणी नेताना तुम्ही कायम एका पायावर तयार व्हाल ! कारण तुमच्या आयुष्यातून हद्दपार झालेली हिरवळ तुम्हाला तिथे न्याहाळायला मिळते. पण बायकोला संशय येऊ नये म्हणून अधून मधून कुरबुर करावी. मला तिकडे बोअर होतं, असे समानार्थी काही डायलॉग मारावे आणि कधी कधी बायकोला पाठवावे. असा दिवस शक्यतो जेव्हा लॉंग विकेंड असतात, हिरवळ कमी असायचे चान्सेस जास्त असतात असा निवडावा.

५. रात्रंदिवस गॉगल घालायची फॅशन लगेच स्वीकारा आणि चालू करा. याचा प्रचंड फायदा म्हणजे आपण कुठे पाहत आहोत हे बायकोला अजिबात कळत नाही.

टीप:- त्यातून पण एखादे प्रेक्षणीय स्थळ बघताना बायकोने पकडलेच तर तोंडावर फेकायला "तुला अशी हेअरस्टाईल कशी दिसेल/तुझ्याकडे पण अशाच रंगाचा एक टॉप होता तो तुला किती खुलून दिसायचा/ आजकालच्या मुली काहीही घालतात नाही/दिसायला बरी आहे पण ड्रेसिंग सेन्स किती बकवास आहे तिचा" असले एखादे वाक्य अगदी निरागसपणाचा आव आणून तोंडावर मारायला तयार ठेवा.

६. बायकोला इम्प्रेस करताना, तिला हसवायचे म्हणून वगैरे मुलांचे कोडवर्ड्स सांगायचे नसतात. काही मुलं त्यांना मुलं झाली तरी ते कोड्स बायकोसमोर आपल्यासोबत कम्युनिकेशन साठी वापरतात.

७. ज्यांना बार मध्ये जाऊन पिण्यापेक्षा घरीच निवांत प्यायला आवडते त्यांच्यासाठी सध्या बाजारात थंड पेये थंड ठेवणारे 500 ml, 750ml चे vacuum flask मिळतात. मुलं वगैरे घरात असताना त्यांचे औषधांच्या ग्लासकडे लक्ष जाण्यापेक्षा एकदाच व्हिस्की/रम वगैरे त्यात ओतून पेग बनवून टाकावा. येता जाता, बायकोला स्वयंपाकात मदत करता करता चणे फुटाणे खात खात मस्त पिता येते.
टीप:- vacuum flask घेताना झाकण काढून बसवता येईल असा घ्यावा. धुवायला सोप्पं पडतं आणि शिवाय छोट्या तोंडाच्या फ्लास्क मधून बर्फाचे क्यूब्स आत जात नाहीत.

८. शॉपिंगला गेल्यावर मित्रांना मारायचे "काहीही घाल तुला कोण बघतंय/ तुझ्यापेक्षा तो ड्रेस पुतळ्यावर चांगला दिसेल/ थोडं पोट कमी असतं तर बरा दिसेल कदाचित/ याच्यापेक्षा थोडा चांगला दिसत असता तर निदान वाईट आहे असं तरी म्हणता आलं असतं" वगैरे डायलॉग बायको आणि सासरच्यांच्या सोबत शॉपिंग करताना मारायचे नसतात. बायको आणि सासरचे यांचं सेन्स ऑफ ह्युमर सोबत थोडं वाकडंच असतं.

९. बायकोच्या मैत्रिणींची नावे आणि चेहरे तुम्हाला लग्नाच्या आधीच पाठ झालेली असतात. पण त्यांची नावे कधी एका फटक्यात सांगायची नसतात. तिने एखाद्या मैत्रिणीचा किस्सा सांगितला तर "कोण ?" वगैरे विचारावे, मुद्दामून कोणत्यातरी दुसऱ्या मैत्रिणीचा संदर्भ जोडून ही म्हणजे ती का असे विचारावे.

टीप:- तुम्ही घरात कसेही रहा, पण जोपर्यंत बायकोच्या मैत्रिणींसमोर तुमचे इम्प्रेशन चांगले आहे, तिला "कसली लकी आहेस गं तू!" वगैरे कमेंट मिळत आहेत तोपर्यंत तुमचे स्थान अबाधित आहे. बेसिकली, तुम्ही बाकी गोष्टींसारखी मैत्रीणींसमोर मिरवण्याची एक गोष्ट आहात हे लक्षात ठेवा. तिच्या मैत्रिणींवर तुमचे इम्प्रेशन " कार्येशु मंत्री आणि शयनेशु कामदेव" अशीच असायला हवी.

१०. कधी न कधी, तुमच्या ध्यानीमनी नसताना, तुम्ही गाफील असताना बायको तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारणार हे लक्षात ठेवा. म्हणून फेसबुक, ईमेल आयडी आणि बाकी ठिकाणी जिथे जिथे आपल्या एक्स चा नाव पासवर्ड म्हणून टाकले आहे ते सर्व चेंज करा. आपले आणि बायकोचे नाव तोडून त्याची वाट लावून एखादे (मानव+मानसी=मानवसी, आत्माराम+वरदा=आवर, कोमल+आनंद=कोमा, मानव+जानवर=मानवर) असे घाणेरडे नाव तयार करा आणि त्या सोबत बायकोचा वाढदिवस जोडून पासवर्ड तयार करा. ही टीप कधी न कधी किमान एखादी पप्पी झप्पी तरी तुम्हाला नक्की मिळवून देणार.

क्रमशः

भाग ४:- https://www.maayboli.com/node/64069

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण जोपर्यंत बायकोच्या मैत्रिणींसमोर तुमचे इम्प्रेशन चांगले आहे, तिला "कसली लकी आहेस गं तू!" वगैरे कमेंट मिळत आहेत तोपर्यंत तुमचे स्थान अबाधित आहे.>> अजिबात नाही. अस काही झालच तर बायकोच्या डोक्यात मोठा सायरन वाजायला लागतो. अजूनही Happy

अस काही झालच तर बायकोच्या डोक्यात मोठा सायरन वाजायला लागतो. अजूनही >>>>>

या इनसिक्युरिटीचे कारण शोधा Happy Wink

१०. कधी न कधी, तुमच्या ध्यानीमनी नसताना, तुम्ही गाफील असताना बायको तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारणार हे लक्षात ठेवा. म्हणून फेसबुक, ईमेल आयडी आणि बाकी ठिकाणी जिथे जिथे आपल्या एक्स चा नाव पासवर्ड म्हणून टाकले आहे ते सर्व चेंज करा.
>>>
A=1 B=2 ........ Z=26
ARUN= 1+18+21+14=1182114

A=1 B=2 ........ Z=26
ARUN= 1+18+21+14=1182114>>>
गंडलेलं लोजिक आहे, हेच डिकोड करताना, ११,८,२१,१४ अस केलं तर ARUN चा KHUN व्हायचा... Wink

बिस्किटे, चॉकलेट्स संपल्यावर त्याचा कागद परत डब्यात न टाकता ड्स्ट बिनमध्ये टाकवा..
टॉवेल सापडत नाही म्हणुन जे हातात येइल त्याला हात पाय पुसु नयेत.
टूथब्रशलाही कव्हर मिळतं हे लग्न झाल्यावर माहिती होतं.
अ‍ॅपल हातातल्या हातात न खाता, प्लेट घेउन , अ‍ॅपल कटर ने केलेले तुकडे त्या प्लेट मध्ये घेउन खायची सवय लावा..

@अग्निपंख, Lol
डिकोड करून खुन झाला तर होऊ द्या.

Pages