कथा एका कट्ट्याची

Submitted by कुमार१ on 6 September, 2017 - 05:56

काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेत नोकरीस होतो. संस्थेच्या स्थापनेपासूनच मी तिथे गेलो. यथावकाश तिथे स्थिरावलो. कामाचा व्याप हळूहळू वाढत होता. अनेक सहकारी लाभले होते. सुरवातीच्या एकदोन वर्षांत आम्ही उत्साहाने व जोमाने काम करीत होतो. तेव्हा तेथील व्यवस्थापनाची आमच्याशी वागणूक बरी होती. हळूहळू संस्था विकसित झाली तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली. आता मात्र व्यवस्थापनाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली. सर्वसाधारण नोकरदारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आम्हाला जाणीवपूर्वक दिलेल्या नव्हत्या. व्यवस्थापन आमच्याशी चर्चेस उत्सुक नसायचे. क्वचित झालेल्या चर्चा निष्फळ ठरत. परिणामी संस्थेतील पूर्वीचे उत्साही वातावरण संपुष्टात येऊन ते गढूळ झाले.

ती नोकरी सोडून दुसरा पर्याय बघणे बऱ्याच जणांना जमत नव्हते. त्यामुळे बरेच जण इथला कोंडमारा सहन करीत व धुसफफुसत काम करीत होते. फुरसतीच्या वेळांत जेव्हा आम्ही एकत्र जमत असू, तेव्हा संस्थाचालकांना दूषणे देत आमच्यातील असंतोष व्यक्त करीत असू. ही नोकरी सोडण्याचे धैर्य नाही आणि संघटित होऊन संस्थेशी टक्कर देण्याची हिम्मत नाही, अशा अवस्थेत आम्ही दिवस ढकलत होतो. या रोगट वातावरणाचा आमच्यावर परिणाम होऊन आम्ही वृत्तीने नकारात्मक झालो होतो. जेवण, चहापान इ. निमित्ताने आम्ही एकत्र जमलो की तेव्हाच्या गप्पांमध्ये संस्थेच्या नावाने बोटे मोडणे, हा आमचा एककलमी कार्यक्रम झाला होता.

हे सगळे बदलले पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटे. जर आपण अजून बराच काळ येथे राहणार असू आणि व्यवस्थापनाच्या वृत्तीत बदल होणार नसेल, तर मग आपणच आपल्याला सकारात्मक बनवले पाहिजे, हा विचार दृढ झाला. आपल्या सहकाऱ्यांमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले पाहिजे असे मनोमन वाटू लागले. त्यासाठी काय करता येईल याचा सतत विचार करू लागलो.
एका शनिवारी रात्री पलंगावर पडलेलो असताना अचानक एक कल्पना मनात चमकून गेली. ती म्हणजे आपल्या सहकाऱ्यांचा मिळून एक ‘कट्टा’ जमविणे. परंतु सर्वसाधारण ‘क्लब्ज’ पेक्षा हा कट्टा वेगळा हवा हे महत्वाचे. निव्वळ खाणेपिणे, फालतू गप्पा, कुजबुज व कुचाळ्या असे त्याचे स्वरूप नको. मग माझे विचारचक्र वेगाने फिरू लागले आणि त्यातूनच एका उपक्रमाचा जन्म झाला.

कट्ट्याचा मूळ हेतू असा होता. आम्ही सहकाऱ्यांनी मिळून नियमित स्वरूपात एकत्र जमावे. दर वेळेस आमच्यातील एकाने सुमारे वीस मिनिटे जगातील कोणत्याही विषयावर बोलावे. ते बोलणे माहितीपूर्ण व मनोरंजक असावे. त्यानंतर सुमारे चाळीस मिनिटे त्या विषयावर आमची चर्चा व्हावी. वक्त्याने बोलण्यासाठी त्याच्या पसंतीचा विषय निवडावा. पण, कट्ट्याच्या तासादरम्यान आपले रोजचे कामकाज व त्यातील कटकटी याबद्दल कोणीही एक चकार शब्द काढू नये.

