नवरात्रीचे नऊ रंग कसे आले?

Submitted by सोनू. on 22 September, 2017 - 05:05

नवरात्र आली की मुंबईत नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.

पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही असं माझ्या ओळखीत तरी दिसलं.

महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात. अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. लोकसत्ता चा खप जास्त होतोय नी मटाचा कमी म्हणून खप वाढवण्यासाठी काय करावे यावर विचार करताना 2003 मधे ही कल्पना सुचली. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले. ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. मग काय, पसरले नवरंग मुंबईवर. इतके की मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे लोण पसरलं.

मार्केटिंग गिमिक असो का काही असो, रंगीत शहरं बघायला छान वाटतं हे नक्की. मी पण नेहमी असे रंग वापरून रंगून जाते नऊ दिवस ( ऑफिसचे दिवस, सुट्टीत नाही Happy )

जय मटा, जय माता Wink

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानाकळा,
बरोबर. एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक पद्धतीने सुरुवात करणारा मटा आहे. पूर्वी कोणी शुक्रवारी या देवीचा हा रंग वगैरे करायचे. सगळे 9 दिवस वेगवेगळे रंग घालणारे पण असतील. पण मटाने त्याला अगदी संघटीत उत्सवाचं रूप दिलय. वार - देवी - रंग असा कॉम्बो करून रंग ठरवून टाकलेत. बाकी कुणी वेगळा क्रम दिला तरी यांचे "लॉजिक" पटते म्हणून लोक यालाच फॉलो करतात.

मी एका क्लायंटचे हेच नवरात्री नवरंग कॅम्पेन चालवतोय व्हॉट्सपवर....
तिथे काल तीन वेगवेगळे रंगक्रम असल्याचे समजले. काही जणींनी आजचा रंग राखाडी असल्याचे म्हटले, काहिंनी पांढरा तर काहींनी भलताच....
पुढे जाऊन प्रत्येक जण आपआपले क्रम काढणार आणि गोंधळ होणार असे दिसते. Happy

वेगवेगळे झाले तरी काही फरक नाही पडणार कारण प्रत्येक ऑफिसवाले आपण कोणता फॉलो करायचे हे ठरवतीलच. तसे मेल फिरतात.
फक्त वेगवेगळ्या ऑफिसचे वेगवेगळे होऊ शकतील. व्हॉटस्सपवर जे फोटो फिरतात, ज्यात लेडीज स्पेशल ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एकाच रंगातल्या बायका दिसतात, ती मजा निघून जाईल फक्त Happy

माझ्यामते वेगवेगळे रंग प्रत्येकाने काढणे चांगलेच. अश्याने या मागे काहीही प्रथा परंपरा धार्मिक एंगल नाहीये हे लोकांच्या डोक्यात राहील.

माझ्यामते वेगवेगळे रंग प्रत्येकाने काढणे चांगलेच. अश्याने या मागे काहीही प्रथा परंपरा धार्मिक एंगल नाहीये हे लोकांच्या डोक्यात राहील.
>> कठीण आहे. "आमच्यात" हे रंग असतात असं सांगणारे तयार होतात.

बरोब्बर सोनू,मी पण मटा मध्येच आधी हे नवरंग बघितले होते. त्या नंतरच्या 1 -2 वर्षात लोकमत,सकाळ आणि बाकी काही पेपर मध्ये पण सुरु झाले ,पण तेव्हा रंगा बाबतीत एक वाक्यता नव्हती. आता सगळ्या पेपर ,इतकेच काय ऑफिस मध्ये फन कमिटी कडून येणाऱ्या मेल मध्ये पण एकच रंग असतात.

हे रंग दिवसानुरूप असतात , जसं रविवार सुर्याचं प्रतिक म्हणून तांबडा , सोमवार चंद्राचा म्हणून पांढरा , मंगळवार गणपतीचा आणि मंगळाचा लाल, बुधाचा हलका निळा , गुरूचा पिवळा , शुक्राचा हिरवा आणि शनिचा राखाडी किंवा गडद निळा

हे रंग दिवसानुरूप असतात , जसं रविवार सुर्याचं प्रतिक म्हणून तांबडा , सोमवार चंद्राचा म्हणून पांढरा , मंगळवार गणपतीचा आणि मंगळाचा लाल, बुधाचा हलका निळा , गुरूचा पिवळा , शुक्राचा हिरवा आणि शनिचा राखाडी किंवा गडद निळा

हे माहीत नव्हतं. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद! आज मंगळवारी आहे खरा लाल रंग!

