१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.pnghttps://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...

साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० Sad . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती

खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .

डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत Happy )

Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे

हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .

वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .

या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .

साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल Happy आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल Wink
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ? Happy

मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील Happy
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना Happy )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका Happy
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .

बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला Happy
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद नानाकळा . मी हा धागा विसरलोच होतो.

अर्निका ,
केदार आता किती वजन आहे? > ८० -८२ (९० चे २ सायकल्स येऊन गेले Wink )

हा धागा नजरेतुन कसा काय बर सुटला? कदाचित मला वजन कमी करण्याचा प्रश्न सध्या तरी नाही म्हणून दुर्लक्ष झाले असेल माझे. असो.
केदार, तुमची चिकाटी निश्चय संयम वाखाणण्यासारखे आहेत. घरच्यांच्या पाठिंबा हवाच जो तुम्हाला मिळाला हे भाग्य.
माझ्यामते तर कमी केलेल्या वजनाच्या दर किलोमागे तितकी जास्तीची वर्षे "सुदृढ आयुष्य" म्हणुन तुम्ही कमावली आहेत.
कीप इट अप...
(ही माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद)

‘लठ्ठपणा आणि आरोग्य' याबाबत समाजात काही गैरसमज आढळतात.
त्यापैकी ‘लठ्ठ पण तंदुरुस्त’(fat but fit ) हा एक समज गेल्या काही वर्षांत माध्यमांनी रूढ केला आहे.
अलीकडील संशोधनानुसार यात तथ्य नसल्याचे आढळले आहे.
प्रमाणाबाहेर वाढलेले वजन ही हृदयाच्या आरोग्यासाठी घातकच गोष्ट आहे, असा संशोधनाचा निष्कर्ष आहे.
तेव्हा सर्वांनी आपले वजन योग्य ठेवणे हे तंदुरुस्त हृदयासाठी आवश्यकच आहे.

थोडा oddप्रश्न वाटेल, पण तुमच वजन कमी झालं तेव्हा तुमच्या चेस्टवरची चरबी कमी झाली का?माझा मुलगा वय वर्षे १०त्याच वजन कमी होतंय पण त्याची चेस्ट चरबी कमी होत नाहीये.काही व्यायाम असेल तर कळवा .प्लिज

अरे , किती दिवसानी दिसला हा धागा .

दिपिका,
मला चेस्ट वर कधी चरबी नव्हती फारशी , त्यामुळे हा प्रश्नच आला नाही .

संदिप , एका वर्षानंतर उत्तर देतोय , माफ करा .
आज सकाळी ८२.७. रोज सकाळी न चुकता करतोच.
वजनकाटा जर्मनीलाही घेऊन आलोय , त्यामुळे प्रमाणा बाहेर कधी जात नाही.
८५ धोक्याची पातळी ठेवलीय , ती दिसली की परत जोरात Happy

>> १. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)

मला वाटतेय हे टाळायचे पदार्थ लिहिलेत. खायचे नव्हे(?) (बाकी २, ३, ४ मध्ये मुद्द्यानुसार खायच्या/करायच्या गोष्टी आहेत)

स्त्रियांचे वेट लॉस specially गरोदरपणानंतर हे पुरुषांपेक्षा वेगळे असते का.. i found more struggle in it..स्त्रियांच्या वेट लॉस (थयरॉईड ,टाईप 2 डायाबिटीस) वर कोणी लेख लिहिला आहे का.. किंवा कोणी मार्गदर्शन करु शकेल का?

स्त्रियांचे वेट लॉस specially गरोदरपणानंतर हे पुरुषांपेक्षा वेगळे असते का.. i found more struggle in it.>>>> हो. पुरुषाने १५ दिवस चालण्याचा व्यायाम केला तर त्यांच्या वजनात फरक पडतो तेच स्त्रीने केला तर महिना दीड महिना लागतो.त्या मसल्सचे काहीतरी नाव आहे,त्यामुळे हा फरक पडतो.

