मायबोली गणेशोत्सव २०१७ - स्वरचित आरत्या

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 01:52

लंबोदरा वंदन करितो तुला
चरणी ठेऊन माथा ||

प्रथम पूजेचा तुला असे मान
ओंकाररुपी तू विद्यमान
मोरेश्वरा तुझे असे नाव
सकल जनांचा तुज ठाई भाव||

कर्ता करविता तू स्वामी जगाचा
त्रिवार दंडवत तुज भक्त गणांचा||

मोरया बाप्पा मोरया||

मायबोली गणेशोत्सव २०१७ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहूया आणि आपली प्रार्थना अनेक मायबोलीकरांकरवी बाप्पापर्यंत पोचवूया. आरत्या लिहिण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

ओवी, भजन, पोवाडा अशा वेगवेगळ्या प्रकारांमधे प्रार्थना लिहू शकता .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुखदायक सुखकर्ता आधार तुझा तू तारण कर्ता
तूच आदी तूच अनंता पाठीराखा भक्तांचा
धावत येरे तू गणराया साद घालतो आता
संकट हरण्या पाठी तू बाप्पा मोरया

सकल कलांचा तू निर्माता
बुद्धीची खरी तू देवता
कोटी कोटी रूपे तुझी
साऱ्या सृष्टीचा तू कर्ता..
मोरया बाप्पा मोरया

ब्रम्हांड रचयिता तू विश्वेश्वरा
विणवितो हात जोडूनी ईश्वरा
शेवटचे मागणे तुला आता लंबोदरा
मिटावे डोळे यावी जाग तुझ्या उरा
मोरया बाप्पा मोरया

दिशा

स्थापना तुझी करतात गणेशा
पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा
धांगडधिंगा अन सैराट वागणे
लाज वाटत नाही लवलेशा

कोठे चाललो आहोत आपण सारे
कधी करणार विचार हे गणेशा
तूच कर आता चमत्कार काही
थांबव या मानवाच्या विनाशा

ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता
फाटून गेले कर्ण या कर्कशा
नाही ठेवीत पावित्र्य सणांचे
सापडत नाही यांना योग्य दिशा

राजेंद्र देवी

गणराया

निरोप घेता विनविले तुज
लवकर यावे ममगृही निज
तरीही येणे एक वर्षाने
दिर्घकाळ वियोग जीवघेणे

तू सकलांचा भाग्यविधाता
मागत नाही काही आता
विसर तुझा कधी न व्हावा
देह तव चरणी झुरावा

तव दर्शने चिंता हरती
मनात विलसे अविरत शांती
मोह माया गळून पडता
चंचल चित्ती येइ स्थिरता

दत्तात्रय साळुंके

गणराया
प्रथमेशा तू तुच गजानन
चरणी तुझिया अखंड वंदन
विघ्न्हारा तव रूप मनोरम
रिद्धी सिद्धीचा इथेच संगम

बुद्धीचा अवतार असे तू
विद्देचा खजिना
सर्व कलांचा तू भवसागर
सर्जनशील कणा

अनंत कोटी रूपे तुझी
अनंत कोटी नावे
कुठल्याही रूपांत
तू मनास भावे

अलौकिकतेने धन्य तुझी मूर्ती
पसरलेली विश्वात तुझीच किर्ती
नको काही आम्हास शिवाय कृपादृष्टि
असु दे छायेत तुझ्या ही सारी सृष्टी
___अक्षय

ओंकारा तू श्रीगणेशा
शिवसुता तू जगदीशा
शरण नाथा शाबरीच्या
मागतो मी आज आदेशा ॥धृ॥

साधनेच्या ह्या ऐलतीरी
तु बैसलासी मुलाधारी
कुंडलिनीच्या उत्थाना
मन माझे व्हावे निर्विकारी ॥१॥

चौदा विद्यांच्या देवा
रिद्धि सिद्धी विनायका
वचनबद्ध तू आम्हाला
हाक देता हाजिर व्हावा ॥२॥

तु आहेस प्रतापवंत
मी गुरूशी निष्ठावंत
मार्ग दावी रे हे अनंत
आम्ही नाथपंथी वरदवंत! ॥३॥

―₹!हुल /२६.८.१७

प्रार्थना
विमलमती दे गजानना
भालचंद्रा सिंदुरारि हिची कामना
लेण्याद्री रमलास गौरीनंदना
लेप रक्तगंधाचा हा गजवदना
सप्रेमे आळवू सिध्दिगणेशा
त्वरा करा या हो गणाधीशा
तत्वमसि तू, गणपती तू
राजसवदना,तू, अधिपती तू
व्यास-शिष्या आता दु:ख हरा
वाढते मोदक, वाहते दुर्वांकुरा
दिवसें-दिवशी मोद भरा
शुभंकरी सुखकरी हो, मयुरेश्वरा
हिची तव चरणी प्रार्थना ....

विजया केळकर __

गणेश वंदना
गजवदना , गजेंद्रा, गणपती
तव स्तवना देई अल्पमती

शिवसुता संगे शोभती रिध्दि- सिध्दी
तव स्मरता देई सद् बुद्धी

प्रदक्षिणा घालूनी मातपिता तोषविले
तव चरणी मी नतमस्तक झाले

मोरया, मृत्युंजय, मंगलमूर्ति
तव प्रार्थिता होवो कामनापूर्ति

मूषकवाहना, शूर्पकर्णका, विनायका
तव भक्तांची हाक आता ऐका

प्रथमेश्वरा, ओंकारा, विद्याधरा
तव वंदिता जोडिले दोन्ही करा
विजया केळकर ____

गणम गणम गजम गजम...गणम गणम... गजम गजम

डोळ्यात अंगार तुझ्या
मुखी तरी हास्य तुक्सय5
दुष्टांवर बरसतो
ऐसा बल्हाळ तू
मुखी तुझे नाव (गणपती बाप्पा मोरया)
गणम गणम गजम गजम...गणम गणम... गजम गजम

वक्रतुंड एकदंत
कैलास पुत्र तू
कामे सिद्ध करण्यासी एकच सूत्र तू
दुष्टांचा वैरी नि आमचा कैवारी तू
एक जात एक धर्म एकच गोत्र तू..
गणम गणम गजम गजम...गणम गणम... गजम गजम
__शेखर

आला निरोपाचा दिस
विसर्जनासाठी भक्तांची लगबग
ढोल ताश्यांचा गजरात
बाप्पा निघाले थाटामाटात
घेतो निरोप आता देवा
तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा
गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या