पुस्तक

Submitted by अविनाश जोशी on 28 September, 2017 - 01:49

पुस्तक
माझी वाचनाची आवड सगळ्यांनाच माहित होती.
दिसेल ते पुस्तक मी वाचत सुटायचो. मला वाचनाचा भस्म्या रोगच झाला होता असं म्हणाना.
त्याच त्या विनोदी कथा आणि ललित कथा वाचून मी कंटाळलो होतो.
माझा कल आता गूढ वाचनाकडे जास्त होता.
मंत्रतंत्र, विविध साधनं, वशीकरण, संमोहन अशा विषयांचा भरणा माझ्या वाचनात वाढू लागला. किंबहुना फक्त याच विषयात माझे वाचन सुरु झाले.
मध्य आशियात कमावलेला भरपूर पैसा आणि कुणाची ही जबाबदारी नसणं यामुळे मला भरपूर वेळ आणि पुस्तकांकरिता भरपूर पैसा होता.
दोन तीन पुस्तकांची दुकान माझी ठरली होती तिथे जाऊन काय नवीन आले आहे हे विचारून मी भंडावून सोडत असे. दुकानदार ही या विषयात नवीन पुस्तक आलं कि मला फोन करत असत.
माझा वाचनाचा व मननाचा वेग प्रचंड होता. त्यामुळे आधाशासारखा मी पुस्तकांवर तुटून पडत असे.
मध्ये एक महिनातर कोरडाच गेला. म्हणजे मला एकही नवीन पुस्तक मिळाले नाही.
दुकानदाराच्या मागे माझी कटकट सुरूच होती.
महिन्यानंतर एक दुकानदार म्हणाला की त्याच्याकडे एक पुस्तक येणार आहे. फार दुर्मिळ पुस्तक आहे आणि त्याची किंमत काही हजारात असेल. माझ्या बाबतीत पैशांचा प्रश्न नव्हता. त्यामुळे ते पुस्तक मिळवायलाच हवे होते. दोन तीन आठवडे गेले तरी ते पुस्तक काही आले नव्हते. दुकानदाराच्या म्हणण्याप्रमाणे पुस्तक मिळवणे अवघड होते.
शेवटी एकदाचे त्याने मला पुस्तक दाखवले. पुस्तक प्लास्टिक पिशवीत बंद होते. आणि मुख पृष्ठावर कवटीचे चित्र होते. जीवन मृत्यू ह्या विषयांवर ते पुस्तक होते असे दुकानदार म्हणाला.
त्याला ते पुस्तक मी द्यायला सांगितले तर तो म्हणाला अजून निश्चित किंमत कळाली नाही. तरी चार पाच हजार रुपये तरी असावी. शेवटी बरीच घासाघीस करून मी तीन हजाराला सौदा पक्का केला.
दुकानदार मला म्हणाला की मी एका अटीवर हे पुस्तक तुम्हाला देत आहे. पुस्तकातले विषय अतिशय गूढ व तंत्र मंत्रांनी भारलेले आहेत. पण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही पाहिलं पान उघडून वाचता काम नये. असे म्हणून त्याने पहिले पान कव्हरला चिटकवले. आता तुम्ही मुद्दाम प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला पहिले पान वाचणे शक्य नाही. जर तुम्ही पहिले पान वाचले तर कुठल्याही प्रकारे मी जबाबदार राहणार नाही.
मी त्याची अट तात्काळ मान्य केली आणि पुस्तक घेऊन घरी आलो.
पुस्तकातले विषय बरेच चमत्कारिक व गुंतागुंतीचे होते.
पुस्तक संपूर्ण वाचल्यावरही फारसे काही कळले नाही. त्यामुळे पुनर्वाचन करावेच लागले. प्रत्येक वाचनात बरीच तंत्र माहिती होत गेली. पुस्तक म्हणजे अशा प्रकारच्या ज्ञानाचा खजिनाच होता.
पुस्तक जर असे असेल तर मला बंदी घातलेल्या पहिल्या पानावर काय असेल हा विचार मला अस्वस्थ करायला लागला.
बराच प्रयत्न करूनही माझे मन आवरेना.
शेवटी विचार केला की बघू तर उघडून. काय व्हायचं असेल ते होऊ देत.
मी काळजीपूर्वक पिना काढून पाहिलं पान वेगळे केलं आणि त्यावर दृष्टी टाकली.
त्याच्यावर एकच ओळ लिहली होती आणि ती वाचून मला जबरदस्त धक्काच बसला.
प्रकाशन जून २०१६, मूल्य रुपये ४०.

[नादभय ह्या आगामी संग्रहातून]

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

☺️

Lol Proud

Lol