शब्दांच्या पलिकडले

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 August, 2017 - 12:56

“हाय. काय करत आहेस ?”

“काही नाही रे. पुस्तक उघडून बसले होते बस्स.”

“हो का ? बघू बरं कुठला विषय वाचत आहेस.”

प्राजक्ताने आपल्या पुढ्यातलं भलंमोठं गणिताचं पुस्तक उचललं. तिच्या उजव्या हाताच्या भिंतीवर एक आरसा टांगलेला होता. त्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहून तिने डोळे मिटले अन इमेज मोड ऑन केला.

“बापरे ! खूपच जोरात अभ्यास चाललेला दिसतोय.” तिच्या हातातलं जाडजूड पुस्तक पाहून निसर्ग म्हणाला. तिचं आरशातलं प्रतिबिंब मानसिक तरंगांद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. मोबाईल आणि इंटरनेटचा हा पुढचा टप्पा होता. या तंत्रज्ञानामुळे लोक मोबाईल कानाला न लावता, इंटरनेट समोर न बसता, अगदी तोंडसुद्धा न उघडता एकमेकांशी बोलू शकायचे, स्मृतींचं आदानप्रदान करू शकायचे.

“कशाचं काय रे, पुस्तक उघडं आहे पण डोक्यात काहीच घुसत नाहीये.” प्राजक्ता आपलं डोकं पुस्तकावर आदळत म्हणाली. तिच्या केसांना लावलेलं सुगंधी तेल गणितपानांवर पसरलं.
‘पुस्तक बंद केल्यानंतर डोक्यात जे उरतं तो म्हणजे अभ्यास’
कुठेतरी वाचलेलं वाक्य निसर्गला आठवलं अन तो मनाशीच हसला.

“का हसलास रे ?”

“काही नाही ग. ओय… गच्चीवर खूप मस्त चांदणं पडलंय.”
तो विषय बदलत म्हणाला.

“तू गच्चीवर बसला आहेस का ?”

“हो तर. त्याशिवाय मला कसं कळणार. जा न तूपण टेरेसवर.”

“ओके. दोन मिनीट हं.”
प्राजक्ता हळूच खुर्चीवरुन उठली. पैंजणांचा खोलीबाहेर पडण्याचा आवाज, नीरव शांततेच्या पार्श्वभूमीवरचा लोखंडी जिन्यावरून पावलं वाजण्याचा आवाज...त्यानंतर सामोरी आलेली विस्तीर्ण गच्ची अन कोपऱ्यातली जुनाट खुर्ची. सरतेशेवटी खुर्चीवरची धूळ ओठांच्या फुंकरीने दूर सारण्याचा आवाज उमटला. पण तिथून पन्नास मैलांवर बसलेल्या निसर्गला हे ऐकू जाणं शक्य नव्हतं.
“हा बोल रे.” प्राजक्ता लाकडी खुर्चीवर बसता बसता म्हणाली. खुर्चीच्या हातांवर तिने आपले रेशमी हात टेकवले.
“आलीस का गच्चीवर ?”

“हो. खरंच मस्त चांदणं पडलंय.” प्राजक्ता काळ्याकुट्ट आभाळावर काळेशार टपोरे डोळे रोखत म्हणाली. काही क्षण अबोलतेत निघून गेले.

“तू स्वप्न पाहत असतेस का गं ?”

“हो तर. प्रत्येकजण स्वप्न पाहतो.”

“तुझं एखादं स्वप्न सांग ना मला.” निसर्ग थंडगार गच्चीवर बिनधास्त लवंडत बोलला. दोन्ही हातांचे तळवे त्याने डोक्याखाली उशीसारखे घेतले होते.

“स्वप्न तर रात्री पडतात अन सकाळी विसरून जातात रे.”

“तसं नाही गं. स्वप्न म्हणजे तुझ्या इच्छा, आकांक्षा, भविष्यात तुला काय करायला आवडेल वगैरे वगैरे.”
‘मुलींना प्रत्येक गोष्ट फोडून सांगावी लागते.’ त्याने मनाशी विचार केला.

“अच्छा तसं होय. तू सांग, स्वप्न ऑर इच्छा व्हाटेव्हर यू से”

“प्रश्न मी विचारलाय न आधी.”

“नाही तरीपण तू सांग.”

“ओके. चिंब पाऊस सुरू आहे, विजा कडाडताहेत अन मी स्पेसबाईकवर ढगांच्या मधून उडत चाललोय.”

“एकट्यानेच ?!”

तो बोलावं की नाही बोलावं या विचारात पडला.

“सांग न.”

“नाही… तुझ्यासारख्या एखाद्या मैत्रिणीसोबत.” तो हिंमत करून म्हणाला.
त्याला वाटलं तिला राग येईल पण उलट ती खळाळून हसली.
“माझ्यासारख्या कशाला ? मीच येईल न, अर्थात ट्राफ़िक सुरू असला तर. अशा रात्री जो कधी नसतोच.”