असा कट्टा सुरू झाल्यास आम्ही त्या तासाभरात पूर्णपणे वेगळ्या विश्वात जाऊ, रोजच्या कटकटी विसरू आणि प्रफुल्लित होऊ असे मला वाटले. मी स्वतः या कल्पनेने आनंदून गेलो होतो. आपल्या सहकाऱ्यांना ही कल्पना आवडेल असे मनोमन वाटत होते. मग कट्ट्याच्या स्वरूपाविषयी अजून काही विचार मनात आले. एखाद्या विषयावर एखाद्याने फक्त ‘बोलणे’ एवढीच कट्याची मर्यादा नको. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार भाषण करणे, एखादी कला सादर करणे, वैयक्तिक कलासंग्रहाचे प्रदर्शन, स्लाईड-शो असे विविध पर्याय जरूर ठेवावेत.

हे सगळे विचारमंथन झाल्यावर मी अतिशय खूष झालो. मग काही केल्या झोप येईना. कधी एकदाचा सुटीचा रविवार संपतोय आणि सोमवारी ही कल्पना मित्रांसमोर मांडतोय यासाठी उतावीळ झालो. मग सोमवार उजाडला. नेहमीप्रमाणे आम्ही कार्यालयात आलो. मी तर जेवणाच्या सुटीची आतुरतेने वाट पाहत होतो. जमेल तेवढ्या सहकाऱ्यांना निरोप दिला आणि आजच्या सुटीत वेळ काढून यायला सांगितले. ठरलेली वेळ झाली आणि आम्ही सुमारे २५ जण एकत्र जमलो. मी सर्वांसमोर कट्ट्याची कल्पना मांडली. माझे बोलणे पूर्ण होते न होते तोच त्यांचे चेहरे उत्साही दिसू लागले. मग त्यांच्यातून उत्स्फूर्तपणे, ‘अत्यंत सुंदर कल्पना’, बहुत खूब’, ‘fantastic’ असे अनेक उद्गार निघाले. मंडळी या कल्पनेवर बेहद्द खूष होती.

मग अवघ्या पाच मिनिटात आमच्या कट्ट्याची ‘घटना’ तयार झाली. त्यात सादर करण्याचा विषय हा जगातला वाट्टेल तो असेल, फक्त दोन विषय सोडून – एक, आपले रोजचे कामकाज आणि दोन, व्यवस्थापनासंबंधीच्या तक्रारी ! थोडक्यात, आपल्या करीअर संबंधी काहीही न बोलता जाणीवपूर्वक वेगळा विषय निवडावा, असा त्याचा मथितार्थ होता.
काही जणांना हा कट्टा आठवड्यातून एकदा हवा होता तर काहींच्या मते तो महिन्यातून एकदा ठीक होता. मग पंधरवाड्यातून एकदा हा सुवर्णमध्य निघाला. कट्ट्याचा सूत्रसंचालक ही भूमिका माझ्यावर सोपविण्यात आली. माझे काम असे की वक्त्यांचे वेळापत्रक आखणे, त्यांना संबंधित दिवसाची आठवण करणे आणि प्रत्येक सादरीकरणाचा सारांश टिपून ठेवणे.
दरवेळेचा वक्ता हा १५ दिवस आधी ठरवला जाई. त्यामुळे त्याला विषय निवडणे आणि त्याची पुरेशी तयारी करणे शक्य होई. अशा तऱ्हेने या उपक्रमास सुरवात झाली आणि तो नियमित होऊ लागला. सादरीकरणासाठी आपला क्रमांक लवकर लागावा यासाठी अहमहमिका होती. एकूण आम्हा सर्वांच्यात उत्साह संचारला. लोकांनी निवडलेले विषय हे अफलातून होते. त्यातून प्रत्येकातील सुप्त गुण सर्वांसमोर येऊ लागले. सादर झालेल्या विषयावरील चर्चा तर थांबायलाच तयार नसे. सुरवातीच्या काही वक्त्यांना मी स्वतंत्रपणे गाठून त्यांची या उपक्रमाबद्दलची मते आजमावली. सर्वानी दिलखुलासपणे एक गोष्ट कबूल केली. ती म्हणजे, जेव्हा एखाद्याचा बोलण्याचा दिवस १५ दिवस आधी ठरे तेव्हापासून तो त्या विषयाने अक्षरशः झपाटला जाई. (इथे वाचकांनी हे लक्षात घ्यावे की या कट्ट्याचा काळ हा भारतात आंतरजाल सामान्यांच्या वापरात येण्यापूर्वीचा आहे. त्यामुळे एखाद्या विषयाची माहिती चुटकीसरशी मिळवणे तेव्हा सोपे नसे). तसेच आपले सादरीकरण जास्तीत जास्त चांगले व्हावे यासाठी तो प्रयत्नशील असे. त्यामुळे रोजच्या कामकाजातील त्रास, घरच्या अडचणी आणि जगण्यातील ताणतणाव या सगळ्यांपासून त्याला खरोखर सुटका झाल्यासारखे वाटे.

