लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!

Submitted by अदित्य श्रीपद on 28 September, 2017 - 13:09

आज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे.

लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!

लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून मग लताला शिव्या घालणारे हि काही लोक आहेत. मी लताचा भयंकर चाहता असलो तरी अंध भक्त नाही. आणि लताची गाणी आवडतात म्हणजे इतर गायिकाकडे ढुंकूनहि पाहायचे नाही असले दळभद्री विचारसुद्धा माझ्या मनात येत नाहीत.बऱ्याचदा आपण चाहते लोक असाच सारासार विवेक हरवून बसतो आणि स्वतःची गोची करून घेतो असं मला वाटतं. लता कितीही आवडली तरी तिच्या काही गोष्टी मला खटकतात त्या पहिल्यान्दा नमूद केल्या पाहिजेत
माझी लताबाबत सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही. तिच्या गायकीला आत्मसात करणारे आणि तिला पुढे नेणारे शिष्य तिने तयार केले नाहीत. आपला वारसा पुढे चालेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी तिची नाहीतर मग कुणाची होती? बर भारतात अशी गायकीची घराणी विपुल आहेत तेव्हा स्वतःचा वारसा निर्माण करून जपण्याची गोष्ट आपल्याला काही अगदी नवखी नाही. माझा हा आरोप खरतर फक्त लतावर नाही तर बालगन्धर्वांपासून ते अगदी दिलीपकुमार पर्यंत सगळ्याच महान कलावंतांवर आहे.बर आपल्या महान भारतवर्षाला घराणे शाहीची परंपरा अगदीच नवखीही नाही,(तिचे भरपूर दुष्परिणाम आपण भोगले आहेत थोडे सुपरिणाम दिसले तर काय हरकत आहे?). आजकाल तंत्रज्ञानाने यांची गाणी, अभिनय इ. कामं जतन करता येतात, पुढच्या पिढीला उपलब्ध होतात पण पूर्वी हे नव्हत. म्हणजे तानसेन खूप मोठा गायक असेल पण आता आम्हाला तो काय आणि कसा गायचा हे कस कळणार? त्याच्या घराण्याच्या गायकीवरूनच ना! आणि पुढे चांगले गायक जर तुमच्या घराण्यात निपजले तर तुमचीच गायकी ते अधिक समृद्ध करतील कि नाही? मुख्य काय आहे की तुम्ही जेव्हा खूप महान आणि यशस्वी कलावंत असता तेव्हा तुम्ही तुमच्या अंगच्या कलागुणाचे नुसते मालक नसता तर विश्वस्तही असता. खरे मालक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारे रसिक असतात. तेव्हा तिच्या संवर्धनाची जबाबदारी तुमचीच असते.
लताबाबत आणखी एक तक्रार करण्याजोगी गोष्ट म्हणजे तिची इतकी प्रचंड मोठी कारकीर्द आहे तिने इतक्या विविध प्रकारची गाणी इतक्या वेगवेगळ्या संगीतकारांच्या कडे म्हटली आहेत. तीचं एकूण अनुभव विश्व किती समृद्ध असेल! पण तीने स्वतःचे अनुभव सविस्तर कथन करणारे एक आत्मचरित्र सुद्धा लिहीलेलं नाही. (हरीश भिमाणीने लिहिलेलं पुस्तक इतकं भिकार आहे कि इथे त्याचा उल्लेख सुद्धा करायला नको.)खरतर तिच्या नुसत्या फिल्मी किशश्यावर २-३ खंड लिहून होतील. आत्मचरित्र सोडा तिच्या प्रदीर्घ अशा मुलाखती, Documentaries जवळपास नाहीतच.ज्या आहेत त्यात ती मोकळेपणाने, खुलून बोलत नाही.लता आज ८८ वर्षांची झाली आहे आजपर्यंत तिच्याकडे कोणी आत्मचरित्र/ चरित्र, मुलाखतीसाठी गेलच नसेल का! पण बहुधा ती स्वतःचं आयुष्य असं उलगडून सांगायला उत्सुक नसावी.
आणखी एक तक्रार म्हणजे काही गाणी म्हणायचं तिनं टाळायला हवं होत. “चंदनसा बदन...” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर...” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते.(असं आपलं माझं नम्र मत आहे.... तुम्ही असहमत होऊ शकता.)आणखी एक “हम को भी गमने मारा, तूमको भी गमने मारा, हम सबको गमने मारा, इस गम को मार डालो...” हि असली गाणी तिने का गायली असावीत कुणास ठाऊक.
बास यापेक्षा जास्त तक्रार मी करू शकत नाही.