मी दोन आठवड्या पासून रोज एक तास चालायला सुरुवात केली आहे पण म्हणावा असा फरक आजुन दिसत नाहीये. फक्त एक किलो वजन कमी झाले आहे.
माझी रोजची दिनचर्या खालील प्रमाणे
सकाळी ७:३० ला उठणे. नंतर ९ वाजता नाश्ता, त्यात कधी पोहे कधी उपमा तर कधी दलिया.
१ वाजता जेवण. जेवणात ३ चतकोर भाकरी आणि एक भाजी
४ वाजता एक तास भरभर चालणे. संध्याकाळी ८:३० ला जेवण त्यात ३ चतकोर भाकरी भाजी आणि थोडा भात आमटी (तुरीच्या डाळीची )
१०:३० ते ११ च्या दरम्यान झोपणे .
रविवारी चालण्याचा वव्यायाम करत नाही.
वरील दिनचर्येत काय बदल करावेत म्हणजे अपेक्षित रिझल्ट मिळतील.

आता पुरते दोन बदल करा. सकाळी 6 वाजता उठून 1 तास चालून या आणि रात्री जेवण लवकर म्हणजे झोपे आधी 3 तास करून करून 1 तास चालून या.
10.30 ते 7.30 9 तास झोप? आबाबा लैच नशीबवान तुम्ही.

आता पुरते दोन बदल करा. सकाळी 6 वाजता उठून 1 तास चालून या आणि रात्री जेवण लवकर म्हणजे झोपे आधी 3 तास करून करून 1 तास चालून या.
10.30 ते 7.30 9 तास झोप? आबाबा लैच नशीबवान तुम्ही.>> सध्या आहे नशीबवान पण किती दिवस राहील माहित नाही.

>>>>>> "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका Happy>>>>> बेस्ट!!! असे आपण सतत म्हणत खरच पळवाट काढत असतो.

खूप छान लेख.

हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .>>>
एक साधी गोष्ट करण्या सारखी मला वाटते - सर्वच जण चहा कॉफी च्या सवयीत अडकतो आणि नंतर साखर कमी कशी करावी वैगेरे struggle करतो , परंतु मुलांच्या बाबतीत - मुलांना चहा कॉफी आवडत नसते पण बऱ्याचदा घरातूनच हि सवय लावली जाते. मुलांना आपण हि सवय न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला फायदा होईल.

व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.>>
खूप चांगली टीप , कारण आपण वेळेचा आग्रह धरतो आणि नियमितता जाते ...

आरोग्य चांगले हवे हे ध्येय ठेवायचे की वजन कमी करणे हे ध्येय ठेवायचे .ह्याचा निर्णय घेता आला पाहिजे.
वजन कमी करण्याच्या वेडापायी आरोग्य ची वाट लागते.

वजन कमी झाले की आरोग्य उत्तम होते .
ही आज ची गंभीर अंध श्रद्धा पहिली मनातून काढून टाका.
वजन वाढले की आरोग्य बिघडते ही पण अंध श्रद्धा सोडून ध्या.
ह्या वर एक की दीड लाख लोकांवर अभ्यास झाला आहे.
Bmi आणि आरोग्य ह्याचा काही संबंध नाही

या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे. >> केदार - खूप खूप छान वाटले हे वाचून !!

व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.>>
खूप चांगली टीप , कारण आपण वेळेचा आग्रह धरतो आणि नियमितता जाते ... >>>>>> होय, अगदी खरे आहे. नुकताच मलाही डॉक्टरांनी हाच सल्ला दिला, कारण गेल्या दोन महिन्यात माझे वजन अत्यंत वाढले होते. पण एंडोक्रिनॉलॉजिस्टने कोणतीही औषधे न देता, दिवसातून जमेल तेव्हा नियमितपणे मोकळ्या जागी निदान १ तास तरी भराभरा चालायला सांगितले. एका वेळेस जमणार नसेल तर सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास तरी चालायचा सल्ला दिला. योगामुळे लगेच फायदा होणार नाही (बराच वेळ लागेल), आणि जिमला तर मुळीच जावू नका असेही म्हणाले. जिमिंगने केवळ मसल्स तयार होतात व शरीर स्टिफ होते असे त्यांचे मत होते.

आरोग्य चांगले हवे हे ध्येय ठेवायचे की वजन कमी करणे हे ध्येय ठेवायचे .ह्याचा निर्णय घेता आला पाहिजे.
वजन कमी करण्याच्या वेडापायी आरोग्य ची वाट लागते. >>> हे जरी खरे असले तरी Bmi आणि आरोग्य ह्याचा काही संबंध नाही अशी वेडीवाकडी विधाने करू नका.

Pages