आता चहापानाच्या वेळेस जेव्हा आम्ही एकत्र जमत असू तेव्हा गप्पा मारण्यासाठी कट्ट्यातले नवे विषय मिळत. एकमेकांतील कलागुणांची सर्वांना माहिती होऊ लागली. परिणामी आमच्यातील जिव्हाळा खूप वाढला. ही सगळी कट्ट्याचीच किमया म्हणावी लागेल.
या कट्ट्यांमध्ये हाताळले गेलेले विषय जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे होते. नाटक-चित्रपट, सहित्य, क्रीडा, थरारक अनुभव, राजकीय-सामाजिक, खाद्यजीवन, अध्यात्म, पर्यटन आणि वैयक्तिक छंद अशा कित्येक क्षेत्रातील विषय सादर होत होते. बहुतांश लोकांनी एखाद्या विषयावर बोलणे एवढेच पसंत केले. पण मोजक्या लोकांनी प्रत्यक्ष कलेचे सादरीकरण, स्लाईड-शो आणि स्वतःच्या संग्रहाचे प्रदर्शन अशा प्रकारे कट्टा सदर केला. नमुन्यादाखल त्यातील काही विषयांचा उल्लेख करीत आहे.

एकजण सिक्कीमला पर्यटन करून आला होता. त्याने त्याच्या सहलीचा सारांश एका वाक्यात सांगितला. तो म्हणाला, “मला तिथे आवडलेल्या गोष्टी म्हणजे – मुले, फुले आणि बायका!” आणि याच क्रमाने तिन्ही गोष्टी आवडल्याचे त्याने नमूद केले. अन्य एकजण त्याकाळी झालेल्या मुंबई - बाँबस्फोटाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्या घटनेचा ‘आँखो देखा हाल’च त्याने आम्हाला सादर केला. त्याने, त्यावेळी वाटलेल्या प्रचंड भीतीमुळे त्याच्या नाडीचे ठोके तिप्पट झाल्याचे सांगितले. हा वृत्तांत ऐकत असताना आम्हा सर्वांच्या नाडीचे ठोकेही नक्कीच वाढले होते.
‘चारोळी’ हा प्रकार त्याकाळी नुकताच प्रकाशित होत होता. एकाने त्यावर त्याचा कट्टा सादर केला. त्यामध्ये चंद्रशेखर गोखल्यांची पुढील चारोळी प्रचंड दाद मिळवून गेली :

‘इथं वेडं असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत’

त्याने ही चारोळी म्हटल्यावर आम्ही बेहद्द खूष होऊन ती पुन्हा एकसुरात तीनदा म्हटली! त्यात म्हटल्याप्रमाणे आयुष्यात आपल्याला हा अनुभव पदोपदी येत असतो.

वैयक्तिक छंदांसंबंधीच्या विषयात एकाने ‘स्वतःची फोटोग्राफी’ हा विषय निवडला होता. बहुतेकांची अशी अपेक्षा होती, की हा गृहस्थ त्याने काढलेले उत्तम फोटो दाखवून त्यावर बोलेल. पण, प्रत्यक्षात त्याने जे सादर केले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेले. त्याने ‘माझ्या फोटोग्राफीतील चुका’ हा विषय ठरवून त्याने काढलेले दहा फोटो आम्हाला दाखवले. त्यातील प्रत्येकात काहीतरी चूक झाली होती आणि ती टाळण्याजोगी होती. आपल्यातले बरेचजण तसे हौशी फोटोग्राफर असतात. अशा सर्वांसाठीच हा विषय मार्गदर्शक व मनोरंजक ठरला. तसेच, आपण केलेल्या चुकांमधूनच आपण सतत शिकत असतो, हा मुद्दा अधोरेखित झाला.
एका क्रीडाप्रेमी सदस्याने ऑलिम्पिक्स आणि फुटबॉल-विश्वचषकांचा इतिहास यावर घेतलेले कट्टे जबरदस्त गाजले. आम्ही सगळे ते मंत्रमुग्ध होऊन ऐकताना वेळेचे भान कुणालाच राहिले नव्हते. सामाजिक कार्यात रस असलेल्या एकाने ‘भारतातील गरिबी व तिचे परिणाम’ हा विषय सादर करताना दारिद्र्यातून उत्पन्न होणारे कुपोषण, रोगराई, बालमृत्यू आणि आत्महत्या या मुद्द्यांचा आढावा घेतला. तो सर्वांनाच अंतर्मुख करून गेला. या विषयामुळे, आतापर्यंत साधारण करमणुकीच्या पातळीवर रेंगाळणाऱ्या आमच्या कट्ट्याला एक वेगळा पैलू पडला.