आपल्याकडे सुरांची ४ सप्तक आहेत खर्ज, मध्य, तार आणि अति-तार सप्तक. या अशा २८ सुराच्या दुनियेत लता ज्या सहजतेने संचार करते, तसं आज पर्यंत एक आशा भोसले सोडली तर इतर कुणाही गायिकेला जमलेले नाही. पुढे जमू शकेल असे वाटत नाही. साध्या तार सप्तकातला सा लावताना गायक-गायिकांचा आवाज चिरकतो, फाटतो, केविलवाणा वाटतो, तिथे लता अति तार सप्तकात मुक्त बागडून इतक्या सहज मध्य सप्तकात येते कि पाहून, ऐकून अचंबित व्हायला होतं. तिच्या ह्या सामर्थ्याची जाणीव बहुधा शंकर जयकीशनला प्रथम झाली( तुम्हाला त्या आधीचे उदाहरण माहित असेल तर सांगावे.) आणि “रसिक बलमा...” मध्ये तिचा आवाज टिपेला गेला त्यानंतर जवळपास सगळ्या संगीतकारांनी तिच्या ह्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला. ( आता कधी कधी त्याचा दुरुपयोगही झाला आहे. उदा. तेरे मेरे बीच मे, कैसा ही ये बंधन अंजाना...आणि सोला बरस कि बाली उमर को सलाम)
सज्जाद सारख्या संगीतकारांनी तिच्या आवाजाला अति किंवा तार सप्तकात न नेताही कमाल केली आहे. तुम्ही त्याचं संगदिल या पिक्चर मधलं “दिल मे समा गये...”हे तलत बरोबर गायलेलं राजेंद्र कृष्णने लिहिलेलं आणि दिलीपकुमार मधुबाला वर चित्रित झालेलं गाणं ऐका किंवा सी. रामचंद्र चं १९५८ साली आलेल्या “अमरदीप” मधलं “ दिल कि दुनिया बसके सावरिया...” हे गाणं ऐका. म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल .खाली लिंक दिलेल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=vFXPWUduCCk
https://www.youtube.com/watch?v=bnnyd15Z_kM
हे दोन महान संगीतकार केवळ लताच आपल्या संगीताला न्याय देऊ शकेल असे मानत. सज्जदचं “ एक लता बस गाती है बाकी सब रोती है.” हे प्रसिद्ध पण जरासं अतिशयोक्तीपूर्ण विधान असलं तरी त्यातून त्याच्या भावना पुरेपूर व्यक्त होतात. लताशी काही बेबनाव होऊन लताने त्याच्याकडे गायचे सोडल्यावर सी रामचंद्राची तर कारकीर्दच संपली. काय झालं हे नक्की कुणाला कधीच कळले नाही.
लताची मला सगळ्यात जास्त आवडलेली गाणी (“लग जा गले...” किंवा “नैना बरसे रिमझिम...” चित्रपट “वो कौन थी” सोडून)आहेत- ‘धीरे धीरे मचल’ हे अनुपमा मधलं गीत- हेमंत कुमारने संगीतबद्ध केलेलं आणि कैफी आजमी ने लिहिलेलं आणि ‘परख’ मधलं सलील चौधरीने संगीत दिलेलं आणि शैलेंद्रने लिहिलेलं “ ओ सजना, बरखा बहार आई ...”हे, या गाण्यांच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=qFJBl5_TxWU
https://www.youtube.com/watch?v=5a7l2UzZ654
https://www.youtube.com/watch?v=TAb9IktpLGY
यातल्या शेवटच्या लिंक मधले ‘अनुराधा’ मधले “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना..”लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका. ‘पिया’ च्या पि आणि या मधली ती सूक्ष्म, नाजूक थरथर, अनुराधाचे दबलेले दु:खं उघड करते. ह्या गाण्यात “ कजरा ना सोहे...” हे कडवं सुरु होण्याच्या अगदी थोड आधी डॉ. निर्मल (बलराज सहानी) अनुराधा गाता असतानाच ( त्याचे तिच्या कडे लक्ष नसते)शेजारच्या खोलीत जातो त्यावेळी अनुराधा म्हणजे लीला नायडूने चेहऱ्यावरचे दु:ख, निराशा फार उत्तम दाखवली आह. लीला नायडू फार सुंदर अभिनेत्री होती पण ती इतका सहज सुंदर अभिनय करू शकते हे हा चित्रपट पहायच्या आधी मला ठावूकच नव्हते.कदाचित हृशिदांची हि कमाल असेल!
१९४२ ते आता आता पर्यंत भारतीय सिने संगीतातलं लताचं स्थान म्हणजे दशांगुळे व्यापून उरले असेच होते. इतकी प्रदीर्घ, यशस्वी आणि देदीप्यमान कारकीर्द अक्ख्या होल वर्ल्ड मध्ये कुणाच्या नशिबी आली असेल असे वाटत नाही. या बाईने जवळ जवळ एकछत्री राज्य केले आहे म्हणाना. मी लताचा भयंकर चाहता पण म्हणून मला दुसऱ्या गायक गायिका आवडत नाहीत असं अजिबात नाही. लता नावाच्या झन्झावाताच्या प्रचंड सामर्थ्यापुढे अनेक लहान लहान कलाकाराची तारवं फुटली त्याला काय करणार!. माझं मन त्याबद्दल लताला दोष द्यायला तयार नाही, पण अनेक गुणी गायिकांना एकतर संधीच मिळाली नाही किंवा ज्यांना मिळाली त्यांची लताशी तुलना झाली आणि ते साहजिकच मागे पडत गेले याची हळहळ मात्र खूप वाटते.
जस्वीन्दर कौर(खय्याम ची बायको- हीचं ‘तुम अपना रंज ओ गम...’ हे गाण खूप गाजलं होतं ), मीना कपूर-अनिल बिस्वास ची पत्नी (“कूछ और जमाना कहता है- छोटी छोटी बाते” या गाण्यात प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या दोन ओळी रिपीट करताना ती शब्द असे काही तोडते आणि अशा हरकती घेते कि ज्याच नाव ते – खाली या गाण्याची लिंक दिली आहे लक्षपूर्वक ऐका).