इमेज मोड ऑन करून तिने छानशी स्माइली आठवली अन त्याला पाठवली.

“आता तुझं स्वप्न सांग.” त्याने सूचना केली.

“ओके. आठवते.” ती विचार करू लागली. पाण्याच्या टाकीत काडीने ढवळल्यावर जसा आवाज येईल तशीच अस्पष्ट कंपनं ऐकू येत होती. प्राजक्ता आपल्या इच्छा आकांक्षांची स्वप्नावली ढवळतेय हे त्याच्या ध्यानात आलं. काही क्षणांतच तिने आपल्या नजरेसमोर एक काल्पनिक चित्र तयार केलं.
“निसर्ग, मला कधीकधी कंटाळा येतो रे या सगळ्यांचा. मित्रांना क्वचित भेटणं अन घरी बसून लेक्चर अटेंड करणं. हा प्रचंड कोलाहल, गर्दी अन प्रदूषण. असं वाटतं की या सगळ्यांपासून दूर, अगदी दूर निघून जावं… अगदी दूर जिथे जंगल असेल, डोंगरदऱ्यांना वळसा घालून नदी वाहत असेल. पण नदीचं पात्र अगदी शांत. जणूकाही युगानुयुगांपासुन ती इथेच आहे. जणूकाही तिला कसलीच घाई नाही, सागराला भेटण्याची गडबड नाही. नदीच्या अगदी मधोमध माझी बोट असेल. आजुबाजुला निस्तब्ध, गुढरम्य जंगल, डोईवर पुर्णचंद्र अन आकाशभर पसरलेला त्याच्या सख्याचांदण्यांचा सडा. मी त्या बोटीच्या डेकवर पाण्यात पाय सोडून बसलेले… थंडगार पाण्याचा स्पर्श माझ्या पायांना होतोय…”
मनाच्या दृश्यपातळीवर आलेलं प्राजक्ताचं कल्पनाचित्र निसर्ग काळजीपूर्वक पाहत होता. कल्पनेने तो तिच्या बाजूला जाऊन बसला. दोघांनी हातांत हात गुंफले अन आकाशीच्या चंद्राकडे पाहिलं. निसर्गने प्राजक्ताच्या स्वप्नाला आपल्या स्वप्नाची फोडणी दिली.

मग त्याने टेलीकॉल होल्डवर टाकला अन घाईघाईने पायऱ्या उतरून घरात आला. त्याच्या खोलीत एक छोटासा मेमरी प्रिंटर पडलेला होता. त्याची पिन त्याने डोक्याला चिकटवली. थोड्याच वेळात प्रिंटरमधून त्याला हवं असलेलं कल्पनाचित्र बाहेर पडलं.
‘आज जर प्राजक्ताने माझ्या प्रेमाला होकार दिला तर हे चित्र उद्या मी तिला भेट म्हणून देईन.’ तिला ऐकू जाणार नाही अशा बेताने तो मनाआड बोलला.

“ओय S कुठे आहेस ? आवडलं नाही का माझं स्वप्न ?” प्राजक्ता डोळ्यांच्या भुवया आक्रसून, मनातल्या मनात चढ्या आवाजात बोलली.

“नाही नाही खूप छान होतं. भारीच काव्यात्मक बोलतेस तू तर.”

“हो मग. पॉझिट्रॉन ऐवजी उगाच नाही मी बालकवी घेतलेत ऑप्शनलला.”

“पण असं जंगल शोधायला तुला आफ्रिकेत जावं लागेल. इकडे नाही मिळणार. खी : खी :”

“जाईन की, तू कशाला चिंता करतोयस. आधी तू महाबळेश्वरला गेला होतास त्या ट्रीपबद्दल सांग. खूप मज्जा केली असेल तुम्ही तर.”

“हो खूपच.” निसर्गने अख्खीच्या अख्खी ट्रीप तिच्या नजरेसमोर उभी केली. मनावर ठसा उमटवणारा जेमतेम तीस टक्के भागच त्याला लख्ख आठवत होता. पांढऱ्या रंगाची ती जेटोकार, त्यात बसलेले सात मित्र. महाबळेश्वरचा वळणावळणाचा घाट स्पष्ट दिसत होता. माथ्यावर पोहोचल्यावर जेव्हा निसर्गने डावीकडे पाहिलं तेव्हाचं जावळीच्या खोऱ्यातल्या हिरव्यागार डोंगरांचं मनोहारी दृश्य त्याने प्राजक्ताला दाखवलं.

“वॉव खूपच मस्त आहे रे हे.” तिनेसुद्धा पसंतीची मोहोर उमटवली.