आमच्या कट्ट्यासारखे अन्य काही इतरत्रही चालू असतात. एकाने हाच धागा पकडून ‘जगामध्ये दीर्घकाळ चाललेले कट्टे’ हा विषय घेतला. परदेशातील एक-दोन कट्ट्यांचा दाखला देताना त्याने सांगितले की की ते सुमारे दीडशे वर्षे चालू असून त्यामध्ये नवीन सभासदाला प्रवेश मिळणे हे महाकठीण असते. त्या कट्ट्यातील कोणी सोडून गेल्यास अथवा निधन पावल्यासच नवीन व्यक्तीला घेतात आणि त्यापूर्वी तिला कठीण चाचणीस सामोरे जावे लागते! हे ऐकल्यावर आपला कट्टाही असा दीर्घकाळ चालो (पण इच्छुकांसाठी खुला राहो) अशी सुखद भावना आम्हाला स्पर्शून गेली.

कट्याच्या पहिल्या वर्षात सभासदांची उपस्थिती ९०% असायची. त्याची लोकप्रियता वाढत होती. बरेच सभासद नियमित येत तर थोडे अधूनमधून हजेरी लावणारे. दुसऱ्या वर्षात कट्टा जरा अनियमित होऊ लागला. पंधरवाड्याऐवजी महिन्याने. काहीना विषय निवडीचा पेच पडल्याने ते येईनासे झाले. तरीही जे हजर असत ते खूष व समाधानी होते. तिसऱ्या वर्षात मात्र कट्ट्याची उपस्थिती रोडावली. एखाद्याचा बोलण्याचा दिवस असताना खुद्द तोच त्यादिवशी दांडी मारे. नियमित मंडळींना याचे वाईट वाटे. ते अनुपस्थितांना भेटून नियमित येण्याचे आवाहन करीत. नंतर मात्र असे ठरले की अनुपस्थितांच्या फार मागे लागायचे नाही. जेवढे हजर राहतील तेवढ्यानी कट्टा नेटाने चालू ठेवायचा. खरं म्हणजे माझ्यासह काहीजणांनी हा कट्टा अखंड चालू राहण्याचे स्वप्न पाहिले होते. काही काळाने आमच्यातील काही जण जरी ही नोकरी सोडून अन्यत्र गेले, तरीसुद्धा सर्वांनी महिन्यातून एकदा तरी भेटून हे चालू ठेवावे अशी आमची खूप इच्छा होती. पण, प्रत्यक्षात ती शक्यता धूसर झाली.

अशा प्रकारे सभासदांच्या घटत्या उपस्थितीतही आम्ही काही मोजके जण कट्टा चालवत राहिलो. दरम्यान आमच्यातील काहींनी ती नोकरी सोडली. त्यामुळे कट्ट्याची उपस्थिती आणखीनच खालावली. तरीही काही काळ आम्ही पाच जण निरनिराळे मनोरंजक व उत्साहवर्धक विषय घेऊन कट्टे करीत राहिलो. शेवटी, एके दिवशी भरलेल्या कट्ट्यामध्ये माझ्यासह अवघे तीन जण हजर होते. आम्ही तिघांनी हा उपक्रम चालू राहिला पाहिजे अशी तीव्र इच्छा व्यक्त केली. हे बोलताना आम्ही खूप भावनिक झालो होतो. पण का कोण जाणे, त्यापुढील कट्ट्याची तारीख काही ठरवली गेली नाही. त्यानंतर कोणीच पुढाकार न घेतल्याने कट्टा संपुष्टात आला.