https://www.youtube.com/watch?v=MoCUt4Qtu9w
गीता दत्त, मुबारक बेगम( ‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली ...), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत. असं म्हणतात कि नूरजहा जर फाळणीच्या वेळी पाकिस्तानांत गेली नसती, तर आज लता एवढी यशस्वी झाली नसती. आता नुरजहा पाकिस्तानात गेल्यावर फार उजेड पाडू शकली नाही (म्हणजे ती अगदीच यशस्वी झाली नाही असे नाही पण लताच्या तुलनेत ...कीस गल्ली मे गलबला!)तिची पाकिस्तानात गेल्यानंतरची काही गाणी मी ऐकली आहेत आणि ती तद्दन फालतू आहेत आणि नूरजहानची गान कारकीर्द लताच्या मानाने फारच आधी म्हणजे १९८४ मध्येच संपली आणि १९८६ मध्ये तर तिचा मृत्यूच झाला. असो, पण नुरजहा जर भारतात राहिली असती तर कदाचित तीची गान कारकीर्द जास्त फुलली असती हे मात्र खरं. भारतीय फिल्म इंडस्ट्री आणि संगीत ह्यांच्या पुढे पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी.पाकिस्तानात तिला तोडीचे गीतकार, संगीतकार, सहगायक, आणि श्रोतृवर्गहही मिळाला नाही हेही खरच.मी तिची १९४७ पूर्वीची जवळपास सगळी गाणी ऐकली आहेत आणि सगळी जबरदस्त आहेत. तिचा आवाज, त्याचा पोत, त्याचा बाज काही औरच होता.ती स्वतः सिनेमात नायिकेचं काम करीत असे. दिसायला हि तशी बरी होती,अभिनय वगैरे चुकूनही करीत नसे.(तो सचिन हि करत नाही पण ते एक असो...) पण फक्त स्वतःलाच आवाज द्यायची, पार्श्व गायन करीत नसे.(१९६० पर्यंत). तीचं गाण ऐकताना वाटत राहत कि हिने नक्की समोर माईक धरला नसेल, एव्हढा स्पष्ट खणखणीत आवाज.
“ दिया जलाकर आप बुझाया “, “आवाज दे कहा है...” आणि “जवान है मुहब्बत, हसी है जमाना...” हि तिची विशेष गाजलेली आणि मला स्वतःला प्रचंड आवडलेली गाणी. खाली लिंक दिलेल्या आहेत. आवर्जून वेळ काढून ऐका ...
https://www.youtube.com/watch?v=ANptt7VMxXU
https://www.youtube.com/watch?v=IL5EbdnQm0s
https://www.youtube.com/watch?v=Mttp129cf8o
त्यातूनही मला सगळ्यात आवडलेलं तिच गाण म्हणजे “जवा है मुहब्बत... “ हे. ह्यात मुहब्बत मधल्या ‘त’ वर ती सूर किंचित तोडते, आणि नंतर “हसी ही जमाना..” असं अलगद उचलते कि बास! याच गाण्यातलं शेवटच कडवं जे “तुम आये के बचपन मेरा लौट आया.. हे ती जरा खालच्या पट्टीत घेते म्हणजे ते ऐकताना असं वाटत कि कुणीतरी बंदुकीत गोळी भरतोय, मग barrel वर करीत खटका मागे ओढून नेम धरतय आणि एवढी वातावरण निर्मिती झाल्यावर संणकन गोळी सुटावी तसे “ मिला है मुझे जिंदगी का बहाना” आपल्या कानावर येऊन आदळतात. जितक्या वेळा ऐकतो तितक्या वेळा अंगावर शहांरेच येतात राव!
इतके चांगले गुण असलेली गायिका आम्हाला सोडून पाकिस्तानात जाऊन बसली आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली म्हणून हळ हळ वाटते दुसरं काय.तिनेच १९८२ साली भारतात आली असताना म्हटल्याप्रमाणे कलाकारची कला हि त्याची स्वतःची मिळकत नसते तर ती रसिकांची मालमत्ता असते. आमची मालमत्ता घेऊन शत्रू राष्ट्रात जाऊन बसायचा तिला काही हक्क नव्हता.जाऊ दे ..आता बोलून काय उपयोग!
---आदित्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅडम नूरजहाँ यांचा मृत्यू २००० साली झाला असं विकीपिडियावर लिहिले आहे. १९८६ साली कोणत्या नूरजहाँचा मृत्यू झाला?
हा लेख आजिबात आवडलेला नाही. लता या नावाविषयी लिहीण्यापूर्वी थोडा अधिक अभ्यास करून लिहावे ही विनंती. हिंदी चित्रपट संगीतात पहिल्या १००० अंकांवर लता मंगेशकर हे एकच नाव आहे आणि असेल.
लतादिदींनी शिष्य वगैरे का घडवले नाहीत असे naive प्रश्न मलाही पडले होते कधी काळी पण पण जितकं तुम्ही ऐकाल तितकं तुम्हाला कळेल की हे शिकण्या शिकवण्या पलीकडचं आहे. Lata is Lata. The one and only. देव त्यांना उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य देवो__/\__