मग ८ व्या आणि नवव्या दिवशी रिपीट का? का काळा ?
>>>>
बायका आणि रिपीट रंग.. .. कल्पना तरी कशी करवते हो लोकांना Happy
काळा रंगही नसावा.. आपल्यात सणांना काळे घालत नाहीत. बहुतेक संक्रांत वगळता..
कुठलेतरी दोन राखीव रंग असावेत..
तरी मला वाटते नवव्या दिवशी ट्रेडीशनल वेअर असते ना?

>>>>>हे रंग दिवसानुरूप असतात , जसं रविवार सुर्याचं प्रतिक म्हणून तांबडा , सोमवार चंद्राचा म्हणून पांढरा , मंगळवार गणपतीचा आणि मंगळाचा लाल, बुधाचा हलका निळा , गुरूचा पिवळा , शुक्राचा हिरवा आणि शनिचा राखाडी किंवा गडद निळा
हे माहीत नव्हतं. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद! आज मंगळवारी आहे खरा लाल रंग!<<<<<<+१.

आमची कामाला येणारी बाई, सुद्धा पेपरवाल्याकडे जावून विचारते आणि साडी नेसते. ती मराठी नाहीये आणि भैय्या आहे आणि काहीच वाचता न येणारी बाई , तिच्या शेजारी पेपर व्कणार्‍या मराठी माणसाला विचारत. सगळे फॉलो करताहेत.

हे सगळ आत्ताच आत्ताच सुरु झालेल आहे त्यातही माग्च्या २-४ वर्शात जास्त पर्टिक्युलरली फॉलोही करतात पब्लिक..

<जसं रविवार सुर्याचं प्रतिक म्हणून तांबडा , सोमवार चंद्राचा म्हणून पांढरा , मंगळवार गणपतीचा आणि मंगळाचा लाल, बुधाचा हलका निळा , गुरूचा पिवळा , शुक्राचा हिरवा आणि शनिचा राखाडी किंवा गडद निळा> कोणत्या ग्रहतार्‍याचा रंग कोणता हे कसं ठरलं?
आणि नवरात्र म्हटल्यावर दोन वार रिपीट होतात, तेव्हा पहिले दोन रंग रिपीट होत नाहीत, ते का?

वार - देवी - रंग असा कॉम्बो करून रंग ठरवून टाकलेत. बाकी कुणी वेगळा क्रम दिला तरी यांचे "लॉजिक" पटते म्हणून लोक यालाच फॉलो करतात. >>
हे लिहिलय की वर! नवरात्रीत ग्रह नी बाकीचे देव कुठून आणलेत? ज्याला जो संदर्भ लावता येतो तो लावतात म्हणा! काहीतरी लॉजिक चिकटवायचा प्रयत्न करायचा. रंग ठरवून घालून मिरवण्याशी कारण!
तसं खरं काही लॉजिक नसलेल्या गोष्टीला लॉजिक चिकटवण यात भारतीयांचा हात कोणी धरू शकणार नाही. कुंकू, जोडवी, पैंजण नी काय काय ला पण आहेतच की लॉजिक लावलेली. मग पुरुषांना या लॉजिकचा फायदा नाही देता येत का विचारलं तर काहीतरी बायकी कारण पण दिलं जातं.
हौस आहे ते हौस म्हणून केलं की बरं नाहीतर वर बऱ्याच जणांनी लिहिलय ना की उगाच एकटं पाडलं जातं वगैरे, तसं होतं.
देवीचे 9 फोटो पाहिलेत, यावर्षी मोदींचे 9 जॅकेटमधले फोटो पाहिलेत. मला तर या ललनांचे फोटो आवडलेत 2015 मधले.

IMG-20151012-WA0000.jpg

हो ना. बनवणार्यांनी मंगळवार बुधवार असे टाकले असते तर दरवर्षी वापरता आले असते. उत्सुकांनी एडिटावे, आम्ही लाभ घेऊ.

मंगळ हा लाल ग्रह आहेच, मंगळवार म्हणून लाल रंग. चन्द्र शुभ्र आहे ते तर डोळ्यांना दिसतंच. सोमवार चंद्राचा वार म्हणून पांढरा रंग.

आधी इतरानी लिहिल्याप्रमाणे ही परंपरा होतीच, मटा ने publicity दिली पण मूळ आयडिया मटाची नाही.