यथावकाश आम्ही तिघेही ती नोकरी सोडून अन्यत्र स्थिरावलो. त्यानंतर खूप वर्षांनी आम्ही तिघे काही काही कारणाने भेटलो. आम्ही एकमेकांना आलिंगन देत कट्ट्याच्या आठवणी काढल्या. खरे तर आम्ही त्या विषयाबाबत खूप भावनिक होतो. पण, कट्टा पुन्हा सुरू करण्याचा विचार कोणीच बोलून दाखवला नाही. जर आम्ही पुन्हा असा उपक्रम चालू केला असता आणि तो टिकवून ठेवण्यात आम्हाला पुन्हा अपयश आले असते, तर ते आता पचवणे जड गेले असते.

नंतर मी या कट्ट्याबाबत जरा विचारमंथन केले. एक गोष्ट लक्षात आली, की कुठल्याही उपक्रमाला एक ठराविक आयुष्य लाभते. त्याच्याशी संबंधित लोकांना सुरवातीस भन्नाट वाटलेली एखादी कल्पना कालांतराने मिळमिळीत वाटू शकते. त्यात उत्साह व सातत्य टिकविणे हे वाटते तितके सोपे नसते. विशेषतः बुद्धीजीवी उपक्रमांच्या बाबतीत हे अधिकच जाणवते. तेव्हा असा कट्टा दीर्घ काळ चालेल असे स्वप्नरंजन करण्यापेक्षा तो काही काळ का होईना चालला यातच समाधान मानलेले बरे.

तर, अशी ही जन्म-मृत्यू कथा – एका कट्ट्याची. या कट्ट्याने आम्हाला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन दिला तसेच आमचा मनोविकास घडविला. अधूनमधून मी जेव्हा गतायुष्याचे स्मरणरंजन करतो, तेव्हा त्या तीन वर्षांदरम्यान त्या उपक्रमाने जो अवर्णनीय आनंद दिला, त्या आठवणींनी आजही रोमांचित होतो.
******************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘पुरुष उवाच’, दिवाळी अंक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक गोष्ट लक्षात आली, की कुठल्याही उपक्रमाला एक ठराविक आयुष्य लाभते. त्याच्याशी संबंधित लोकांना सुरवातीस भन्नाट वाटलेली एखादी कल्पना कालांतराने मिळमिळीत वाटू शकते. त्यात उत्साह व सातत्य टिकविणे हे वाटते तितके सोपे नसते. विशेषतः बुद्धीजीवी उपक्रमांच्या बाबतीत हे अधिकच जाणवते. तेव्हा असा कट्टा दीर्घ काळ चालेल असे स्वप्नरंजन करण्यापेक्षा तो काही काळ का होईना चालला यातच समाधान मानलेले बरे.
हे पुरेपूर खरे आहे. पण ह्या कट्ट्याची कल्पना करणे आणी ती दीर्घ काळ राबवणे हे सोपे नाही.
सुन्दर उपक्रम आणी सुन्दर लेख !

मस्तच लिहीलय.
माझी बहीण आणि तिचे यजमान त्यांच्या घरी अगदी असाच कट्टा चालवतात. दर वेळेस वेगळा विषय असतो. आज साडे तीन वर्षे झालीत पण अजून तरी फार उत्साहात चालू आहे सगळं. लोकं पण वाट बघत असतात त्या दिवसाची. मी ही मुद्दाम एक दोन वेळा गेले आहे ह्या साठी तिच्याकडे. नंतर ही दोन चार दिवस फार छान वाटत रहात . जायला जमलं नाही तर फोन वर वृत्तांत विचारते .. कोण काय बोललं वैगेरे .

एक गोष्ट लक्षात आली, की कुठल्याही उपक्रमाला एक ठराविक आयुष्य लाभते. त्याच्याशी संबंधित लोकांना सुरवातीस भन्नाट वाटलेली एखादी कल्पना कालांतराने मिळमिळीत वाटू शकते. त्यात उत्साह व सातत्य टिकविणे हे वाटते तितके सोपे नसते. विशेषतः बुद्धीजीवी उपक्रमांच्या बाबतीत हे अधिकच जाणवते. तेव्हा असा कट्टा दीर्घ काळ चालेल असे स्वप्नरंजन करण्यापेक्षा तो काही काळ का होईना चालला यातच समाधान मानलेले बरे. >> ह्याची जाणीव आहे आम्हाला , पण आज मिळणारा आनन्द ही खूप मोठा आहे. उद्या कट्टा बंद पडेल का ह्या विचाराने आजचा आनन्द का कमी करायचा ?