छान लेख.

मला हे तार सप्तक सूर सरगम वगैरे शास्त्रीय बाबी सर्व डोक्यावरून जातात. मात्र दिदींच्या आवाजातील गोडवा आणि आशाच्या आवाजातील मादक खट्याळपणा पोहोचतो, आणि तोच पुरतो Happy

बाकी सुरुवातीचे पॅराग्राफ ईथून काढून त्याचा वेगळा लेख बनवून दोन लेख स्वतंत्र प्रकाशित करायला हवे होते. तक्रारीचा सूर लताच्या चाहत्यांना खटकल्यास पुढचा लेख झाकोळला जाण्याची शक्यता आहे.

<<बाकी सुरुवातीचे पॅराग्राफ ईथून काढून त्याचा वेगळा लेख बनवून दोन लेख स्वतंत्र प्रकाशित करायला हवे होते. तक्रारीचा सूर लताच्या चाहत्यांना खटकल्यास पुढचा लेख झाकोळला जाण्याची शक्यता आहे.>>
हे मान्य आहे...

हा तीन तासांचा लघुपट १९९० साली आला होता ज्यात दिदी आपल्या कारकीर्दीविषयी बोलल्या आहेत. आज त्यातील अनेक गोष्टी आपल्याला अगोदरच माहिती असतील पण त्यांचा उल्लेख प्रथम ह्या लघुपटात झाला असण्याची शक्यता आहे. माझी आवडती गोष्ट म्हणजे प्रत्येक भागाच्या शेवटी लतादिदींनी गाण्याच्या दोन ओळी कोणत्याही वाद्यमेळाशिवाय गुणगुणल्या आहेत. त्या ऐकायला फार गोड वाटतात Happy
https://youtu.be/BKdh5S9O6kA

विस्कळीत लेख वाटला. ५०-९०च्या दशकातील मंगेशकर फॅमिली सोडून इतर गायिकांची फारशी गाणी ऐकलेली नाहीत आणी २००० सालानंतरची लताची गाणी तितकीशी भावत नाहीत.

इण्टरेस्टिंग लेख. जरा टीकात्मक असल्याने बर्‍याच पॉईण्ट्स बद्दल सहमत नाही. तार सप्तक वगैरे मला कळत नाही पण 'गल्ली चुकलं काय हो?' इतपत कळते. म्हणजे गोलमाल मधल्या गाण्यात लता गातागाता हसते ते ऐकायला खटकते (हेच आशाचे ऐका - सुन सुन सुन दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है मधे), किंवा तुझसे नाराज नही जिंदगी मधे त्या कडवे संपवणार्‍या ओळी खटकतात ईई. पण तरीही मी जबरी लताफॅन आहे. नूरजहाँ चे ते जवाँ है मोहब्बत खूप श्रवणीय असले, तरी तिची लास्टिंग मेमरी म्हण़़जे सुनील गावसकर ने कोणातरी पाकड्याला तिच्यावरून दिलेले फेमस उत्तर इतकीच आहे Happy

मै Lol नाना - यावर सचिन ने सिक्स मारल्यावर शोएब रन अप च्या टॉप ला गेला तेव्हा रवी शास्त्री जे म्ह्ण्टला ते मी म्हणतो "Now what will the come back be?" :). बाय द वे उपमेवरून लक्षात आले असेलच की मी सचिन भक्त आहे Wink लताच्या गाण्यांचा तर आहेच. पण सर्व रास्त टीका वेलकम आहे दोघांवरही.