येस! अल्पना इज म्हणिंग राईट. पुपुवर याविषयी चर्चा झाली होती. नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालणं ह्यात प्रथा/ परंपरा किंवा धार्मिकता अजिबात नाहीये. साधारणपणे १९९९-२००० च्या आसपास दक्षिण मुंबईतल्या सरकारी ऑफिसातल्या बायका नवरात्रात ठरवून एकेका दिवशी एकेका रंगाचे कपडे घालत होत्या. पण त्यावेळी सगळ्या ऑफिसचा एक रंग नसायचा. उदा. मंत्रालयाचा हिरवा रंग, एलायसीचा लाल रंग वगैरे प्रत्येक ऑफिस आपापल्या आवडीप्रमाणे ठरवत होतं. आम्ही त्यावेळी नवरात्रात कपड्यांच्या रंगावरून ती बाई कुठल्या ऑफिसात असेल हे ओळखायचो. ती ऱंगांची गंमत हळूहळू ट्रेनचे ग्रूप, सोसायट्या इत्यादी ठिकाणी पसरत गेली. सगळीकडेच मग एकरंग सोहळा साजरा होऊ लागला. पण ट्रेन ग्रूपने लाल रंग ठरवला असेल तर ऑफिसात नेमका हिरवा रंग असायचा. हौशी बायकांची पंचाईत होऊ लागली. मग सगळ्यांना लक्षात ठेवायला सोपं होईल असे सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल असे रंग सगळीकडेच ठरवले गेले. तसेही हे रंग अश्या क्रमाने बरेच जण नवरात्र नसतानाही वापरतात. ह्यात तिथीचा काही संबंध नाही. म्हणजे अष्टमीला हिरवा, पंचमीला लाल असं नसून पहिला सोमवार पांढरा, पहिला मंगळवार लाल असेच दरवर्षी असतात. नवरात्राच्या आठव्या नवव्या दिवशी ही सुसूत्रता थोडी डगमगायची. कारण रंगाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या समजाप्रमाणे रंग घ्यायचा. मटाने आता नवरात्राचा आठवा नववा दिवसही सुकर केला आहे.
नऊ दिवस नऊ रंग हा सगळा हौशीचा मामला आहे. त्यात अंधश्रद्धा, धार्मिकता, परंपरा वगैरे काही नाही. कोणी तसा समज करून घेत असेल तर तो त्या. बु. दो.!

मस्त पोस्ट आल्या आज या धाग्यावर. रोजरोज तेच तेच वाद विवाद निरर्थक चर्च ऐकून कंटाळा आलेला. अश्या पोस्ट येतील तर रोज माबोवर यावेसे वाटेल.

भारी साड्या नेसायची संधी मिळते असं एक कारण ऑफिसातल्या बायांनी दिलं आहे. आपण काय टीका वगैरे करत नाही .उनका पैसा उनकी मर्जी .अपनेको क्या .हा पण कोण नेसून वगैरे आलं नाही तर बोल वगैरे लावत नाहीत.खुशीचा मामला असतो.रोज साडी नेसण्यात रस नसल्याने आणि साडीत काम करायची सवय वगैरे नसल्याने त्या वाटेला जात नाही .

नऊ दिवस नऊ रंग हा सगळा हौशीचा मामला आहे. त्यात अंधश्रद्धा, धार्मिकता, परंपरा वगैरे काही नाही. कोणी तसा समज करून घेत असेल तर तो त्या. बु. दो.! >>>> +१०००

हा पण कोण नेसून वगैरे आलं नाही तर बोल वगैरे लावत नाहीत.
>>>>>

हे असे सगळीकडे होत नाही.
गंमती की सिरीअसली की आडून टोमणे मारणे नक्की काय असते ते समजत नाही पण आल्याआल्या ज्या बायकापोरी ठराविक रंगाचे कपडे घालत नाहीत किंवा घातले तरी घरच्यासारखे वा साधेसेच असले तर अश्यांना आमच्याकडे ईतर बायका, काय ग्ग, घातले का नाहीस आज, हे काय घालून आलीस, जरा चांगले घालायचे ना, तुझ्याकडे ती ब्ल्यू सारी होती ती नेसायचीस ना वगैरे वगैरे फार सुनावतात... आणि मग टी टाईमला फोटो काढायचा पोग्राम होतो त्यात अश्या बायका आपसूक बाजूला सारल्या जातात, किंवा त्याच स्वताहून कोषात जातात. आणि काही जणी तरीही त्यांना उगाच फोटोला चला म्हणून आग्रह करतात. त्यांना ऑकवर्ड वाटले तरी अजून ऑकवर्ड वाटेल हे बघतात.

अर्थात हे काही मी दोष द्यायला लिहिले नाहीये, पण हे असे होते ईतकेच Happy

हे फक्त नवरात्रात होतं असं नाही, एक्सटेंडेड नातेवाईक (चुलत दिराचं इ.)लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांत अश्या ठिकाणी साडी न नेसता कोणीही गेली तरी भरपूर ऐकायला मिळत. घरचं कार्य असेल (हळद-कुंकू) तर मग काही विचारायलाच नको. प्रवाहाविरुद्ध पोहायच असेल तर पाण्याचे फटके तर बसणारच ना!

हे एक हार्मलेस फन सारखे वाटतेय. राजीखुषीचा मामला आहे आणी इतरांवर जबरदस्ती नाही तोवर ठीकच आहे.

Pages