कुमारजी नेहमीप्रमाणेच रोचक लिखाण.
कट्टयाच्या आठवणी वाचून छान वाट्लं. ज्या गोष्टीनी आयुष्य समृद्ध होते त्या गोष्टी जरूर केल्या पाहिजेत.

शेल्फ लाईफ बद्दल एक्दम अनुमोदन.
एका कामाच्या ठिकाणी साऱखे सारखे मॅनेजरच्या नावाने खडे फोडून कंटाळा आल्याने आम्ही ५-६ लोकांनी 'बॅश बोर्ड' असा जाहिर फलक सुरु केलेला. आणि त्यावर कार्टून स्ट्रिप सारखं दर आठवड्याला ऑफिसच्या चांगल्या आणि वाईट पॉलिसी इत्यादी बाबत काही तरी नर्म विनोदी, मर्यादा पाळून काही लिहायचं. ४-५ महिने चालला. प्रोजेक्ट आर्किटेक्ट, सीटीओ, पीएम, सीईओ पासुन सगळे मजा घ्यायचे. एक लघुद्रुष्टीच्या मॅनेजरमुळे बंद पडला.

मस्त लेख. आवडला.
मला कट्ट्यांचा काही अनुभव आहे. पण तिथे केवळ एखाद्या तज्ञ माणसाला दर वेळी बोलावतात. तुमच्या कट्ट्यातील आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्यातल्याच प्रत्येकाला सादर करायची संधी मिळते. सामान्य माणसाजवळसुद्धा सांगण्यासारखे काहीतरी असतेच. त्याला अशा संधीची गरज असते.
परंतु सर्वसाधारण ‘क्लब्ज’ पेक्षा हा कट्टा वेगळा हवा हे महत्वाचे. निव्वळ खाणेपिणे, फालतू गप्पा, कुजबुज व कुचाळ्या असे त्याचे स्वरूप नको. मग माझे विचारचक्र वेगाने फिरू लागले आणि त्यातूनच एका उपक्रमाचा जन्म झाला. >>>>>> हे तर एकदम आवड ले.

@ कुमार१, छान उपक्रम! आपल्या समृद्ध लिखाणकलेला जोपासण्यात त्या कट्ट्याचा नक्कीच हातभार लागला असावा असे वाटते. आपल्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वाचा आदर वाटतो.

सचिन व सागर, मनापासून आभार.
सचिन, तुमचे बरोबर आहे! तुमच्या उत्साह वर्धक प्रतिक्रिया या खूप मोलाच्या आहेत

सर्वांचे आभार. समारोपाच्या निमित्ताने थोडे मनोगत.

हा लेख पूर्वी एका दिवाळी वार्षिकात प्र. झाला होता. तिथे त्यांनी लेखाखाली माझी संपर्क महिती छापली नव्हती. त्यामुळे वाचकांचे प्रतिसाद येण्यास मार्ग नव्हता. त्यातून तो अंक फक्त वार्षिकच अस्ल्याने वाचक काही कळवू शकत नाहीत.

जेव्हा एखदी कल्पना आपल्या डो क्यातून निघते तेव्हा आपल्याला त्याबद्दल ममत्व असते. पण, एकूण या उपक्रमाबाद्दल बाहेरच्या व्यक्तीचे तटस्थ मत घेणे गरजेचे असते. म्हणून हा लेख इथे लिहीला.

आधी वाटत होते की आपल्या एक खाजगी उपक्रमाबद्दल लेख लिहावा की नाही. तसेच, कट्ट्यातील चर्चिलेल्या विषयांबद्दल इतरांना वाचायची काय उत्सुकता ? पण धीर करून लिहीला.
आपणा सर्वांना तो आवडला याचे समाधान आहे.
धन्यवाद !

दिवाळीपूर्व उपक्रम
विविध जुन्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेले माबोकरांचे निवडक साहित्य