लता मंगेशकरांची शिष्य परंपरा या मुद्द्यासंदर्भातः

२०व्या शतकातल्या शास्त्रीय गायक/वादकांसंदर्भात हा मुद्दा अनेकदा उपस्थित झाला आहे. १९व्या शतकापर्यंत कलाकार राजाश्रयी असत, त्यांना एका जागी बस्तान होते. त्यामुळे जवळपास प्रत्येक प्रसिद्ध व सर्वोत्कृष्ट कलाकाराची शिष्यपरंपरा होती. २०व्या शतकात विशेषतः उत्तरार्धात कलाकारांचे भारतात व भारताबाहेर दौरे प्रचंड वाढले. एका जागी बस्तान राहिले नाही. त्यामुळे गुरु शिष्य पारंपारिक पद्धतीने तालीम देणे जवळपास अशक्य झाले. त्यातदेखील काही कलाकार उस्ताद म्हणुन नावाजलेले आहेत पण ते तुलनेने सामान्य लोकांत कमी प्रसिद्ध राहिले. उदा. गुलाम मुस्तफा खान. यांची शिष्य परंपरा मोठी पण गायक म्हणुन त्यांचे नाव भीमसेन बरोबर नाही आले. भीमसेन जोशींचा नाव घेण्यासारखे शिष्य एकही नाही. अशीच अनेक इतर उदाहरणे देता येतील.

दुसरा मुद्दा सिनेमात गाणार्‍या अजून कुठल्या गायक-गायिकेने शिष्य तयार केले? शिष्य तयार करतील अशी त्यांची तयारी राहिली आहे का? सिनेमात गाण्याला मी नाव ठेवत नाहिये. ती एक कला आहेच. पण कलेबरोबरच त्यात क्राफ्टचे (कारागिरी) अंग मोठे आहे. बहुसंख्य सिनेगायकांचा पाया शास्त्रीय संगीतात आहे, किमान लता-आशाच्या पिढीत तरी होता. त्यांनी तालीम शास्त्रीय संगीतकारांकडे घेतली. पुढे सिनेगायक झाले. तेव्हा लता मंगेशकर शिष्य तयार करू शकतील का हा मुद्दाही आहे. त्या शिष्याला क्राफ्ट शिकवून उत्कृष्ट कारागिर नक्की करू शकतील. आणि तसे झालेही असेल. पण त्यांच्याकडे येणारा मनुष्य मुळात कुठल्यातरी शास्त्रीय संगीतकाराचा शागीर्द म्हणुन उमेदवारी करूनच येणार नाहीतर नुसती कारागिरी शिकवून काय होणार.

लता मंगेशकरांवरील अजून एक 'प्रसिद्ध' पुस्तक राजु भारतनचे आहे.

>> “चंदनसा बदन...” , “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “, “एहेसान तेरा होगा मुझपर...” <<
हि आणि यासारखीच पुरुषी आवाजातहि गायली गेलेली गाणी लताबाईंनी तोडिसतोड तर कधी मूळ गाण्यापेक्षा उत्तम गायलेली आहेत. त्यांचं पिक्चरायझेशन हि सुंदर झालेलं आहे, (उदा. सायरा बानोने तर डेबुटांट असुनहि कमाल केलीय या गाण्यात), तर तुमचा आक्षेप नेमका कशावर आहे याचं मला कुतुहुल आहे.

बाकि लताबाईंच्या दैवी आवाजावर, प्रतिभेवर आम्हि काय लिहिणार, त्यांच्या हयातीत जन्मलो हेच आपलं भाग्य आहे. संगिताच्या या देवीला ८८ व्या वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!

<<हा तीन तासांचा लघुपट १९९० साली आला होता ज्यात दिदी आपल्या कारकीर्दीविषयी बोलल्या आहेत. आज त्यातील अनेक गोष्टी आपल्याला अगोदरच माहिती असतील पण त्यांचा उल्लेख प्रथम ह्या लघुपटात झाला असण्याची शक्यता आहे. माझी आवडती गोष्ट म्हणजे प्रत्येक भागाच्या शेवटी लतादिदींनी गाण्याच्या दोन ओळी कोणत्याही वाद्यमेळाशिवाय गुणगुणल्या आहेत. त्या ऐकायला फार गोड वाटतात Happy>>
ही बहुधा नस्रीन कबिर ने केलेलि फिल्म आहे. ह्यवर तिने पुस्तक ही लिहिलेले आहे पण ते गाजले नाही. ह्यात लता फार खुलुन बोललेलि नही.प्रत्येक संगीतकार -वो बहुत अच्छे थे , मै उनको बहुत मानती थी , असे ती म्हणते तर इतर सगळे तिचे खुप कौतुक करतात. सज्जड आणि गुलजार फक्त जेन्युइन वाटतात ...

भारतीय संगीतात परंपरा/घराणी फार पूर्वी पासून आहेत.ते आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे म्हणाना. संगीत म्हणजे शास्त्रीय , सुगम, लोक नाट्य कि चित्रपट संगीत ह्याने त्यात काही फरक पडता कामा नये. लता ही दिनान्थांची मुलगी त्यांची( तिला बळवंत संगीत परंपरा म्हणतात) गायकी तिने जशी च्या तशी उचलली नाही, दिनानाथांची गायकी खर्या अर्थाने वसंतराव देशपांडे ह्यांनी पुढे नेली. हे स्वत: त्यानीच सांगितले आहे. त्यांच्या गायकीतला आक्रमकपणा आशा आणि हृदयनाथ ह्यांच्या संगीतात जाणवतो.( खरेतर ते वारले तेव्हा आशा आणि हृदयथ फारच लहान होते) लताचे गाणे तसे आक्रमक नाही. तसे ते असावे असेही नाही, आणि ते फार छान आहे.....

