सिग्नलची परी आणि मी

Submitted by र।हुल on 1 September, 2017 - 09:27

लाल दिवा बघुनी
थांबलो सिग्नलला
काचेवरती नाजूक
काळा हात फिरला ॥१॥

बघुनी मी अस्वस्थ
थोडा मनांत झालो
हलकेच काच गाडीची
खाली करता झालो ॥२॥

उघडणारी काच बघुनी
डोळे तिचे चमकले
उदास मलूल चेहर्यावरी
हास्य खिन्न विलसले ॥३॥

हातांत मिळताच काही
मनोमन ती हरखली
बघुनी माझ्याकडे ती
खळखळून किती हसली ॥४॥

कृतज्ञतेने हात तिने
माझ्यासमोर जोडले
बघुनी मला मनांत
खजील अपार वाटले ॥५॥

हळूहळू ती पाठीमागे
मागे सरकत राहीली
मनपटलावर माझ्या
माझीच ईशू झळकली ॥६॥

नकळत मी तुलना
मनांत दोघींची केली
दोघींतही मला केवळ
आदिमायाच फक्त दिसली ॥७॥

एवढ्यात खांबावरची
सिग्नल लाल बदलली
मीही हलकेच काच
वरती गाडीची घेतली ॥८॥

प्रतिमा तिची समोर
अंधुक धुसर बनली
मनांत आहेच अजूनही
ती माझ्या रेंगाळली ॥९॥

घरी जातांच सायंकाळी
ईशू माझ्याकडे झेपावली
कडेवरती ती माझ्या
अलगद बाहूंत विसावली ॥१०॥

उचलून ईशूला घेताना
परी सिग्नलची आठवली
नकळत माझ्या डोळ्यांची
कडा अबोल ओलावली ॥११॥

निरागस एक सवाल
ईशूने मजला केला
काय रे बाबा तू
आज कसकाय रडला? ॥१२॥

ऐकूनी तिला खोटं
मी लटकंच हसलो
काही नाही गं पिल्लू
असंच काही बोललो ॥१३॥

ढोंगी किती आपण
जाणिव मला झाली
सुरक्षित समाजाने शाल
एक विषमतेची पांघरली ॥१४॥

―₹!हुल/१.९.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता!!

दोघींतही मला केवळ
आदिमायाच फक्त दिसली >>> हे खूप आवडले Happy

सायु, अक्षय, निरूजी, सुमुक्ताजी,वेडोबा, अनंतजी, तनिष्का, भावनाजी, पंडितजी, शशांकजी, मेघा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे. आपल्या प्रतिसादांमुळे लिहीण्यासाठी नवी उमेद मिळते.
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!!
__/\__ Happy

जबरदस्त मांडलाय आम आदमीच्या भावनांचा कल्लोळ आणि काहीतरी करायची धडपड पण परिस्थितीपुढे हतप्रभ !

Pages