मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दाली / चैत्राली,
कृती न दाखवता मोदक खायला दिले तर अट्टल खवय्यांनाही फरक कळत नाही असा अनुभव आहे. पण असतात एक एक.. मी थोडं थोडं पीठ मळून घेऊन लग्गेच मोदक करून लग्गेच उकडायला ठेवत होते त्यामुळे प्री आणी पोस्ट उकड हा फरक पीठाला कितपत कळला असेल ही पण शंका आहेच Wink
फास्ट फास्ट हुव्या, सादाच पीठ वापर्‍या और मस्त लाग्या. अपून खुष, घरचे खुष. गंपती बाप्पा मोलया.

प्री आणी पोस्ट उकड हा फरक पीठाला कितपत कळला असेल>> खरं आहे Happy उकडीची भाकरी आणि उकड न काढता पीठ भिजवून केलेली भाकरी ह्यातला फरक करणार्‍यालाच जाणवतो, खाणार्‍याला जाणवतोच असं नाही.

आयते मोदक बसून खायला मिळाले तर उकड्/बिना उकड/डायरेक्ट शिजवलेला भात मळून/तांदूळ पिठी मळून लाटून वाफवून यापैकी कसेही चालतील Happy

व्वा! ममो, मस्त सोपी कृती. आणि मोदक तर काय झ्याक दिसतायत. कळ्या खूपच सुंदर आल्यात. सगळे एकाच मापाचे आणि कळ्याचे. __________/\___________ Happy

काय हे, एवढे नवीन मेसेजेस बघून मला वाटलं कुणीतरी या पद्धतीनं केलेल्या देखण्या मोदकांचे फोटो टाकले की काय. घ्या बरं मनावर Wink

ओ असं अचानक इतक्या लवकर धागे वर आणले की आम्हाला कालनिर्णय सहजासहजी अव्हेलेबल नसणार्‍यांना गडबडल्यासारखं होतं ना!! . अत्ता वाटलं ऑ? आली की काय गणेशचतुर्थी! Happy

अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील. >>> मै, हा संदर्भ घेऊन धागा वर आणला... Wink

>>>>< घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. > ह्या वाफा मोजायच्या कशा ?<<<<
कळीचा प्रश्ण!

योकु , बरोबर आहे तुमचं . रंगीत तालीम करायला दोन तीन रविवार हवेतच ना !

दणदणीत वाफा ही खरं तर लिहून explain करून सांगण्याची गोष्ट नाहीये . तेथे पाहिजे जातीचे .

पण खरंच समजलं नसेल तर करते प्रयत्न .

वाफ काढण्यासाठी पदार्थावर झाकण ठेवले जाते . जर मध्ये मध्ये नाही ढवळलं तर पदार्थ नक्कीच खाली लागेल म्हणजे जळेल खालून . दणदणीत वाफ म्हणजे तो खालून लागायला न देण्याच्या क्षणापर्यंत त्यावर झाकण ठेवणे . जस जस पदार्थातल moisture कमी होईल तस तसा दणदणीत वाफ येण्याचा वेळ पण कमी होत जाईल .

बघा मी केलाय प्रयत्न आता आणखी सुधारणा करा जाणकारांनी .

जाई मोस्ट वेलकम .
गणोशोत्सव चालू आहे आणि मोदक नाहीत म्हणून केला अपलोड फोटो .
मधला एक डबल डेकर केलाय.

थोडा चुन उरलाय तर आज ह्या पद्धतीने उकडीचे मोदक करायला तांदूळ भिजत घातलेत. हातसडीचा आंबेमोहोर घेतलाय. घरचाच आहे. बघुया कसे होतात ते.
जुना तांदूळ आहे. ....

सोपी पाकृ आहे.रंगीत तालिम (मातोश्रीच्या परवागनीने) नक्की करण्यात येईल. Happy

गेल्यावर्षी पिठाची उकड काढलेली.ती बिघडली होती. Sad

मला उकडीचे मोदक कधीच जमले नव्हते. नाही जमत एखादा पदार्थ करायला तर काही बिघडत नाही म्हणून मी नाद सोडून दिला होता.
पण काल ह्या पद्धतीने केले, मस्त झाले होते. मनीमोहोर, तुमचे खूप आभार __/\__ Happy

माझ्याकडे बासमती नाहीये... साध्या सोना मसुरी तांदळाचे प्रयोग म्हणून करून पाहावे का? :विचारात पडलेली बाहुली:

हेमाताई, मी गेली २-३ वर्षे तुमची ही रेसिपी वापरून मोदक करते. अगदी प्रदर्शनात ठेवण्याइतके सुबक करण्याची माझी पात्रता नाही. पण लेक आणि त्याचा बाबा आनंदाने खातात.
रेसिपीबद्दल धन्यवाद!

अनया थँक्यू .

हे माझे ह्या वर्षीचे . आज केले. नेहमी मी पान किंवा मलमल च फडकं घालते चाळणीत. आज प्रथमच चाळणीला तेलाचा हात लावून ठेवले

IMG_20190912_205050.jpg

Pages