बाकि लताबाईंच्या दैवी आवाजावर, प्रतिभेवर आम्हि काय लिहिणार, त्यांच्या हयातीत जन्मलो हेच आपलं भाग्य आहे. संगिताच्या या देवीला ८८ व्या वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!>>>>>>> +1111111

लता शिष्य कसे बनवणार? शिष्य निर्माण करणारे कलाकार स्वतः संगीताची निर्मिती करत होते. लता दुसऱ्यांची निर्मिती गात होती आणि तिचा तो गाता गळा साक्षात दैवी होता. तो गळा कोणा शिष्याला वारशात देता आला असता तर तिने स्वतःच्या भाचरांना दिला नसता का? अर्थात तिने स्वतः प्रचंड मेहनत घेऊन स्वतःला तयार केले पण देवाने तिला गोड गळ्याचे वरदानही दिले. लताने गायलेली गाणी इतरांच्या तोंडून ऐकली की फरक कळतो. कित्येक सामान्य गाणीही केवळ लताच्या आवाजात असल्यामुळे श्रवणीय झालेली आहेत.

नूरजहाँ व शमशाद बेगम यांची गाणी मलाही आवडतात. दोघीही श्रेष्ठ गायिका आहेत पण त्या गायच्या तो काळ वेगळा होता. त्या काळात जे तंत्र होते व जे चित्रपट बनत होते त्यात त्यांचा तो धारदार व किंचितसा अनुनासिक आवाज खपून गेला. पण पुढे चित्रपट आणि चित्रपट संगीत अतिशय जलद गतीने बदलले. 50 व 60 च्या दशकात ज्या प्रकारची हळुवार, गोड गाणी आली त्यात लतापुढे नूरजहाँ टिकू शकली नसती. ती पाकिस्तानात गेली त्यामुळे तिची झाकली मूठ सवालाखाची राहिली. लता नसती तर कदाचित त्या पद्धतीची गाणी बनलीही नसती. मग नूरजहाच ग्रेट वाटत राहिली असती.

ह्यात लता फार खुलुन बोललेलि नही.प्रत्येक संगीतकार -वो बहुत अच्छे थे , मै उनको बहुत मानती थी , असे ती म्हणते तर इतर सगळे तिचे खुप कौतुक करतात. सज्जड आणि गुलजार फक्त जेन्युइन वाटतात .>>> नक्की काय अपेक्षित आहे तुम्हाला? लतादिदींनी इतरांबद्दल आणि इतरांनी लतादिदींबद्दल वाईटसाईट बोलावं?
लतादीदींनी गायलेली गाणीच खूप बोलतात. ती ऐकत राहीली तरी गाण्याविषयी बरंच काही शिकायला मिळेल एखाद्याला.
लतादीदीची कला सर्वोत्कृष्ट आहे. अर्थात त्यांना संगीतकारही तितक्याच ताकदीचे लाभले हे आपलं भाग्य!

लेख पटला नाही.
एकीकडे लताने अन्य गायिकांची कारकीर्द खुंटवली (ही झिजलेली निरर्थक टेप्) आणि दुसरीकडे लतानेच स्वतःचे शिष्य तयार केले नाहीत (सुगम गायकाने स्वत: चे घराणे/ शिष्य निर्माण केल्याचे मी तरी ऐकलेले नाही.)
लता आवडते म्हणजे दुसर्‍या कोणाचीच गाणी आवडत नाहीत, असं कोण कशाला म्हणेल? ही काय निवडणूक आहे का , की फक्त एकाच कोणाला मत देता येईल?
शेवटी नूरजहांबद्दल : तिचं तिच्या माजी नवर्‍याने लिहिलेलं चरित्र (अनुवाद) वाचलं. ती मूळची लाहोरची. फाळणी झाली तेव्हा ती लाहोरला, स्वतःच्या मूळ गावी परत गेली, जे इथे राहून तिच्यासाठी दुरावले असते.
अन्य अनेक गृहीतकांप्रमाणे भारत पाक शत्रूराष्ट्र हेही तुम्हीच ठरवून टाकलंत. तसं असतं तर मेहंदी हसन, गुलाम अली पासून नाझिया हसन आणि आणखी कोण कोण भारतात लोकप्रिय का झाले? नूरजहाँची पाकिस्तानात गेल्यानंतरची गाणी त्या दर्जाची नाहीत हे मीही ऐकलं /वाचलंय.

मलाही चंदन सा बदन लता च्या आवाजात जास्त आवडते. जिंदगी भर नही भूलेगी हे सुद्धा दोघांचे स्वतंत्र आहे, चालीत थोडा फरक आहे, त्यामुळे ते ही आवडते. मंझिल मधले रिमझिम गिरे सावन पूर्वी किशोर चे जास्त आवडायचे. आता लताचे जास्त आवडते.