“हो तर. नंतर आम्ही घोड्यांवर बसलो अन रपेट मारली.” निसर्गने मधला भाग कापून दोन तासांनंतरच्या दृश्यावर झेप घेतली.
“मी गुलाबी घोड्यावर बसलो होतो… घोडा उधळला… मी मांड पक्की केली… लगाम खेचला... थोड्याच वेळात घोडा काबूत आणला “

“ये S फेकू नकोस.” तिने त्याच्या स्मृतीरथाला मधेच अडवत म्हटलं. “घोडा उधळला तिथपर्यंत ठीक आहे पण त्यानंतरचे बरेच दृश्य पिवळसर आहेत.”

निसर्ग गोंधळला. मानसिक संभाषणांची एक खासियत होती. ज्या गोष्टी भूतकाळात प्रत्यक्ष घडल्या आहेत त्या धवल रंगात दिसायच्या तर कल्पना, स्वप्ने पिवळसर दिसायची. अर्थात याची तीव्रता ज्याच्यात्याच्या मानसिक क्षमतेवर अवलंबून होती.

“काय घडलं होतं ते दाखव चुपचाप.” प्राजक्ताने खड्या आवाजात सूचना केली.

निसर्गने नाईलाजाने स्मृतीचक्र उलटं फिरवलं. “घोडा उधळला… मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला… शेवटी तोल जाऊन खाली आदळलो… कण्हत कण्हत जमिनीवरून उठलो… सगळे हसू लागले…”

“बस बस बस…” प्राजक्ता मनमुक्त हसत म्हणाली, “मला वाटलंच होतं असंच काही झालं असेल. चांगलीच मजा आली म्हणायची मग सहलीत.” तिचं हसणं काही थांबत नव्हतं.

“मी खूप बढ़ाया मारतो असं वाटत असेल ना गं तुला ?” निसर्ग निराशेने म्हणाला.

“नाही रे पागल, अजिबात नाही.” प्राजक्ता क्षणाचाही विलंब न करता उत्तरली. ती समोर असती तर तिच्या शब्दांची सत्यता त्याला तिच्या डोळ्यांत दिसली असती.

“थँक्स, जाऊदे तो विषय.” निसर्गने विषय बदलत म्हटलं. “तुला आपली फेअरवेल पार्टी आठवतेय का गं ?” त्याने मुद्दामहून पार्टीचा विषय काढला. यामागे त्याचा खास उद्देश्य होता.

“नाहीतर काय, चांगलीच आठवतेय ती पार्टी.”

“किती मजा आली होती नाही. तुझा डान्स खूप मस्त झाला होता.”

“थँक यू. पण माहितीये का मला प्रॅक्टीस करायलापण जास्त वेळ मिळाला नव्हता. क्षितीजा अन उन्मुक्ता जेव्हा…” फेअरवेल पार्टीतल्या आठवणींचा घडाच तिने घडाघडा रिचवायला सुरुवात केली. निसर्ग ते दृश्य काळजीपूर्वक न्याहाळत होता. दोन महिन्यांआधीच्या पार्टीतले कोणते चेहरे तिला स्पष्टपणे आठवतात हे त्याला पहायचं होतं. त्या चेहऱ्यांनी तिच्यावर खासच परिणाम उमटवला असणार होता. प्राजक्ताच्या नजरेचा कॅमेरा चहुदिशांनी फिरत होता. सुरुवातीचे किरकोळ दृश्ये संपल्यानंतर तिच्या नृत्याला सुरुवात झाली. नृत्य सुरू असतानासुद्धा तिची नजर समोरच्या भरगच्च भरलेल्या लॉनवरून फिरत होती. कुणी खुर्च्याँवर बसलं होतं कुणी गप्पा छाटत उभं होतं. एकजण कॅमेऱ्याने शूटिंग घेत होता, चारपाच जण म्युझिक सिस्टीमजवळ उभे राहून काहीतरी खटपट करत होते. गंमत म्हणजे पार्टीतल्या बहुतेक जणांचे चेहरे फिकट, धूसर अंधुक होते.

