खिडकी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 September, 2017 - 00:50

चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते. ह्या छोट्याश्या खिडकीच्या बगिच्यात फुलपाखरे, पक्षी नांदू लागतात, काही घरटीही करतात. असे खिडकीत चैतन्य खुलते.

घर बांधताना किंवा फ्लॅट घेताना आपल्याला पुरेशी हवा यावी, प्रकाश यावा अशा खिडक्या खोल्यांना असाव्यात एवढाच विचार मनात येतो. पण ह्या खिडक्यांच्या सहवासात आल्यावर आपलं ह्या खिडक्यांशी कधी भावनिक नात जुळत हे कळतच नाही. घरात असताना खिडकीजवळ एखादे दिवस उभं राहून बाहेर पाहील नाही अस कधी होत का हो? उलट मोकळ्या वेळेत आवर्जून खिडकीत जाऊन आपण बाहेरचा परिसर दृष्टीत सामावतो. मग खिडकीबाहेर कोणाकडे तो रस्ता असेल, कोणाकडे सोसायटी असेल, कोणाच्या खिडकीतून डोंगर-नद्यांची दृश्य असतील, कोणाच्या खिडकीबाहेर मैदान असेल, बाजारपेठ असेल, कोणाकडे परसबाग असेल, अंगण असेल. हे खिडकीबाहेरच विश्व ह्या खिडकीतून अनुभवणं हा चाळा म्हणा की विरंगुळा म्हणा पण प्रत्येकालाच असतो. एकांतात ही खिडकी म्हणजे आपली मैत्रीणच होऊन जाते. हिच्या सहवासात मनातील वादळ बाहेर निघून जातात आणि मनातील आनंद वर्षाव येथे रिमझिमतो. उगवते मावळते सूर्य चंद्रही ह्या खिडक्यांत लोभस दिसतात. ए. सी. च्या थंडाव्या पेक्षा खिडकीतून आलेली गार वार्‍याची झुळूक सुखद संवेदना देऊन जाते. खिडकीतले कोवळे ऊन, संध्याकाळ पाहणं, खिडक्यांवर दवाने तयार झालेले गारेगार बाष्प, खिडकीतून दिसणारा आणि ओंजळीत पडणारा पाऊस सार किती उत्साही वातावरण असत.

मलाही माझ्या घरातील खिडक्या अशाच प्रिय आहेत. आम्ही घर बांधताना ठरवलेले की खिडक्या मोठ्या ठेवायच्या जेणेकरून भरपूर हवा आणि प्रकाश घरात खेळेल. पण आता ह्या खिडक्यांशी आता घट्ट ऋणानुबंध जोडले गेले आहेत. सकाळी उठताच मी खिडकीच्या कट्ट्यावर बसून बाहेरचा निसर्ग आणि प्रभात गारव्या चा आनंद वाफाळत्या चहासोबत खास वेळ काढून घेते. ही सकाळची पाच मिनिटे दिवसभराचा उत्साह पुरवितात. किचनच्या ओट्याला लागून असलेल्या तीन भिंतीला तीन खिडक्या आहेत. सकाळी जेवण बनवतानाचे दोन तास ह्या खिडक्यांमुळे सुखकारक होऊन जेवणातही स्वाद आणतात. एका खिडकीतून बागेतील फुले तर दोन खिडक्यांतून पक्षांचे बागडणे, भक्ष्य टिपणे पाहताना आणि किलबिलाट व सोबतीला मोबाइलमधली प्रभातगीते किंवा लतादीदींची गाणी ऐकताना स्वयंपाक कधी उरकतो हे कळतही नाही व कामाचा थकावाही जाणवत नाही .

आमच्या बेडरूमच्या खिडकीतून पाठीमागच्या एका शेताचा भाग दिसतो. त्यातील खोल डबकत्यात पाणी जवळजवळ डिसेंबर जानेवारी पर्यंत असते. ह्या पाण्यामुळे अनेक पक्षी इथे येतात व काहींचे झाडावर वास्तव्यही असते. ह्या पक्ष्यांचे फोटो काढण्याचे आणि निरीक्षण करण्याचे माझे ठिकाण म्हणजे खिडक्याच. आमच्या हॉलच्या खिडकीतून आमच्या घरात कायम बुलबुल ये-जा करतात. वर्षातून तीनदा तरी ते आमच्या झुंबरावर घरटी बांधून पिलांना जन्म देतात. ह्या खिडक्याच त्या पिलांच्या संगोपनाचा मार्ग असतो. नाजूक सूर्यपक्षीही खिडकीच्या ग्रिलवर टुणूक टुणूक उड्या मारतात.

माझ्या मुली श्रावणी आणि राधा यांचा भातुकलीचा खेळही खिडक्यांमध्ये रंगतो. बर्‍याचदा आमची कौटुंबिक गप्पांची मैफिलही खिडकीच्या कट्ट्यावर रंगते. रात्रीचा प्राजक्त आणि रातराणीचा दरवळणारा सुगंध ह्या खिडक्यांमध्ये मन रेंगाळून ठेवतो.

१६ सप्टेंबर २०१७ च्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत पूर्वप्रकाशीत
1505243909979.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मस्त लेख संदिप खरे च्या कवितेतील या ओळी आठवल्या

मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार
मग त्याला आकाशाची आसव लगडणार
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार
मग ऊर फुटून जावस वाटणार
छाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार
मग सारच कस मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार
पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार
बंद नाही पडणार
काय रे देवा…

वर्षा, अनु, कऊ, वेदांती धन्यवाद.
पंडीत वा संदिप खरेंची कविता छानच आहे.

छान लेख Happy
मला खिडकीवर बसून फोटो काढायला खूप आवडतात. बरेचदा मोबाईल हातात घेत माबोवर टाईमपास करताना मी खिडकीवरच बैठक मारली असते. बसण्यासाठी म्हणून मी दूरद्रूष्टीने खिडकीचा कठडा मुद्दाम मोठा करून घेतला आहे Happy

जागू किती गोड लिहिलं आहेस .

खिडकीवर इतकं चांगलं ललित तुच लिहू जाणे >> दक्षिणा अगदी बरोबर लिहिलं आहेस.

खिडकी आणि खिडकीच्या आठवणी खुप छान वर्णन केल आहे. आमच्याही घराच्या खिडक्या मोठ्या आहेत. पावसाळ्यात खिडकीत उभे राहून गरम चहा पित रस्त्यावरून वाहणारे खळखळ पाणी बघताना आणि पावसाचे तूषार झेलताना खुप छान वाटते. उन्हाळ्यात खिडकी समोर फुलणार गुलमोहर डोळ्यांना सुखद अनूभव देऊन जातो.