छान लेख! टीकेचा सूर थोडा आहे पण यानिमित्ताने इथे लताबाईंची गाणी चर्चिली जात आहेत हे छान आहे.

लताबाईंनी इतर गायिकांना पुढे येऊ दिलं नाही ही ओरड नेहमी ऐकली आहे. त्यात तथ्य असेल / नसेल. गेली कित्येक वर्षं त्या निवृत्त आहेत. वीरझारा व लुकाछुपी बहुत हुई सोडलं तर दिल तो पागल है ९७ शेवटचा मोठा सिनेमा म्हणावा लागेल. तरी वीस वर्षात दुसरी लता झालेली नाही. श्रेया सुनिधी पासून रेखा भारद्वाज पर्यंत अनेक गायिका आवडतात पण देअर इज स्टिल नो अदर लाइक हर.

लताने आत्मचरित्र लिहिण्याचा तिच्या गाण्यांनी मिळणार्‍या श्रवणानंदाशी काही संबंध नाही. पण कलाकाराला फक्त एक कलाकार म्हणून पाहण्याऐवजी, त्यातला माणूसही आपल्याला पाहायचा असतो.
लताच्या मुलाखती ऐकल्या/वाचल्या असतील किंवा तिने लिहिलेलं (म्हणून जे छापलेलं दिसतं) ते वाचलं, तर बाई नेहमीच पोलिटिकली करेक्ट बोलत आल्यात असं दिसतं. त्यामुळे आत्मचरित्राची अपेक्षा फोल आहे. संगीतकार आणि त्यांचं संगीत यांविषयी त्या वेगळं आणखी काही लिहू शकतील का माहीत नाही. तसंच त्यांच्या संगीतसाधनेबद्दल भरपूर लिहिलं गेलंय.

संगीतकारकीर्दीला २५ वर्षं पूर्ण झाली (आता याच गोष्टीला पन्नास वर्षं होतील) तेव्हा शांता शेळके आणि अन्य एक लेखक, यांनी लताबद्दल अनेकांना लिहितं करून एक ग्रंथ संपादित केला होता. त्यातला कुमार गंधर्वांनी लिहिलेला लेख मला शाळा/ज्युनियर कॉलेजात मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता. पुढे ते पुस्तकही वाचता आलं. त्यातल्या आशाच्या लेखाचं शीर्षक लक्षात आहे - 'आमचे छोटे बाबा.'

'फुले वेचिता'सुद्धा आहे.

मला लहानपणी आशा प्रचंड आवडे. त्यातूनच 'लताने आशाला पुढे येऊ दिलं नाही' वगैरे वाचून लताबद्दल अढी तयार झाली. लता आशासारखं गाऊ शकत नाही, हेही डोक्यात तयार झालं होतं. नंतर अक्कल आल्यावर लताचा आवाज, तिचं गाणं यांची महती कळली आणि मग दोघीही सारख्याच आवडू लागल्या.

चिनूक्स, सेम पिंच. बरेचदा घरातले/आजुबाजुचे बोलताना ऐकून अशी मते तयार होतात. किमान माझे तरी असे झाले होते. सु/दुर्दैवाने मला संगीतातले ओ की ठो कळत नसल्याने मोठा झाल्यावर सर्वांचे आवाज आवडू लागले. लता/आशा जमान्यातले संगीताच्या तुलनेत सध्याच्या संगीतात प्रयोग अधिक होत आहेत. त्यामुळे वेगवेगळे पोत असलेले आवाज ऐकायला मिळत आहेत. हे पण चांगलेच लक्षण आहे. दुसरी लता मंगेशकर होणे हे प्रगतीपेक्षा जैसे थे राहण्याचेच लक्षण असेल. सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सोना मोहपात्रा, रेखा भारद्वाज, शिल्प राव, नेहा भसिन, नेहा कक्कर आणि अनेक विविध गायिका आपल्याला त्यांच्या कलाकारीचा आनंद देत आहेत. दुसरी लता नाही म्हणून रडणे फुकाचे.

लताच्या समकालीन गायिकात सुमन कल्याणपुरांचा पुरेसा उल्लेख (वावटळी पुढे टिकल्या नाहीत हे तितके योग्य विधान नाही) देखील नसणे हे फारच खटकले. गीता दत्त नक्कीच लतापुढे ठाम उभ्या होत्या. त्यांची घसरण / अंत याची कारणे वेगळी. रुना लैला, वाणी जयराम देखील समकालीन. किशोरी आमोणकर, गीत गाया पत्थरोने, लताने सगळा स्टॉक बाजारातून मागे घ्यायला लावणे हे वेल डॉक्युमेंटेड आहेच.
http://theladiesfinger.com/lata-female-singers/

सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सोना मोहपात्रा, रेखा भारद्वाज, शिल्प राव, नेहा भसिन, नेहा कक्कर आणि अनेक विविध गायिका आपल्याला त्यांच्या कलाकारीचा आनंद देत आहेत. दुसरी लता नाही म्हणून रडणे फुकाचे>>>>>