घटना जेवढी जुनी होत जाते तेवढी विस्मृतीत जाते, धूसर होत जाते. मनावर ठसा उमटवणाऱ्या घटना व आपले खास जवळचे लोक यांचेच चेहरे फक्त आपल्याला स्पष्ट आठवतात. त्यामुळेच प्राजक्ताला अनोळखी अन तोंडओळख असलेले चेहरे अस्पष्ट दिसत होते. फक्त एक कुरळ्या केसांचा मुलगा कार्पेटला अडखळून पडला तो तिच्या थोडाफार लक्षात राहिला होता. याव्यतिरिक्त तिची एक जवळची मैत्रीण अन समोरच्या रांगेत बसलेल्या तिच्या आवडत्या मॅडम यांचेच चेहरे तिला स्पष्ट दिसले.
छे ! एवढेच नव्हे. आणखीही एक चेहरा होता. दूरवरच्या कोपऱ्यात, एका झाडाखाली, थोड्याशा काळोखात, आपल्या मित्रांसोबत उभ्या असलेल्या त्याचा… निसर्गचा चेहराही तिला स्पष्ट आठवत होता !!
“यस्स S” निसर्ग आनंदाने ओरडून गच्चीवर नाचायला लागला. त्याला हेच अपेक्षित होतं. ‘दोन महिन्यांपूर्वीच्या पार्टीतला माझा अंधुक उजेडातला चेहरा हिला स्पष्टपणे आठवतो म्हणजे नक्कीच मी तिच्यासाठी खास असणार. कदाचित माझ्याबद्दल तिच्या मनात प्रेमही असेल.’ निसर्गने कॉल होल्डवर टाकून मनाशी विचार केला.

“प्राजक्ता” तो अत्यंत सौम्य, संयमित स्वरात बोलला.

“काय ?”

“मला तुला काहीतरी सांगायचंय. काहीतरी खास.”

“सांग ना मग.”

तिच्या शब्दांत अधीरता आहे का हे शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. एकवेळ आवंढा गिळून त्याने दीर्घ श्वास घेतला.
“प्राजक्ता… प्राजू… तू मला आवडतेस. मनापासून प्रेम करतो गं मी तुझ्यावर.”

अन त्यासरशी तिच्या मनात विचारांचं प्रचंड काहूर उठलं. निसर्गला त्याच्या सरांनी सांगितलेला आधुनिक मानसशास्त्राचा नियम आठवला,
“माणसाचा मेंदू एखाद्या रंगमंचासारखा असतो. त्याचे विचार म्हणजे स्टेजवर वावरणारी पात्रं. ही पात्रं हवा तसा साज चढवतात, प्रेक्षकांना आकर्षित करणारे संवाद फेकतात. आपण लोकांशी बोलतो ती वाक्य म्हणजे हे संवाद होत.
रंगमंचाच्या पाठीमागे एक झिरझिरीत पडदा असतो. नाटक सुरू असतानादेखील त्या पडद्यामागे धावपळ सुरू असते, कुजबुज सुरू असते. मनाचंही तसंच आहे. बऱ्याचवेळा आपण बोलतो एक पण मनात मात्र वेगळेच विचार सुरू असतात.हे विचार म्हणजे पडद्यामागच्या मनातली कुजबुज होय. ही जेवढी जास्त तेवढा मनाचा गोंधळ जास्त.

प्राजक्ताच्या मनातली कुजबुज प्रचंड वाढली होती. एवढा कसला हा गोंधळ ? ती काय विचार करतेय मला कळायलाच हवं. निसर्गने आपले डोळे घट्ट मिटले, मनाची सगळी शक्ती, सगळं लक्ष एकवटून तिच्या मनाच्या पडद्यामागील विचारद्वंद्व ऐकण्याचा प्रयत्न केला अन तेवढ्यात तिच्या मनातले काही विचार, स्मृतीचित्रे एकमेकांशी भांडत, तिच्याच नकळत पडद्याला धक्के मारून रंगमंचावर अवतरले. त्या विचारांमध्ये फक्त निसर्ग नव्हता, यशही होता... अधूनमधून विजेसारखा चमकून जाणारा.
“तुला कुणी दुसरा आवडतो का ?”

“अम्म… नाही म्हणजे…”
त्याचे चित्र पुसट होत जाऊन यशबद्दलचे विचार, स्मृतीचित्र गडद होऊ लागले.

“ गंमत केली ग वेडे. तुला खरं वाटलं की काय” तो मनातलं दुःख दडवून हसत बोलला… हास्यामागे अश्रू दडवून मनसोक्त रडला.

########################

Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ गंमत केली ग वेडे. तुला खरं वाटलं की काय” तो मनातलं दुःख दडवून हसत बोलला… हास्यामागे अश्रू दडवून मनसोक्त रडला. Sad
छान लिहीलंय नेहमीप्रमाणे कल्पनेच्या जगात फिरवून आणलंत... Happy

“ गंमत केली ग वेडे. तुला खरं वाटलं की काय” तो मनातलं दुःख दडवून हसत बोलला… हास्यामागे अश्रू दडवून मनसोक्त रडला.
भारीय हे.

मस्त

नेहमीप्रमाणे मस्तच Happy
त्या दोघांसोबत आम्हीही सैर केली ह्या तंत्रज्ञानाची.

छानच.. Happy

छान कल्पना.
पण तिच्या उत्तराची तर वाट बघायची. मनात येतं काहीही येतं.