हो, हल्लीच्या सगळ्याच गायिका खूप टॅलेंटेड आहेत. पण त्या सगळ्या त्याच त्या प्रकारची गाणी गातात. श्रेया घोषाल मला खूप आवडते पण तिची प्रेमगीतेच जास्त ऐकलीत, पॉप्युलर झालीत. लता प्रेमगीते, उडत्या चालीची खट्याळ गीते, दर्दभरी रडगीते, भक्तिगीते सगळी गात असे, गण्यातली भावना आवाजात पूर्णपणे दाखवून ती गात असे. योग्य शब्दोच्चार, गायची पद्धत याबाबत ती खूप आग्रही होती हे तिच्या व तिला गाणी देणाऱ्यांच्या मुलाखतीतून ऐकलंय. त्यामुळे गाणे जिवंत वाटायचे. या बाबतीत लता ती लताच व आशाही ती आशाच.

हल्ली त्या प्रकारची गाणी बनत नाहीत. टॅलेंटेड गायिका आहेत पण त्यांना चौफेर प्रतिभा दाखवता येईल असे कामच मिळत नाही तर काय करणार? 50-60-70 च्या दशकातील सिनेमा आणि आताच सिनेमा यात जमीन अस्मानाचे अंतर पडलेय. तेव्हाचे चित्रपत एक टिपिकल फॉरमॅट सांभाळून बनायचे, त्यात एक प्रेमगीत, भक्तीगीत, बालगीत, विरहगीत , कॅब्रेगीत यांना वाव असायचा. आता हे सगळे इतिहासजमा झालेय. एका गायिकेचे फारतर एखादे गाणे चित्रपटात असते. मागे शिल्पा रावने म्हटलेले की एखाद्या चित्रपटासाठी जीव तोडून मेहनतीने गाणे गायले तरी ते फायनल प्रिंटमध्ये येईल की नाही याची शाश्वती नसते, कोणी दुसऱ्याचे गाणे फायनल प्रिंटमध्ये आले तर मेहनत फुकट गेल्यासारखे वाटते.

चिनूक्स, टण्या, भरत, पोस्ट्स आवडल्या.
मला स्वतःला आवडणारी अनेक गाणी ही लतादिदींची नाहीत. कोणत्याच कलाकाराची तुलना दुसऱ्या कलाकाराशी करणे व्यर्थ असते. हे जितक्या लवकर कळेल तितके आपण जास्त चांगले रसिक होतो.
ह्या लेखात नूरजहाँ बद्दल जे लिहिले आहे ते ही आवडले नाही. तिने पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर भरपूर गाणी गायली आहेत. त्यातील काही अत्यंत सुंदर आहेत (मुझसे पेहली सी मुहोब्बत, कल्ली कल्ली जान). तेव्हा तिने तद्दन फालतू गाणी गायली असे बेधडक विधान करण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर बरे झाले असते. लतादिदींनी पाकिस्तानमधील एका वाहिनीवर मुलाखत दिली होती (https://youtu.be/FD0i5ke8nVs) त्यात त्यांनी त्यांच्या आणि नूरजहाँ यांच्या मैत्रीविषयी छान सांगितले आहे.
एकूणच आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते अशा प्रकारच्या विधानांमुळे हा लेख अत्यंत न पटण्याजोगा झाला आहे.

चला ह्या निमित्तने अनेक जुन्या स्म्रुती जाग्या झाल्या ...सर्व प्रतिक्क्रिया सुखद वातल्या ....मि देखिल लताचा पन्खाच आहे. ८८ वय झाले तरी तीला मी अरेतुरेच करनर , आइ, आजी मावशी ह्याना कोन अहो जहो करते का?

लताबाईंच्या दैवी आवाजावर, प्रतिभेवर आम्हि काय लिहिणार, त्यांच्या हयातीत जन्मलो हेच आपलं भाग्य आहे. संगिताच्या या देवीला ८८ व्या वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!> +१
सुरैय्या चा आवाज पण छान होता.

मला ७० च्या दशकातील आणि मिड ८० पर्यंत च्या गाण्यांतला लता मंगेशकरांचा आवाज आवडतो. तरुण असताना गायक गायिका सुंदर गातातच. पण ४५- ५५ वर्षं वय असताना लताबाईंचा आवाज काही गाण्यांत जो काही लागलाय, त्याला तोड नाही. गेले अनेक वर्षं मला एक सवय लागली आहे, लता मंगेशकरांचे एखादे गाणे ऐकले की ते रेकॉर्ड करताना त्यांचे वय काय असेल हे मोजायचे आणि ते गाणे एंजॉय करायचे.
माझी ऑलटाईम फेव्हरीट्स- रझिया सुलतान - ए दिल ए नादान, घर- तेरे बिना जिया जाये ना, रॉकी- हम तुमसे मिले, क्या यहीं प्यार है, लिबास-
सिली हवा छू गयी आणि १९९१ चा लेकिन- सुनियो जी अर्ज म्हारियो ( लताबाईंचे वय- ६० वर्षे!!!)

Pages